‘इतिहासाची मोडतोड’ हा मी लिहिलेला लेख thinkmaharashtra.com या पोर्टलवर प्रसिध्द झाला आहे. त्यावर एका वाचकाने प्रतिक्रिया दिली आहे, की ”नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते, म्हणून त्यांच्यातविषयी आदर आहे. पण त्यांनी असा कोणता त्याग केला, की ते पंतप्रधान झाले? ज्यांचे कर्तृत्व नाही त्यांचे नाव इतिहासातून गाळले गेले असेल तर ते योग्यच झाले.”
ती प्रतिक्रिया म्हणजे अज्ञानमूलक उद्धटपणा आहे.
नेहरू महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या व्यापक स्वातंत्र्य चळवळीत 1920 सालापासून सामील झाले. नेहरूंनी नऊ वेळा जवळपास नऊ वर्षांचा तुरुंगवास स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या सत्ताावीस वर्षांच्या काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगला. त्या ला त्याग म्हणायचे नाही का?
नेहरू हे निर्विवादपणे तत्कालीन असामान्य व्यक्तिमत्त्व होते. नेहरूंना प्राथमिक शिक्षण ते औद्योगिकीकरण, सांख्यिकी माहिती गोळा करणे ते जागतिक शांतता, स्त्री-मुक्ती ते आदिवासी समाजाचे कल्याण, कला ते गिर्यारोहण ते अणुशक्ती अशा विषयांबाबत व्यापक आस्था होती. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या अभ्यासू व्यासंगाची साक्ष देतो.
भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताला एकसंध राष्ट्राचे अंतिम रूप देण्याचे हे आव्हान सोपे नव्हते. नेहरूंनी साम्यवाद व अनियंत्रित भांडवलशाही या दोघांचा अतिरेकी वापर टाळून त्यामधील मिश्र अर्थव्यवस्थेचा मार्ग निवडला. त्यामुळे भारताला भांडवलशाही महासत्ता अमेरिका व साम्यवादी महासत्ता रशिया यांच्या जागतिक रस्सीखेचीपासून अलग राहता आले. नेहरूंनी भारतासारख्या नवस्वतंत्र देशाची अविकसित अर्थव्यवस्था चांगल्यापैकी सक्षम होईपर्यंत तिला स्पर्धात्मक वातावरणापासून अलिप्त राखायचे आणि अर्थव्यवस्थेच्या अंगभूत क्षमतांचे सबलीकरण झाले, की मग तिचा सांधा स्पर्धाप्रधान वैश्विक अर्थकारणाशी यथाकाल जोडून द्यायचा हा अतिशय वास्तववादी व प्रगल्भ दृष्टिकोन जोपासत संस्थात्मक भांडवलाची पायाभरणी केली.
फाळणीनंतर खूप मोठा सिंचित प्रदेश आणि रेल्वेचे मोठे जाळे पाकिस्तानात गेले होते. भांडवलबाजारही अविकसित होता. नेहरूंनी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नेहरूंनी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना महत्त्वाचे स्थान दिले. त्यात धोरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची निर्मिती व विस्तार यांद्वारे खासगी उद्योगांच्या वाढीसाठी सुपीक भूमी निर्माण होऊ शकली. सार्वजनिक उद्योगांमुळे तंत्रज्ञानाची निर्मिती, विकास व विस्तार यांना चालना मिळाली. खासगी क्षेत्राच्या वाढीसाठी अत्यावश्यक असलेल्या यंत्रतंत्राचे आणि यांत्रिक सुट्या भागांचे उत्पादन स्वादेशात सुरू झाले. प्रशिक्षित कर्मचारीवर्ग अणि शिक्षित यंत्रतंत्रकुशल मनुष्यबळ खासगी उद्योगांना प्राप्त होण्याचा मार्ग त्यामुळे प्रशस्त झाला.
देशाची संघराज्यात्मक संरचना ध्यानी घेऊन आर्थिक विकासासाठी उपलब्ध साधनसामग्रीचे विनियोजन व वाटप केंद्र तसेच राज्यस्तरावर काटेकोर व काही शास्त्रीय निकषांबरहुकूम व्हावे यासाठी केंद्रीय वित्त आयोगाची संकल्पना वास्तवात आणली गेली. सततच्यान आणि सुविहित आर्थिक विकासासाठी ऊर्जा हा घटक महत्त्वाचा आहे हे जाणून दूरदर्शीपणे अणुऊर्जेच्या देशी विकसनासाठी अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. सरकारने औद्योगिकीकरणाच्या विस्ताराबरोबर प्रशिक्षित व उच्चशिक्षित मनुष्यबळाला असणारी मागणी वाढेल व त्यावेळी तसे मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर अत्याधुनिक यंत्रतंत्राचा अवलंब उद्योगांना करता येणार नाही हे हेरून ‘आय आय टी’ सारख्या संस्थांच्या स्थापनेचा उपक्रम हाती घेतला. वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञानाधारित जीवनव्यवहार ही आधुनिक जीवनशैलीची दोन मुख्य गमके. देशाचा आर्थिक-औद्योगिक पाया भरीव बनतो तोही वैज्ञानिक संशोधनामुळे. ते दोन्ही पैलू साध्य होण्यासाठी ‘काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेची स्थापना झाली. शासकीय प्रशासनात उत्तम दर्ज्याफचे कर्मचारी व अधिकारी मिळण्यासाठी ‘भारतीय लोकसेवा आयोगाची’ स्थापना झाली. नियोजनप्रधान अर्थविकासाचे प्रारूप स्वीकारून केंद्रीय नियोजन आयोगाची स्थापना करून पंचवार्षिक विकासयोजना तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे संपूर्ण भारत हीच एक विशाल सामायिक व एकात्म बाजारपेठ आहे हे अर्थवास्तव प्रस्थापित झाले.
आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर बेतलेल्या नवउद्योगांची स्थापना आणि विकास ही लष्करी सक्षमीकरणाची पूर्वअट असते. म्हणून दुस-या पंचवार्षिक योजनेचा भर आधुनिक व पायाभूत उद्योगांच्या स्थापनेवर होता. पोलाद हा संरक्षण सामग्रीच्या निर्मितीमधील व नाना प्रकारची यंत्र व यंत्रसामग्री यांतील एक प्रमुख घटक. त्यामुळे पोलाद, लोखंड निर्मिती, यंत्रनीर्मिती, वीजनिर्मिती यांसारख्या पायाभूत उद्योगांच्या स्थापनेवर दुस-या पंचवार्षिक योजनेत भर दिला गेला.
नेहरूंचे प्रशंसनीय योगदान स्वातंत्र्यानंतर भारत एकसंध देश म्हणून एकत्रित रीत्या उभा करणे, त्याचे स्वतंत्र अस्तित्व जागतिक स्तरावर मुखर करणे, त्याचे आंतरराष्ट्रीय धोरण आखणे, अंतर्गत संसदीय लोकशाही प्रशासन व्यवस्था बळकट करणे, सर्वसामान्य माणसाचे हित केंद्रस्थानी ठेवून समाजवादी व्यवस्था निर्माण करणे, जातीयवाद व जमातवाद यांचा मुकाबला करून निधर्मी दृष्टिकोन रूजवणे अशा अनेक आघाड्यांवर होते.
नामवंत इतिहासकार बिपिनचंद्र हे नेहरू यांचा ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असा उल्लेलख गौरवाने करतात. वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष डॅा. विजय केळकर नेहरू यांचा ‘नवरचनाकार’ म्हणून गौरव करतात. नरहर कुरुंदकर त्यांना मुत्सद्दी नेता म्हणून संबोधतात.
नेहरू यांच्या कार्यकालाचे मूल्यमापन करताना त्यात काही दोष, उणिवा व कमतरता आढळणारच. पण त्या कमतरता त्यांच्या यशाला धक्का लावत नाहीत. ब्रिटिश राजवटीदरम्यान दरसाल सरासरी एक टक्क्याने घटते राहिलेले ठोकळ देशी उत्पादन नेहरूंच्या कार्यकाळात दरवर्षी सरासरी चार टक्के दराने वाढत होते. त्याला नेहरूंचे कर्तृत्व म्हणायचे नाही का?
भारताच्या इतिहासातील नेहरूंचे अमीट स्थान नाकारून कोणता शहाणपणा सिध्द होतो?
[या लेखाला आधार :- 1.’नवरचनाकार’ हा डॅा. विजय केळकर यांचा लेख. (शब्दांकन,अभय टिळक, लोकसत्ता लोकतंत्रात्मक पुरवणी, रविवार 18 मे 2014.) 2. ‘The Discovery of India’s Jawaharlal Nehru, (Penguin Publication 2008 edition.) 3. ‘India Since Independence ‘, (Bipinchandra, Mridula Mukherjee, Aditya Mukherjee, Penguin Publication, 2010 edition.)]
– विद्यालंकार घारपुरे