बाबू चांगदेव मोरे हे पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. बाबू मोरे यांनी ऑर्गेनिक शेतीचा प्रयोग उन्हाळ्याच्या दिवसांत ठिबक सिंचनाद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेच्या प्रांगणात यशस्वी करून दाखवला. पालघरमध्ये पाणी मुबलक प्रमाणात आहे. बाबू मोरे त्या जलस्रोतांचा वापर करून दुपीक शेतीच्या माध्यमातून पालकांचे स्थलांतर रोखण्यात यशस्वी झाले आहेत.
बाबू मोरे यांचा जन्म चाखरवाडी गावातील (बीड जिल्हा) शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या पाच बहिणी, तीन भाऊ आणि आईवडील असे मोठे कुटुंब. बाबू मोरे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावी जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यांना दहावीला सदुसष्ट टक्के गुण (2002) मिळाले. ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबेजोगाईलागेले. त्यांना कला शाखेतून बारावीला ऐंशी टक्के गुण मिळाले. पुढे, ते शासकीय कॉलेज (पनवेल) मधून सत्याहत्तर टक्के गुण मिळवून डी एड उत्तीर्ण झाले. त्यांना अनोळखी व्यक्तींनी नि:स्वार्थ वृत्तीने सहाय्य अनेक कठीण प्रसंगांत केले. साहजिकच, त्यांच्यावरही दुसऱ्याला मदत करण्याचे संस्कार घडत गेले असे ते सांगतात.
बाबू मोरे यांची पहिली नियुक्ती विक्रमगड तालुक्यातील जांभे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (2009) झाली. त्या शाळेत वर्ग सातवीपर्यंत होते. तेथे वारली लोकवस्ती आहे. त्या शाळेची पटसंख्या दोनशेचौतीस होती. त्यांना वर्गखोल्या कमी पडत. त्यामुळे काही वर्ग व्हरांड्यात बसवावे लागत. विद्यार्थ्यांचे आईवडील व्यसनी असल्याने त्यांचे मुलांकडे दुर्लक्ष असे. मुले शाळेत गैरहजर असणे, शारीरिक अस्वच्छता, शाळाबाह्य मुले अशा समस्या होत्या. बाबू मोरे यांनी वस्तीतील पस्तीस–चाळीस शाळाबाह्य मुलांना शोधून शिक्षणाच्या प्रवाहात आणले. बहुसंख्य मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवावे लागे. त्यासाठी शाळेतच टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य निर्माण केले. प्रत्येक विद्यार्थ्याची केस स्टडी बनवली. त्यामध्ये विद्यार्थ्याची वैयक्तिक व कौटुंबिक माहिती, आर्थिक परिस्थिती याची नोंद केली. त्याचा मुलांची मानसिकता समजून घेऊन शिकवण्यात फायदा झाला. तसेच, शाळेतील हुशार मुलांची मदत घेऊन त्यांना गटागटाने अभ्यास घेण्यास लावले. शाळाबाह्य मुले नियमित विद्यार्थ्यांच्या बरोबरीने येईपर्यंत अभ्यासक्रमाचे नियोजन केले. भाषा व गणित यांच्या जोडीने मुलांचे इंग्रजीही उत्तम आहे. शाळेचे ते काम पाहून शाळा तपासणीसाठी आलेल्या राजस्थानच्या कमिटीने शिक्षकांचे कौतुक करून शाळेला चांगला शेरा दिला. चंद्रकांत वांगड नावाचा विद्यार्थी तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आला. त्याने पाड्यावर लाइट नसतानादेखील रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करून दहावीला एकोणनव्वद टक्के गुण मिळवले. जांभेच्या शाळेत झाडे कमी होती, पाण्याचाही प्रश्न होता. मोरे यांनी शाळा परिसरात तीस–पस्तीस झाडे लावली. सलाईनच्या बाटल्यांचा वापर ठिबक सिंचनासाठी केला. आजमितीला त्यांतील सर्व चिकूची झाडे शाळेला व मुलांना छाया देती झाली आहेत.
मोरे जांभेच्या शाळेतील एक हृदयस्पर्शी आठवण सांगतात, “साईनाथ गांगडा नावाच्या मुलाचे खेळताना मनगटाच्या मागे हाड तुटले. मोरे यांनी स्वत: पुढाकार घेऊन साईनाथला ठाण्याच्या दवाखान्यात अॅडमिट केले. त्याचा औषधोपचार स्वखर्चाने केला. साईनाथ बरा होऊन शाळेत पंधरा दिवसांत आला. त्याने, ‘सर, तुमच्यामुळे माझा हात वाचला, नाहीतर दिलीपसारखा माझाही हात कापावा लागला असता’ असे म्हणून कमरेला गच्च मिठी मारली! आज तो मुलगा व्यवस्थित शिक्षण घेतोय याचे समाधान आहे.” दिलीप नावाच्या मुलाचा हात, योग्य औषधोपचाराअभावी गँगरीन होऊन कापावा लागला होता. त्याचा संदर्भ साईनाथच्या कथनात होता.
बाबू मोरे यांची बदली जांभेच्या शाळेतून खोमारपाडा जिल्हा परिषद शाळेत (2013) झाली. तेथे वेगळेच प्रश्न होते. शाळेत वर्ग पहिली ते पाचवीपर्यंत होते व पटसंख्या अठ्ठ्याऐंशी होती. शाळेचा परिसर छोटा होता, कुंपण नव्हते. रस्ता शाळेलगतच असल्याने मुले जेवण्यास बसली, की रस्त्यावरची कुत्री व गुरे येऊन त्यांच्या ताटातील जेवण खात. त्या शाळेत अविनाश जाधव मुख्य शिक्षक, तर सुनील शिंदे सहशिक्षक होते. शिक्षकांनी लोकसहभागातून शाळेत बदल घडवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शिक्षकांनी स्वत: हजार–हजार रुपये काढले. त्याबद्दलची माहिती पालकांची मीटिंग घेऊन त्यांना दिली. ‘शाळा सुधार’ पुस्तिका काढून घरोघरी वाटली. त्या प्रयत्नातून अठरा हजार रुपये जमा झाले. शाळेला तारेचे कुंपण घातले. पालकांनी श्रमदानही केले. शाळेच्या गेटसाठी गणेश ओझरे व जयवंत टोकरे या पाड्यावरच्या शाळेत शिकून अधिकारी झालेल्या व्यक्तींनी मदत केली. मोरे शाळेतील प्रत्येक काम कोणाचीही वाट न बघता हिरिरीने करतात. मोरे यांनी त्या शाळेतही शाळाबाह्य आठ–दहा मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करून घेतले.
खोमारपाड्यात एकशेचौऱ्याण्णव कुटुंबे व दीड हजारच्या आसपास लोकसंख्या आहे. खोमारपाड्यातील विद्यार्थ्यांचे पालक मुख्यत: हंगामी भातशेती करायचे. शेतीची कामे आवरली, की तेथील अठरा कुटुंबे रोजगाराच्या शोधार्थ वसई, विरार, कल्याण, मुंबई अशा वेगवेगळ्या गावी स्थलांतर करत. त्यांना त्या काळात बांधकाम मजूर, रेतीची कामे, मासेमारी, वीटभट्ट्यांवर सात–आठ महिने मेहनत करून प्रत्येकी वीसएक हजार रुपये मिळत. पालकांना स्थलांतरापासून रोकणार कसे? पाड्यावर थांबवणार कसे? हा प्रश्न होता. शाळेतील पंधरा–सोळा मुले दरवर्षी पालकांबरोबर काही महिने स्थलांतरित होत. ती मुले पुढील वर्षी जेव्हा पुन्हा शाळेत येत, तेव्हा त्यांची पाटी कोरी झालेली असायची! अशातच, बाबू मोरे यांनी घरून आणलेला आल्याचा एक कोंब शाळेच्या मागील जमिनीत लावला. त्या एका कोंबापासून आठशे ग्रॅम आले मिळाले. तो शेतीचा प्रयोग त्यांनी इतर पिकांवर करून पाहण्याचे ठरवले. त्यांनी भंगारवाल्याकडून तुटलेले टोप, प्लॅस्टिकचे टब घेतले. त्यामध्ये शेणखत व माती मिसळून त्यात आले, पालक, मेथी, बटाटा, मिरची अशी रोपे लावली. शाळेच्या परसबागेतील तो प्रयोगही यशस्वी झाला आणि मोरे यांना पालकांना पाड्यावरच थांबवण्याचा आशेचा किरण सापडला, तो म्हणजे शेती!
खोमारपाडा येथील जमीन सुपीक आहे. पाणी मुबलक आहे. मोरे यांनी शाळेच्या समोरील अर्धा गुंठा पडिक जागा विद्यार्थ्यांच्या मदतीने लागवडीयोग्य बनवली. मेथी, पालक, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, शेपू अशी, शालेय पोषण आहारात उपयोगी पडतील अशा रोपांची लागवड केली. त्यातून तीन उद्देश साध्य झाले. एक म्हणजे मुलांना ताज्या व ऑर्गेनिक भाज्या खाण्यास मिळाल्या, दुसरा मुलांना शेतीविषयी माहिती मिळाली व कृतीतून शिकता आले, तिसरा महत्त्वाचा म्हणजे भातशेतीव्यतिरिक्त भाजी, फळे व इतर पिके त्या मातीत होऊ शकतात याचा विश्वास पालकांमध्ये निर्माण झाला. मोरे यांनी प्रयोग मुलांच्या मदतीने प्रत्यक्ष कृतीतून यशस्वी करून दाखवला. मुलांनी त्या भाज्या जवळजवळ साडेतीन महिने खाल्ल्या. शेतात आलेले कांदे सहा महिन्यांपर्यंत खाण्यासाठी पुरले. पालक मुलांची शेती येता–जाता पाहत होते. त्याप्रयोगामुळे पालकांमध्ये कुतूहल निर्माण झाले.
बाबू मोरे यांनी पालकांची मीटिंग गणपतीच्या सुट्टीपूर्वी 2016 साली घेतली. त्यांना शेतीविषयक व्हिडिओ प्रोजेक्टरवर दाखवून मार्गदर्शन केले. त्यांना शेती करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांचा पालकांना सवाल होता, की आपल्याकडे जमीन चांगली आहे, पाणी मुबलक आहे. हे सर्व असताना, तुम्ही मालक बनण्याचे सोडून मजूर म्हणून का काम करत आहात? चाळीस पालक त्या मीटिंगला उपस्थित होते. त्या वर्षी पालकांनी स्थलांतर न करता शेती करण्याचे ठरवले. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकांनी गवार, कांदा, वांगी, दुधी, हरभरे, कलिंगड, काकडी, भेंडी, मिरची, वाल व पालेभाज्या अशा पिकांची लागवड केली. त्यातून पालकांना बाहेरून कमावून आणणाऱ्या पैशांपेक्षाही चांगले उत्पन्न मिळाले. कामासाठी स्थलांतर करणाऱ्या रहिवाशांच्या मुलांचे खोमारपाड्यातील प्रमाण शून्यावर गेल्या चार वर्षांपासून आले आहे.
मोरे यांनी मुलांना श्रमप्रतिष्ठा, देशभक्ती, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये नुसतीच परिपाठात न शिकवता त्याचे उपयोजन शिकवले. त्यांनी विद्यार्थ्यांना अगदी शाळा सारवण्यापासूनचे काम करून दाखवले. खेळांची कौशल्ये शिकवली. पालघरमध्ये दरवर्षी भरपूर पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. मोरे यांनी पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांना पाण्याचा अंदाज घेऊन पोहण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांनी सिनियर मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कुक्कुटपालन, विज्ञान प्रदर्शन, वीटभट्ट्या यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. मुले गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी ‘स्वच्छता दिंडी’ काढतात. तरंग वाचनालय, वर्गांना शब्दपट्ट्यांचे तोरणे, लाकडी ठोकळ्यांपासून शैक्षणिक साहित्याची निर्मिती, इंग्रजी सुधारण्यासाठी ‘जॉली फोनिक्स’ असे उपक्रम शाळेत गुणवत्तेसाठी राबवले जातात. त्यामुळे दुर्गम पाड्यावरील मुले हस्ताक्षर सुधार प्रकल्प, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकणे किंवा रिले स्पर्धेत सलग तीन वर्षे जिल्हा पातळीवर शाळेचा संघ पहिला येणे असे यश सहज मिळवत आहेत. गावासाठी ते ऐतिहासिक महत्त्वाचे आहे.
शाळेत पारंपरिक वर्गरचना नाही. मुलांच्या क्षमतेनुसार विषयगट तयार करण्यात आले आहेत. चालू वर्षी शाळेची पटसंख्या पंच्याहत्तर आहे. ग्रामपंचायतीने एक वर्गखोली डिजिटलकरून दिली आहे. चाळीस शाळांनी उपक्रमशील शाळा म्हणून मोरे यांच्या शाळेला भेट दिली आहे. बाबू मोरे यांना मुलांना आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे शिक्षण द्यायचे आहे. मोरे यांचा मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबर जीवनशिक्षण देण्याकडे कल आहे. त्यांचा भर पर्यावरणसंवर्धन व जलसाक्षरता यांवर देखील आहे.
पालघरमधील श्रीस्वामी समर्थ मठ, मुंबईचे अक्षरधारा फाउंडेशन आणि सुहृदय फाउंडेशन यांचे सहाय्य मोरे यांच्या प्रयत्नांना आहे. त्यांच्या समन्वयातून खोमारपाड्यासह शेजारच्या फणसीपाडा, मुसळपाडा, ठाकरपाडा व खडकीपाडा येथील अठरा शेतकऱ्यांचा गट बनवला आहे. त्यांच्याकरवी पाड्यावरील शेतामध्ये मेथी, पालक, शेपू, कोबी, मिरची, दुधी, कारले, डांगर, कलिंगड, टोमॅटो, वांगे, कांदा, लसूण, गवार अशी विविध प्रकारची पिके केली. मोरे यांनी दिवाळीच्या सुट्टीत गावी न जाता पाड्यावर राहून कांद्याची रोपे तयार केली. त्यासाठी किरण गहला यांनी त्यांचे शेत, पाणी व कांद्याची रोपे तयार करण्यासाठी विनामूल्य सहाय्य केले. टाळेबंदीत त्याचा फायदा झाला. कांद्याचे पस्तीस टन उत्पादन झाले. कोरोनामहामारीच्या काळात लोकांना उत्पन्नाचे साधन मिळाले! त्याआधी व्यापारी भैय्या लोक एक किलो काजू बियांच्या बदल्यात एक किलो कांदे किंवा बटाटे देऊन आदिवासींना नाडत होते. बाबू मोरे यांच्या कामाला शिक्षणखात्यातील अधिकाऱ्यांची साथ आहे. बाबू मोरे यांना मुलांचे आरोग्य व शेतीपूरक व्यवसाय, व्यसनमुक्ती यासाठी काम करायचे आहे. त्यांची इच्छा शाळेबरोबर गाव समृद्ध करण्याची आहे.
बाबू यांच्या पत्नी स्वाती व त्यांची मुले स्वरांजली (चार वर्षे) व अनुजा (दोन वर्षे) खोमारपाड्याच्या वातावरणात छान रमली आहेत. ते लोक राहतात तालुक्याच्या गावी – विक्रमगडला. स्वातीदेखील गावच्या महिलांना शेतीची कामे व अन्य कौशल्ये शिकवण्याचा खटाटोप करतात.
बाबू चांगदेव मोरे 93701 43310 morebabu88@gmail.com
– वृंदा राकेश परब 75069 95754 vrunda.rane@gmail.com
वृंदा राणे-परब या दहा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. त्यांनी ‘दैनिक वृत्तमानस’, ‘पुढारी‘, ‘मुंबई तरुण भारत‘, ‘मी मराठी‘ या वर्तमानपत्रांत मुद्रितशोधक पदावर काम केले. त्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘मध्ये काही काळ उपसंपादक पदावर काम करत होत्या. सध्या त्या ‘थिंक महाराष्ट्र‘सोबत मुक्त पत्रकार म्हणून जोडलेल्या आहेत. त्यांनी मराठी विषयात एम ए पदवी मिळवली आहे. त्या मुंबईत गोरेगाव येथे राहतात.
—————————————————————————————————–
———————————————————————————————————————————————-