बेधडक वळणाची कोल्हापुरी बोली

1
86
_Kolhapuri_Boli_1_1.jpg

कोल्हापूरी बोलीला रांगडेपणाचा आणि उधळेपणाचा खास बाज आहे. निसर्ग, सीमावर्ती प्रदेश, लोकजीवन यांमुळे कोल्हापुरी लोकांच्या बोलण्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाषेच्या वेगवेगळ्या कारणांनी एकमेकांहून परस्परभिन्न वाटाव्यात अशा बोली छटा तीमध्ये मिसळल्या आहेत. कागल-गडहिंग्लज परिसरातील कानडी प्रभावाच्या बोलीमध्ये लहेजा आहे तर राधानगरी, गगनबावडा, आजरा व शाहुवाडी परिसरातील बोलण्यावर कोकणी हेल पद्धतीचा प्रभाव आहे. चंदगड परिसरात कन्नड-कोकणी-मराठी यांच्या एकत्रीकरणातून ‘चंदगडी’ बोली निष्पन्न झाली आहे. कोल्हापुरी बोलीचा जॉर्ज ग्रिअर्सनच्या १९०५ च्या भारतीय भाषा सर्वेक्षणात इंडो-आर्यन कुळातील भाषा म्हणून निर्देश आहे.

कोल्हापूर शहर परिसरातील बोलण्यावर वेगळी अशी दमदार झाक आहे. तो ठसा कोल्हापुरातील संस्थानी राजवटीचा आहे. बौद्ध, कदंब, शिलाहार ते मुसलमान एवढ्या राजवटींशी त्या प्रदेशाचा संबंध आला. इनामदार, जहागीरदार, शेतकरी, कुणबी, अलुतेदार, बलुतेदार व डोंगराळ प्रदेशातील लोकसमूह तेथे दिसून येतात. कोल्हापुरी भाषेत एक प्रकारचा चिवट, गडद असा रांगडेपणा व भरडपणा आहे. जीवनाची पुरेपूर शाश्वती, निसर्ग व शेतीजीवन यांनी आलेली सुस्थिरता यामुळे भाषेवरील भरड संथपणाचा ठसा उमटला गेला आहे. काहीशा संथ, व्यक्ती- भू-समूह वैशिष्ट्यांचा, उच्चार-लकब-हेलकावे यांच्या ध्वनिस्तरावरील संस्कारांचा प्रभाव त्या बोलीवर आहे.

कोल्हापूरच्या भाषेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे तेथील स्त्रिया व मुली ‘येतो’, ‘जातो’, ‘करतो’, ‘आलो’ अशा पुरुषवाचक क्रियापदांत बोलतात. भरड, रांगडी पुरुषवाचक बोलीरूपाच्या पुनरावृत्तीने त्यास सामाजिक, वेगळेपण प्राप्त झाले आहे. उच्चारणाच्या वेगळ्या धाटणीमुळे त्यास भावपरिणामकारकताही साधली जाते. माधुर्यभावाचे प्रसारण करणाऱ्या शब्दांचीही विपुल उपस्थिती असते. ‘काय मर्दिनी’ असा उच्चार केवळ त्या परिसरात स्त्रियांच्या तोंडी ऐकायला मिळतो. तसेच, ‘बलिवलंय’ (बोलावले आहे) अशा लोभस मृदू स्वरव्यंजनाचीही साथ असते. सकृतदर्शनी स्त्रियांची उच्चाररूपे भरड, थेट वाटावीत अशी असतात. मात्र ‘कवा आलासा’, ‘येतायसा’, ‘जातायसा’, ‘गेलासा’ अशा आकारान्त प्रत्ययाचा स्वाभाविक गोडवा त्या भाषेत टिकून आहे.

डोंगर उतरणीची शेती आणि भातशेती या शेती जीवनाचे वेगळे भान देणारा शब्दसंग्रह त्या भाषेत आहे. ‘इरलं’, ‘टोकणं’, ‘तरवा’, ‘बेजमी’, ‘हुरदं’, ‘झोमडं’ इत्यादी शब्द त्याची साक्ष पटवतात. चंदगड, आजरा, गगनबावडा, गडहिंग्लज, पन्हाळा, शाहुवाडी या प्रदेशातील लोकभाषेच्या व्याकरण, शब्दसंग्रह आणि सुरावट यांमध्ये विविधता दिसते. ‘नाद खुळा’, ‘नाद न्हाय करायचा’ अशी प्रतिक्रियात्मक शब्दरूपे आहेत. भाषेत प्रेमवजा आज्ञा असते. ‘यायला लागतंय, नाही म्हणायचं न्हाय’, ‘यंदा द्यायचा दणका काढूण’ अशी रूपेही दिसतात.

राजन गवस यांनी ‘रविवार सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ‘कुळकथा शब्दांची’ नावाचे सदर चालवले होते. ते त्यात कोल्हापूर शेतीसंस्कृतीतून निपजलेल्या, घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दांबद्दल लिहीत. नामाच्या विशिष्टतादर्शक सुलभ उच्चारणातून प्रेमभावाचे प्रसारण करण्याची लकब त्या भाषेत आहे. उदाहरणार्थ, ‘दसुदा’, ‘वसुदा’, ‘शामादा’, ‘अण्णादा’. ‘दा’ हा उत्तरप्रत्यय लावून शब्दांचे सुलभीकृत पॅटर्न तयार करणे हा त्या बोलीचा विशेष आहे. उच्चारणातील दीर्घत्व काढून टाकून प्रसंगी मध्य स्वरव्यंजनाचा लय करून शब्द तयार करण्याची वृत्ती त्या भाषेत आहे. त्यामुळे ‘शंक्रोबा’, ‘भैरोबा’ असे न म्हणता ‘भैरी’, पोह्यासाठी ‘फव्वं’, ‘मधघर’ अशी उच्चारणरूपे तीमध्ये येतात.

तिकटी, तिठ्ठा, ढव्ह असे स्थलविशिष्ट शब्दही त्या परिसरात पाहण्यास मिळतात. सामाजिक परिस्थितीतून काही क्षेत्रविशिष्ट शब्द तयार केले गेले आहेत. ते सार्वत्रिक अंगवळणीही पडले आहेत. वडाप हा नवाच शब्द तेथे तयार झाला आहे. तो तेथील रिक्षासंस्कृतीने व वृत्तपत्रसृष्टीने घडवला आहे. ‘वढा, डांबा आणि पळवा’ अशा तिहेरी शब्दांतून तो घडला गेला असावा. तो अवैध प्रवास वाहतुकीसाठी वापरण्यात येतो.

झाडूसाठी ‘साळोता’, नळासाठी ‘चावी’, दळणासाठी ‘दळाप’, वाजंत्रीसाठी ‘वाजाप’ असे प्रदेशविशिष्ट शब्द आढळतात. ‘चर्चा झालं’, ‘मी अंघोळ केलं’ अशी कानडी प्रदेश भाषा उच्चारप्रभावाने केलेली रुपे पाहण्यास मिळतात. ‘परपंच्या’, ‘बजार’, ‘उंडंग्यानू’, ‘कावबारणे’, ‘खांडूक’, ‘म्हायी’, ‘गदबाळलं’, ‘हुबाल्या’, ‘हेमलं’, ‘कडू बेणं’ असे शब्दही आढळतात. कानडी प्रभावाची द्योतक म्हणून ग्रामनामे व व्यक्तिनामेही विपुल प्रमाणात आढळतात. जुन्या काळात गडहिंग्लजला ‘गडइंग्लज’ म्हणत, तर हातकणंगलेचे ‘हातकलंगडा’. ‘आगा कुठं चालला गा’, ‘तंबाखू धर गा जरा’, ‘जाशील बस, की’, ‘आगा बस गा’ अशी शब्दरूपे त्या भाषेत आहेत. त्या भाषिक लकबींकडे पाहिले, की तेथील सामूहिक जाणिवेत निवांतपणा, अघळपघळपणाला विशेष महत्त्व असल्याचे ध्यानात येते. एकच शब्द दोन लिंगांसाठी वापरला जातो. त्याचे वेगळे रूप कोल्हापूर परिसरात पाहण्यास मिळते. उदाहरणार्थ, आजरा तालुक्यात ‘चहा झाला का?’ यातील चहा शब्द पुल्लिंगी तर चंदगडमध्ये ‘चहा झाली का?’ यामधील चहा हा शब्द स्त्रीलिंगी येतो. ‘काशी नाही केशी जोडव्या काकणाला पैशे नाशी’, ‘मागचं म्होरचं इसारली अन् वाळकीन् बाई पसारली’ अशा वेगळ्या म्हणी त्या बोलीत आहेत. त्या भाषेचा विशेष शब्दोच्चारातून भावनेचा ओसंडून जाणारा प्रत्यय येतो.

कोल्हापूर परिसरातील तरुणांच्या भाषेचा बाज वेगळाच आहे. दूरचित्रवाणीवर अवधूत गुप्ते यांनी; तसेच, खाजगी रेडिओ केंद्रावरील निवेदकांनी कोल्हापूरच्या तरुणांच्या भाषेला वेगळे स्थान प्राप्त करून दिले. मुले फुल टू धमाल, एकदम बेफिकीर वाटावीत, बेधडक वाटावीत अशा उच्चारणात बोलतात. भावी, कट्ट्यावरची भाषा यांत अनेक लक्षवेधक रूपे पाहण्यास मिळतात. ग्राम्य वाटाव्या अशा शब्दांचे सुलभीकृत संदेशन हेही कोल्हापुरी भाषेचे वेगळे परिमाण आहे. टपोरी, अधिक विन्मुक्त वाटावी अशी ती बोलीरूपे आहेत. ती तेथील तरुणांच्या सामूहिक भरणीतून निर्माण झाली आहेत. ‘सुक्काळीच्या’, ‘का भावा’, ‘नाद नाही करायचा’, ‘काटा कीर्र’, ‘खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी’ अशी रूपे अवतीभवती भेटत राहतात. त्यात स्वातंत्र्याचा उधळमोकळा आविष्कार भासतो.

‘शिस्तात’ हा शब्दवापरही त्याच प्रकारचा; तसेच, नववधू-वरांचे कपडे खरेदीसाठी ‘मुलाचे कपडे काढाचे आहेत’, तर ‘रांडेच्या’ शब्दाचा वापर इतका विपरीत व बहुअर्थप्रसवी केवळ कोल्हापुरात वापरला जात असावा. नकार, तिरस्कार ते जवळिकता, निकटता व आत्मीयतेचे द्योतक अर्थ त्या शब्दांतून व्यक्त होतात. एवढेच नव्हे तर, मुस्लिम मराठीत ‘रांडेकू’ असाही उच्चार होतो. काही वेळा नपुसकलिंगी भाषारूपांचा वापर होतो- ‘कुठं गेलं रं ते’, ‘हे आमचं, ते तुमचं’ इत्यादी. शब्दांचा अनेकवचनी वापरही विपरीतपणे केला जातो. ‘चैन’चे ‘चैनी’, ‘भुक’चे ‘भूका’ असे. ‘शिटा’सारख्या इंग्रजी-मराठी मिश्रित शब्दांचाही वेधक असा वापर केला जातो.

मराठी चित्रपटसृष्टीत 1970 ते 90 च्या दोन दशकांत कोल्हापुरी भाषेचा काही एक बाज होता. कोल्हापूर मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध. त्यासाठी वापरले जाणारे काही शब्द पाहा. खुळा रस्सा, तांबडा-पांढरा, रक्ती मुंडी, कुंभारी रक्ती, नळी चॉप्स या डिशची नावे कोल्हापुरातच ऐकावीत! कोल्हापूरच्या जुन्या भागात दुधाची मिसळ करतात तर राधानगरी परिसरात दुधाची आमटी करतात! ‘गुच्चीवडा’ हे तेथील बटाटावड्याचे नाव तर हॉटेलचे नाव ‘खांडोळी’!

कोल्हापूर बोलीचा वापर मराठी साहित्यात अधिकांशाने अलिकडील काळात झाला. त्या जिल्ह्यात 1950 नंतर महाराष्ट्रातील जे प्रमुख लेखक होते त्यांच्या साहित्यात मात्र त्या प्रदेशातील भाषेचा पट जवळपास अस्तित्वात नव्हता. शंकर पाटील, महादेव मोरे, नामदेव व्हटकर यांच्या साहित्यातून काही प्रमाणात सीमा भागातील विशिष्ट समूहस्तराची भाषा आली आहे. ती सीमाभाग व कोल्हापूर परिसर या प्रदेशातील भाषा आहे. 1980 नंतर मात्र राजन गवस, आनंद पाटील, कृष्णात खोत, किरण गुरव, जी. के. ऐनापुरे, अशोक पाटील, रफीक सूरज यांच्या लेखनातून त्या भाषेचा लक्षणीय आणि वेधक आविष्कार झाला आहे. अप्पासाहेब खोत यांनी कथाकथनातून कोल्हापुरी बोलीला महाराष्ट्रभर पोचवले. शाहुवाडी, पन्हाळा, गडहिंग्लज, राधानगरी या परिसरातील भाषाठेवणीचा, रंगस्वरूपाचा त्यांच्याकडून आविष्कार होतो. कृष्णात खोत यांच्या ‘झड-झिंबड’ कांदबरीत पन्हाळा परिसरातील लोकभाषेचा आणि व्यक्ती भाषेचा वेधक असा आविष्कार झाला आहे.

– डॉ. रणधीर शिंदे

randhirshinde76@gmail.com

(लेखक शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात अधिव्याख्याता आहेत.)

About Post Author

1 COMMENT

  1. भारीच लावलायसा की…
    भारीच लावलायसा की
    उजळाईवाडी कोल्हापूर.

Comments are closed.