मंगळवेढा परिसरात शके 1376 ते 1378 या काळात भीषण दुष्काळ पडला होता. तेथे एका सधन कासाराने मंगळवेढ्याच्या पूर्वेस एक मोठी विहीर खोदली पण पाणी लागले नाही. त्याला एका योग्याने सांगितले, की तुझ्या थोरल्या सुनेला (बाळंतिणीला) बाळासकट विहिरीत सोड तर पाणी लागेल. कासाराने विहिरीत बांधकाम करून तिला राहण्यासाठी विहिरीच्या आतल्या बाजूस खोली बांधून तेथे तिच्या राहण्याची व्यवस्था केली – भांडी, पाळणा, उखळ, पाटा-वरवंटा इत्यादी साधनेही ठेवली. थोरली सून तयार झाली. तिला त्या खोलीत सोडल्यावर कासार (सासरा) वर येऊ लागला. त्याने पाण्याचा खळखळाट ऐकून मागे वळून पाहिले. तर सात पायऱ्यांपर्यंत पाणी वर आलेले त्याला दिसले, पण पाणी येताना तेथेच थांबले होते. अजूनही त्या पायरीच्या वर पाणी येत नाही असे म्हणतात. तीच ती सुनबाई (गोपाबाईची) विहीर. विहिरीच्या बाजूला कथेचा फलकही लावलेला आहे!
-राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे