दत्तप्रसाद दाभोलकर यांनी ‘अन्वयाची अक्षरलिपी’ या कवितासंग्रहाचे परीक्षण करत असताना एक किस्सा कथन केला आहे. बाबा आमटे यांच्या ‘माती जागवील त्याला मत’ या गाजलेल्या कवितासंग्रहावर ‘शब्दांकन- रमेश गुप्ता’ असे आहे. आता, कवितांचे शब्दांकन म्हणजे काय? मग ही कवितानिर्मितीची प्रक्रिया कोणती? कविता बाबा आमटे यांची की रमेश गुप्ता यांची?…
तीस वर्षांपूर्वीचा प्रसंग. मी त्या वेळी दिल्लीला होतो. निशिकांत मिरजकर दिल्ली विद्यापीठात ‘आधुनिक भारतीय भाषा विभागा’चे प्रमुख होते. बारा भारतीय भाषांमधील प्राध्यापक तेथे होते. त्यांतील काही जण त्या त्या भाषेतील साहित्य अॅकॅडमी पुरस्कार प्राप्त लेखक होते. इंदिरा गोस्वामी या सुद्धा त्या प्राध्यापकांच्यात होत्या. त्यांना आसामी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तेथे अनेक चर्चा रंगत. कविता हा मिरजकर यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्यांची तीन पुस्तके -1.कवितेची रसतीर्थे (नऊ कवींच्या निवडक काव्याची समीधा), 2.नव्या वाटा नवी वळणे हे पेंग्वीन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक, 3.अॅन आउटलाइन ऑफ मराठी पोएट्री.
त्या संदर्भात कविता म्हणजे काय? कविता निर्मितीची प्रक्रिया कोणती? यावर दिल्लीत एकदा बहुआयामी परिसंवाद झाला होता. मी त्या परिसंवादाला उपस्थित होतो. त्यानंतरच्या व्यक्तिगत चर्चेत एक वेगळी गोष्ट आमच्या लक्षात आली. ‘माती जागवील त्याला मत’ हा बाबा आमटे यांचा कवितासंग्रह खूप गाजला. पण त्या कवितासंग्रहावर ‘शब्दांकन- रमेश गुप्ता’ असे आहे. आता, कवितांचे शब्दांकन म्हणजे काय? मग ही कवितानिर्मितीची प्रक्रिया कोणती? कविता बाबा आमटे यांची की रमेश गुप्ता यांची? त्या यशात दोघांचा वाटा समसमान की आणखी काही? हा तिढा आणखी वाढत होता. बाबा आमटे यांच्या दुसऱ्या कवितांचे शब्दांकन मराठीतील एका ख्यातनाम लेखकाने केले आहे. त्या संग्रहाला पु.ल. देशपांडे यांची प्रस्तावना आहे. मात्र तो कवितासंग्रह फारसा चर्चेत राहिला नाही. मग कवितांचे शब्दांकन म्हणजे काय? खरा कवी कोण? त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कवितानिर्मितीची नक्की प्रक्रिया कोणती?
मी आणि मिरजकर, आम्ही रमेश गुप्ता यांना भेटण्याचे ठरवले. गुप्ता तोपर्यंत आनंदवन सोडून दिल्लीत येऊन स्थायिक झाले होते. आम्ही त्यांचा पत्ता शोधत गेलो. आम्ही गेलो त्याच्या आदल्या दिवशी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता ! डोक्यावर मोठी जखम, शस्त्रक्रिया असे सारे झाले होते आणि ते हॉस्पिटलमध्ये होते. आम्ही तेथे त्यांना भेटण्यास गेलो. त्यांच्या डोक्याला भलेमोठे बँडेज बांधलेले होते, पण गुप्ता हे ताजेतवाने होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे फोटोसेशन आणि मग मिरजकर यांनी घेतलेली त्यांची विस्तृत मुलाखत झाली. मुलाखत ध्वनिमुद्रित केली, मिरजकर त्यावर सविस्तर लिहिणार होते.
मला त्या वेळी जे समजले ते काहीसे असे आहे- “बाबा आमटे त्यांच्याच तंद्रीत जेवण झाल्यावर माझ्याशी काही बोलत बसत. मी ते उतरवून घेत असे. मात्र मी त्यांच्या त्या शब्दांनी संमोहित झालेला असे. ते शब्द माझ्याबरोबर असत. अगदी झोपेत सुद्धा ! मी शब्दांकन सकाळी उठल्यावर करत असे. बाबांचे ते शब्द माझ्याबरोबर रात्रभर नसते तर मी ते शब्दांकन करू शकलो नसतो आणि बाबांचे ते बोलणे कविता बनल्या नसत्या !” म्हणजे विज्ञानात, एखाद्या अणूची त्याच्या ‘एक्सायटेड स्टेट’ला रासायनिक प्रक्रिया पुरी होते; मग तो पुन्हा नेहमीचा अणू बनतो, तसे काहीसे ! माणूस कविता करतो म्हणजे तो भवतालाला आणि स्वत:लाही विसरतो आणि त्याच्या मनाच्या डोहात उडी मारतो, तसे काहीसे?
दाभोलकर यांचा हा मजकूर एका पुस्तकपरीक्षणातून निवडला आहे. तो ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने निशिकांत मिरजकर यांच्या नजरेस आणला. मिरजकर निवृत्तीनंतर पुण्यात स्थिरावले आहेत. त्यांनाही तो प्रसंग आठवतो. ते म्हणाले, की दाभोलकर दिल्लीला असताना वातावरण चैतन्यमय वाटे. मला ते दिवस फार आठवतात. आम्ही दर शनिवारी एकत्र बसत असू. विविध विषयांवर गप्पा होत. भानू काळे यांनी दाभोलकर यांच्या गौरवार्थ ‘रंग माझा वेगळा’ नावाचा ग्रंथ संपादित केला आहे. त्यामध्ये दिल्लीच्या त्या प्रसंगाचे उचित वर्णन येते.
– दत्तप्रसाद दाभोलकर 9822503656
(राजश्री देशपांडे यांच्या ‘अन्वयाची अक्षरलिपी’ या कवितासंग्रहाच्या परीक्षणातून उद्धृत. साधना, 10 सप्टेंबर 2022)
——————————————————————————————————————————