सडसडीत बांधा, कमावलेला आवाज आणि अभिनय करण्याबरोबर अभिनय शिकवण्याचे कसब… ते पारखीसर!
पारखीसरांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध पैलू इतरांना कायमच थक्क करतात! ते लेखन, अभिनय, दिग्दर्शन, नकलांचे कसब अशा सर्व क्षेत्रांत अग्रेसर…
पारखीसर सामाजिक बांधिलकी, गुरुंबद्दल कृतज्ञता या गुणांनी युक्त.
पारखीसर विविध सामाजिक उपक्रमांत हिरीरीने सहभागी होतात. मुलांतील गुणांचा समाजाला उपयोग झाला पाहिजे, म्हणून चांगला नागरिक घडवण्याबरोबरच पथनाट्यासारख्या विविध उपक्रमांमधून ते सामाजिक भान जपतात.
त्यांचे गुरू भालबा केळकर. त्यांच्या स्मृती जागृत राहव्यात म्हणून त्यांनी भालबा केळकर स्मृती बालनाट्य स्पर्धा सुरू केल्या, त्यास बावीस वर्षे झाली. पारखीसरांनी नाट्यछटाकार दिवाकर यांच्या स्मृती जपण्यासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा सुरू केल्या. त्याला एकवीस वर्षे झाली.
पारखीसरांचे वडील विनायक पारखी हे हौशी लेखक होते, ते नाट्यछटांचेदेखील लेखन करत. लहानगा प्रकाश नाट्यछटांचे सादरीकरण करे. पारखीसरांनी लहान वयातच नकलांची कला आत्मसात केली. त्यांना स्फुरण मिळाले ते सदानंद जोशी यांच्याकडून. त्यातून ‘नकलानगरी’च्या कार्यक्रमांना आरंभ झाला. त्यांनी ‘नकलानगरी’चे हजारावर प्रयोग केले आहेत.
पारखीसरांनी भास्कर संगीत विद्यालयात एक वर्ष संगीताचेदेखील शिक्षण घेतले. त्यांनी ‘प्रकाशन, प्रशिक्षण आणि प्रयोग’ हे ब्रीद आयुष्यभर पाळले आहे. ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’ १९७८ साली सुरू झाली. पारखीसर त्या माध्यमातून विद्यार्थी घडवत आहेत. प्रत्येक विद्यार्थी अभिनेता घडेल आणि त्याने तेवढेच करावे अशी पारखीसरांची अपेक्षा नाही. पारखीसरांचा प्रयत्न अभिनयगुणांबरोबर, संवादकौशल्य, देहबोली आदी माध्यमांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण व्हावा; तसेच, त्याने जीवनात जे करावे ते सर्वोत्तम करावे, त्याने सुजाण नागरिक व्हावे यासाठी असतो.
त्यांना नाट्यछटा कलाप्रकार विशेष प्रिय. नाट्यछटालेखनासाठी लेखकांना प्रवृत्त करणे, प्रोत्साहन देणे, त्यासाठी नाट्यछटा लेखनाची स्पर्धा घेणे, नाट्यछटांच्या प्रयोगांचे आयोजन या गोष्टींबरोबर पारखीसरांनी नाट्यछटांच्या डीव्हीडींची निर्मितीदेखील केलेली आहे. पारखीसरांनी बालनाट्य गावागावामध्ये पोचले पाहिजे म्हणून ध्यास घेतला आहे. बालनाट्याचे एकसष्ट प्रयोग एका वर्षात करण्याचा त्यांचा मानस आहे. पारखीसरांना त्यासाठी मनुष्यबळ आणि आर्थिक पाठबळ यांची गरज लागणार आहे. अर्थात, त्यासाठी अनेकानेक मंडळी पुढे येत आहेत.
पारखीसरांची महाराष्ट्र सरकारच्या अभ्यासक्रम समितीवर ‘नाट्यकला’विषय शिकवण्यासाठी निवड झाली. त्यांनी प्रत्येक शाळेत नाट्यशिक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या धडपडीला मूर्त स्वरूप येताना दिसत आहे. विषय शाळेमध्ये नाट्यपूर्ण पद्धतीने शिकवल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. तसेच, त्यांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी उपयोग होईल यावर पारखीसरांचा विश्वास आहे. ‘दैनिक प्रभात’तर्फे पाच वर्षांपासून घेण्यात येणा-या अभ्यासनाट्य स्पर्धांच्या आयोजनामध्ये पारखीसरांचे मार्गदर्शन असते.
पारखीसर हिंदुस्तान अँटिबायोटिक्समध्ये नोकरीला होते. त्यांच्या कलागुणांना तेथेही वाव मिळाला. त्यांनी बालरंगभूमीवर केलेल्या कार्याबद्दल १९८७ साली तत्कालीन राज्यपाल शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते पारखी यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, योगेश सोमण, लोकेश गुप्ते, अश्विन चितळे, अमित फाळके, अथर्व कर्वे, तेजश्री वालावलकर, सक्षम कुलकर्णी यांच्यासारखे कलाकार पारखीसरांच्या हाताखालून गेले आहेत. रंगभूषाकार इंद्रायणी चव्हाण, आमोद दोषी, ध्वनिसंकलक महेश लिमये, तुषार क-हाडकर आदी कलाक्षेत्रातील मंडळीदेखील त्यांच्या गुणसंवर्धनाचे श्रेय पारखीसरांना देतात. त्यांनी वीणा गोखले यांच्यासारखी सामाजिक कार्यकर्तीदेखील घडवली आहे.
पारखीसरांना नाट्यगौरव हा पुरस्कार तर सेंट्रल कल्चरल कमिटीतर्फे दिला जाणारा ‘आर्टिस्ट ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना पुणे मराठी ग्रंथालय, अखिल भारतीय नाट्य परिषद, केसरी संस्था, भरत नाट्य मंदिर, रोटरी क्लब, लायन्स क्लब यांच्यातर्फेदेखील गौरवण्यात आले आहे.
सोहम आपटे,
९७६७४३४९९२
प्रकाश पारखी
prakashparkhi1@gmail.com
९४२२३०३३०३
नाट्य संस्कार कला अकादमी
www.natyasanskar.com
नाट्य संस्कार कला अकादमीचे…
नाट्य संस्कार कला अकादमीचे काम अतिशय चांगले. पारखी सरांची निस्वार्थ सेवा व मुलांप्रती असलेला स्नेहभाव, व्यक्तीमत्व विकासाचे काम छानच. नाट्यछटा व अभ्यासनाट्य शालेय विद्यार्थ्यांना खूप उपयोगी असते. आम्ही आमच्या शहरात व जिल्ह्यात शाळाशाळांमधून हा उपक्रम सशुल्क राबवावा काय? मार्गदर्शन हवे.
Comments are closed.