मंदार भारदे यांची झेप विमानाची !

1
945

मंदार अनंत भारदे नावाचा शेवगावकर तरुण विमाने आणि हेलिकॉप्टर्स भाड्याने देतो; त्याच्या स्वत:च्या मालकीची विमाने आणि विमान उड्डाण कंपनी आहे. त्याने ‘मंदार अनंत भारदे’ या त्याच्या नावातील आद्याक्षरे घेऊन कंपनी स्थापन केली आहे – Mab Aviation (मॅब एव्हिएशन) !

          मंदार वडिलांच्या नोकरीमुळे नाशिक येथे वाढला-शिकला. तो नाशिकमध्ये राहून डॉक्युमेंटरी फिल्म, जाहिराती करू लागला. त्याला पंढरीच्या वारकऱ्यांवर माहितीपट बनवत असताना ‘टॉप शॉट’ घेण्यासाठी हेलिकॉप्टर हवे होते. त्या प्रयत्नांत असताना, त्याने त्याच्या धाडसी, परखड आणि बिनधास्त स्वभावानुसार थेट विमान आणि हेलिकॉप्टर्स भाड्याने देणारी कंपनीच स्थापन केली ! मंदार तो प्रसंग रोमहर्षक रीतीने वर्णन करतो. त्याच्या कंपनीचे ‘कस्टमर्स’ मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील ‘टायकुन्स’ आणि बॉलिवूड तारेतारका हे आहेत.

त्याचा हा प्रवास अविश्वसनीय, थक्क करणारा आणि रोमांचक आहे. मंदारची जिद्द, कल्पकता, जोखीम पत्करण्याची तयारी आणि मुख्य म्हणजे मराठी माणूस असूनही चक्क विमान कंपनीचा मालक होण्याची धमक अनुकरणीय व कौतुकास्पद आहे. त्याच्या कंपनीचे ब्रीद आहे – 99.99 is not equal to Hundred ! त्याचा अर्थ नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव शतांश म्हणजे शंभर नव्हे ! हे ब्रीद त्याच्या कल्पकतेचे प्रतीक तर आहेच, पण ग्राहक सेवेत तो किती ‘परफेक्शनिस्ट’ होऊ पाहतो याचीही ती ओळख आहे. त्याच्या कंपनीचे ब्रीदसुद्धा अक्षरांत नसून अंकांत आहे. त्याला माणसाच्या परिपूर्णतेच्या ध्यासात एवढीही उणीव ठेवायची नाही !

जगभरातील कोणताही राष्ट्रप्रमुख भारतभेटीला आला तर त्यांच्या दिमतीला विमाने केंद्र सरकार ज्या कंपन्यांतर्फे पुरवते त्या मोजक्या कंपन्यांमध्ये मंदारच्या कंपनीचाही समावेश आहे. त्याने एअरलाईन कंपनीचे ‘लायसन्स’ मिळवून स्वत:ची विमानेसुद्धा खरेदी केली आहेत ! उच्च कौशल्ये प्राप्त वैमानिक, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हवामानतज्ज्ञ आणि तज्ज्ञ इंजिनीयर्स अशांच्या सेवा-सुविधा पुरवणाऱ्या मंदारच्या त्या वैशिष्ट्यांची स्पृहा देश-विदेशांतील कंपन्या करत आहेत. मंदारने त्या बरोबर विमान उड्डाणाला विमान पर्यटनाचे स्वरूप देऊन टाकले आहे. त्याची विमाने एअर अॅम्बुलन्स सेवाही पुरवतात. ही सुविधा प्रत्येक पाचशे किलोमीटरवर उपलब्ध असल्यास अत्यवस्थ रोग्यांचे प्राण वाचवणे शक्य होईल ही मंदारची योजना आहे. त्याची कंपनी ऑर्गन ट्रान्सपोर्टचे काम करते. ती त्यातही विश्वासार्ह ठरली आहे. मंदार त्याची ही योजना आठ दिवसांच्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी उपयुक्त ठरली तेव्हा झालेला आनंद, मिळालेले समाधान शब्दातीत आहे असे सांगतो. त्याची कंपनी आखाती देशांसाठी मांस, फुले अशा, लवकर खराब होऊ शकणाऱ्या पदार्थांची वाहतूक करते. म्हणजे कार्गो सेवासुद्धा देते. त्याने मध्यम वर्गीयांच्या विमान उड्डाणाचे स्वप्न माफक दरात पूर्ण करण्यासाठी ‘जॉय राईड’सारख्या योजना सुरू केल्या आहेत. ‘एक्सप्लोअर द मराठा’ ही योजना शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देते. महाराजांची दूरदृष्टी, त्यांचा हवामानाचा-भौगोलिक स्थळांचा अभ्यास यांबाबत त्या सफरींदरम्यान माहिती दिली जाते. त्या योजनेचा फायदा परदेशी पर्यटक जास्त घेतात !

असे विविध उद्योग योजण्यामागे मंदारची भूमिका स्पष्ट आहे. तो म्हणतो, विमानाचा शोध दुसऱ्या महायुद्धात युद्ध जिंकण्यासाठी म्हणजे उद्ध्वस्त करण्यासाठी झाला, पण मला पर्यावरण रक्षणासाठी विमानातून सीड बॉम्बिंग म्हणजे उंचावरून एका तासात दोनशे किलोमीटर जागेवर बीजरोपण करून झाडे आणि जंगले वाढवण्याची आहेत. युद्धातील बॉम्बिंगमुळे रक्तपात झाला असला तरी ऑर्गन ट्रान्सपोर्ट करून मला लोकांचे प्राण वाचवण्याचे आहेत. मला मध्यमवर्गीयांची हवाई सफरीची स्वप्ने पूर्ण करण्याची आहेत. त्याच्या या अफलातून औद्योगिक साहसाचा उद्देश फक्त नफ्यासाठी व्यवसाय असा नाही, तर तो समाजाचे काही देणे लागतो ही त्याची भावना आहे. तो तशा समाजसेवेत विमाने व हेलिकॉप्टर्स घेऊन सहभागी असतो.

मंदार फक्त बिझनेसमन आहे असे नाही तर तो लेखक आणि व्याख्यातादेखील आहे ! त्याचे ‘लोकसत्ता’मधील ‘बघ्याची भूमिका’ हे सदर लोकप्रिय ठरले होते. त्यातील लेखन समाजातील वैगुण्यांवर तिरकस प्रहार करणारे होते. ते पुस्तकरूपात उपलब्ध आहे. मंदारला राज्यातील आणि देशातील अनेक नामांकित व्यासपीठांवर मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून आमंत्रित केले जाते. त्याच्या भाषणांतून त्याच्या कल्पकतेचा, सृजनशीलतेचा आणि मुख्य म्हणजे समाजभान जपणाऱ्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा फायदा देशातील हजारो युवकांना होतो असा अनुभव आहे. त्याचे मुक्त चिंतन त्याच्यात दडलेल्या तत्वचिंतकाची साक्ष देते. त्याची ही काही निरीक्षणे : –

  • दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग… लोक काय म्हणतील हा विचार आहे- तो करून माणसाची प्रज्ञा जेवढी मारली जाते तितकी इतर कशानेही नसेल.
  • धाडस म्हणजे काय तर लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जाऊनस्वतःला जे आवडेल ते करणे.
  • जग सर्वांनाच हसते, वेड्यात काढते,पण माणूस यशस्वी ठरला, की तेच जग त्या व्यक्तीला डोक्यावर घेते.
  • ‘टार्गेट’वर लागलेल्या गोळ्यांपेक्षा न लागलेल्या गोळ्या जास्त असतात.
  • आईबाप स्वत:ची स्वप्ने मुलांच्या डोळ्यांनी पाहतात,पण मुलांना त्यांची स्वप्ने त्यांच्या डोळ्यांनी पाहू द्यावीत.
  • आजकाल घरोघरीप्रोफेशनल जन्मतात, मुले नाही.
  • बहुमताच्या मागे जाऊ नये, कारण बहुमत चुकीची सरकारे वारंवार निवडते किंवा गाथा बुडवते.

       मंदार म्हणतो, की त्याच्या जगण्याचे तत्त्वज्ञान ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता’ हा तुकोबाचा अभंग हेच आहे. त्याचा स्वप्नांचा पाठलाग अजून सुरूच आहे. त्याला वेगवेगळ्या क्षेत्रांत खूप काही करायचे आहे !

      मंदार भारदे यांचे कुटुंब ते स्वत:, पत्नी केतकी भालेराव आणि अकरावीत शिकणारा मुलगा व नववीत शिकणारी मुलगी असा आहे. ते चौघे मुंबईत दादरला राहतात. त्यांचे वडील, अनंत नाशिकमध्ये असतात. त्यांची कन्या, मंदारची बहीण पल्लवी या कौस्तुभ आमटे यांच्या पत्नी. त्या आनंदवनात असतात.

मंदार भारदे mandarbharde@gmail.com

– उमेश घेवरीकर 9822969723 umesh.ghevarikar@gmail.com

————————————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. मी मंदारचे लोकसत्ता तील लेख वाचले आहेत. तसेच वारी वरील त्याची डॉक्युमेंट्री सुरेख होती. मंदार हा ginius आहे असे मला वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here