Home वैभव इतिहास भारत घडला, नद्या जन्मल्या!

भारत घडला, नद्या जन्मल्या!

काही नद्या जगाच्या नकाशात पटकन नजरेत भरतात. अमेझॉन, नाईल, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्या लांबीला अफाट, त्यांची पात्रे प्रचंड मोठी आणि त्यांच्यावर विसंबून राहणारे लोकही भरपूर. नाईल ही जगातील सर्वांत लांब नदी. ज्येष्ठ कथाकार जी.ए. कुलकर्णी, त्यांच्या पत्रांत माणसाचे आयुष्य कसे अनाकलनीय असते आणि त्याला अनपेक्षित दिशा कशी मिळते हे सांगताना नाईलचे उदाहरण अनेकदा देतात. व्हाईट नाईल जेथे उगम पावते, तेथून शंभरेक मैलांवर लाल समुद्र आहे. ती पुढेही वाहताना किंचित उजवीकडे वळून लाल समुद्रात जाऊ शकली असती. दक्षिणेला अरबी समुद्र आहे; तोही तसाच जवळ. पण नाईल नदी लाल समुद्र, अरबी समुद्र यांना बाजूला ठेवते आणि ब्लू नाईलला सोबत घेऊन, सहारा वाळवंट तुडवत हजारो मैल उत्तरेला जाते व अखेर, भूमध्य समुद्रात विसर्जित होते! चौफेर वाळवंट, पाण्याचा सतत तुटवडा, कमी पाऊस या सगळ्या प्रतिकूल गोष्टी असतानादेखील, नाईल अनेक नागमोडी वळणे घेत उत्तरेकडेच जाते. पाण्याचा एका दिशेने जाणारा तो अविरत प्रवाह हा अनेक अनाकलनीय नैसर्गिक प्रक्रियांवर अवलंबून असतो. नदीला जिवंत माणसाप्रमाणे असलेली ती प्रबळ उर्मी गेली कित्येक शतके माणसाला विचार करण्यास लावत आहे. तिच्या प्रत्येक कृतीमागे आणि प्रक्रियेमागे किती मोठी गुंतागुंत आहे आणि तिचा तो प्रवास किती काळ चालू आहे ते समजले तर बघता बघता, सगळ्या पृथ्वीचा इतिहास नजरेसमोर स्पष्ट होत जाईल. तो प्रचंड काळ – साधारण दोन-तीन अब्ज वर्षांचा; त्यांतील अनंत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माणसाच्या खुजेपणाची जाणीव सतत होत राहते. नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात ते कदाचित म्हणूनच असेल!

नद्यांच्या अस्तित्वाच्या प्रवाहखुणा पृथ्वीच्या इतिहासात तशा फार उशिरा येतात. पृथ्वीचा जन्म झाला त्यानंतर जवळपास दोनशे कोटी वर्षें, पृथ्वी हा नुसता तापलेला गोळा होती. ती जसजशी थंड होत गेली तसतसे, वेगवेगळे वायू आणि पाण्याची वाफ बाहेर पडून येऊन प्रचंड पाऊस पडला आणि समुद्र निर्माण झाले. जमिनीचा पहिला तुकडा समुद्रातून बाहेर आला तो सुमारे दोनशे कोटी वर्षांपूर्वी. पृथ्वीवर जे पहिले खडक निर्माण झाले ते एकतर जमिनीची प्रचंड उलथापालथ होऊन किंवा समुद्रात गाळाचे थर बसून बसून. त्या पुराणपुरुषांमध्ये समुद्राच्या लाटांनी उमटवलेल्या खुणा शाबूत आहेत – काही खडक तर त्यांच्या कुशीत समुद्री शेवाळाचे थर जपून उभे आहेत. नद्यांच्या अस्तित्वाच्या काही क्षीण खुणा शंभर कोटी वर्षें जुन्या खडकांत दिसतात खऱ्या, पण त्या क्षीण खुणा समुद्राच्या एकछत्री अंमलात नंतर हरवूनही जातात.

पृथ्वीवरील सर्व भूप्रदेश एकत्र जोडलेले तीस कोटी वर्षांपूर्वी होते. त्या महाभूमीला ‘पॅनजीआ’ (Pangea) असे नाव आहे. त्या महाभूमीला चारी दिशांनी पँथालासा (Panthalassa) या अतिप्रचंड समुद्राने वेढले होते. भारताच्या तीन बाजू त्या वेळी ऑस्ट्रेलिया, अंटार्टिका आणि आफ्रिका-मादागास्कर यांना जोडून होत्या. दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे खंड जिगसॉसारखे एकमेकांत जुळले गेले होते, तर उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया हे खंड एकत्रित होते. तो महाभूप्रदेश उत्तरेला लोरेशिया आणि दक्षिणेकडे गोंडवन या दोन भागांत वीस कोटी वर्षांपूर्वी विभागला गेला. भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांच्या जोडल्या गेलेल्या भागात त्या वेळी घनदाट सदाहरित जंगले होती आणि त्या सदाहरित जंगलांत भीमकाय अनेक नद्या वाहत होत्या. नद्यांच्या अस्तित्वाचा तो पहिला मोठा पुरावा पृथ्वीच्या इतिहासात आढळतो. त्या नद्यांचा अंमल पृथ्वीवर एक कोटी वर्षें राहिला. त्या एक कोटी वर्षांत गाळाचे जे खडक जमा झाले त्यावरून त्या नद्या कोठल्या दिशेने वाहत होत्या आणि त्यांचा वेग साधारण किती होता ते सांगता येते. गोंडवन भूमीत निर्माण झालेल्या गाळाच्या खडकांचे स्थान भूशास्त्रात अजोड आहे, कारण त्या कालावधीतील जीवसृष्टी आणि नद्यांनी केलेल्या झीजेच्या खुणा त्या खडकांत दिसतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या खडकांत प्रचंड प्रमाणावर दगडी कोळसा सापडतो. इतका कोळसा दुसऱ्या कोणत्याच खडकांत सापडलेला नाही. तो कोळसा आणि जीवाश्म हे भारत, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचे काही भाग यांत सापडतात. त्यामुळे ते देश एके काळी एकमेकांशी जोडलेले होते या निरीक्षणास पुष्टी मिळते. त्या जंगलांतून वाहणाऱ्या मोठमोठाल्या नद्यांनी गाळाची मैदाने प्रचंड प्रमाणात तयार केली आणि त्यामध्ये सदाहरित जंगलांचे अनेक भाग गाडले गेले. ते गाडलेले वृक्ष आणि जंगले _sangamकोळसा बनले. त्या काळातील नैसर्गिक घडामोडींतून इतका प्रचंड कोळसा मिळतो म्हणून त्या काळाचे नाव ‘कार्बोनीफेरस.’

भारतीय भूमीचा उत्तरेकडे प्रवास सुमारे साडेसतरा कोटी वर्षांपूर्वी सुरू झाला. साधारण अंटार्क्टिकाच्या वर, ऑस्ट्रेलियाच्या खाली डावीकडे असलेला भारतीय भूमीचा तुकडा एका प्रचंड उल्काघातामुळे किंवा तत्सम कारणामुळे सुमारे पाच सेंटिमीटर प्रतिवर्ष या वेगाने उत्तरेकडे सरकू लागला आणि सारे काही बदलून गेले. जमिनीचा तुकडा उत्तरेला जाताना निर्माण झालेल्या प्रचंड तणावामुळे आणि भूगर्भात झालेल्या हालचालींमुळे भारतीय भूपृष्ठाला भेगा ठिकठिकाणी पडल्या आणि नद्यांना वाहण्यासाठी मार्ग प्रशस्त निर्माण झाले. दामोदर, महानदी, गोदावरी, तापी, शोण, नर्मदा, अजय या नद्या तशा रुंदावलेल्या भेगांमधून वाहत आहेत. भारताचा नकाशा पाहिला तर या नद्या एक विशिष्ट रेषा पकडून चालल्या आहेत असे दिसते, त्याचे कारण हे आहे. त्याच सुमारास भारत, श्रीलंका आणि मादागास्कर हे प्रदेश अलग झाले. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी, आफ्रिकेजवळ असताना त्या अलग होण्याच्या प्रक्रियेमुळे जमीन दुभंगून भारतात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या भागांत ज्वालामुखीचे उद्रेक प्रचंड झाले आणि त्यातून दख्खन-माळवा-सौराष्ट्र या पठारी भागांची निर्मिती झाली. भारतीय भूमी जशी उत्तरेकडे सरकत गेली तसे ते ज्वालामुखी थंडावत गेले. काही पूर्ववाहिनी नद्या त्याच सुमारास पूर्वेकडे नैसर्गिक उतार असलेल्या दख्खनच्या पठारावरून उगम पावल्या असाव्यात. कृष्णा, भीमा या नद्यांच्या पूर्ववाहिनी असण्याचे एक कारण ते आहे. कोकणची सपाट जमीन बऱ्याच नंतर, त्या ज्वालामुखी खडकांची झीज होऊन होऊन निर्माण झाली आणि त्यामुळे पश्चिमेला तीव्र उतार तयार झाला. उल्हास, सावित्री, कुंडलिका किंवा मिठी या लहान लहान नद्या तशा अगदी अलिकडे, म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी पश्चिमेकडे वाहत्या झाल्या. भारताच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची घटना घडली ती साडेचार कोटी वर्षांपूर्वी. त्या घटनेने भारताचा इतिहास, भूगोल आणि हवामान यांना मोठी कलाटणी दिली. ती घटना म्हणजे सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी भारतीय भूभाग आणि आशिया यांची झालेली टक्कर. त्या टकरीमुळे निर्माण झालेल्या दोन हजार नऊशे  किलोमीटर पसरलेल्या हिमालयाच्या विराट पर्वतरांगा नंतरच्या पाच कोटी वर्षांत सुमारे नऊ किलोमीटर उंच झाल्या. भारत आणि आशिया यांच्यामध्ये असलेला टेथिस समुद्र त्या टकरीमुळे बंद झाला आणि त्या समुद्राचा तळ अनेक घड्या पडून हिमालयात सामावला गेला. त्या समुद्रतळावर साचलेला गाळ आज समुद्रसपाटीपासून सहा-आठ किलोमीटर वर उचलला गेला आहे.

नऊ किलोमीटर उंच पर्वत निर्माण होणे आणि तो वाढत राहणे ही पृथ्वीच्या समतोलात गडबड करणारी गोष्ट आहे. तो बिघडलेला समतोल परत आणायचा, तर त्या पर्वतरांगांची उंची कमी करून, त्यांना एका स्थिर पातळीवर आणायला हवे हे भूरचनेचे तत्त्व आहे. त्यामुळे जितक्या वेगाने हिमालय वर उचलला जाऊ लागला, तसतशा हिमालयात अनेक हिमनद्या-नद्या उगम पावल्या आणि त्यांनी त्या नवीन पर्वताची झीज सुरू केली. त्या काळात पृथ्वीचे हवामान सतत बदलत होते. अनेक हिमयुगे आणि ‘ग्लोबल वार्मिंग’ची अनेक चक्रे एकामागे एक अशी येत गेली. त्या सतत बदलत्या हवामानामुळे हिमनद्या निर्माण होणे आणि त्या वितळून त्यातून नद्या उगम पावणे ही प्रक्रियाही घडत गेली. अगदी अलिकडे, सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी एक हिमयुग येऊन गेले. त्या हिमयुगाच्या शेवटी अनेक हिमनद्या वितळून त्यातून शेकडो नद्या उगम पावल्या. ते शेवटचे हिमयुग संपले आणि हिमालयातील गोठलेल्या सगळ्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. अक्षरश:, बर्फाच्या पाण्याने भरलेल्या हजारो नद्या वेगाने हिमालयाच्या उतारावरून वाहत आहेत; अनेक धबधबे-भोवरे निर्माण करत, वाटेत येणारे धोंडे ठोकरत, माती-दगड वाहून नेत धावत आहेत असे चित्र साधारण आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी हिमालयाने पाहिले. हिमालयात जवळजवळ पंधरा हजार हिमनद्या आहेत आणि त्या त्यांचे हिमालयाची झीज करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या जोडीला गंगा, सिंधू, यमुना, रावी, चिनाब, सतलज, ब्रह्मपुत्रा या प्रचंड मोठ्या नद्या हिमालयातून टनावारी गाळ वाहून आणत आहेत. त्या नद्यांनी सुमारे दोन-तीन कोटी वर्षांपूर्वी वाहून आणलेल्या गाळाची मैदाने चीन आणि युरेशिया यांना टक्कर देणाऱ्या भारतीय भूमीच्या प्रचंड दाबाने घड्या पडून पडून टेकड्यांमध्ये परिवर्तित झाली. त्या टेकड्या शिवालिक टेकड्या

शिवालिक टेकड्या हिमाचलपासून ते अरुणाचलपर्यंत हिमालयाच्या पायथ्याला उभ्या आहेत. शिवालिक टेकड्या उतरून खाली आलो, की उत्तर भारताची गाळाची सपाट, सुपीक मैदाने सुरू होतात. हिमाचलपासून बंगालपर्यंत पसरलेल्या त्या भूमीत गंगा आणि इतर नद्या यांनी गेल्या दोन लाख वर्षांत हिमालयातून वाहून आणलेला गाळ आहे. त्या नद्यांनी आणि त्यांच्या प्रचंड पुरांनी हिमालयाच्या पुढ्यात, शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी गाळाची मोठी मैदाने निर्माण केली आहेत. सुपीक गाळाच्या त्या मैदानांत अनेक शतकांचा इतिहास नोंदवला गेला. गंगा-यमुना-सिंधू यांच्या खोऱ्यांनी इसवी सनपूर्व 2700 पासून ते इंग्रज राज्याच्या काळापर्यंत भारताच्या इतिहास- भूगोलातील महत्त्वाचे बदल पाहिलेले आहेत.

– अश्विन पुंडलिक 9834838895
ashwin3009@gmail.com 

(Last Updated On 6th Jan 2020)

About Post Author

Previous articleबी आर पाटील – कृतार्थ उद्योगानंतर कृषी पर्यटन!
Next articleकविश्रेष्ठ मोरोपंत बारामतीचे
अश्विन पुंडलिक हे 'भूशास्त्र' विषयाचे प्राध्यापक मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात आहेत. त्यापूर्वी ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात व्याख्याते आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणात वैज्ञानिक म्हणून काम करत. त्यांनी नर्मदेच्या खोऱ्यातील गाळाच्या खडकांवर संशोधन करून सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे. त्यांचे तत्संबंधी विषयांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. अश्विन पुंडलिक यांनी निसर्ग आणि इतिहास यांची परस्पर सांगड घालणारे ललित लेख मौज, चैत्रेय, भवताल, आणि शब्दमल्हार या मासिकांत लिहिले आहेत.

Exit mobile version