एखादे व्यंगचित्र किती खळबळ माजवू शकते याचा अनुभव भारतातील नागरिकांनी घेतला, मुंबईतील असीम त्रिवेदी या तरुण व्यंगचित्रकाराच्या एका व्यंगचित्रामुळे. त्याच्याविरुद्ध त्याबद्दल देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. मात्र त्या विरुध्द जनक्षोभ उसळताच तो मागेही घेण्यात आला. म्हणूनच वृत्तपत्रामधील शंभर अग्रलेखांचे काम एका ‘मार्मिक’ व्यंगचित्राने होऊ शकते असे म्हणतात. व्यंगचित्र म्हणजे सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमधील विसंगती-विरोधाभास प्रकट करून त्यातून समाजप्रबोधन करण्याचे प्रभावी माध्यम. त्यामुळे कोणतेही वृत्तपत्र उघडले, की त्यामध्ये व्यंगचित्र हमखास नजरेस पडते. ‘व्यंगचित्रां’चा केवळ अभ्यासू वाचक नव्हे तर साक्षेपी संग्राहक मराठवाडयात आहे. त्या कलंदर व्यक्तीचे नाव आहे, मधुकर धर्मापुरीकर. त्यांनी व्यंगचित्रांचा मोठा खजिना नांदेड येथील भाग्यनगरमधील त्यांच्या बंगल्यात आस्थेने जतन करून ठेवला आहे.
मधुकर धर्मापुरीकर नांदेड जिल्हा परिषदेत वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून २००७साली सेवानिवृत्त झाले. ते मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधारचे. त्यांचे शालेय शिक्षण तेथे झाले. जन्म १९५४ सालचा. धर्मापुरीकर यांना लहान वयापासून विनोदी लेखन वाचण्याची आवड निर्माण झाली होती. नामवंत विनोदी साहित्यिक पु.ल. देशपांडे यांची ‘अपूर्वाई’ , ‘पूर्वरंग’ आदी पुस्तके म्हणजे त्यांचा जीव की प्राण. त्यामधील प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांनी रेखाटलेली चित्रे तर त्यांना फारच भावली. शि.द.फडणीस यांच्याप्रमाणेच वसंत सरवटे यांचीही व्यंगचित्रे त्यांना आवडतात. त्यांना वृत्तपत्रे, मासिके व अन्य नियतकालिकांमधील ‘व्यंगचित्रे’ आवडीने पाहण्याचा नादच लागला. ते नांदेडला होळी या जुन्या भागात एकदा गेले असता तेथे त्यांना रद्दीच्या दुकानात ‘इलेस्ट्रेटेड विकली’ चा केवळ व्यंगचित्रांचा खास अंक मिळाला. त्यांनी त्या अंकातील सर्व व्यंगचित्रे तेथेच काढून घेतली. आर. के. लक्ष्मण यांची ‘इलेस्ट्रेटेड विकली’ मधील ती व्यंगचित्रे धर्मापुरीकर यांना अनमोल वाटली. तेथून त्यांनी व्यंगचित्रे जमवण्यास प्रारंभ केला.
धर्मापुरीकरांनी १९८२ पासून स्वतःच ‘व्यंगचित्रे’ काढण्यास प्रारंभ केला. ‘दीपावली’च्या दिवाळी अंकासाठी पाठवलेल्या त्यांच्या एका व्यंगचित्राला त्या वर्षी तिस-या क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला. मात्र चित्रकलेचे प्रशिक्षण वा अभ्यास झालेला नाही म्हणून ‘व्यंगचित्रे’ काढणे त्यांच्या मनाला प्रशस्त वाटले नाही. म्हणून त्यांनी ‘व्यंगचित्रे’ काढणे बंद केले आणि ‘व्यंगचित्रे’ गोळा करून त्यांचा अभ्यास करणे याला प्राधान्य दिले. अनेक आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकारांची ‘व्यंगचित्रे’ कात्रण स्वरूपात आणि व्यंगचित्रांवरील दीडशे ते दोनशे पुस्तके त्यांच्या संग्रहात आहेत. त्यांनी सुमारे एक लाख ‘व्यंगचित्रे’ वर्गवारी करून फाईल्समध्ये लावली आहेत. त्यांच्याकडे ‘न्यूयॉर्कर’ या अमेरिकन नियतकालिकातील व्यंगचित्रांचा संग्रह असलेली सीडी आहे. त्या संग्रहात वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांबरोबर फ्रेंच व्यंगचित्रकार सेम्पे यांचे ‘सन्नी स्पेल्स’ आणि ‘एवरीथिंग कम्प्लीटेड’ तसेच ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांच्या ‘पोनी’ व्यंगचित्रांचा समावेश आहे.
पुस्तकांमध्ये प्रामुख्याने आर. के. लक्ष्मण, शि. द. फडणीस, वसंत सरवटे, प्रभाकर ठोकळ, श्याम जोशी यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. धर्मापुरीकर व्यंगचित्रांचा केवळ संग्रह करून थांबले नाहीत तर त्यांनी आर. के. लक्ष्मण, शि. द. फडणीस यांच्यासारख्या नामवंत व्यंगचित्रकारांच्या निवडक व्यंगचित्रांच्या स्लाईडस तयार करून घेतल्या. त्यांनी त्या स्लाईडच्या आधारे व्यंगचित्रांचे महत्त्व पटवून देणारा अर्ध्या तासाचा ‘व्यंगचित्रांची दुनिया’ हा कार्यक्रम तयार करून तो रसिकांसमोर सादर करतात. व्यंगचित्र पाहताना केवळ त्यातील विरोध किंवा उपहास पाहिला जातो. त्यापलीकडे जाऊन व्यंगचित्रांतील विनोदाचे वैशिष्ट्य, व्यंगचित्रे कशी पाहावीत, कशी वाचावीत, त्यांचा आस्वाद कसा घ्यावा याची माहिती देणारा तो कार्यक्रम आहे. धर्मापुरीकरांनी तो कार्यक्रम पुणे, विदर्भ, पणजी, अमरावती, वाशिम सार्वजनिक वाचनालय इत्यादी ठिकाणी सादर केला असून कार्यक्रमाचे रसिक प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. धर्मापुरीकर यांनी ‘अंतर्नाद’ या दर्जेदार मासिकात ‘व्यंगचित्रांच्या जगात’ हे सदरही चालवले. ते लोकप्रिय ठरले.
येथे २००६ साली जानेवारी महिन्यात झालेल्या नाट्यसंमेलनात धर्मापुरीकर यांनी केवळ नाटकांबाबतच्या व्यंगचित्रांचे खास दालन उभारले होते. त्या दालनालाही रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. धर्मापुरीकर यांनी नांदेड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय मनोविकार तज्ञांच्या सेमिनारमध्ये ‘मनोविकास’ या विषयावर आधारित व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवले होते. ‘डिलाइट इन मॅडनेस’ या नावाने आयोजित केलेल्या त्या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते व मनोविकारतज्ञ मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
धर्मापुरीकर सांगतात, की संग्रह करण्याची वृत्ती त्यांच्या अंगी लहानपणापासूनच होती. ते शाळेत असताना क्रिकेटपटूंच्या फोटोंचा संग्रह करत असत. त्यानंतर त्यांनी व्यंगचित्रे जमवण्यास सुरूवात केली. व्यंगचित्रांसोबत उर्दू शायरी आणि शेर हा त्यांचा आवडीचा विषय. त्यांच्याकडे उर्दू शायरी आणि शेरांचा संग्रह आहे. दिल्लीच्या ‘जामिआ मिलिआ इस्लामिया विद्यापिठा’कडून त्यांनी उर्दूचा पोस्टल कोर्स केला. उर्दू शायरींच्या आस्वादाबाबत त्यांनी ‘जानिबे मंझिल’ हा ब्लॉगही चालवला. त्यांचे त्या ब्लॉगवरील लेखनाचे ‘जानिबे मंझिल’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ब्लॉगवरील लेखनाचे पुस्तक प्रकाशित होण्याचा प्रकार अद्याप महाराष्ट्रात रूजलेला नाही. त्यामुळे हे पुस्तक विशेष ठरते.
धर्मापुरीकर यांनी महाराष्ट्रातील बहुसंख्य व्यंगचित्रकारांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन व्यंगचित्रांबाबत सविस्तर चर्चा केली आहे. मधुकर धर्मापुरीकर हे व्यंगचित्र या विषयावर विस्तृतपणे लेखन करणारे महाराष्ट्रातील एकमेव लेखक आहेत. प्रसिद्ध व्यंगचित्रकार वसंत सरवटे व धर्मापुरीकर यांचा निरनिराळ्या व्यंगचित्रांबाबत जो पत्रव्यवहार झाला त्याला पुढे ग्रंथाचे स्वरूप दिले गेले. त्या दोघांचा हा पत्रव्यवहार ‘व्यंगचित्र : एक संवाद’ नावाच्या ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला आहे. त्या पुस्तकास महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. तसेच ‘रेषालेखक वसंत सरवटे’ (राजहंस प्रकाशन), ‘हस-या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले’ (मॅजिस्टिक) ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. मधुकर धर्मापुरीकरांनी शंभरापेक्षा जास्त कथा लिहील्या आहेत. त्यांचे ‘अप्रपू’ (महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त) आणि ‘रूप’ (मौज प्रकाशन), ‘विश्वनाथ’ (मॅजिस्टिक प्रकाशन) हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. यापैकी ‘विश्वनाथ’ या कथासंग्रहास ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ (पुणे), ‘आपटे वाचनमंदिर’ (इचलकरंजी) आणि ‘वसंत गाडगीळ पुरस्कार’ (मुंबई) असे महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठीत लघुतम कथा लिहील्या जात नाहीत. हिंदीत तसे विपुल लेखन आढळते. धर्मापुरीकर यांनी ‘चिनकूल’ हा लघुतम कथांचा संग्रह प्रसिद्ध केला आहे. (चिनकूल हा कन्नड शब्द असून त्याचा मराठीतील अर्थ ‘लहान’ असा होतो.) त्याचबरोबर धर्मापुरीकरांनी आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी अॅण्ड फ्रेंड’ या दोन पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला आहे. ती पुस्तके साकेत प्रकाशनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
व्यंगचित्रांच्या अभ्यासामुळे उपहासात्मक लेखन करण्यास प्रोत्साहन मिळते असा धर्मापुरीकर यांचा दावा आहे आणि त्यांनी त्यांचा तो दावा सुमारे साठ उपरोधिक कथा लिहून सिद्ध करून दाखवला आहे. मधुकर धर्मापुरीकर सेवानिवृत्त झाले असून व्यंगचित्रांचा आस्वाद रसिकांना मिळावा म्हणून त्यांची सतत धडपड चालू असते. म्हणूनच धर्मापुरीकर हे व्यंगचित्रांचे ‘साक्षेपी संग्राहक’ आहेत हे कोणीही मान्य केल्याशिवाय राहणार नाहीत.
श्रीकांत नारायण कुलकर्णी गेली चाळीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘प्रजावाणी’, ‘तरुण भारत’, ‘लोकसत्ता’ अशा विविध वृत्तपत्रांमध्ये संपादकीय विभागात काम करून ते निवृत्त झाले. ते सध्या मुक्त पत्रकार म्हणून पुण्यात काम करतात. त्यांनी आतापर्यंत विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि इतर नियतकालिकांमधून विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. त्यांना साहित्याची – विशेषता: बालसाहित्याची आवड असून कविता, कथा, विनोदी लेख, चित्रपट परिक्षण अशा विविध पद्धतीचे लेखन त्यांनी केले आहे. आजपर्यंत त्यांची बारा पुस्तके प्रसिद्ध झाली असून छांदिष्ट व्यक्तींवर लिहिलेल्या ‘असे छन्द असे छांदिष्ट ‘ आणि ‘जगावेगळे छांदिष्ट’ या दोन पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. कुलकर्णी स्वत: ‘छांदिष्ट’ असून ते दगडांमधून पशुपक्ष्यांच्या आकारांचा शोध घेतात. ते ‘निर्मळ रानवारा’ या ‘वंचित विकास’ संचलित बालमासिकाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी विविध दिवाळी अंक, विशेषांक, आणि निवडक पुस्तकांचे संपादन केले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9422319143
Feel very proud of you and Feel very proud of you and your work. May the Almighty give you more energy and skill to produce similar more creative work. High regards,
Feel very proud of you and
Feel very proud of you and your work. May the Almighty give you more energy and skill to produce similar more creative work. High regards,
Comments are closed.