Home लेखसूची भूम तालुक्यातील बेलेश्वर (Beleshwar Temple Of Bhoom)

भूम तालुक्यातील बेलेश्वर (Beleshwar Temple Of Bhoom)

बेलेश्वर

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम हा महत्त्वाचा तालुका. भूम हे तालुक्याचे मुख्यालय उस्मानाबादहूनबहात्तर किलोमीटर अंतरावर आहे. तेथून ईट हे छोटे गाव अठरा किलोमीटरवर असून, ईटपासून सहा किलोमीटर दूर श्री बेलेश्वराचे देवालय आहे. ते बाहेरून पाहिल्यावर एखाद्या किल्ल्यासारखे दिसते. त्या मंदिराचे बांधकाम सन 1752च्या दरम्यान पूर्ण झाले असावे.

निजामकाळातील खर्डा (जिल्हा अहमदनगर) येथील संस्थानचे राजे सुलतानराव राजेनिंबाळकर एकदा सर्व लवाजम्यासह काशीला गेले होते. त्यांनी तेथून महादेवाच्या सात पिंडी आणल्या. त्यांनी त्या सात लिंगांची प्रतिष्ठापना खर्ड्याच्या आजुबाजूला केली. त्यांपैकी हे एक बेलेश्वर. मूळ बिल्वेश्वराचे अपभ्रंशाने बेलेश्वर झाले. त्याचे कारण असे, की त्या लिंगाच्या साळुंकीवर बेलाचे पान कोरलेले आहे. ते संस्थान राजेनिंबाळकर यांनी त्यांचे गुरू तुकाराम महाराज यांना अर्पण केले होते. देवस्थानचा देऊळवाडाही त्यांनीच बांधून दिल्याचे सांगण्यात येते.

 

मंदिर परिसर
मंदिर परिसर

तुकाराम महाराजांविषयी आख्यायिका अशी – ते महाराज मूळचे साताराजिल्ह्याच्या खटावतालुक्यातील हटगुनपटगुम या गावचे रहिवासी. त्यांच्या पुरंदरे घराण्यातील वंशज अद्याप तेथे आहेत. तुकाराम महाराज यांना विरक्ती निर्माण झाल्याने ते सन 1688  मध्ये फिरत- फिरत बेलेश्वर परिसरात आले. त्या ठिकाणी घनदाट अरण्य होते. त्यांना तपश्चर्या करण्यासाठी ते योग्य ठिकाण असल्याचा आनंद झाला. तेथे त्यांना तपश्चर्येचे फळ म्हणून श्री दत्तात्रेयांनी दर्शन दिले. तेव्हा त्यांनी दत्तात्रेयांच्या एकमुखी दर्शनाची इच्छा व्यक्त केली. श्री दत्तात्रेयानेतीही पूर्ण केली. त्यामुळे तेथे एकमुखी दत्ताची मूर्ती पाहण्यास मिळते. तुकाराम महाराजांची तपश्चर्या एका गुहेत चाले. ती जागा प्रदक्षिणा मार्गावर आहे. त्या गुहेतून एक वाट खर्ड्याच्या किल्ल्यात निघते असे म्हणतात. तुकाराम महाराज त्याच मार्गाने पाच-सात किलोमीटर अंतरावरील खर्ड्यास जात व भिक्षा मागत. त्या भिक्षेचे तीन भाग करून एकगाईस, एक कुत्र्यास व एक देवास अर्पण करून तो प्रसाद ते स्वत: घेत. दत्त देऊळवाड्यात प्रसन्न झाल्यावर, हातातील काठी दत्त महाराजांनी तेथे रोवली. तिलाच चिंच फुटली. त्या झाडाचे दोन फाटे असून त्यांपैकी एक गोड आहे तर दुसरा आंबट. निसर्गाचा तो चमत्कार आहे, पण भाविक लोक त्याचा पाला प्रसाद म्हणून खातात. बेलेश्वराच्या जवळच रेणुकाई मातेचा तांदळा आहे. मंदिरात बेलेश्वर, दत्तात्रेय आणि रेणुकादेवी यांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे ते मंदिर अनोखेच म्हणावे लागेल.

 

चिंचेचे झाड

त्या तिन्ही मंदिरांचे बांधकाम हेमाडपंतीआहे. मंदिराच्या समोर आवारात एका लहान मंदिरात श्री तुकारामतीर्थ स्वामी महाराजांची समाधी आहे, तर त्याच्यासमोरच असलेल्या मंदिरात विठ्ठलरुक्मणीच्या मूर्ती आहेत. मंदिर निर्जन अशा ठिकाणी आहे. त्या मंदिराचा परिकोट चिरेबंदी असून त्याची कसलीही देखभाल नसल्याने बरीच पडझड झालेली आहे. आत ओवऱ्या असून एकात एक असणारे भव्य दरवाजे आहेत. मधील दरवाज्यावर नगारखाना आहे. वेशीतून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर विस्तीर्ण प्रांगणातून बारवाकडे जाता येते. बारवाचे बांधकाम उत्तम प्रतीचे आहे. किल्लावजा मंदिरातील मुख्य दरवाज्यातून प्रवेश केल्यावर आत तीन समाधिस्थळे दिसतात. त्यांपैकी मोठी समाधी ही मंदिराचे बांधकाम करणाऱ्याची, तर उर्वरित दोन लहान समाधी त्याच्या सती गेलेल्या पत्नींच्या असल्याचे सांगण्यात येते. मंदिरांच्या वर असलेल्या तीन कळसांवर जे शिल्प कोरलेले आहे ते कोळ्या शैलीतील आहे. किल्ल्यासमोरच वासुदेव स्वामी व श्री सच्चिदानंद स्वामीया दोन सत्पुरुषांच्या समाधी आहेत. ते तुकाराम महाराजांचे शिष्य होते. वासुदेवस्वामी मूळ नांदेड भागातील. ते तुकाराम महाराजांची ख्याती ऐकून तेथे आले व त्यांनी त्यांना गुरू करून घेतले. तेथेच त्यांनी तपश्‍चर्या करून आषाढ वद्य द्वितीया सन 1837 रोजी जिवंत समाधी घेतली. दुसरी संपूर्ण पाषाणाची समाधी असलेले सच्चिदानंद स्वामी काशी भागातील होते. त्यांनी श्रावण शुद्ध 8 सन 1885 मध्ये जिवंत समाधी घेतली. तेथून एक फर्लांग अंतरावर एक कुंड असून, त्याचे पाणी कधीही आटत नाही असे म्हणतात. मंदिरात तुकाराम स्वामींचा उत्सव चैत्र वद्य एकादशीला, वासुदेवस्वामींचा आषाढ वद्य द्वितीयेला, सच्चिदानंद स्वामींचा श्रावण शुद्ध अष्टमीला तर दत्तात्रेय महाराजांचा उत्सव मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा करत असतात. दोन-तीन मंदिरट्रस्टला इनामी जमीन म्हणून दोनशे एकर मिळाली असली तरी त्यावर अनेक वहिवाटदारांनी कूळ लावलेले असल्याने देवस्थानाला त्याचे उत्पन्न काहीच येत नाही. भगवान शंकर येथे रामलिंग या नावाने विख्यात झाले. सीताहरणाच्या प्रसंगानंतर दंडकारण्यातून राम-लक्ष्मणाचा जो संचार झाला त्यात हे स्थान आहे. मंदिरात भलीमोठी पिंडशाळुंका आहे. मंदिर जुनाट असून गाभाराही तितकाच जुनाट आहे. पुढे नंदी, बाजूस ओवऱ्या, परिक्रमामार्ग, आटोपशीर शिखर असे या मंदिराचे स्वरूप आहे. लहानशा दारातून गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो. मंदिर सुस्थितीत आहे. मंदिरास दरवाजे अनेक आहेत. विश्वस्त मंडळ मंदिराची व्यवस्था पाहते, तर गुरव लोक पूजा करतात.

भारत गजेंद्रगडकर 9404676461 bharat.1946@yahoo.in

(बालाघाटची सादपुस्तकावरून उद्धृत,संपादित-संस्कारित)

भारत गजेंद्रगडकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी प्रमुख वृत्तपत्रांत काम केले आहे. त्यांना छायाचित्रणाचाही छंद आहे. त्यांची छायाचित्रे साधना, तरुण भारत यांच्या मुखपृष्ठावर; तसेच, अनेक दैनिके व साप्ताहिके यांत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांची छायाचित्रांची पंधरा प्रदर्शने त्यांनी भरवली आहेत. त्यांचा विविध सामाजिक कार्यांत सहभाग असतो. त्यांची तेरा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा कै. नागोराव दुधगावकर पुरस्कार मिळाला आहे.

—————————————————————————————————————————————–

 

 

बेलेश्वर मंदिराची किल्ल्यासारखी तटबंदी

 

 

प्रवेशद्वार

—————————————————————————————————————————

About Post Author

Previous articleशरद पवार आणि महिला धोरण (Sharad Pawar and Womens Policy)
Next articleतत्त्ववेत्ता अ.भि. शहा (A. B. Shah – Reformist, Philosopher)
भारत गजेंद्रगडकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी प्रमुख वृत्तपत्रांत काम केले आहे. त्यांना छायाचित्रणाचाही छंद आहे. त्यांची छायाचित्रे साधना, तरुण भारत यांच्या मुखपृष्ठावर; तसेच, अनेक दैनिके व साप्ताहिके यांत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांची छायाचित्रांची पंधरा प्रदर्शने त्यांनी भरवली आहेत. त्यांचा विविध सामाजिक कार्यांत सहभाग असतो. त्यांची तेरा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा कै. नागोराव दुधगावकर पुरस्कार मिळाला आहे.9404676461

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version