बीडच्या प्रकाशयात्री चंद्रभागा गुरव

0
24
_Chandrabhaga_Gurav_1.jpg

बीडच्या चंद्रभागा गुरव यांनी नेत्रदानाबाबत मोठी जनजागृती करून गेल्या सहा वर्षांत तीनशेचाळीस डोळ्यांचे संकलन केले आहे.

जन्मजात वा अपघाताने आलेल्या अंधत्वामुळे आयुष्यभर डोळ्यांसमोर अंधार घेऊन जगणाऱ्यांच्या आयुष्याच्या वाटा ‘तिमिरातून तेजाकडे’ नेण्याचा एक मार्ग असतो तो नेत्रदानाचा. त्याबाबत जनजागृती, मोहिमा होऊनही सुशिक्षितांमध्ये नेत्रदानाचे प्रमाण अत्यल्प आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील नेत्रदान समुपदेशक चंद्रभागा गुरव यांनी सहा वर्षांत तीनशेचाळीस डोळ्यांचे संकलन केले आहे. त्यांचे ते काम लक्षणीय आहे. बीड जिल्हा विकासकामांच्या बाबतीत मागास आहे, मात्र नेत्रदान चळवळीत तो राज्यात अग्रेसर आहे.

चंद्रभागा गुरव यांना मुळातच सामाजिक भान आहे, त्यांनी समाजकार्याच्या आवडीतून पदव्युत्तर शिक्षण समाजकार्य या विषयात घेतले. त्या अंबाजोगाईच्या मानवलोक महाविद्यालयात शिक्षण घेत असताना, त्यांच्यावर डॉ. द्वारकादास व शैलजा लोहिया या दांपत्याच्या समाजकार्याचे संस्कार झाले. त्यांनी समुपदेशनाचे काम काही काळ रत्नागिरी आणि त्यानंतर परभणीच्या रुग्णालयांमध्ये एचआयव्ही बाधितांसाठी केले. त्या समुपदेशक म्हणून ‘एआरटी सेंटर’मध्ये (एचआयव्हीबाधित रूग्णांसाठी विभाग) कार्यरत होत्या. त्या बीडच्या जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात नेत्रविभागात समुपदेशक पदावर 2012 मध्ये रुजू झाल्या. गुरव म्हणतात, की जिल्हा रुग्णालयात नेत्रदानाला सुरुवात 2007 पासून झाली. परंतु, तेथे समुपदेशकाचे पद रिक्त असल्याने केवळ नेत्रदानाविषयी जनजागृती करण्याचे काम सुरू होते. आम्ही माझी नियुक्ती झाल्यानंतर पहिले नेत्रदान करवून आणण्यात फेब्रुवारी 2012 मध्ये यशस्वी ठरलो. आम्ही अंबादास डोंगदरदिवे (रा. चिंचाळा, ता. वडवणी) यांच्या नातेवाइकांना समजावून सांगितले अन् त्यांनी नेत्रदानाला होकार दिला. अंबादास अपघातात मृत पावले होते. ती गोष्ट 4 फेब्रुवारी 2012 ची. चंद्रभागा गुरव यांना ‘एआरटी सेंटर’मध्ये एचआयव्ही बाधितांचे समुपदेशन करण्याचा अनुभव होता. त्या म्हणतात, नेत्रदानासाठी समुपदेशन करण्याचे काम अधिक आव्हानात्मक आहे.

_Chandrabhaga_Gurav_2.jpgएखाद्याच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांच्यासाठी तो खूपच दु:खद प्रसंग असतो. कुटुंबीयांची मनस्थिती ठीक नसते. मात्र, त्याच परिस्थितीत मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना भेटून समुपदेशन करावे लागते. त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यांमुळे एका अंधाच्या आयुष्याची वाट उजळणार असल्याचे सांगून नेत्रदानाचे महत्त्व पटवून द्यावे लागते. त्यांनी गमावलेल्या व्यक्तीचे किमान डोळे तरी जिवंत राहू शकतात आणि ते इतरांच्या कामी येऊ शकतात हे कुटुंबीयांना पटवून देण्यात आपण यशस्वी ठरलो, की त्या दु:खद प्रसंगातही नातेवाईक नेत्रदानाला होकार देतात असे त्या सांगतात. बीड जिल्हा रुग्णालयाचा नेत्रविभाग 2013 ते 2015-16 या तीन वर्षांत नेत्रदानाची उद्दिष्टपूर्ती करून राज्यात अग्रेसर राहिला.

गुरव म्हणतात, अल्पशिक्षित लोकांचे समुपदेशन करून त्यांना नेत्रदानासाठी तयार करणे सुशिक्षित लोकांच्या तुलनेत सोपे असते. अपघातात मृत्यू पावलेल्या एका जोडप्याचे अन् त्याच दिवशी आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याचे असे, एकाच दिवसात तीन जणांचे नेत्रदान करून सहा डोळे संकलित करण्याचा प्रसंगही कायम लक्षात राहणारा असल्याचे त्यांनी सांगितले. बीड येथे संकलित केलेले डोळे जालना येथील ‘गणपती नेत्रालया’च्या ‘आय बँके’त पाठवले जातात. तेथेच गरजूंना नवी दृष्टी देण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते.

_Chandrabhaga_Gurav_3.jpgचंद्रभागा एका पायाने दिव्यांग आहेत. त्यामुळे त्यांना शरीराचा एक भाग व्यवस्थित नसेल तर कशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागू शकतो याचा अनुभव आहे. त्या नातेवाईक नेत्रदानास नकार देत असतील तर जिल्हा रुग्णालय पोलिस चौकीतील पोलिस, वैद्यकीय अधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्ते यांची मदत घेतात.

चंद्रभागा बत्तीस वर्षांच्या आहेत. त्या, पती, सासुसासरे असा त्यांचा संसार आहे. गुरव यांना दोन मुले आहेत.

चंद्रभागा गुरव 7387029914

– अमोल मुळे, amol.mule@dbcorp.in

(दिव्य मराठी, मधुरिमा पुरवणी वरून उद्धृत)

About Post Author