भाई महेश शंकर ढोले – निरपेक्ष कार्यकर्ते

0
32
carasole

भाई महेश शंकर ढोले हे जुन्या पिढीतील राजकीय विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होते. ते रॉयवादी होते. त्‍यांनी शेतकरी संघटना, सर्वोदय चळवळ, सहकारी सोसायट्या, वीज ग्राहक संघटना, मराठी साहित्‍य मंडळ यांत हिरीरीने भाग घेतला. त्‍यांचा भर राजकारणात चांगली माणसे आली पाहिजे आणि धर्मनिरपेक्ष समाजव्‍यवस्था उभी राहिली पाहिजे, यावर होता. त्‍यांनी समाजातील विषमतेवर मात करण्‍यासाठी शैक्षणिक संस्था उभारणीबरोबर शेतीमध्‍येही विविध प्रयोग केले.

भाई ढोले यांचे मूळ गाव सांगोला तालुक्यातील कमलापूर. त्‍यांचा जन्‍म 1922 साली झाला. त्यांचे वडील पंढरपूरला दुकान चालवत. त्यामुळे त्यांचे प्राथमिक व माध्‍यमिक शिक्षण पंढरपूरच्या लोकमान्य विद्यालयात झाले. त्यांना मार्गदर्शन गणेश पाठक मास्तरांचे लाभले. ते स्कॉलरशिप मिळवणारे हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात. त्यांनी राजकीय व सामाजिक कार्याला शाळेत असतानाच प्रारंभ केला. ते विद्यार्थी संघ व राष्ट्र सेवा दल यांचा संघटक व कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या भारावलेल्या कालखंडात शिक्षण सोडून काँग्रेसअंतर्गत रॉयवादी गटात काम केले. त्यांचा वैचारिक प्रवास कॉंग्रेस, समाजवाद, मार्क्सवाद आणि रॉयवाद असा झाला. त्यांनी 1940 साली मुंबई येथे झालेल्या रॉयवाद्यांच्या परिषदेत भाग घेतला. त्यातून त्यांचा वैचारिक दृष्टिकोन पक्का झाला. ते दुस-या महायुद्धात जर्मनीला सहकार्य करणे म्हणजे फॅसिस्ट प्रवृत्तीला सहकार्य करणे असे मानत, म्हणून त्‍यांनी इंग्रजांना सहकार्य करण्‍याचे धोरण स्वीकारले. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर, महात्‍मा गांधी यांनी 1942 मध्‍ये इंग्रजांविरूद्ध चले जावची हाक दिली होती. त्यांची वैचारिक व राजकीय चर्चा आत्‍माराम बापू पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्याशी होत असे. ते 1944 साली मानवेंद्रनाथ रॉय यांनी काढलेल्या रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टीच्या अधिवेशनाला सहका-यांसह उपस्थित होते. भाई ए. के. भोसले यांनी 1946 साली त्या पार्टीच्या वतीने सोलापूरची निवडणूक लढवली. भाई ढोले यांनी त्यांना सहकार्य केले, पण त्यांचा पराभव झाला. रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी 1946 साली विसर्जित झाली, तेव्हा त्यांनी राजकीय प्रबोधनाच्या कार्याला वाहून घेतले. कोणत्याही राजकीय पक्षात सक्रियपणे काम न करता किंवा प्रत्यक्ष निवडणुकीत भाग न घेता, ते चांगल्या उमेदवाराच्या लोकांमध्ये प्रचार-प्रसार करणे, लोकशाही प्रक्रिया अधिक निकोप करणे अशी कामे राजकीय प्रबोधनाच्या माध्यमातून करत होते. त्याचबरोबर सगळ्याच सार्वजनिक चळवळीत सक्रिय भाग घेत होते.

ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जिल्हा समितीच्या कार्यकारणीचे सदस्य होते. त्यांनी रावसाहेब पतंगे यांना 1952 च्या निवडणुकीत सहकार्य केले. त्यांनी भाई राऊळ यांना निवडून आणण्यात 1957 च्या पंढरपूर मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीत मोलाची भूमिका बजावली. मधल्या काळात त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास होऊन सोलापूर येथील संगमेश्वर कॉलेजध्ये इंटरपर्यंत शिक्षण घेतले.

ढोले यांना लग्‍नानंतर दोन मुले झाली. त्यांनी चरितार्थासाठी कमलापूरधील माणखुरामध्ये शेती केली, पण त्याबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीही केली. ढोले यांनी शेतीत विविध प्रयोग केले. त्यांच्या शेतीला लागून माण नदी आहे. त्‍यांनी शेती सहकारी तत्त्वावर करण्याचा प्रयोग पहिल्यांदा केला. पण ते प्रयोग फारसे यशस्वी झाले नाहीत. ते गमतीने म्हणत, “एखाद्यावर सूड उगवाचा असेल तर त्याला माणखुऱ्यातील शेती कसायला द्या!”

ढोले यांनी शेती सोडून 1963 ते 1980 विमा विकास अधिकारी म्हणून काम केले. त्याच काळात ते आरोग्य सहकारी मंडळाचे कार्यकर्ता म्हणूनही कार्यरत होते. त्‍यांनी सांगोला नगरपरिषदेच्या दवाखान्याची उभारणी केली. स. नि. चांदणे यांच्या बरोबरीने सर्वोदय चळवळीत भाग घेऊन शाळा काढल्या, सहकारी सोसायट्या स्थापन केल्या आणि तालुक्यात शेतकरी संघटना उभी केली. सांगोला तालुका शेतकरी संघटना, मराठी साहित्य मंडळ, वीज ग्राहक संघ या संस्था स्थापन करण्यात व चालवण्यात त्यांचा सहभाग होता. 1982 मध्ये सांगोल्यात शरद जोशी यांच्याबेरोबर शेतकऱ्यांची सभा ट्युरिंग टॉकीज मध्ये घेतली. त्यावेळी अशा फिरत्या तंबूच्या चित्रपटगृहांमध्ये फक्त चित्रपट दाखवले जायचे. त्यावेळी ती सभा खूप गाजली. शेतकऱ्यांना संघटित करण्यात त्‍यांचा वाटा मोलाचा होता. त्या काळी, वीज मिळायला पाच-पाच वर्षे लागायची. काही वेळा कनेक्शन मिळालेले नसतानाही शेतकऱ्यांना वीज बिले येत. त्यामुळे त्या संबंधातील अडचणी सोडवणसाठी, त्‍यांनी वीज ग्राहक संघ स्थापन केला. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या धर्तीवर लोकांमध्ये साहित्याबद्दल रुची निर्माण व्हावी, म्हणून त्‍यांनी मराठी साहित्य मंडळ स्थापन केले. त्या माध्यमातून लेखक, कवी यांची व्याख्याने सुरू केली. नव्याने प्रकाशित होणाऱ्या किंवा गाजलेल्या पुस्तकावर चर्चा आयोजित करण्यात येत असे. साहित्याचा प्रसार-प्रचार करण्याचा प्रयत्न अत्यंत कमी खर्चात केला जात होता.

भाई ढोले यांचा सांगोला तालुक्यातील एखतपूरचा ‘निवृत्ती सेवा संघ’ आणि वाटंब-याचे ‘जीवन शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थांच्या स्थापनेत वाटा होता. त्या संस्थेच्या वतीने त्‍यांनी स्थानिक पातळीवर माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले. ते ‘जीवन शिक्षण प्रसारक मंडळा’चे तीस वर्षे अध्यक्ष होते. तत्त्वनिष्ठ, नि:स्पृह, चारित्र्यसंपन्न, स्पष्टवक्ते विचारवंत म्हणून त्यांचा लौकिक होता. बुद्धिवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांवर त्यांची श्रद्धा होती. साहित्य संस्कृती मंडळाने त्यांचे ‘धर्मनिरपेक्षता नव्हे, इहवाद’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्यावेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. त्यात त्यांनी भारतीय राजकारणाची विभागणी धर्मनिरपेक्ष व धर्मवादी अशा दोन पक्षांत होईल असे भाकीत केले होते. ते गेल्या पंचवीस वर्षांतील राजकारण पाहता खरे झाले आहे. त्यांनी ‘मंडल आयोग : एक चिकित्सा’ हे पुस्तकही लिहिले आहे.

– डॉ. कृष्णा इंगोले

About Post Author

Previous articleनामदेवांचे कुटुंबीय व त्यांची अभंगरचना
Next articleपण्डिता रमाबाई सरस्वती – प्रबोधनकार के.सी.ठाकरे
डॉ. कृष्णा इंगोले हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, कुशल प्रशासक व प्रसिद्ध साहित्यिक आहेत. ते सांगोला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळत आहेत. ते प्राचार्यपदी असले तरी ते वर्गात व्याख्यान देण्याचे काम अजूनही करतात. ते ज्या ग्रामीण परिसरात वाढले, घडले, संस्कारित झाले, त्या परिसराशी ते कृतज्ञ राहिले आहेत. त्‍यांनी त्या ग्रामीण विद्यार्थ्यांना तळमळीने ज्ञानदान केलेले आहे. शिक्षण हा त्यांचा पेशा नसून ते त्यांचे जिवितकार्य आहे असे म्हणणे यथोचित होईल. त्यांनी सांगोला तालुक्याच्या साहित्यिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्‍यांच्‍यासंदर्भात 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'वर प्रसिद्ध केलेला सविस्‍तर लेख! लेखकाचा दूरध्वनी 9423236144