शिल्पकार शिल्प साकारतो म्हणजे नेमके काय करतो? शिल्पकार मातीच्या गोळ्यातून केवळ एक मूर्ती/शिल्प घडवत नसतो, तर तो त्या माध्यमातून एक विचार, एक कलाकृती आकारास आणत असतो. शिल्प पाहत असताना, त्याचा आशय समजून घेणे, त्याची जन्मकथा, स्वभावविशेष, सौंदर्यदृष्टी, ती घडवण्यामागील उद्देश, त्या शिल्पाच्या माध्यमातून शिल्पकारास जनमानसापर्यंत नेमके काय पोचवायचे आहे हे सारे जाणून घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. शिल्पांमध्ये काही व्यक्तिशिल्पे असतात तर काही मानवी जीवनातील विविध पैलू घडवणारी विषयशिल्पे असतात. डोंबिवलीतील शिल्पकार भाऊ साठे यांचा ‘गांधी ते गांधी’ असा शिल्पप्रवास अन् शिल्पकार म्हणून भाऊंच्या जीवनप्रवासातील काही गोष्टी या त्यांच्या डोंबिवली येथील शिल्पालयाला दिलेल्या भेटीत उलगडल्या.
शिल्पकार सदाशिव ऊर्फ भाऊ साठे यांचा जन्म 17 मे 1926 रोजी झाला. त्यांच्या चुलत्यांचा गणपती निर्मितीचा कारखाना कल्याणमध्येच होता. भाऊंनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. भाऊंनी मुंबईच्या सर जे.जे. महाविद्यालयात कलाशिक्षण घेतले. त्यांनी शिल्पकलेचा डिप्लोमा प्रथम क्रमांक पटकावत 1948 साली पूर्ण केला. त्यांनी सिनेनिर्माते व्ही.शांताराम यांच्याकडे सेट डिझाइनिंगसाठी मोल्डिंग खात्यात काही दिवस नोकरी केली. त्यानंतर दिल्लीतील अँटिकच्या दुकानात स्टोअर आर्टिस्ट म्हणूनही नोकरी केली. त्याच दरम्यान, भाऊंच्या कर्तृत्वाला वाव देणारी घटना घडली. दिल्ली नगरपालिकेने महात्मा गांधींचा हिंदुस्थानातील पहिला भव्य पुतळा बनवण्यासाठी तयारी सुरू केली. त्यासाठी बऱ्याचश्या शिल्पकारांमध्ये स्पर्धा होती, पण ते काम भाऊंनी मिळवले आणि यशस्वी रीत्या पूर्ण केले.
भाऊंनी तो नावलौकिक लाभल्यावर देशभरात बरीच शिल्पे निर्माण केली आहेत. योगायोग असा, की दिल्लीतील गांधी पुतळ्याने (1954) सुरू झालेला शिल्पनिर्मितीचा प्रवास 2014 साली गांधी यांचीच शिल्पाकृती बनवून पूर्ण झाला. त्यांनी घडवलेल्या शिल्पांपैकी 1961 साली मुंबईच्या ‘गेट वे ऑफ इंडिया’समोरचा शिवरायांचा पुतळा महत्त्वाचा आहे. महाराजांची मुद्रा प्रौढप्रतापी, निर्भय, सर्वकल्याणकारी अशी आहे. पुतळा अश्वारुढ आहे. भाऊंच्या घरी कल्याण येथील संकल्पित शिल्प पाहण्यात आले. ते शीड जसे नावेला दिशा देते, तशी रयतेला स्वराज्याच्या दिशेने नेणाऱ्या आरमाराची उभारणी करणारे आहे. ते मन मोहून घेते. ते दुर्गाडी किल्ल्यावर उभारले जायचे होते, परंतु काही कारणांमुळे ते घडले नाही व शिल्प शिल्पालयात राहिले.
भाऊंनी देशभरात अनेक पुतळे साकारले. पुरंदरावर आक्रमक पवित्र्यात दोन्ही हाती तलवारी घेऊन, शत्रूवर तुटून पडलेल्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा, ग्वाल्हेर येथे 1962, 1969 साली उभारलेला राणी लक्ष्मीबार्इंचा एकोणीस फूटी पुतळा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नऊ फूटी पुतळा, लाल किल्ल्यासमोरील 1975 साली उभारलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अठरा फूटी पुतळा, ठाण्याच्या डॉ. वा.ना. बेडेकर यांचा सहा फूटी पुतळा; तसेच, लंडन बकिंगहॅम पॅलेस येथे प्रिन्स फिलिप यांचे 1973साली व्यक्तिशिल्प अशी शिल्पे उभारली. भाऊंना त्यांच्या शिल्पनिर्मितीच्या योगदानाबद्दल 1954 साली राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक, कल्याण गौरव पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदा-गौरव पुरस्कार, याज्ञवल्क्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्यांचे शिल्पालय डोंबिवली पूर्वेला औद्योगिक वसाहतीत (ए132, फेज वन) आहे. त्यांचे चिरंजीव तेथे माहिती देण्यासाठी हजर असतात. शिल्पालयातील शिवरायांचे सिंहासनाधीश, चेहर्या्वर मुत्सद्दी, करारी बाणा दर्शवणारे शिल्प, झाशीची राणी लक्ष्मीबार्इंचे रणरागिणी रूप, इंदिरा गांधी यांचे करारी रूप दर्शवणारे शिल्प, महात्मा गांधी यांची ध्यानस्थ; तसेच, उद्विग्न मनस्थिती चेहर्याेवर विलसित असणारे शिल्प, इंग्रजांना ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे ठणकावून सांगणारे लो. टिळक यांचे शिल्प, पं.नेहरू, गोंदवलेकर महाराज, गोळवलकर गुरुजी, पु.ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, डॉ. हेडगेवार, आचार्य विनोबाजी, अटलबिहारी वाजपेयी, लॉर्ड माऊंटबॅटन, स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास ही आणि अशी भाऊंची अनेक शिल्पे प्रेक्षकांना सुखावतात, त्यांच्या स्मरणात राहतात.
त्या सगळ्या शिल्पांत विशेष लक्ष वेधून घेते ते, कोयना धरणाचे संकल्पित तीन अश्वांवर स्वार मानवाचे लगाम हाती घेऊन, त्यांना नियंत्रित करणारे शिल्प, पृथ्वी-आप-तेज यांवर मानवाने मिळवलेल्या विजयाचे मूर्त रूप म्हणजे कोयना धरण वीजप्रकल्प. अशी बरीच शिल्पे पाहत प्रेक्षकांचे मनही कविकल्पना करत आणि विविध शिल्पांविषयी तर्कशक्ती लढवत शिल्पालयातून बाहेर पडते. नजरेला सुखावणारी, प्रेक्षकांना विचार करायला लावणारी ही शिल्पे सर्वांनीच वेळ काढून अवश्य पाहावीत.
भाऊ साठे यांचे शिल्पकलेवरचे त्यांच्या शिल्पांची जन्मकथा सांगणारे ‘आकार’ नावाचे पुस्तक प्रकाशित (राजहंस प्रकाशन) केले आहे. भाऊ सध्या (2018) ब्याण्णव वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नी नेत्रा साठे या चित्रकार आणि कवयित्री होत्या. त्यांना दोन मुले आहेत. मुलगा श्रीरंग साठे आणि मुलगी अलका साठे. भाऊ सध्या घरीच छोटी-छोटी शिल्पे आणि चित्रे साकारतात.
‘सदाशिव साठे शिल्प प्रतिष्ठान’
1 ए-132, एम.आय.डी.सी, फेस 1, डोंबिवली – 421201
– चंदन विचारे
Chandan.vichare@gmail.com