मंगळवेढ्यात प्लॅटिनम पिकते!

0
26
carasole

श्री संत दामाजी, चोखामेळा, कान्होपात्रा यासारख्या संतांनी पावन झालेली मंगळवेढ्याची भूमी महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. तीच भूमी सोने आणि प्‍लॅटिनम धातूंचे कोठार म्‍हणून प्रसिद्धीस येण्‍याची शक्‍यता आहे. डॉ. सुभाष ज्ञानदेव चव्हाण यांनी मंगळवेढ्याच्‍या मातीतून शंभर ग्रॅम खनिजाची निर्मिती केली आहे. हे समृद्ध खनिज सोने आणि प्लॅटिनम युक्त आहे.

सुभाष कदम यांनी सोलापूरात मंगळवेढ्याला ज्युनियर कॉलेजची (इंग्लिश स्कूल) स्थापना 1975 साली केली. त्यानंतर नऊ वर्षांनी, 1984 साली विज्ञान व कला महाविद्यालय स्थापन केले. सुभाष कदम यांनी त्यापूर्वीच कोल्हापूर विद्यापीठातून रसायनशास्त्रात पीएच.डी. प्राप्त केली होती. सुभाष कदम संस्थेचा कारभार सांभाळत असताना त्‍यांना मंगळवेढ्याच्या जमिनीचे अंतरंगही खुणावत होते. त्यांच्याजवळ रसायनशास्त्रातील पीएच.डी. होतीच. जिओलॉजिस्ट डॉ. नानासाहेब साठे हे २000 साली मंगळवेढ्यात आले होते. ‘मंगळवेढ्याच्या मातीत सोने आहे’ असा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता. त्यांनी केलेल्या संशोधनाअंती मातीत सोन्याचा अंश असल्याचा निष्कर्ष निघाला. त्यांना सोन्यासंदर्भात पीएच.डी. मिळाली. त्‍यानंतर आर.एन. वनारोटे या विद्यार्थिनीने (भूगर्भशास्त्र) संशोधनाअंती मंगळवेढ्याच्या मातीत प्लॅटिनम असल्याचा दावा केला. तिने हुलजंती येथील मातीचे सॅम्पल नेऊन त्यावर संशोधन करून बिहारमधील खडकपूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पेपरचे वाचन केले. खडकपूरच्या आय.आय.टी.ने त्या संशोधनाची दखल घेतली. या दरम्यान २00५ विद्यापीठ अनुदान आयोगाने (यु.जी.सी.) डॉ. सुभाष कदम यांना तांब्याचे धातुशास्त्र या संशोधनाला करिअर ओरिएंटेड प्रोग्राम अंतर्गत सात लाखांचे अनुदान दिले. या अनुदानातून डॉ. सुभाष कदम यांनी एक किलो मातीतून तांबे, सोने, चांदी, प्लॅटिनम व रेडीयम हे पाच धातू वेगळे केले. त्‍यांनी २0१0 मध्ये इंडियन पेटंटला अर्ज केला. त्‍या पेटंटला २0१४ मध्ये मंजुरी मिळाली.

मंगळवेढ्याच्या मातीत काहीतरी मौल्यवान आहे याबाबत इतिहासकाळापासून दाखले दिले जातात. मोगलसम्राट औरंगजेब मंगळवेढ्यात चार वर्षे तळ ठोकून बसला होता. लढाईसाठी उपयुक्त (शस्त्रांसाठी) धातू त्या मातीत विपुल प्रमाणात मिळत होते, असेही एक कारण त्यामागे होते असे सुभाष कदम यांचे म्हणणे आहे. तसा धातू वितळवण्याची भट्टी मंगळवेढ्यात होती. तिच्या खुणा दिसतात असे त्यांचे म्हणणे आहे. त्यातून इतिहास संशोधनाला नवीन मुद्दा मिळतो!

भूगर्भशास्त्र दृष्ट्या मान्य झालेल्या पद्धतींप्रमाणे त्या मातीतून शंभर फुटांपर्यंत खोल खणून अनेक नमुने घेण्यात आले. त्यांचे रसायनशास्त्र दृष्ट्या योग्य पद्धतीने पृथक्करण करण्यात आले. मातीतून विविध धातू अलग करून धातूंचे प्रमाण अधिक असलेली माती (खनिज) प्रयोगासाठी वापरली. उपलब्ध नमुन्यांची गुणात्मकता तपासण्यासाठी खनिज नमुन्यामध्ये योग्य प्रमाणात नायट्रिक अॅसिड घालून ते मिश्रण तापवले. नंतर पाणी घालून पुन्हा तापवल्यानंतर ते मिश्रण गाळून घेतले. त्यात समप्रमाणात अमोनिया घालून द्रावण तयार झाले. मातीच्या प्रत्येक एक फूट थरातून सहाशे नमुने तपासले गेले. अनेक गावांतील नमुने घेऊन तोच प्रयोग विस्तृत प्रमाणात केला. सुमारे एक हजार ठिकाणांचे खनिज नमुने तपासल्यावर निष्कर्ष निघाला. सर्व तपासण्या एकाच निष्कर्षाप्रत जाणाऱ्या होत्या. त्या मातीत मौल्यवान धातू आहेत. मुख्य म्हणजे, सोन्यापेक्षा महाग असा प्लॅटिनम हा धातू सापडल्याचा तो निष्कर्ष आहे.

सुभाष कदम यांनी वस्तुस्थितीकडे गांभीर्याने पाहिले आहे. त्यांनी अशा चाचण्यांतून निघालेले निष्कर्ष, त्यांची पद्धत यांचे स्वामित्व (पेटंट) मिळवले आहे. थेट ऑस्ट्रेलियातील संस्थेत त्यांचे स्वामित्व नोंद झालेले आहे. मंगळवेढ्याच्‍या मातीतून सोने काढण्‍यासाठी मायनिंग कंपनीची स्‍थापनाही करण्‍यात आली आहे.

सुभाष कदम यांच्या प्रायोगिक भट्टीतून एक किलो समृद्ध खनिजातून शंभर ते दीडशे ग्रॅम प्लॅटिनम मिळत आहे. त्याचे नमुने सुभाष कदम यांच्याकडे उपलब्ध आहेत.

मंगळवेढा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध तालुका. ज्वारी ही जिराईत शेती. दुष्काळाचे संकट आले, की ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्याला हमखास नोकरी बरी वाटते. सुभाष कदम यांच्या खनिज संपत्तीच्या स्वामित्वाचे उद्योगात रुपांतर झाले तर मंगळवेढ्याचा इतिहासच बदलेल. सोलापूरलाही नवीन ओळख मिळेल. सुभाष कदम एक शिक्षणमहर्षी आहेतच. त्यांनी माळरान मळ्याचे हिरव्यागार शेतीत परिवर्तन केलेले आहे. त्यांच्या ज्वारीच्या (पारंपरिक) जमिनीतून मौल्यवान धातू निर्मितीला सरकारी प्रमाणपत्र केव्हा मिळते याची ते वाट पाहत आहेत.

सुभाष कदम यांनी त्यांना मिळालेला शैक्षणिक वारसाही वृद्धींगत केला. डॉ. सुभाष कदम त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या मंगळवेढा, मोहोळ, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांतील दहा शिक्षणसंस्थांचा कारभार यशस्वी रीत्या सांभाळत आहेत. दलितमित्र ज्ञानदेव संभाजी कदमगुरुजी (बी.ए.,एलएल.बी., बी.टी.) हे सुभाष कदम यांचे वडील. कदम गुरुजींनी (1920-2000) मंगळवेढ्याला 1951 साली ‘शिक्षण प्रसारक मंडळ’ स्थापन करून बहुजन समाजाला ज्ञान-विज्ञान व सुसंस्कार यांसाठी प्रेरित करण्याचा वसा घेतला. मंगळवेढ्याला 1952 साली इंग्लिश स्कूल सुरू झाल्यानंतर 1960 सालीच इंग्लिश स्कूल-भोसे (मंगळवेढा), इंग्लिश स्कूल-बेगमपूर (मोहोळ), इंग्लिश स्कूल-नरखेड (मोहोळ), इंग्लिश स्कूल-वेळापूर (माळशिरस) या चार शाळांची स्थापना केली गेली. सुभाष कदम यांचे प्राथमिक शिक्षण त्यावेळी सुरूही झालेले नव्हते.

कदम यांचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण करण्याचा सुरू होता. ते विद्यार्थ्यांनी चौकस असावे, त्यांच्यामध्ये संशोधनवृत्ती जोपासली जावी म्हणून प्रयत्नशील राहिले. मंगळवेढ्याच्या परिसरात शिक्षणाचा पसारा वाढत गेला. संस्थेत दहा हजार विद्यार्थी आहेत. त्यांपैकी चाळीस टक्के मागासवर्गीय विद्यार्थी आहेत. सुमारे पाचशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. संस्थेत व्यावसायिक व तंत्रशिक्षणाचीही सोय आहे. शिक्षणाचा पसारा वाढला, की दर्जा घसरू लागतो. कदम यांनी तसे होऊ दिले नाही. त्यांच्या विविध शाळांतील मुले तालुक्यातील गुणवत्ता यादीत झळकू लागली. त्याचप्रमाणे पुणे बोर्डात 90 ते 94 टक्के गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवणारे बारा-तेरा विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. (1980 ते 2003)

क्रीडा हा शिक्षणाचा महत्त्वाचा घटक! क्रीडेत प्राविण्य मिळवण्यासाठी ‘यशवंत मैदान’ सदैव उपलब्ध असते. विद्यार्थ्यांचे नैपुण्य सोलापूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाही. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर व जागतिक पातळीवरदेखील मंगळवेढ्याचा झेंडा फडकावला आहे. डॉज बॉल या खेळात कदमांच्या शाळेतील मुलांनी फ्रान्समध्ये व दक्षिण आफ्रिकेत जाऊन क्रीडाकौशल्य दाखवले. मुंबईसह चंद्रपूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, नागपूर, अकोला, पलूस, जालना इत्यादी जिल्ह्यांतील मैदाने मंगळवेढ्याच्या विद्यार्थ्यांनी गाजवली आहेत. महाराष्ट्राबाहेर – राजस्थान, बंगळुरू, गुजरात, ओरिसा, पश्चिम बंगाल अशा देशपातळीवरील स्पर्धांत सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केलेले आहे.

विद्यार्थ्यांचे यश हे त्यांपैकी प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक जसे असते; तसेच, त्यापाठीमागे कर्तव्यदक्ष शिक्षकाचीही मेहनत असते. विज्ञानविषयक प्रदर्शनात संस्थेतील सहावी ते दहावीचे विद्यार्थी राज्यस्तरीय पातळीवर सहभागी झालेले आहेत. त्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांनीही ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती’ स्पर्धात्मक परीक्षा जिंकलेल्या आहेत. लक्ष्मण नामदेव नागणे यांचे एक नाटक प्रसिद्ध झालेले असून त्यांचे व्यंगचित्रांचे पुस्तक राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहे. प्रा. शशिकांत जाधव यांची कादंबरी प्रकाशित झालेली आहे. संस्थेत कार्यरत असणाऱ्या बी. टी. पाटील यांना आदर्श मुख्याध्यापक म्हणून गौरवले गेले आहे. काही शिक्षकांना ‘गुणवंत व आदर्श’ शिक्षकांचा पुरस्कार मिळालेले आहेत. पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांची यादी मोठी आहे.

सुभाष कदम यांना श्रीलंकेतील विद्यापीठाने डी. लिट. पदवी दिली. लंडनमध्ये ‘हाऊस ऑफ लॉर्डस्’चा महात्मा गांधी सन्मान मिळाला आहे.

– राजा पटवर्धन
9820071975

About Post Author