पुण्याचे मकरंद टिल्लू एकपात्री कार्यक्रमासाठी बीडला गेले होते. त्यांना परतताना वाटेत आष्टी गाव लागले. गुरांसाठी चारा छावणी तेथे होती. टिल्लू म्हणाले, “अंगावर जराही मांस नसलेली ती गुरे पाहून मनाला त्रास झाला. वाटले, पाण्याची इतकी भीषण टंचाई असताना पुण्यात किती पाणी वाया जाते!” त्यांना त्याची खंत वाटली. त्यांचे त्यातून सुरू झाले ‘अनाथ नळांसाठी’ हे अभियान!
करंगळीच्या आकाराच्या निम्मे पाणी नळातून सतत वाहत असेल, तर त्या एका नळातून दरवर्षाला सुमारे पाच लाख लिटर पाणी वाहून जाते. पाण्याची एक लिटरची बाटली विकत घेण्यासाठी वीस रुपये पडतात. म्हणजे मग त्या एका गळक्या नळातून एका वर्षात एक कोटी रुपयांचे पाणी वाहून जात आहे, असा विचार केला तर !… ते विचारसूत्र ‘अनाथ नळांसाठी’ या अभियानामागे आहे. गळती फक्त साठ ते शंभर रुपयांचा नळ लावून थांबवता येते!
टिल्लू यांनी सरकारी ऑफिसांमध्ये, बस स्थानके-रेल्वे स्टेशने-शाळा यांमध्ये चकरा मारून पाण्याची गळती का-कोठे आहे ते बघण्यास सुरुवात केली आणि लक्षात आले, की गळती तर आहेच; परंतु त्याहून जास्त लोकांमध्ये त्याबद्दल अनास्था आहे! टिल्लू यांना वाटते, की लोकांमध्ये पाणी वाचवायला हवे याविषयी संवेदनशीलतेचा अभाव आहे. टिल्लू ‘रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईम सिटी’चे अध्यक्ष आहेत. ‘रोटरी’तर्फे दोनशेहून अधिक देशांत चौतीस हजारांहून अधिक क्लब्जमार्फत सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. टिल्लू यांनी ठरवले, की ‘पाणी वाचवा अभियान’ उभारायचे!
सहसा, लोक मार्च महिन्यात ‘पाणी वाचवा’ म्हणू लागतात. टिल्लू यांनी १ जुलै २०१२ पासून पावसाळ्यातच ‘पाणी वाचवा अभियाना’ला सुरुवात केली. अभियानाचे बारसे केले – ‘एक कोटी लिटर पाणी वाचवा अभियान’! त्यांनी अभियानाचे चार टप्पे योजले –
अभियानाची सुरुवात म्हणून पुण्याच्या ‘बालगंधर्व’ चौकातील ‘गंधर्व’ हॉटेलपासून जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता अशी रॅली काढली गेली. त्यामध्ये ‘रोटरी’ सदस्य, ‘नवचैतन्य हास्ययोग परिवार’ सदस्य, ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’तील विद्यार्थी सहभागी झाले. सहभागींनी रॅलीत व नंतरही आजुबाजूला ‘पाणी वाचवा’ प्रचार सुरू केला. पहिला रोख हॉटेलांवर! ते अभियान दोन पातळ्यांवर – मोठी हॉटेल्स व ‘अमृततुल्य’ (चहाची दुकाने) – राबवण्यास सुरुवात केली.
टिल्लू अभियानात सहभागी होण्याचा फायदा हॉटेलांना सांगू लागले –
१. हॉटेलमधील सुमारे सत्तर टक्के पाणी वाचते, २. जेथे पाणी थंड करून दिले जाते, त्या ठिकाणची वीज वाचते,
३. वेटरवरील अनावश्यक ताण वाचतो, ४. टंचाईच्या काळात टँकरवरील खर्च वाचतो, ५. मुख्य म्हणजे मालक आणि ग्राहक दोघांनाही चांगल्या सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद मिळतो.
टिल्लू व साथीदार यांनी सुमारे सातशे हॉटेल्समध्ये जाऊन समाज प्रबोधन केले. त्यामुळे अनेक हॉटेलांमध्ये पाणी देण्याची पद्धत बदलली आहे. ‘अमृततुल्य’मध्ये सर्वात छान प्रतिसाद मिळाला. बहुसंख्य अमृततुल्य हॉटेलांत ग्लासमध्ये नाही तर बाटल्यांतून पाणी देतात. “एक ‘टिल्लू’ सुरुवात आता मोठा परिणाम करत आहे” – टिल्लू यांचा शेरा!
टिल्लू यांना गळणारे नळ बदलण्याची कृती होत नाही हे फार खटकते. त्यांच्या ध्यानी आले, की ‘मजूर अड्ड्या’त तुटक्या नळातून पाणी दिवसभर वाहत असते. त्यांच्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला तेथून सुरुवात झाली. टिल्लू यांनी जनजागृतीसाठी ‘जलरक्षक प्रबोधिनी’ संस्था स्थापन केली आहे. त्यांचे उद्दिष्ट एक लाख जलरक्षक तयार करण्याचे आहे. टिल्लू पुण्यातील एका शाळेत कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांनी मुलांना कार्यक्रमात हसवून झाल्यावर, वेगळा उपक्रम केला. त्यांनी पाण्याची किती गळती होत आहे ते पाहण्यासाठी मुलांना घेऊन शाळेत एकत्र चक्कर मारली. शाळेच्या स्वच्छतागृह-शौचालयातील नळ गळका होता. त्या नळाला पाण्याची बाटली लावली, तर ती बाटली किती वेळात भरते यावरून वर्षाला किती पाणी वाया जाते याचा अभ्यास मुलांना करून दाखवला. मुले ती बाटली सर्वांसमक्ष धरून स्वच्छतागृहांमध्ये उभी राहण्यास लाजू लागली. टिल्लू म्हणाले, “मी बाटली धरतो, ती बाटली किती वेळात भरते ते तुम्ही बघा.” एक लिटरची बाटली एक मिनिट पंधरा सेकंदांत भरली. त्याचाच अर्थ पाच मिनिटांत चार लिटर, दिवसाला एक हजार एकशेबावन्न लिटर आणि वर्षाला चार लाख वीस हजार लिटर वाहून जातो पाण्याचा खजिना!
मुलांनी संपूर्ण शाळेत एकूण गळती वर्षाला सुमारे बावीस लाख लिटर होत होती असा अंदाज बांधला. तो उपक्रम ‘वनराई’ संस्थेच्या सहकार्याने आणखी काही शाळांमध्ये राबवला गेला. त्या अभियानात त्र्याऐंशीहून अधिक शाळांतील सदतीस हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विविध शाळा, कॉलेजे, रोटरी क्लब, वनराई, चेंज मेकर्स, वसुंधरा स्वच्छता अभियान, मिलन मैत्री परिवार, जैन सोशल ग्रूप असे अनेकजण सहभागी झाले आहेत. थेट लोकसहभागातून दहा हजारांहून अधिक गळके नळ बदलण्यात आले आहेत. अभियानाच्या प्रेरणेतून हजारो नळ उत्स्फूर्तपणे बदलले गेले आहेत. टिल्लू ‘अनाथ नळांसाठी’ काम करतात. त्यासाठी संस्था लोकांकडून रकमेऐवजी नळदान घेते. त्यामुळे ते वाढदिवशी नळदानाचे पुण्य सांगतात.
टिल्लू यांच्या अभियानाचा संदेश प्रत्येकाला दररोज किमान एक बादली पाणी वाचवणे शक्य आहे हा आहे. अभियानात फ्लश-शॉवर-बाथटबचा वापर बंद करणे, फ्लश टँकचा वापर अनिवार्य असल्यास त्यामध्ये एक लिटरची पाण्याची बाटली भरून टाकून ठेवावी – म्हणजे वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी एक लिटर पाण्याची बचत होते – तसेच, प्लास्टिकचा देखील पुनर्वापर होतो, पुरुषांनी दाढी करताना लागणाऱ्या पाण्यासाठी बेसिनमधील नळाऐवजी भांड्याचा वापर करावा, नळ भांडी घासताना-कपडे धुताना गरजेनुसार चालू ठेवावा, नळ काम करताना बंद करण्याची सोय स्वतःच्या किंवा मोलकरणींच्या हाताजवळ ठेवावी, पाईप लावून गाडी न धुता ती कपड्याने साफ करावी, ठिबक सिंचन घराच्या बागेसाठी वापरावे… असे अनेक उपाय लोकांपर्यंत पोचवले जातात. प्रत्येक कुटुंबाने ठरवल्यास दररोज पन्नास ते साठ लिटर पाणी वाचवता येणे सहज शक्य आहे. दोन लाख कुटुंबांनी तसा संकल्प केला, तर सुमारे तीनशेपासष्ट कोटी लिटर पाणी दरवर्षी वाचवता येईल. संकल्पात सहभागी होणाऱ्यांचे लेखी फॉर्म भरून घेतले जातात. अनेक सोसायट्या, शाळांमध्ये ‘पाण्याशी मैत्री, जीवनाची खात्री’ या विषयावर व्याख्याने देऊन जागृती केली गेली आहे. पाण्याचे ‘फिक्स्ड डिपॉझिट’ जमिनीत करण्यासाठी उपक्रम राबवले जातात.
टिल्लू एकपात्री कार्यक्रम, व्याख्यान यांसाठी गेल्यावर पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ घेत नाहीत. ते आयोजकांना सांगतात, की ‘एक ‘नळ’ देऊन माझा सत्कार करा’. ते त्यामागील भूमिका लोकांना सांगतात. ते म्हणाले, की या प्रकारे वर्षाला किमान एक लाख लोकांपर्यंत विचार पोचवता येईल! ते असे म्हणतात, की पाणी वाचणे हा बायप्रॉडक्ट आहे. पाणी वाचवणारे मन तयार करणे हा मेन प्रॉडक्ट! म्हणून ते कृतीवर आधारित उपक्रमांवर भर देत असतात.
‘जलरक्षक अभियान’ पुण्याबरोबर तळेगाव दाभाडे, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा अशा अडतीस गावी पसरले आहे. अभियानाचा विस्तार होत आहे. टिल्लू म्हणतात, आतापर्यंत सुमारे शंभर कोटी लिटरहून अधिक पाणी वाचवले गेले आहे. आमचे ध्येय आहे ‘जलरक्षकां’च्या, लोकांच्या सहभागातून दर दिवशी एक कोटी म्हणजे म्हणजे वर्षाला तीनशे पासष्ट कोटी लिटर पाणी वाचवण्याचे!
– मकरंद टिल्लू
Email – mtilloo@gmail.com
Excellent Motivator, Great…
Excellent Motivator, Great Activist, everyone should become his supporter by following what he is doing, I Support and will follow at every place
Really inspired
Really inspired
Comments are closed.