उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशातील, जळगावात हट्टाने राहून त्या गावाचे नाव जगाच्या नकाशावर प्रकाशमान करण्याचे श्रेय प्रख्यात उद्योगपती व जैन उद्योगसमुहाचे प्रवर्तक डॉ.भवरलाल जैन यांना जाते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा आवाका जेव्हा मुंबई-पुण्यापलीकडे कल्पिला जात नव्हता तेव्हा भवरलालजींनी स्वत:च्या औद्योगिक साम्राज्याचा पाया जळगावात घातला. शेती, शेतकरी आणि शेतीसंबधी उद्योगात हाडाची काडे करण्याची बांधिलकी मानली. पाश्चिमात्य देशांतले तंत्रज्ञान डोळसपणाने भारतीय मुशीत घालून शेतक-यांना उपलब्ध करुन दिले. स्वत: शेतकरी असल्याने, पिढ्यांन् पिढ्या शेती करणा-या घरात जन्म घेतल्याने त्या व्यवसायाशी त्यांची नाळ उत्तमरित्या जुळली होती.
जैन यांनी प्रथम शेतीमध्ये लागणा-या गोष्टींचा म्हणजे खते, बी-बियाणे, जंतुनाशके, ट्रॅक्टर्स यांच्या जोडीला रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस यांचा व्यापार केला. त्यांनी कच्च्या पपईच्या चिकातून काढलेल्या पेपेन या एन्झाइमची निर्यात करून उद्योजक-कारखानदार म्हणून पदार्पण केले. त्यांनी 1980 साली पीव्हीसी पाईप्सची निर्मिती सुरू केली. पीव्हीसी पाईप्स, ठिबक सिंचन, एचडीपीई पाईप्स, पीव्हीसी शीटस् अशा उत्पादनांच्या साहाय्याने त्यांचा विस्तार झाला. जैन पाईप्स, जैन ठिंबक सिंचन या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील शेतक-यांना ते परिचित झाले. निर्यातही वाढत गेली. उती संवर्धनाने केळी पिकाला नवसंजीवनीमिळाली, तर सौरबंब आणि जैन ज्योत या उत्पादनांनी सौरऊर्जेवरील उत्पादनांमध्ये नवे दालन उघडले. कांदा निर्जलीकरणाची अन्नप्रक्रिया करून त्यांच्या गराची, सरांची, अर्काची निर्यात वाढवली. कराराच्या शेतीने क्षितिज आणखी रुंदावले. शेतक-यांच्या मालाला हमीभाव आधी जाहीर केला. शेतीउत्पन्नातील जुगार थांबवायला प्रत्यक्ष कृती केली. फळांची निर्यात थेट सुरू केली.
जैन यांनी बायोटेक्नॉलॉजी शिवाय शेतीमध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टीने विचार करून अद्ययावत प्रयोगशाळेची निर्मिती केली. ग्रॅण्डनैन नावाची उतीसंवर्धित केळी रोपांची नवी जात व्यापारी तत्त्वार वितरित करण्याचा पहिला मान भवरलाल जैन यांना जातो. युरोपमधील तसेच अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये ग्रॅण्डनैन जातीची ताजी पिकलेली केळी निर्यात करण्याचे त्यांचे स्वप्नही साकार झाले आहे. स्वतःच्या गरजेपोटी आयात करणारी राष्ट्रे भारतातून अन्य जातींची फारशी केळी घेत नाही. अशा रितीने ताज्या पक्व केळीची निर्यात करून देशाच्या संपत्तीत मोलाची भरत तर पडते आहेच, शिवाय शेतकर्यांच्या उत्पन्नात थेट भर पडली आहे. जैन यांना आणखी एका पायाभूत बाबीविषयक काम केल्याचे श्रेय जाते. शेतावर संशोधन विकास व प्रात्यक्षिके प्रशिक्षण आणि विस्तार केंद्र, पडिक जमिनीचा विकास, नापिक जमीन लागवडीखाली आणणे, मृदसंधारण, डोंगराळ व खडकाळ जमिनीवर लागवड करणे, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, जलसंधारणाचे व्यवस्थापन, खतपाणी, हरितगृहे व त्याच बरोबर सेंद्रीय आणि जैव खते तसेच जैव-कीटकनाशके हे सर्व एका छत्राखाली असलेले चित्र पाहण्यासाठी दर वर्षी किमान पंचवीस ते तीस हजार शेतकरी ‘जैन उच्च तंत्र शेती संस्थाना’स भेट देतात आणि प्रेरणा घेऊन जातात.
जैन यांचा औद्योगिक पसारा खूप विस्तारला. त्यांचे भारतामध्ये सहा, इस्त्रायलमध्ये एक तर अमेरिकेत चार कारखाने आहेत. त्यांच्या उद्योगात केवळ जळगावमध्ये सुमारे साडेचार हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. वार्षिक उलाढाल सुमारे तेराशे कोटींवर गेली आहे. त्यात सहाशे कोटीं रूपयांची निर्यात समाविष्ट आहे. भवरलाल जैन यांनी जगभर प्रवास केला. त्यांनी औद्योगिक उत्पादनाची गुणवत्ता जगजाहीर करणारी आयएसओ सारखी मानांकने स्वीकारली. भवरलालजींना अमेरिकेतले सिंचन विषयातले ‘क्रॉफोर्ड रीड मेमोरीयल’ हे पारितोषिक 1997 साली मिळाले. तो पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियाई व्यक्ती होते. उत्तर महाराष्ट्र, उदयपूर आणि कोकण कृषी विद्यापीठ तसेच तमीळनाडू कृषी विद्यापीठांनी भवरलालजींना सन्माननीय अशा डी.लिट, डी.एस्सी या पदव्या दिल्या. त्या कामाची पावती म्हणून भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव देखील झाला. त्यांनी केलेल्या कृषी विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल भारत सरकारने तो सन्मान त्याना दिला.
जैन यांचा जन्म 12 डिसेंबर 1937 साली जळगावच्या वाकोद गावी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.कॉम, एलएल.बी या पदव्या मिळवल्या होत्या. त्यांचे मराठी व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व होते. त्यांचा ग्रंथसंग्रह उत्तम होता. ते पूर्ण शाकाहारी व निर्व्यसनी होते. ते चहा-कॉफीचेही सेवन करत नसत. त्यांनी शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धांत बक्षिसे मिळवली होती. त्यांनी उमेदवारीच्या काळात निव्वळ आठ हजार रूपये भांडवलात व्यवसाय सुरू केला. त्यांनी 1963 साली उद्योग सुरू केला. त्या उद्योगाने आज वार्षिक तीन हजार कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत झेप घेतली आहे. त्यांची मुले तो उद्योग सांभाळतात.
भवरलाल जैन दिवसाचे किमान बारा तास काम केल्याशिवाय झोपत नसत. त्यांची एकाच वेळी शंभर जणांना कामाला लावण्याची हातोटी अनोखी होती. त्यांची चार मुलेही त्यांच्या व्यवसायात सहभागी आहेत. किंबहुना उद्योगाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून भवरलाल जास्त वेळ अनुभुती शाळेला व लेखन विचाराला देत असत. त्यांचे पत्नी कांताबेन यांच्यासंबंधीचे ‘ती आणि मी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
जैन हे भांडवलशाहीचे कट्टर पुरस्कर्ते होते. तरीही ते नव्या आर्थिक धोरणांबाबत मूलभूत मतभेद नोंदवत. राष्ट्रीय आर्थिक विकासाचा विचार ते स्वतंत्र पध्दतीने करत. त्यासाठी कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक असावे अशा विचारांचा ते पुरस्कार करत असत. त्यांना भारत हा महासत्ता बनू शकेल असा आत्मविश्वास होता. त्यासाठी अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण होण्याबाबत ते सुचवत. समाजवादी ढोल बडवत आपण सरकारी नोकरशाही वाढवली, मात्र तिच्या विळख्यातून अर्थव्यवस्था मुक्त व्हावी असे त्यांना वाटत असे. भवरलाल जैन ‘कायद्याचे जंजाळ म्हणजे प्रगती नव्हे’, ‘पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे ‘ असे विचार मांडत.
भवरलाल जैन यांचे 25 फेब्रुवारी 2016 रोजी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
– किशोर कुळकर्णी
we love our bade Bhau. Now we
we love our bade Bhau. Now we are alone but we commit for fulfilling the dreams of respected bade Bhau. Lacs of salute Thanks Praveen Patil
भवरलाल जैैन यांनी शेती आणि
भवरलाल जैैन यांनी शेती आणि शेतक-यांसाठी अहोरात्र अपार कष्ट घेतले. त्याचं शेतीविषयक संशोधन आणि उपयुक्त मार्गदर्शन भारतीय स्तरावर नावाजलं गेलं. या आदर्श भूमीपुत्राला शत-शत प्रणाम.
शत शत प्रणाम!!
शत शत प्रणाम!!
Comments are closed.