Home मराठी भाषा विस्मरणात गेलेली पुस्तके ब्रिटिश मिशनरी आणि मराठी म्हणी (British Missionaries and Marathi Proverbs)

ब्रिटिश मिशनरी आणि मराठी म्हणी (British Missionaries and Marathi Proverbs)

7

जगाच्या पाठीवर ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणाऱ्या मिशनरी लोकांनी जगभरातील लोकांच्या शारीरिक प्रकृतीची काळजी तर घेतलीचपण ते जेथे जेथे गेले तेथील लोकांशी एकरूपही झाले! लोकांशी एकरूप होणे म्हणजे त्यांची भाषा स्वत:ची मानणे, त्यांच्या चालीरीतींचा आदर आणि प्रसंगी अंगीकार करणे, त्यांची खाद्यसंस्कृती परकी न मानणे इत्यादी. हिंदुस्तानात आलेल्या ब्रिटिश प्रशासकांनीही येथील स्थानिक भाषांचा अभ्यास – कदाचित त्यामागे वेगळा मनसुबा असेलही – इंग्रजी लोकांच्या स्थानिक पातळीवर भाषिक एकरूपता साधण्याच्या प्रयत्नांतून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस दोन पुस्तके जन्माला आली. पहिले पुस्तक आहे Some Assamese Proverbs. त्या पुस्तकाचे निर्माते होते कॅप्टन पी.आर. गुरडान. ते आसाममधील गोलपारा येथे डेप्युटी कमिशनर होते. पुस्तक 1896 साली प्रकाशित झाले आहे. त्यावेळी त्याचे मूल्य दोन रुपये लावले होते. इतक्या मोठ्या किंमतीला (तत्कालीन किंमतप्रणालीचा विचार करता) ते विकले जाईल असे प्रकाशकांना वाटले. त्यावरून त्याचा ग्राहकवर्ग लेखकाप्रमाणेच अभ्यासू असा ब्रिटिश अधिकारी श्रेणीतील किंवा सुशिक्षित, श्रीमंत असा हिंदुस्तानी माणूस असण्याची शक्यता प्रधान मानली गेली असावी. हेमचंद्र बरुआ या बॅरिस्टरांचे सहाय्य म्हणींचा तो संग्रह तयार करण्याच्या कामात त्यांना झाले होते.

पुस्तक छोटे आहे आणि ते सहा विभागांत मांडले आहे. पहिल्या भागात, मानवी स्वभावाच्या अनेक तऱ्हा, चुका आणि काही पातके, यांच्याशी संबंधित म्हणी आहेत. त्या म्हणी अतिशयोक्ती, संताप, खोटा बडेजाव करण्याची वृत्ती, वृथा अभिमान, लोभ, अज्ञान अशा विविध स्वभाववैशिष्ट्यांना उद्देशून बनलेल्या आहेत. दुसरा विभाग नीतिविषयक सल्ला, काही धोके, व्यवहारज्ञान, फसवणुकीच्या तऱ्हा इत्यादींवर प्रचलित अशा म्हणींचा असा आहे. तिसऱ्या विभागात, जातिविशिष्ट म्हणी, चौथ्यात धार्मिक चालीरीती, लोकप्रिय अंधश्रद्धा, सामाजिक आणि नैतिक बाबी. पाचव्यात शेतीविषयीचे संदर्भ आणि हवामानावर आधारित तर सहाव्यात जनावरे, पाळीव प्राणी आणि कीटक यांच्या संदर्भातील म्हणी आहेत. सुरुवातीला त्या त्या म्हणी त्या त्या विभागात मांडल्या आहेत आणि सहा विभागांतील म्हणी देऊन झाल्यावर उत्तरार्धात त्या म्हणींचे संदर्भ समजावून सांगितले आहेत.

लोभीपणावर भाष्य करणारी म्हणफणस आहे फांदीवर, तेल आधीच ओठांवर.

अतिशयोक्ती – पाण्याला गेल्या बायका बारा, नाक कापून आल्या तेरा; एका तीरात सिंह मारले सात, संकोचाने ठेवले मनात.

अज्ञान – ज्याला येत नाही नाचता तो म्हणतो उतार भारी अंगणाचा. (आपल्याकडील समानार्थी – नाचता येईना अंगण वाकडे)

स्वार्थीपणा – माझी आई गेली गोस्वामींकडे, तिच्या बरोबर मी गेलो

भात आणि केळी मिळता प्रसाद, मी गोस्वामींचा शिष्य झालो. (आपल्याकडची म्हणपोटाचा भरला दरा, तो गाव बरा)

वाईट काळात तुम्ही काहीही विपरीत करू शकता (विनाशकाले विपरीत बुद्धी)

फालतू गोष्टींकडे लक्ष – मी विसरलोच होतो, रावणाच्या घरात पंचरंगी फूल होते.

खोटी सबब – जरुरीपेक्षा जास्त बोलणारा माणूस म्हणतो, “काय करणार, जिभेला नाही हाड, ती बोलते फार ‘ (तुर्की भाषेत – जीभेला हाड नसते, पण ती हाडांचा चुरा करते. ग्रीक भाषेत – जिभेला हाड नसते पण ती हाडे फोडते. मराठीत – काय बोलतोस? तुझ्या जिभेला काही हाड?)

दांभिकपणा – हत्ती गेला चोरीला, वांगी चोरणारा पकडला.

आपल्या मराठी भाषेतील म्हणींशी आसाममधील बोलीभाषेतील म्हणींचे साधर्म्य बघून म्हणावे लागते, माणूसच केवळ येथून तेथून सारखा नाही तर त्याच्या भावभावना, विचारपण सारखेच!

म्हणींवरील दुसरे पुस्तक आहे – Marathi Proverbs. ते चर्च मिशनरी सोसायटीचे मिशनरी रेव्हरंड A Manwaring यांनी तयार केले आहे. त्यांनी सर्व म्हणी गोळा केल्या आणि त्या इंग्रजीत अनुवादित केल्या. नवलाची गोष्ट म्हणजे ते पुस्तक पहिल्या पुस्तकाच्या आसपासच म्हणजे 1899 मध्ये प्रकाशित झाले. पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत रेव्हरंड म्हणतात, “मराठी म्हणींचे इंग्रजीत भाषांतर करून ते यापूर्वी प्रकाशित झाले असल्याचे मला माहीत नाही. पुस्तक प्रकाशित करण्याचे एकमात्र कारण म्हणजे बोलीभाषेतील सर्व अभिव्यक्तींचे जतन त्या नष्ट होण्यापूर्वी करणे. त्या बोलीभाषेतील म्हणींमधून लोकांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व दृष्टीस पडते, म्हणून त्या जपण्यास हव्यात.

हे विचार एका मिशनरी व्यक्तीचे आणि एकशेएकवीस वर्षांपूर्वीचे आहेत. हे लक्षात घेता मिशनरी वर्गाकडे एक वेगळ्या परिमाणाने बघणे जरूर आहे असे सर्वाना वाटेल.

रेव्हरंड यांनीही पुस्तकाची प्रकरणे पाडली आहेत. म्हणींच्या उगमांचे वर्गीकरण शेती, प्राणी, शरीराचे भाग व पोशाख, अन्न, रोग आणि शरीरस्वास्थ्य, घरे, पैसे, नावे, निसर्ग, नैतिक दंडक, नातेसंबंध, धार्मिक, व्यापार व व्यवसाय आणि अन्य असे आहे. ते पुस्तक पहिल्याच्या मानाने बरेच मोठे आहे. त्यात दिलेल्या म्हणी बऱ्याचशा परिचयाच्या आहेत. मला ज्या थोड्या वेगळ्या वाटल्या त्या येथे दिल्या आहेत

आगला पडला तर मागचा हुशार (पुढच्यास ठेच मागचा शहाणा)

आळसाने शरीर क्षीण गंजाने लोखंड क्षीण

एका ठेचेने न फिरे तर दुसराही पाय चिरे

कुडास कां ठेवी ध्यान (भिंतीला कान असतात)

गरिबाला सोन्यारूप्याचा विटाळ गरजवंत तो दडवंत (काळजीपूर्वक काम करणारा)

गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी.

झाड पाहून घाव, मनुष्य पाहून शब्द

तुरीची काठी तुरीवर झाडावी (काट्याने काटा काढावा)

तुळशीचे मुळात कांदा लावू नये (तुळस उपटून भांग लावू नये)

पिंपळाचे पान गळाले की पिंपळगाव जळले (पाने झडलेले झाड बघून गाव ओसाड झाल्याचे ठरवू नये)

उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी, हिवाळा भोगी.

खानदेशे आणि डाळ नाशे

गांडी गुजराथी, आगे लाथ पीछे बात (मठ्ठ गुजराथी, पहिल्याने लाथ घाला मग बोला)

जातीला जात मारी, जातीला जात तारी

हाट गोड की हात गोड?

भिकेची आणि म्हणे शिळी का?

वाहती गंगा आणि चालता धर्म (गंगेप्रमाणे दानधर्म सतत चालत राहवा)

मराठी माध्यमाच्या शाळा कमी होत आहेत आणि मराठीच्या अभ्यासाची गोडी उरली नाही या जाहीर शोकगीताच्या काळात म्हणींवरील ही दोन पुस्तके काही फुंकर घालतात असे मला वाटले. मराठी भाषेबद्दल औत्सुक्य वाढवणारी अभ्यासाची अशी साधने उपलब्ध आहेत. आपण काय करायचे ते ठरवुया!

रामचंद्र वझे9820946547 vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केले. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले‘, ‘क्‍लोज्ड सर्किट‘, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले‘ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर‘ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध  झाल्‍या आहेत. त्‍यांचे ‘महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

————————————————————————————————————————————————————-

About Post Author

7 COMMENTS

  1. रामचंद्र वझे साहेबांचे कार्य खुप मोलाचे आहे असे मला वाटते.इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनाच काय पण इतरांनाही मराठीतील म्हणी नीट कळत नाहीत.आजच्याही म्हणी जतन करून ठेवणे गरजेचे आहे.

  2. खूपच छान आणि माहितीपूर्ण. असे विविध दुर्लक्षित विषय शोधून त्यावर लिखाण होणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version