बाजीरावाच्या समाधीवर

11
57

जेव्हापासून मी थोरले बाजीराव पेशवे यांच्याविषयी इतिहासातून वाचत गेलो, तेव्हापासून त्या मर्द पेशव्याविषयीचा माझा आदर, प्रेम वाढतच गेले आहे. त्याने जन्मभरात एकूण त्रेचाळीस लढाया केल्या आणि त्या सर्व जिंकल्या! यशस्वी सेनापती म्हणून त्याच्या युद्धकौशल्याचा खास अभ्यासही केला जात असतो. तोच महापराक्रमी पेशवा मस्तानीचा बाजीराव म्हणूनही ओळखला जातो. तो वीर ऐन तारुण्यात, कोणतेही भयानक आजारपण न येता वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी मध्यप्रदेशात नर्मदाकाठच्या रावेर-खेडी या गावी सोमवार २८ एप्रिल १७४० रोजी अचानक मृत्यू पावला.

रावेर-खेडी गावाच्या नर्मदातीरावर त्याची असलेली समाधी, तेथे लौकरच होणार असलेल्या धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यात कायमची बुडणार आहे असे वाचनात आले होते. त्या स्थानाला प्रत्यक्ष भेट द्यायची माझी इच्छा अधिकच तीव्र झाली अन् मी संधी शोधू लागलो. माझ्या जळगावच्या मुक्कामात तशी संधी आली आणि पुण्याच्या डॉ. नातू या रसिक सहकाऱ्याची साथ मिळताच आम्ही दोघे मोटारीने त्या मोहिमेवर निघालो. राजू माळी हा आमचा फोटोग्राफर मित्रही साथीला आला.

प्रवासाचा पल्ला मोठा होता. जळगाव ते रावेर-खेडी हे अंतर सुमारे अडीचशे किलोमीटरचे आहे. आम्ही जळगावहून प्रथम रावेर मार्गे बऱ्हाणपूर गाठले. तेथील कोटाला प्रदक्षिणा घालत खांडवा शहरात न जाता बायपास मार्गे हायवेने थेट सनावद गाठले. तेथे हायवे सोडून देऊन पश्चिमेकडे ओंकारेश्वराला जाणारा रस्ता पकडला. दर पाच-सहा किलोमीटरवर थांबून विचारत विचारत पुढे जात होतो. रस्ता डांबरीच पण सिंगल होता. तसेच तीस-चाळीस किलोमीटर पुढे गेल्यावर उजवीकडे रावेर-खेडी अशी अगदी छोटी पाटी दिसली. आम्ही तेथून आत घुसलो. तो रस्ता खडीचा होता. हळुहळू प्रवास करत आम्ही धीराने जात राहिलो. ना डोंगर-वा ना नर्मदा. एक छोटे खेडेही लागले, पण ते रावेर नव्हते अन् खेडीही नव्हते. उत्सुकता ताणली जात होती.

बाजीरावाची समाधीछोटासा उतार उतरलो तर दिसली एक नदी. छोटीच होती. तिच्यावर सिमेंटचा सांडवा बांधलेला होता. तो ओलांडून आम्ही पलीकडे गेलो. ती नदी नर्मदा नव्हती. नर्मदेचीच लहानशी उपनदी होती. थोडा चढ चढून आलो तर वर असणाऱ्या गावाचे नाव होते खेडी. तेथून अजून पुढे वळणे वळणे घेत गेलो. दोन किलोमीटरवर गाव लागले – रावेर. पण नर्मदा दिसेना. गाडीतून खाली उतरून ‘पेशवा-समाधी’ असे विचारले तेव्हा दिशा मिळाली. गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. चालत निघालो. प्रथम नदी दिसली. तिचे विशाल पात्र पाहताच खात्री पटली, की ही नर्मदाच!

नर्मदाकाठी थोड्या उंचावर जुने बांधकाम होते. उंचच उंच दगडी भिंत होती. लोखंडी दरवाजा. जाळीचा. गेट होते. पण कुलुपबंद नव्हते. ते उघडून आम्ही आत अंगणात आलो. त्या परिसरात चिटपाखरू नव्हते. एकही माणूस नाही. पोलीस-रक्षक कोणीही नव्हते. आम्ही बिनधास्त आत घुसलो.

दगडी भिंतीला मोठा दरवाजा व देवडी होती. दरवाजा उघडाच होता. आम्ही आतील प्रांगणात आलो. तेथे भलामोठा चौक होता. चौकाच्या चारी बाजूंनी अवाढव्य, बंदिस्त भिंत होती. भिंतीवरून चालण्यासाठी रुंद रस्ताही होता. भिंतीवर चढायला दगडी पायऱ्या होत्या. चौकामध्ये उजवीकडे पुढच्या बाजूस दगडी बांधकामात बाजीराव पेशव्यांची समाधी होती. साधारणत: दहा फूट बाय दहा फूट अशा भक्कम ताशीव काळ्या दगडांचा पाच फूट उंचीचा चौथरा. चौकोनी. चारी बाजू सारख्या. त्या चौथऱ्यावर चढायला पायऱ्या. सहा-सात पायऱ्या चढून वर यायचे. समाधिस्थानही चौकोनी. चौथऱ्याच्या मध्यभागी. अंदाजे चार फूट उंच. बांधकामाला सहज प्रदक्षिणा घालता येण्याजोगे. बांधकामाला खिडक्यांसारखी नक्षी, पण आत डोकावता येण्याची सोय नाही. साधीसुधी दगडांची समाधी. आत त्याची रक्षा. वर निळे आभाळ.

समाधीवर पायऱ्यांनी चढता येते. तेथे डावीकडे संगमरवरी जुनी पाटी दगडात बसवली आहे. समाधी, तट, भिंत हे बांधकाम ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याने केल्याचा उल्लेख आहे. समाधीसमोर तटाच्या भिंतीला खिळ्याने अडकवलेला पत्र्याचा बोर्ड. मध्य प्रदेश शासनाच्या पुराण वस्तू खात्याने लावलेला. तेथे थोडक्यात इतिहास लिहिला आहे. तो पूर्णपणे वाचल्यावर असे कळले, की त्या पराक्रमी पेशव्याचा मृत्यू ‘लू’ लागल्यामुळे म्हणजे सनस्ट्रोकने झाला होता! तो पेशवा नर्मदेच्या डोहात भर उन्हाळ्यात भरपूर पोहत होता अशी नोंद आहे. म्हणजे त्याला सनस्ट्रोकने मृत्यू आला हे तार्किक दृष्ट्या खरे वाटते.

समाधीवर बघण्यासारखे काहीच नव्हते, म्हणून वीस-पंचवीस फूट उंचीच्या तटावर–भिंतीवर चढून पूर्ण फेरी मारली. अफाट नर्मदा पाहिली. पावसाळ्यात पुराने किती भयानक दिसत असावी त्याची कल्पना केली. खेडी गावाचे खेडेपण तेथून दिसते. मातीच्या, पत्र्याच्या घरांवर निळ्या ऑइल पेंटने नंबर्स टाकलेले दिसले. तसा नंबर समाधीच्या गेटबाहेरच्या भिंतीवरही दिसला. पाण्याखाली जाणाऱ्या इमारतींची ती ओळख-क्रमवारी होती. पूररेषा आखली गेली आहे. धरणाच्या बांधकामास मात्र अद्याप सुरुवात झालेली नाही.

भिंतीच्या बाहेर मारुतीचे छोटेसे देऊळ आहे. त्यावर प्रचंड पिंपळही छाया धरून आहे. एका महापराक्रमी माणसाची समाधी पाहिल्याचा आनंद होता, समाधानही होते, पण हे सगळे बुडणार याचे दु:खही वाटत होते.

‘रावेर-खेडी’ – (पश्चिम निमाड), जि. खरगोन-मध्यप्रदेश
(छायाचित्रे – राजू माळी)

आनंद गुप्ते
अमृती, ७० श्रीकृष्णनगर,
बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०० ०६६
०२२ २८९७४९३१

About Post Author

11 COMMENTS

  1. दर्शन घेण्यची अतीव इच्छा झाली
    दर्शन घेण्याची अतीव इच्छा झाली आहे.

  2. sir u have done a great job.
    Sir u have done a great job. the peoples like me who want to go but cant can have darshan of peshwa samadhi. Hats of to great Bajirao. mahesh soman. kelshi dapoli ratnagiri 415717 – 02358287319

  3. आपण भाग्यवान आहात. प्रत्यक्ष
    आपण भाग्यवान आहात. प्रत्यक्ष जाऊन आलात. तुमच्यामुळे आम्हालाही समाधी पाहता आली. धन्यवाद.

  4. Namaskar.

    Namaskar. Hi Samadhi aapan vachavu shakat nahi ka? Kahitari upay asel. jar Maharashtra sarkarla vinanti karun kalvale tar
    kahi upyog hoil ka?

  5. Dhanyawad, Tumchya mule
    Dhanyawad, Tumchya mule aamhaalaa hya Shoor Yoddhya vishayi ek navin mahiti milali. Aani tyanchya samaadhiche sthaan hi kalale.

  6. या पराक्रमी योध्दया बद्दल मला
    या पराक्रमी योद्ध्‍याबद्दल मला लहानपणापासूनच अपार आदर आहे. नर्मदा धरणात कितीतरी महत्वाची ठिकाणे बुडलीत. कालगती शेवटी, पण परदेशात जसे पुरातन वास्तूंचे संरक्षण करतात तसे इथे होत नाहीच. अशी ठिकाण वाचवावी अस सरकारलाही वाटत नाही. “कालाय तस्मै नमः”

  7. thanks for show gret maratha
    thanks for showing great maratha samadhi in rawer. I want information now dam is kampalent in this situation.

  8. Bajirao peshvyancha shevtcha
    Bajirao peshvyancha shevtcha pravas ya article adhare kalala Thanks.

  9. Sir thanks a lot……mi
    Sir thanks a lot……mi mastanivar research karat ahe…..malahi pesve bajiravabaddal adar abhiman ahe…tumchya lekhane kup mahiti mlali,…..thanks again……..mastanibabat kahi mahiti asel tar jarur sanga

  10. It is unfortunate that this
    It is unfortunate that this Samadhi would be submerged in water. Is there any memorial to such a unique personality, a great fighter, a great general, in Maharashtra? Is the Maharashtra government even aware of this situation ? And if so, are they going to do anything about it?

  11. आपण तिथपर्यंत जाण्याचे कष्ट…
    आपण तिथपर्यंत जाण्याचे कष्ट घेऊन ती समाधी शोधून काढून तिचि छायाचित्रण तसेच चित्रण केल्यामूळे ते प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य आम्हाला मिळाले त्याबद्दल आपले आभार! छत्रपति शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली व संपूर्ण भारतभर त्यानी मराठा साम्राज्याचा धाक निर्माण केला आणि मुघल सत्ता तसेच निजाम आणि इंग्रज यांना आपल्या पराक्रमाच्या बळावर गुडघे टेकावयास लावले. हिंदवी स्वराज्याची मान
    संपूर्ण देशभर ऊंचावणार्या या नरविराच्या पराक्रमास शतशः प्रणाम!
    31/1/2020

Comments are closed.