Home सामाजीक निसर्गसंवर्धन बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (Balasaheb Sawant Krushi Vidyapeet, Dapoli)

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (Balasaheb Sawant Krushi Vidyapeet, Dapoli)

2

दापोलीचे ‘बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ’, ही देशातील कृषी संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये एक अग्रगण्य संस्था आहे.  ह्या विद्यापीठाने विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान, कोकणातली पिके, फळे, भाज्या इत्यादींच्या सुधारित जाती यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय फरक पडला आहे.  शेती, मत्यवयवसाय, पशुपालन, मधमाशीपालन, रेशीम किड्यांची पैदास अशा विविध विषयांशी संबंधित अभ्यासक्रम, उपक्रम, व्यवसाय मार्गदर्शन यामुळे विद्यापीठाचा नावलौकिक टिकून आहे. अशाया विद्यापीठाची माहिती करून देत आहेत रजनी अशोक देवधर.

 ‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सुमारे ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा आणि पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा यंच्या दरम्यान असलेला भूप्रदेश  म्हणजे कोकण. ह्या कोकणात,  जांभा दगड आणि लाल माती  असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुका आहे. दापोली तालुक्यातील दापोली या  थंड हवेच्या  गावानजीक  समुद्र किनारे, बंदरे  आहेत.  समृद्ध जंगल संपत्ती आहे. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथे ब्रिटीशांचा कॅम्प वसवलेला होता त्यामुळे दापोलीला कॅम्प दापोली असेही म्हटले जात असे. पुरातन मंदिरे, निसर्ग सौंदर्य यामुळे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दापोलीमध्ये देशातील अग्रगण्य कृषी विद्यापीठ आहे. हरित क्रांतीचे जनक कृषीतज्ज्ञ व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक  यांनी मे 1972 मध्ये या विद्यापीठाची स्थापना केली. ‘विद्वत्तेचे बीज, प्रगतीचे क्षेत्र’ हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

भरपूर पाऊस असलेल्या कोकणामध्ये  खाचरात चिखल करून भातशेती  हे मुख्य पीक  तर डोंगर उतारावर नाचणी, वरी ही भरड धान्ये पिकवली जातात. जोडीला पावटा, वाल, कुळीथ  ही पिके देखील होतात. आंबा, काजू, फणस, कोकम ही कोकणची वैशिष्ट्य असलेल्या फळांना चांगली बाजारपेठ मिळवून देणे, शेतीखेरीज उत्पन्नाचे साधन नसलेल्या, हलाखीत आयुष्य जगणाऱ्या कोकणवासियांची  आर्थिक उन्नती साधणे, पशूसंवर्धन, मत्स्य व्यवसाय या व्यवसायांचा विकास करणे  या मुख्य उद्दिष्टांनी दापोलीत सन १९६५  मध्ये कृषी महाविद्यालय व  १८ मे १९७२ रोजी  कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. परशुराम कृष्णाजी सावंत उर्फ  बाळासाहेब सावंत कृषीमंत्री असताना त्यांच्या पुढाकाराने ह्या विद्यापीठाची स्थापना झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ  २००१ मध्ये विद्यापीठाचे नामकरण ‘बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ’ असे करण्यात आले. दापोली येथे विद्यापीठाचे मुख्य केंद्र आहे. कोकण किनारपट्टीवरचे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि बृहन्मुंबई हे जिल्हे हे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. विद्यापीठाच्या कृषी, मत्स्य आणि कृषी अभियांत्रिकी या तीन विद्याशाखा आहेत.  कृषी विद्याशाखेत प्रामुख्याने तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये, फळे, चारापिके, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय, वनस्पती जैवतंत्रज्ञान, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, रेशीम शेती, उच्चतंत्रज्ञानावर आधारित शेती, खार जमीनीतली शेती, कृषी अभियांत्रिकी आणि संबंधित सामाजिक-आर्थिक विषयांवर संशोधन केले जाते. या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात. मत्स्य विद्याशाखेत सागरी, निमखाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन या विषयांवर संशोधन केले जाते.

कोकणांत होणारी पिके, फळे यावर संशोधन करून नवीन जाती विकसित करून उत्पादन व दर्जा वाढविणे, शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी संशोधन करणे, उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन  करणे यासाठी  कटिबद्ध असलेल्या विद्यापीठाचे  दापोली जवळ वाकवली या  गावात  मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे. दापोली मधील गिम्हवणे या गावात  सेंद्रिय शेती प्रकल्प आहे. विद्यापीठ परिसरात बांबू प्रकल्प, तुती प्रकल्प, औषधी वनस्पती, वनशेती, मृद संधारण असे अनेक प्रकल्प राबविले जातात. कोकणातल्या जमिनीत आणि शेतांच्या लहान आकारासाठी उपयोगी पडावीत म्हणून कमी किमतीची, वजनाला हलकी, वापरायला सुलभ अशी कृषी अवजारे आणि यंत्र विद्यापीठाने विकसित केली आहेत.

१९७७ साली  डॉ. प्रतापराव साळवी यांची नेमणूक कुलगुरू पदावर झाली. त्यांनी   विद्यापीठातील शिक्षण व संशोधनाचा  स्तर  वाढविला.  त्यामुळे दापोली कृषी विद्यापीठ देशातील  A ग्रेड म्हणजे अग्रगण्य दर्जाचे कृषी विद्यापीठ म्हणून गणले जाऊ लागले. त्यानंतर आलेले कुलगुरू डॉ.एस.बी कद्रेकर यांनी विद्यापीठाच्या प्रत्येक विभागात परिवर्तन घडविले. वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रात आधुनिकता आणली. केंद्राचे कार्यक्षेत्र विस्तारले. आंबा, काजू यावरील संशोधनाबरोबरच ऊस, रेशीम पैदाशीसाठी तुतीची लागवड, मृद् संधारण अशा विषयांशी संबंधित प्रयोग होऊ लागले. कोकणातील फणस,करवंद ,कोकम या पिकांवर संशोधन होऊ लागले. फळ पिकांच्या सुधारित जाती विकसित करण्यावर भर दिला. कोकणातील माड व पोफळीच्या बागांमध्ये मिरी ,जायफळ, लवंग, दालचिनी  अशी आंतरपिके किफायतशीर असल्याचे प्रयोगाने सिद्ध  केले. विद्यापीठाच्या सुरवातीस अशा द्रष्टया, तज्ज्ञ  कुलगुरूंचे योगदान विद्यापीठाच्या प्रगतीच्या वाटचालीसाठी  मोलाचे ठरले.

कोकणातील मुख्य फळ आंबा. विद्यापीठच्या रोपवाटिकेत आंब्याची कलमे तयार  केली जातात आणि त्यांची विक्री होते. आंब्याच्या रत्ना व सिंधू अशा नवीन जाती विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. इतर फळझाडांचीही निरोगी कलमे, पिकांची बियाणे ह्या रोपवाटिकेत सरकारी दराने मिळतात. पाण्याचे नियोजन, पिकांच्या गरजेप्रमाणे पाणी देण्याचे वेळापत्रक, किडीच्या निर्मूलनासाठी कीटकनाशकांच्या फवारणीचे, पिकांच्या आणि आंतरपिकांच्या लागवडीचे वेळापत्रक, बियाणे आणि खतांची आवश्यक मात्रा इत्यादी गोष्टींची माहिती विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना दिली जाते. हवामानाप्रमाणे वर्षभराच्या लगवडीविषयी मार्गदर्शन करणारे विद्यापीठाचे ‘कृषी दैनंदिनी’ हे प्रकाशन अनेक व्यावसायिक व हौशी शेतकरी रेफरन्स गाईडप्रमाणे वापरतात.

कोकणातील मुख्य पिक भात. विद्यापीठाने कोकणातल्या हवामानाशी सुसंगत अशा भाताच्या 30 सुधारित आणि 5 संकरीत जाती विकसित केल्या आहेत. कडधान्यांच्या आणि कंदपिकांच्याही जाती विकसित केल्या आहेत. कोकणातील लाल मातीत लागवड करता येणाऱ्या भाज्या व फळांच्या जाती विकसित करण्यात येऊन त्याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येते. फळांवर प्रक्रिया करून त्यांच्यापासून विविध टिकाऊ पदार्थ बनविण्याचे तंत्रज्ञानही विकसित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन, सहाय्य करणारी संस्था असा विद्यापीठाचा नावलौकिक आहे. विद्यापीठाच्या अधिपत्याखाली कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वनशास्त्र महाविद्यालय , मत्स्य महाविद्यालय, काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था व १९ संशोधन केंद्र  आहेत.

विद्यापीठाच्या सातत्यपूर्ण संशोधनामुळे आणि मार्गदर्शनामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे आणि त्यामुळे नोकरीसाठी शहरात स्थलांतर करणाऱ्या तरुणांच्या संख्येतही घट झाली आहे.  देशातील  अग्रगण्य  बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ ही दापोलीची आणि कोकणाचीही गौरवास्पद ओळख आहे.

रजनी अशोक देवधर

7045992655

deodharrajani@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. माहिती वाचून खूप छान वाटलं.मी सध्या कृषी महाविद्यालय, दापोलीमध्ये पदवीचं शिक्षण घेतेय. आपल्या विद्यापीठाबद्दल इतके सकारात्मक विचार पाहून इथे विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटला. खरंच, निसर्गसौंदर्यानं नटलेल्या कोकणाची शान आहे कृषी विद्यापीठ! 🌾
    सुंदर लिहिलंय.. लिहित रहा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version