बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता व विविध कामगिरी

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची नोंद मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून इतिहासात आहे. त्यांनी ‘मुंबई दर्पण’ हे पहिले पाक्षिक 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईतून (काळबादेवी) सुरू केले. ते मराठी व इंग्रजी भाषांतील संयुक्त व संमिश्र असे नियतकालिक होते. त्यांनी ते पाक्षिक नियतकालिक साप्ताहिक म्हणून 4 मे 1832 पासून केले. ते बंद 26 जून 1840 रोजी झाले. त्यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्याच वेळी, मे 1840 पासून सुरू केले. ते चार वर्षे चालले.

जांभेकर हे पश्चिम भारतातील प्रबोधनाचा पाया घालणारे आद्य विचारवंतही मानले जातात. प्रबोधनाचे ते त्यांचे कार्य थोर आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात पत्रकारिता, शिक्षण, इतिहास, पुरातत्त्व संशोधन, पाश्चिमात्य ज्ञान विज्ञान, सामाजिक व धार्मिक जागृती व सुधारणा, शालेय पाठ्यपुस्तके, गद्य-पद्य इत्यादी क्षेत्रांत महत्तम कार्य केले आहे. त्यांना नियतकालिके, वृत्तपत्रे यांच्या प्रचंड शक्तीची व ग्रंथरूपाने संग्रहित केलेल्या ज्ञानाची जाणीव होती. जांभेकर ते आंबेडकर असा प्रबोधन काळ नोंदला जातो तेव्हा जवळ जवळ सव्वाशे वर्षांची ही दोन्ही टोके – या दोन महान विभूती लक्षात येतात आणि त्यांच्या ज्ञानोत्कर्षाने व कार्याने मन दिपून जाते.

जांभेकर यांनी महाराष्ट्रात पत्रकारिता सुरू केली तो काळ पेशवाईच्या अस्तानंतरचा (1818) होता. मराठी भाषा व साहित्य-संस्कृती यांवर इंग्रजांच्या राजवटीमुळे काही संक्रमण होऊ लागले होते. त्याला पर्याय म्हणजे विकासाचा मार्ग म्हणून शिक्षणाकडे पाहिले पाहिजे हा विचार जांभेकर यांचा होता. वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम शिक्षण, लोकशिक्षण, मराठी साहित्य व पाश्चिमात्य सुधारणावादी ज्ञानविज्ञान यांच्या प्रसारासाठी आहे अशी त्यांची धारणा झाली. त्यांनी त्या दृष्टीने इंग्रजी, गुजराथी व बंगाली भाषांचा अभ्यास करून त्या भाषांतील वृत्तपत्रांची माहिती करून घेतली.

त्यांनी अन्य विशेषत: समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्या कार्याचा अभ्यास केला. राममोहन रॉय यांनी बंगालमधील सामाजिक, धार्मिक प्रश्नांत उल्लेखनीय काम केलेले आहे. बाळशास्त्री यांनी त्या अभ्यासास धरून सामाजिक व धार्मिक सुधारणा या क्षेत्रांतही काम केले आहे. त्यांना पत्रकारिता व शिक्षण यांच्या माध्यमातून विकासाचा मार्ग मराठी जनतेला उपलब्ध करून देणारे विद्वान अशी मान्यता मिळाली. त्यांनीच पश्चिम भारतातील प्रबोधनाचा पाया घातला. त्यांना ‘जस्टिस ऑफ दि पीस’ हा सन्मान 1840 मध्ये मिळाला. तो त्या काळातील बहुमान समजला जात असे. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या ‘ग्रँड ज्युरी’मध्ये बसू शकत होते. ते लंडन येथील जिऑग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेत कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून 1842 ते 1846 पर्यंत होते. त्यांनी गाजलेल्या श्रीपती शेषाद्री धर्मांतर प्रकरणी शेषाद्री यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी त्या सनातनी काळात, 1843 मध्ये लढा दिला. त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन शेषाद्री यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांना सामाजिक व धार्मिक रोषाला सामोरे जावे लागले; धार्मिक बहिष्कारही सहन करावा लागला.

महाराष्ट्रातील पेशव्यांचे राज्य गेल्यानंतर मराठी माणसांचे मन, मेंदू, मनगट बधिर झाले होते. ते पुन्हा प्रज्वलित होण्यासाठी लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून त्यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले. ‘दर्पण’ म्हणजे समाजाच्या सर्वांगीण क्षेत्राचे प्रतिबिंब ! त्या वेळी त्यांचे वय होते अवघे वीस वर्षे. ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील ‘ज्ञानेश्‍वरी’नंतरचे महत्त्वाचे संक्रमण मानले जाते. त्या पाक्षिकात प्रत्येक पानावर अर्ध्या पानाचा मराठी मजकूर व त्यापुढेच त्याचे इंग्रजीत भाषांतर अशी छपाई असे. मराठी जनतेला काय म्हणायचे आहे ते मराठी भाषेत व ते इंग्रज प्रशासनास कळावे यासाठी इंग्रजीत अशी त्या मजकुराची कल्पक रचना होती. ‘दर्पण’ 26 जून 1840 रोजी बंद झाले. मात्र त्यांनी त्या आधी 1 मे 1840 पासून मराठी भाषेतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ सुरू केले.

जांभेकर व त्यांचे सहकारी यांनी या दोन्ही नियतकालिकांमधून रसायनशास्त्र, इतिहास, पुरातत्त्व संशोधन, ज्योतिषशास्त्र, भूगोल, इंग्लंड देशाची व वर्तमान हिंदुस्थानची राज्य पद्धत, सामाजिक व धार्मिक परिस्थिती, शास्त्रज्ञान, भाषाज्ञान, वाङ्मयज्ञान, लोकमानस ज्ञान यांबाबत माहिती दिली आहे. वाचकांना विचारप्रवृत्त करणे हा त्यांचा हेतू होता. ‘दिग्दर्शन’ हे मासिकही 26 जून 1840 पासून बंद झाले.

गंगाधरशास्त्री जांभेकर हे पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (पूर्वी ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील रहिवासी. त्यांचा धाकटा मुलगा बाळ जांभेकर वयाच्या तेराव्या वर्षी, 1826 च्या सुमारास मुंबईमध्ये इंग्रजी व अन्य विषयांच्या शिक्षणासाठी बॉम्बे नेटिव्ह स्कूलमध्ये दाखल झाला. बाळ जांभेकर बुद्धिमान होते. त्यांनी अवघ्या दोन वर्षांत इंग्रजी, गणित व अन्य नऊ भाषा यांत प्राविण्य मिळवले. त्यांची ती तडफ लक्षात घेऊन त्यांना विद्यार्थिदशेतच उपएतद्देशीय सचिव म्हणून नियुक्ती प्रथम मिळाली. तो मराठी माणसासाठी फार मोठा गौरव होय !

गर्व्हनर एल्फिन्स्टन यांनी बाळ जांभेकर यांची विद्वत्ता ओळखून त्यांना आणखी पुढे संधी दिली; मराठी भाषेत शालेय पाठ्यपुस्तकाशी संबंधित ग्रंथ तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. इतकेच नव्हे तर पुढे, मार्च 1830 पासून त्याच शिक्षण संस्थेत (की ज्याचे नामांतर 1827 पासून बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी असे झाले) उप एतद्देशीय सचिव (डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी) म्हणून दरमहा पन्नास रुपयांवर नियुक्ती केली. बाळशास्त्री यांनी त्या काळात मराठी, संस्कृत, इंग्रजी यांव्यतिरिक्त गुजराती, बंगाली, हिंदी, फारसी या भाषांतही प्राविण्य मिळवले. अंकगणित, बीजगणित, भूमिती, महत्त्वमापन, अंकशास्त्र, शून्य उपलब्धी गणित या विषयांतही विशेष प्राविण्य मिळवले. त्यांचे उत्तम अध्यापन, संस्थेबद्दल निष्ठा, सद्वर्तन आणि मुलांच्यातील व सहाध्यायींमधील लोकप्रियता हे गुण लक्षात घेऊन त्यांची त्याच संस्थेत पूर्ण वेळ एतद्देशीय सचिव म्हणून मार्च 1832 पासून सन्मानाने दरमहा शंभर रुपये पगारावर नियुक्ती झाली. त्यांची नियुक्ती त्या आधी, 1831 मध्ये लंडन येथील रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेतील पौर्वात्य भाषांतर समितीचे एतद्देशीय भाषा सचिव म्हणून झाली होती. त्याचे कारण त्यांचे विविध भाषांतील नैपुण्य हे नमूद करण्यात आले आहे. त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमध्ये कार्यकारी प्राध्यापक (अ‍ॅक्टिंग प्रोफेसर) म्हणूनही काम पुढे, 1842 मध्ये केले.

बाळशास्त्री जांभेकर यांना इंग्रज प्रशासन, मुंबईतील वास्तव, मराठी माणसाच्या मनातील अस्वस्थता आणि बदलती समाजव्यवस्था असे सारे सामाजिक भान होते. ते इंग्रजी, गुजराथी व बंगाली नियतकालिके नियमित वाचत. त्यांच्या वाचनात पाश्चिमात्य ज्ञानाची सुधारणावादी पुस्तकेही असत. वैचारिक प्रौढत्व त्यांच्या विचारात व दूरदृष्टीत होते.

त्यांनी भारतातील पहिले अध्यापक विद्यालय (सध्याच्या डी एड, बी एड, एम एड धर्तीवरचे) एप्रिल 1845 मध्ये मुंबई येथे सुरू केले. तेच त्याचे पहिले संचालक होते. त्यांनी ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचे शिळाप्रेसवर मुद्रण सर्वात प्रथम 1845 मध्ये केले. ते काम मुंबई येथील प्रभाकर शिळा मुद्रणालयात झाले. त्यांनी मुंबईतील पहिले सार्वजनिक वाचनालय ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या नावाने 1845 मध्ये सुरू केले. त्याचे ‘पिपल्स फ्री रीडिंग रूम’मध्ये रूपांतर झाले. त्यांनी लोकशिक्षणाचा एक भाग म्हणून ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’1845 मध्ये स्थापन केली. सोसायटीचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांचीच निवड झाली. सार्वजनिक प्रश्नावर निबंध वाचन व त्यावर चर्चा असे सोसायटीमधील कार्यक्रमांचे अभिनव स्वरूप होते. त्यांचे शिष्य व सहकारी होते -दादाभाई नौरोजी, डॉ.भाऊ दाजी, विश्‍वनाथ नारायण मंडलिक अशी मोठमोठी माणसे ! त्यांनी ती संस्था ‘स्टुडंटस् लिटररी अ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटी’ या नावाने सुरू ठेवली (महाविद्यालयातील वाङ्मय मंडळे व विज्ञान मंडळे हे त्याचेच आधुनिक रूप होय). त्यांनी काळबादेवी भागात वाडा भाड्याने घेऊन त्यात पहिले वसतिगृह 1845 मध्ये सुरू केले. त्यांनी मुंबईतील कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही 1842 ते 1843 असे वर्षभर काम केले.

प्रा. बाळशास्त्री जांभेकर पुरातत्त्व व इतिहास संशोधन असे काम लंडन येथील दि रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई येथील शाखेत (1830 पासून) करत असत. त्या शाखेने 1841 पासून ‘जर्नल ऑफ दि बॉम्बे ब्रँच एशियाटिक सोसायटी’ सुरू केले. त्यामध्ये बाळशास्त्रींनी 17 मे 1846 पर्यंत (म्हणजे जीवनाच्या अखेरपर्यंत) भारतीय इतिहास, शिलालेख, ताम्रपट, पुरातन नाणी, चित्रलिपी, गूढ लिपी यांवर संशोधन करून इंग्रजीतून लेखन प्रसिद्ध केले. त्यांचे ते काम राजमान्य झाले होते.

बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’मधून साहित्यलेखनाचा आरंभ केला होता. त्यांचे लेखन भाषांतराच्या माध्यमातून ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले होते. त्यांनी कॅप्टन जर्व्हिस यांचे लॉर्ड ब्रॉग्हम यांच्या ‘ट्रेएटाईज ऑन द ऑब्जेक्ट्स – अ‍ॅडव्हांटेज अँड प्लेजर्स ऑफ नॉलेज’ नावाच्या प्रसिद्ध शास्त्रीय पुस्तकाचे ‘विद्येचे लाभ, उद्देश आणि संतोष’ या नावाने भाषांतर केले. ते 1829 मध्ये छापले गेले. त्यांनीच पहिला मराठी शब्दकोष आणि मराठी भाषेचे व्याकरण या पुस्तकासाठी संपादन व भाषांतर केले होते.

बाळशास्त्री यांनी मराठी साहित्यामधील गद्य व पद्य लेखनाचा आरंभ ‘दर्पण’ या वृत्तपत्रातून केला असे म्हणता येईल. त्यांनी पहिली कविता ‘मूर्तिपूजा’ या शीर्षकाखाली 22 जून 1832 च्या ‘दर्पण’ मध्ये प्रकाशित केली.
हाय हाय मनुष्याचे भले आवृत्तीने
आपल्या हाताने जाकेली तिचे पाया पडावे
या सुंदर पृथ्वीतील सर्व वस्तू
आणि विस्तृत आकाशात प्रकाशणारी जगे
जाने त्यास जन्मदिला त्या भयंकर ईश्वरास
असे शब्दाने बोलत असतां, की जो लबाड होणार नाही

त्यांनी निसर्ग, देव, व्यक्तिपूजा, अंधश्रद्धा, देशभक्ती इत्यादी विषयांवरील कविता प्रकाशित केल्या.

जांभेकर यांनी त्यांच्या ‘दर्पण’ व नंतर ‘दिग्दर्शन’मधून बरेच निबंध व लेख लिहिले आहेत. त्यांनी इतरांचे काही निबंध प्रकाशितही केले आहेत. जांभेकर हे आद्य निबंधकार व आद्य गद्य लेखक होत. त्यांचे निबंध व लेख यांचे वैशिष्ट्य हे आहे, की त्यातून धार्मिक व सामाजिक सुधारणा, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रुढी-परंपरा यांचा त्याग, ज्ञान व विज्ञान यांची माहिती, स्त्रियांचे शिक्षण, शालेय शिक्षण ह्यांचे दर्शन होते.

त्यांनी ‘दर्पण’मधून हिंदुधर्म आणि सती (4-5-1832), जातिभेदाचा प्रश्‍न (16-3-1832), स्त्रियांस वेदाभ्यास (21-9-1832), स्त्री शिक्षणाची दिशा (30-5-1834), स्त्री-पुरुषांना समान हक्क 1 व 2 (23-5-1834 व 6-6-1834), ग्रंथपरीक्षणाचा नमुना (4-5-1832), मुंज मुलींची का नाही? (2-5-1834), सरकारी नोकरीत जातीयता (9-5-1834), नाटकशालेस प्रोत्साहन (17-2-1832) असे पुरोगामी विचारांचे लेख प्रसिद्ध केले होते. त्यांनी ‘दिग्दर्शन’ या मासिकातूनही रसायनशास्त्र, इतिहास, सूक्ष्मदर्शक यंत्र, मोडी व बाळबोध अक्षरांचे ताम्रपट, वाफयंत्रे, ज्योतिष शास्त्र, सिद्ध पदार्थ विज्ञान असे अनेक विषय हाताळले होते.

बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘ज्ञानेश्‍वरी’ हा मौलिक ग्रंथ सर्वप्रथम शिळाप्रेसवर प्रकाशित केला. त्यांच्यामुळेच ‘ज्ञानेश्‍वरी’ची पहिली मुद्रित प्रत शक्य झाली. त्यांचे पुढील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत – 1. नीतिकथा, 2. सारसंग्रह, 3. इंग्लंड देशाची बखर भाग 1 व 2, 4. भूगोलविद्येची मूलतत्त्वे, 5. भूगोलविद्या गणितभाग, 6. बालव्याकरण (यांतील क्रमांक 4 व 6 ही पुस्तके मुंबई इलाख्याच्या प्राथमिक शाळेतून पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासली जात होती), 7. मरे यांच्या इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, 8. शब्दसिद्धी निबंध, 9. समीकरणाविषयी टिपणे, 10. शून्यलब्धी गणित व मूलपरिणती, 11. हिंदुस्थानचा इतिहास, 12. हिंदुस्थानातील इंग्लिशांच्या राज्याचा इतिहास, 13. मानसशक्ती विषयीचे शोध (अपूर्ण). (यांतील 11 व 12 क्रमांकांचे ग्रंथ हे इतिहास ग्रंथ आहेत आणि 13 वा मानसशास्त्रीय ग्रंथ ही पुस्तके बाळशास्त्रींच्या पश्चात प्रसिद्ध झाली. या अनेक प्रकाशित ग्रंथांव्यतिरिक्त बीजगणित, भूगोल, मराठी व्याकरण इत्यादी विषयांवरही ग्रंथ लिहिण्याचा त्यांचा विचार होता. इंग्रजी-मराठी धातुकोश, शून्यलब्धी मूल परिणती गणित, पुनर्विवाह प्रकरण, संध्येचे भाषांतर हे विस्तृत ग्रंथ अर्धेच लिहून झाले होते. बाळशास्त्रींचा मृत्यू 17 मे 1846 रोजी मुंबईत झाला.

– रविंद्र बेडकिहाळ 9422400321 weekly_lokjagar@rediffmail.com

———————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here