ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य एम.पी. तथा मधू पाटील यांनी त्यांच्या ‘खारजमिनीतील रोप’ या आत्मकथनाला असे वेगळे शीर्षक का दिले? खारजमिनीतील रोप छोटे, ठेंगणे! भात कणसाभोवती वाढणारे असते, ते रोप पाखरांशी मैत्रीसंबंध जोडते. पाखरांची गुणगुण ही त्या रोपाला आनंद देते. म्हणून त्यांनी त्यांचे आत्मकथन खार -जमिनीतील रोपाला अर्पण केले आहे. त्या मनोज्ञ अर्पणपत्रिकेवरून, मधू पाटील यांच्या संवेदनशील, सुसंस्कृत आणि तितक्याच हळव्या मनाची झलक कळते. ती जाणीव पुढे, पुस्तक वाचत असताना सातत्याने होते.
पाटील हे आगरी समाजाचे. त्यांच्या दृष्टीने ती जात मागासवर्गीय समाजापेक्षा थोडी वर असणारी. पाटील हे सर्वात लहान. त्यांचा जन्म होण्यापूर्वी शेजेवरून पिवळाधमक नाग गेला. त्यांच्या वडिलांना तो शुभशकुन वाटला. त्यांनी मुलाला भटाबामणांच्या मुलाप्रमाणे शिकवण्याचे ठरवले. मोठे कुटुंब. तीन एकर खारी जमीन. कष्टाचे जीवन. वरी-नाचणी-वांगी-मिरच्या-वाल-घेवडा-कलिंगडे यांचे उत्पन्न… आषाढ महिन्यात शेतीची कामे उरकल्यानंतर रामविजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत अशा पोथ्यांचे वाचन होई. गावची मंडळी गोकुळ अष्टमीला येत. जेवणावळी उठत. मधू मोठा झाला तसा तो पोथी वाचनानंतर अर्थ सांगू लागला. त्याच्यावर त्या वयातच मराठी भाषेचे आणि मराठी संस्कृतीचे संस्कार झाले रूपही लोभस. वैशाख मासात गावात मारूती सप्ताह साजरा होई. त्यावेळी एकदा ‘गोकुळ चोर’ हे नाटक बसवण्यात आले. त्याच्या मोठ्या भावाने छोट्या मधूला कृष्णाची भूमिका करण्यास पुढे केले. त्यानंतर मधूने नायक-नायिकेच्या भूमिकेपर्यंत मजल मारली. गावातील भजनी मंडळातही मधूने अभंग गाण्याचा परिपाठ ठेवला. त्याचा आवाज गोड आणि त्यामुळे मधूचे कौतुक सर्वजण करत. नव्या युगात त्यांच्या त्या रम्य गावाचे रूपांतर कसे झाले आहे, त्याचेही वर्णन वाचकाला अंतर्मुख करणारे आहे. गावात टीव्ही आले. भजन मंडळ – नाटक बंद झाले. खाड्यांतील मासे घरीदारी वाटणे थांबले. बैलगाड्या कालबाह्य झाल्या. मोटार सायकली, फोर व्हीलर धावत आहेत. सिमेंटकाँक्रिटची घरे, नळाचे पाणी, विजेचे दिवे आले. लग्नसमारंभांत बेंजो आला. बिअरच्या बाटल्या आल्या. चंगळवादी संस्कृतीची दाट छाया त्या भागावर पसरली आहे!
पाटील यांनी आत्मकथनामध्ये सर्व सविस्तर लिहून, जणूकाय आजची स्वार्थ, जातीयता, धर्मांधता यांनी पोखरलेली राजकीय व्यवस्था आणि स्वातंत्र्यलढ्याचा नेत्रदीपक काळ यांमधील विरोधाभासच अधोरेखित केला आहे.
खार जमिनीतील रोप
लेखक : प्रा. एम. पी. तथा मधू पाटील
प्रकाशक : राजेंद्र प्रकाशन, गिरगाव, मुंबई
पाने : १३२, किंमत : १५० रुपये
– प्रा. पु.द. कोडोलीकर 9730942444
(‘जनपरिवार’ वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)
लेख छान आहे. जुन्या…
लेख छान आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मी अलिबागचा. Pramod Karulkar
अलिबाग कॉलेज मध्ये आमच्या वर्गाला प्रा मधु पाटील मराठी शिकवीत असत. मंत्रमुग्ध करणारा तास असे. ” प्रतिभा म्हणजे काय?’ या विषयावरची भाषणे त्यांची स्वतःची फार आवडती होती। त्यांनी मला, ऐपत नसली तरी, अलिबाग कॉलेजच्या परिघा पलीकडे शैक्षणिक धेय्य बाळगायला उत्तेज्जन दिले.
Comments are closed.