भगवदगीता हा व्यास मुनींनी रचलेल्या, महाभारत ग्रंथामधल्या भीष्मपर्वाचा भाग आहे. त्यात अठरा अध्याय असून सर्व मिळून एकंदर सातशे श्लोक आहेत. त्यात महाभारतातले युद्ध सुरू होण्यापूर्वी युद्धभूमीवरच झालेला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद अंतर्भूत आहे.
अर्जुन स्वजनांशी युद्ध करायला तयार नव्हता. पण श्रीकृष्णाने त्याला तो क्षत्रिय असल्याची आठवण करून देऊन आणि युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे याचा उपदेश करून अर्जुनाला युद्ध करायला तयार केले. त्या संबंधात त्या दोघांमधे सुमारे अडीच-तीन तास जो संवाद झाला, तो म्हणजेच भगवदगीता! हिंदू संस्कृतीमधे भगवान श्रीकृष्ण म्हणजे ईश्वराचा अवतार मानला जातो. त्याने म्हणजे खुद्द भगवंताने केलेला हा उपदेश असे म्हणून भगवदगीता असे नाव पडले.
या संवादादरम्यान अर्जुनाने कृष्णाला अनेक प्रश्न विचारले आणि कृष्णाने त्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली व त्या अनुषंगाने उपदेशही केला. अर्जुनाचे प्रश्न अनेक वेगवेगळ्या विषयांवरचे होते. त्यात तत्त्वज्ञान, वैश्विक वास्तवाचे (रिआलिटीचे) ज्ञान, माणसाची कर्तव्ये, अध्यात्म, भक्ती, योग आणि इतरही अनेक विषय होते. साहजिकच, अशा विविध विषयांवरच्या प्रश्नांची उत्तरे देताना भगवान कृष्णाने त्यामधे संपूर्ण वेदवाड.मयाचा संक्षिप्त गोषवारा सांगितला. एवंच, गीता ही संपूर्ण वैदिक वाड.मयाची संक्षिप्त आवृत्ती आपसूकच बनली.
या कारणाने गीतेला हिंदू तत्त्वज्ञान व संस्कृती आणि अध्यात्म यांचा सारांश म्हणावा असे स्वरूप प्राप्त झाले व त्यामुळे गीतेला अनन्यसाधारण महत्त्व आले. म्हणूनच गीता हे वेदांतल्या उपनिषदांप्रमाणेच, त्याच दर्जाचे व प्रमाणभूत असे एक उपनिषदच मानले जाते.
गीतेमधले तत्त्वज्ञान आणखी सोप्या भाषेत विशद करून सांगण्याकरता अनेक मोठमोठ्या विद्वानांनी त्यावर टीकाग्रंथ लिहिले आहेत. त्यांपैकी अनेक ग्रंथ संस्कृत भाषेमधे आहेत. त्यात आद्य शंकराचार्यांनी लिहिलेले भाष्य प्रमाणभूत मानले जाते. सर्वसामान्य लोकांना व विशेषत: ज्यांना संस्कृत भाषा समजत नाही अशा लोकांच्यापर्यंत गीतेतले गहन तत्त्वज्ञान पोचवण्याकरता सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वराने त्यावर ज्ञानेश्वरी नावाच अपूर्व ग्रंथ लिहिला व ते संत तत्त्वज्ञान संस्कृतातून प्राकृत भाषेमधे म्हणजे मराठीत आणले. अलिकडच्या काळात, नव्वद वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी गीतेवर ‘गीतारहस्य’ नावाचा ग्रंथ लिहिला.
अनिल भाटे- इमेल- anilbhate1@hotmail.com , एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका