सुलक्षणा अमेरिकेतील दोन टॉवर जाळले गेले तेव्हा त्या देशातील मिशिगन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तिचा मुलगा, भाचा त्याच विद्यापीठात वेगवेगळे अभ्यासक्रम करत होते. ती सांगते, की “सकाळी 9 चा सुमार. ती घरून कॉलेजला गेली आणि मेल बघत असतानाच मुलाचा इ-मेल आला, की फार दूर कोठे जाऊ नको. आधी बातम्या पाहा.”
सुलक्षणा टीव्ही पाहण्यास वरच्या मजल्यावर गेली तर तेथे ही गर्दी! कॉलेजच्या प्रत्येक वर्गात मोठ्या पडद्यावर विमानाच्या धडका बसून दोन टॉवरना आगी लागल्या आहेत, ते कोसळत आहेत हे (आता जगप्रसिध्द) दृश्य सारखे दिसत होते. लोक किंचाळत होते, रडत होते. एकमेकांना मिठ्या मारत होते. सारा समुदाय प्राध्यापक-विद्यार्थ्यांचा, वेगवेगळ्या देशांतून आलेला, अनेक जातिधर्मांचा…सा-यांना एकच धसका, की हे अमानुष कृत्य घडले कसे? प्रत्येक जण दुस-याचे सांत्वन करू पाहात होता आणि स्वत:च शोकविव्हळ होत होता.
सुलक्षणा सांगते, की ‘त्यानंतरचे काही दिवस फार भयंकर होते. मन सुन्नबधिर झाले होते’. तिलाच नाही तर सर्वांनाच एकाकी, असहाय वाटत होते. चर्चा अनेक होत, तर्क-वितर्क केले जात, परंतु डोक्यातील विचार त्याच जागी थिजल्यासारखे असत. अमेरिकी प्रशासनाचा, राजकारणाचा राग आला. तिला कोणी कुंकू लावायला सांगितले. का? तर अन्यथा ती मुसलमान वाटेल! सुलक्षणाला याप्रकारचा कोता विचार त्रस्त करत असे. तिला तिचे जीवन बंदिस्त वाटू लागले.
सुलक्षणा भारतात नाशिकला ओकांच्या घरी ज्या मोकळ्या उदार वातावरणात वाढली होती, जेथे तिच्यावर वडिलांकडून स्वातंत्र्य चळवळीचे संस्कार झाले होते आणि आईकडून भारतीय परंपरेचे वळण लावले गेले होते, तिने तोच मोकळेपणाचा अनुभव आधुनिक विचार-ज्ञानाच्या संगतीत अमेरिकेत घेतला होता. स्थानिक राजकारणी डावपेच होते, अभ्यासक्रमातूनही आता फार काही मोठे हाती लागण्यासारखे नाही असे तिला वाटू लागले. तिने पीएच.डी. मिळण्यास दोन-तीन वर्षे बाकी असताना मिशिगन सोडण्याचा निर्णय केला आणि ती भारतात परतली. तिला ज्ञान मिळाले होते, दृष्टी गवसली होती, शिष्यवृत्ती, पाठ्यवृत्ती कमी होणार हे दिसत होते. फक्त पदवी मिळणे बाकी होते, पण त्याआधीच ती अमेरिकन राजकारणाला, आंतरराष्ट्रीय दादागिरीच्या संस्कृतीला व बदललेल्या वातावरणाला विटली.
मुंबईच्या जे जे कॉलेजमधून आर्किटेक्चरची पदवी मिळवल्यानंतर आणि पदव्युत्तर छोटी पदविका हस्तगत केल्यानंतर जवळजवळ पंचवीस वर्षांनी, ती अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यास गेली होती. तिचा इंजिनीयर मुलगा तेच तेथे करत होता, पण त्याला ‘ऑप्शन’ नव्हता. सुलक्षणाने नवरा, दिलीपशी सल्लामसलत केली आणि तिने ‘अमेरिकन ड्रीम’ संपवले!
सुलक्षणाचे स्पष्ट-खुले विचार, तडकाफडकी निर्णय घेण्याचे धाडस आधीदेखील दिसून आले होते. आर्किटेक्ट झाल्यावर, तिने महाराष्ट्र सरकारच्या नगर नियोजन विभागात दोन वर्षे नोकरी केली. ती ज्युनियर होती. तिला एके दिवशी दूर, ठाण्याकडे ‘साइट व्हिजिट’ वर जाण्यास सांगण्यात आले, जीप वगैरे दिली गेली. तो दिवस तिचा बाहेरच गेला. ती दुसर्या दिवशी ऑफिसात आली तर एका ‘स्टाफ’ ने तिला सांगितले, की ‘काल तुम्हाला का दूर पाठवले होते, माहीत आहे का? मोठी पार्टी आली होती, बरेच वाटप झाले!’ सुलक्षणाच्या ध्यानी आले, की या ऑफिसमधून घडणार काहीच नाही आहे, पण सहकार्यांना मात्र तिची अडचण वाटत राहणार! तिने नोकरी सोडून दिली.
असाच प्रसंग तिच्यावर केंद्र सरकारच्या अणुशक्ती केंद्रात ओढवला. मात्र तेथे गैरव्यवहाराचा संबंध नव्हता, सामाजिक भविष्याचा, वर्तमानाच्या वास्तवाचा अभाव होता. तिची तेथे आर्किटेक्ट म्हणून चांगली सहा वर्षे नोकरी झाली. संगणक तेव्हा मोठमोठ्या कार्यालयातच असत. घरगुती, स्वतंत्र संगणकाचा जमाना यायचा होता. सुलक्षणाने अणुशक्ती केंद्राच्या वतीने भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या काही मोठ्या वास्तू बांधण्यामध्ये सहभाग घेतला होता. त्याचा भाग म्हणून ती तेथे संगणकावर आधारीत आर्किटेक्टना गरजेचे सॉफ्टवेअर तंत्रज्ञान शिकू लागली, ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचू लागली. ती सांगते, की मला ऑफिसात दिवसाचे चार तास काम असे, बाकी वेळ मी कामाला पूरक नवनवीन गोष्टी शिकण्यात घालवत असे. ते पठडीतील नोकरशाहीला मानवणारे नव्हते. तिच्या ‘कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट’ चा प्रश्न निर्माण झाला. वरिष्ठांना तिची बाजू रास्त वाटत होती, पण रेकॉर्ड? सुलक्षणाने ‘नोकरीत नवीन शिकण्यास वाव नाही, पुरेसे काम नाही’ म्हणून चांगल्या चालत्या नोकरीचा राजीनामा दिला. तिचा नवरा अणुशक्ती केंद्रातच कामाला होता. अनिल काकोडकर , कृष्णा सैनिस हे नंतर अति उच्चपदी पोचलेले वैज्ञानिक अधिकारी त्याचे सहकारी होते. दिलीपने देखील नंतर काही वर्षांनी नोकरी सोडली व स्वत: चा व्यवसाय सुरू केला.
सुलक्षणा म्हणाली, की मी अणुशक्ती केंद्रात शिकले खूप. त्या काळात ऑटोकॅड येत असलेली भारतातील मी एकमेव स्त्री असणार, परंतु अशा ज्ञानाचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी आपल्या सरकारी संस्थांकडे नाही. मात्र माझे ज्ञान पुढे खाजगी संस्थेमध्ये उपयोगी पडले.
सुलक्षणाला कोणी विचारले, की हा निर्भीडपणा आला कोठून? तर ती म्हणते, दिलीपकडून. ते खरेच असणार. कारण दिलीप मितभाषी होता. किंबहुना, तो दोन-पाच वाक्यांपलीकडे बोलतच नसे. ती वाक्ये मात्र शहाणपणाची, पक्क्या निरीक्षणाची आणि आत्मविश्वासाची असत. त्याने स्वत:चा व्यवसाय त्या जोरावर तर थोड्या काळात पुष्कळ विस्तारला. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या दिलीपला मात्र वाटत असे, की बळ, धाडस अंगात असते. ते संधी असली तरच व्यक्त करावे. सुलक्षणाच्या वेळोवेळच्या निर्णयांत दिलीप तिला बजावत असे, धाडस तुझ्यातच आहे, परंतु ते व्यवस्था सुधारण्यासाठी वापर. उगीचच सत्ता गाजवण्यासाठी वापरू नकोस.
दिलीप महाजन यांचे अल्प आजाराने अकाली, वयाच्या साठीआधीच पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतरही सुलक्षणा धडाडीने नव्या जगाला सामोरी जात राहिली. ती म्हणते, की भविष्यवेध हे माझे वेड आहे. मी फार दूरचे पाहू इच्छित नाही, कारण त्यात किती ढवळाढवळ करता येईल याची शंका असते पण मला जवळचे भविष्य पाहण्याचे औत्सुक्य आहे, गरज आहे. माझ्या क्षेत्रातले ते भविष्य भारताच्या सजग, सुशहरीकरणाचे आहे. भारतभर गावे वाढून त्यांची शहरे बनत आहेत, परंतु त्यात नियोजन, विचार व ज्ञान जरादेखील नाही. त्यामुळे शहरांची सर्वत्र अस्ताव्यस्त, बेसुमार वाढ होत राहिली आहे. शहरे सुसंस्कृतीच्या नाही तर विकृतीच्या विळख्यात अडकली आहेत.
सुलक्षणाचा गेल्या दहा-अकरा वर्षांचा ध्यास शहर नियोजन हाच आहे. ती मिशिगन विद्यापीठात त्या अभ्यासाकरता गेली होती. तिने युनोच्या व अन्य काही पाहणी-अभ्यासांकरता महाराष्ट्रातील खेडी-शहरे जशी पायांखाली घातली आहेत तशी जगातील नगरे-महानगरे पाहिली आहेत. त्या ओघात, तिने आधुनिक अर्थकारणाची बरीच माहिती जमा केली आहे. तिचे लेखन त्या अंगाने जास्त होत असते.
सुलक्षणावर मूळ प्रभाव डाव्या, पुरोगामी विचारांचा, परंतु खुले मन ही तिची ताकद आहे. त्यामुळे ती समोर आलेल्या प्रश्नाचा चहुबाजूंनी विचार करते. त्यामुळेच तिला शहर नियोजनाला जुन्या पठडीतल्या डाव्यांकडून तसेच स्वयंघोषित पर्यावरणवाद्यांकडून होणारा कडवा विरोध सहन होत नाही. त्या एकतर विकासाच्या बाजूच्या आहेत आणि तंत्रविज्ञानाने विकास सुकर होत आहे हा त्यांचा विश्वास आहे. त्या समाज, पर्यावरण विचाराबाबत अर्थव्यवस्थे इतक्याच दक्ष, सजग असतात.
खरे तर, असा वास्तव व वस्तुनिष्ठ विचार करणारी मंडळी बरीच आहेत आणि त्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच पर्यावरण पूरक, ‘सस्टेनेबल’ ‘विकास’ हा राजकीय अजेंडादेखील बनतो आहे. मग सुलक्षणाचे वैशिष्ट्य काय? तर तिच्या विचारांचा पाया पक्का वैज्ञानिक असतो; ती तर्कशुध्द असते आणि सारे काही बुध्दीने मापते. मानवी ज्ञानाचे विश्व न्यूटन , आइनस्टाइन या सर्वांच्या वैज्ञानिक विचाराच्या पुढे गेले आहे. अलीकडच्या जीवशास्त्रीय सृष्टीच्या ज्ञानशाखांचा विस्तार आपण आहे. किंबहुना वैज्ञानिक कसोट्यांवर उतरत उतरतच या जगाचे रहस्य उलगडणार आहे आणि त्या ओघात मानवी जीवन सुकर, सघन व सहिष्णू होत जाणार आहे, हा सुलक्षणाचा पक्का विश्वास आहे. खंबीर व ध्येयवेड्या माणसाला सारे जग आपोआप अनुकूल होते. तसे सुलक्षणाला गेल्या काही वर्षांत आवडीचे काम मिळाले आहे ते नगरशास्त्रीय आकडेवारी गोळा करण्याचे आणि त्या आकडेवारीचे समाजशास्त्रीय, अर्थशास्त्रीय आकलन मांडण्याचे. त्यामुळे तिची मते मुंबईच्या अस्ताव्यस्त वाढीबाबत, दुर्दशेच्या कारणांबद्दल खूप वेगळी आणि ठाम असतात.
ती मुंबईच्या ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’ च्या मुंबई ट्रान्स्फॉर्मेशन सपोर्ट युनियनमध्ये सल्लागार आहे.
तिने अमेरिकेहून परतताना पुस्तके खरेदी करून आणली. त्यातील निसर्गाच्या अर्थशास्त्राचे रहस्य उलगडणारे पुस्तक तिला इतके महत्त्वाचे वाटले की तिने ते मराठीत रुपांतरित केले. जाणकार मंडळींत त्या पुस्तकाबद्दल फार आदराने बोलले जाते. तसा बुध्दिनिष्ठ विचार करण्याची परंपरा मराठीत जोपासली गेली नाही याबद्दल खंतही व्यक्त केली जाते. सुलक्षणा केवळ बुध्दिमती नाही तर बुध्दीची कसोशी मराठीत यावी यासाठी प्रयत्नशील असते. त्याचसाठी ती नागपूरच्या ‘आजचा सुधारक’ या वैचारिक मासिकाच्या संपादकीय गटात असते. स्त्रीमुक्ती संघटनेला त्यांच्या ‘कचरावेचकांना’ संघटित करण्याच्या प्रयत्नांत संकल्पना सहाय्य करते. ठाण्याचे जे बुध्दिनिष्ठ विचारगट आहेत – मग ते सामाजिक गट असोत वा ‘जिज्ञासा’च्या विज्ञानप्रसार मोहिमांशी संबंधित असोत- त्यांच्याबरोबर ती समरसून असते.
तिची स्त्रीविषयक सामाजिक जाणीव जागी कशी झाली याबाबत तिने किस्सा सांगितला. ते १९७२ च्या आगेमागे वर्ष असावे. ती ‘आयआयटी’त पदव्युत्तर शिक्षण घेत होती – त्या काळात आयआयटीत फार मुली नसत. त्यांनी यावे यासाठी प्रोत्साहन सोडा, त्यांना विरोधच केला जात असे. मुलगी वा मुलगा दोघांना चालेल अशा नावाच्या एका तरुण मैत्रिणीने नोकरीसाठी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत अर्ज केला. ती व्यक्ती मुलगा असावी या कल्पनेने इंटरव्ह्यूसाठी बोलावून घेण्यात आले. प्रत्यक्षात ती मुलगी होती, या कारणाने तिची मुलाखत घेण्याचे देखील नाकारले गेले. सुलक्षणा म्हणते, की या पक्षपाताने आम्हा तेथे असलेल्या आठ-दहा मुलींचे डोळेच उघडले!
सुलक्षणा म्हणते, की आपल्या देशात ज्ञानावर जुनाटपणाची आणि विचारबध्दतेची इतकी दाटी झाली आहे, की ती नवीन ज्ञान स्वीकारासाठी प्रथम ती दाटी कमी करायला हवी. यालाच ‘अनलर्न टु लर्न’ असे म्हणतात. पाटी कोरी झाली, की मग जगातल्या नवनवीन विचारांना सामोरे जाणे सोपे होईल.
सुलक्षणा ठाण्याला राहते. तिचे कार्यालय मुंबईत फोर्ट विभागात आहे. ती रोज तेथे जा ये करते, त्याबरोबर प्रभादेवीच्या रचना संसदेच्या आर्कीटेक्चर कॉलेजमध्ये व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये अभ्यागत प्राध्यापक मेहणून शिकवायला जाते. तिचा सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सारा वेळ बांधलेला असतो. पुस्तकाचे वाचन ज्ञान, संशोधन, प्रवास व प्रत्यक्षानुभव यांची सुरेख सांगड तिच्या कामात आहे. गार्गी, मैत्रेयी अशा विदुषी स्त्रियांची दीर्घ भारतीय परंपरा सांगितली जाते. त्या पुराणकथांचा गौरवाने उल्लेख केला जातो, पण वास्तवात सुलक्षणासारख्या अभ्यासू स्त्रिया पाहिल्या की त्या आजच्या बुध्दिमती स्त्रिया वाटतात व त्यांचे महत्त्व मनावर आणखी बिंबते.
(‘आरोग्यसंस्कार’मासिकावरून उद्धृत)
सुलक्षणा महाजन यांचे महाजालावरील लेखन
परिचय – नाव– सुलक्षणा महाजन,
जन्म– १९५१, मुंबई
शालेय शिक्षण– गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल, नाशिक.
उच्च शिक्षण –
सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर, मुंबई येथून बॅचलर ऑफ आर्कीटेक्चर मधील पदवी, १९७२.
आय.आय.टी. पवई येथून इन्डस्ट्रियल डिझाइनमधील पदविका, १९७४.
अॅन ऑर्बर, मिशिगन, यूएसए येथे नगर नियोजन शास्त्राचे अध्ययन २०००.
नोकरी/ व्यवसाय –
महाराष्ट्र रचना खाते, ठाणे
भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई
घेरझी इस्टर्न लिमिटेड, मुंबई आणि एपिकॉन्स कन्सल्टंट, ठाणे ह्या खासगी क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये आर्किटेक्ट म्हणून नोकरी. औद्योगिक, हॉटेल आणि निवासी प्रकल्पांच्या रचना.
सामाजिक कार्य–
स्त्री मुक्ती संघटनेच्या विविध कचरा व्यवस्थापन आणि पुनरुपयोग उपक्रमांत सक्रिय सहभागमुंबई,
अध्यक्ष रचना ट्रस्ट नाशिक.
कोकणातील खार जमिंनींच्या उपयोगाचा उपक्रम
संशोधन –
हॉबिटाट ह्या जागतिक संस्थेच्या सस्टेनेबल सिटीज प्रकल्पातर्फे महाराष्ट्रातील आठ शहरांचा अभ्यास.
सध्या मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिटमध्ये मुंबई संबंधीचे संशोधन आणि लिखाण.
अध्यापन –टाटा सामाजिक विज्ञान संस्था, हॉबिटाट स्कूल, देवनार आणि रचना संसद, प्रभादेवी, मुंबई येथे नगर नियोजन विषयाचे अध्यापन
पुस्तके आणि नैमित्तिक लेखन –
जग बदललं, ग्रंथाली २००४.
अर्थसृष्टी : भाव आणि स्वभाव, ग्रंथाली २००४.
लंडननामा, पहिले जागतिक महानगर, रोहन प्रकाशन २०१०.
महानगर, लोकसत्ता, मुंबई सकाळ, आजचा सुधारक आणि समाज प्रबोधन पत्रिका, साधना, दिव्य मराठी
प्रवास– भारत, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पेरु, पाकिस्तान, श्रीलंका, सिंगापूर, थायलंड, टर्की, चीन कंबोडिया, व्हिएतनाम,
कौटुंबिक – दिलीप महाजन, सायंटिफिक ऑफिसर, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमधून निवृत्ती, आणि केमप्लांट प्रकल्प सल्लागार, ठाणे. (निधन 2007)
मुलगा मिहिर, सून डॉ. यशोदा घाणेकर
पत्ता – 8, संकेत अपार्टमेंटस, उदय नगर, पाचपाखा़डी, ठाणे- 400602
९८१९३५७३५८, ०२२-२२६६२९२०, ०२२-२२६६२९५७, फॅक्स – ०२२२२६२६८८९
sulakshana.mahajan@gmail.com
– दिनकर गांगल
Last Updated On 18th Oct 2019
Budhimati lekh vachla aavdala
Budhimati lekh vachla aavdala,
Yadnyvalka rishini samppti vatap kele, tevha tynachya patni ne …Maitreyine…fakt aatmdyan dya sangitale …
budhimati nav agadi yogya ahe …lekhala
imjiniyr inpormishan
important information
Nice good thim
Nice good thim