बेलोरा हे वर्धा नदीच्या तीराजवळ वसलेले यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील गाव. कोळसाखाणींमुळे त्या गावाचे पुनर्वसन झाले. मूळ गाव खाणीत बुडाले गेले. ती गोष्ट 1980 ची. वर्धा नदीचे खोरे कोळसा खनिजाने समृद्ध आहे असे आढळून आले. पुनर्वसनामुळे नव्या बेलोराची गावरचना आराखड्यानुसार अगदी व्यवस्थित मांडली गेली आहे. ते मूळ गावापासून फक्त अडीच किलोमीटरवर आहे. ते यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणावरून एकशेतीस किलोमीटर तर वणी तालुक्याच्या ठिकाणावरून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. गावापासून तीन किलोमीटरवरील नदी ओलांडली, की पूर्वेकडे चंद्रपूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. तेथून चंद्रपूर फक्त पंचवीस किलोमीटरवर आहे.
बेलोरा हे गाव म्हणजे जवळपास चारशे घरांची लोकवस्ती. पुनर्वसित आणि सुटसुटीत रचना. बेलोरा पूर्वी भरगच्च वाटे. गाव पुनर्वसनानंतर सडसडीत विरळ झाले आहे. पूर्वी भरगच्च यासाठी वाटे, की गावाच्या शेजारी कोळसाखाण असल्याने काम करण्याकरता बाहेर राज्यातील बहुभाषिक लोक तेथे कामधंद्यासाठी येऊन स्थिरावले; दाटीदाटीने राहू लागले. मूळ रहिवाशांत त्यांचीही गर्दी वाढली. जवळचे मोठे आणि बाजारपेठेचे गाव म्हणजे सात-आठ किलोमीटरवरील घुग्घूस. परंतु तेथे जाण्यास पूर्वी नदी आडवी येई. त्यामुळे दुसरी मोठी बाजारपेठ म्हणजे पंचवीस किलोमीटर अंतरावरील वणी हे तालुक्याचे ठिकाण. घुग्घूसला नदीतून नावेने ये-जा करावी लागायची. नावेला इकडे ‘रूख’ असाही शब्द आहे. कालांतराने, गावाशेजारी नदीवर पूल तयार झाल्याने वाहतूक सुखरूप सुरू झाली आणि दळणवळणही वाढले. तो ‘बेलोरा पूल’ या नावाने ओळखला जातो. पुलामुळे चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क वाढला.
कोळसाखाणींना ऐंशीच्या दशकात सुरूवात झाली. सुरूवातीला, भूमिगत आणि नंतर, उघड्या कोळसाखाणी नदीसमांतर पसरल्या. ज्यांच्या शेतजमिनींचे खाणीसाठी अधिग्रहण झाले त्या सर्वांना आर्थिक लाभांसह कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या. काही मंडळी खाणींत नोकरीच्या निमित्ताने नोकरीपुरती तेथे आली होती, तर काही मंडळी कायमस्वरूपी त्या गावाला आपलेसे करून कायमची विसावली. खाण परिसराची उत्खननामुळे वाढ झाली. त्यामुळे गावाचे पुनर्वसन क्रमप्राप्त होते. एकदा वसलेले गाव उठण्यास जड जाते. जुने गाव आत्ताच्या लोकवस्तीपासून दोन-अडीच किलोमीटर पूर्वेकडे व नदीपासून पश्चिमेकडे एक किलोमीटर अंतरावर वसले आहे. जुन्या गावात परिसराची नाळ समाजमनाशी जुळलेली असते. लोक त्यांचा जुना गाव किती चांगला होता हे सांगताना आजही थकत नाहीत. जुन्या गावाची रचना, जाती-व्यवसायानुसार मोहल्ले (वेटाळ), मंदिरे, मैदान आणि सर्वत्र पसरलेली काळी कसदार जमीन… गावातील पुरातन बांधणीचे बहीरमबाबाचे मंदिर. अर्धे वर, अर्धे भूमिगत. त्या मंदिरात दिवसाढवळ्यासुद्धा प्रवेश करण्यास छाती दडपायची.
गावातील शेतजमिनी सर्व जातिधर्माच्या लोकांना होत्या. गावात शेतकरी, कोळसा खाणीत काम करणारे कामगार, मजूर व शेतमजूर अशी संमिश्र वस्ती होती. गावात शाळा, दवाखाना, पोस्ट ऑफिस, स्वस्त धान्य दुकान ह्या शासकीय सुविधा; मंदिर, विहार, चर्च यांसारखी प्रार्थनास्थळे अशा सोयी होत्या. गावाला महात्मा गांधी तंटामुक्तीचा पुरस्कारही मिळाला आहे. गावात दारूबंदी असून दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्ममासानिमित्त ग्रामजयंती उत्सव साजरा केला जातो. या सर्व गोष्टी जुन्या गावातही होत्या, परंतु नव्या गावात त्यांची मांडणी शिस्तीने झाली आहे.
भोंगळे तसेच दीक्षित, डहाके, पायघन, कांबळे, राजूरकर, राखुंडे, मडावी आदी आडनाव असणारे बहुसंख्य लोक तेथे राहायचे. साहित्य अकादमीचा पुरस्कारप्राप्त, ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके हे त्याच मातीतील रत्न. त्यांच्या साहित्यात ‘माझं गाव’ म्हणून बेलोऱ्याच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. डहाके कुटुंब जुने गाव असतानाच अमरावतीला स्थलांतरित झाले. तेथील मंगल नागरकर, अमोल जुनगरीसारखे विद्यार्थी परदेशी कार्यरत आहेत. काही उच्चभ्रू मंडळी बऱ्याच वर्षांआधी शहराला जवळ करती झाली. काही पुनर्वसनाच्या निमित्ताने दुसरीकडे स्थिरावली. आता शेतकरी आणि मजुरवर्ग गावाची शान उंचावण्यासाठी झटत आहेत – समृद्ध अशा शेतजमिनीच्या आसऱ्याने. समृद्ध अशा काळ्या कसदार, गाळाच्या भुसभुशीत शेतजमिनी भरघोस उत्पन्न देत आहेत. पण, आता विळखा पडत आहे तो चहूबाजूंनी पसरणार्या कोळसा खाणींचा आणि धुळीच्या वाढत्या प्रदूषणाचा. काही जमीन कोळसा खाणीत गेली आणि जी उरली आहे त्यावर प्रदूषणाचे सावट. तरी उत्पन्न बर्यापैकी होते. गावात सुबत्ता आहे. लोक मनमिळाऊ आहेत. गावाची जागा बदलली तरी माणसे कमीअधिक तीच आहेत. त्यामुळे जिव्हाळा तोच कायम आहे.
– गोपाल शिरपूरकर, 7972715904, gshirpurkar@gmail.com