बागलाणचा उपेक्षित दुर्गवीर हरगड

0
38
carasole

सह्याद्रीच्या रांगेतील उपेक्षित दुर्ग म्हणून नाशकातील सटाणा तालुक्‍यात उभ्‍या असलेल्‍या हरगडाकडे पाहिले जाते. मात्र त्या गडाच्या पोटात भरपूर इतिहास दडला आहे. तेथे पुरातन राजवाडे, इमारती होत्या. त्यांचे विखुरलेले अवशेष गडावर मिळतात.

‘हरगड’ हे सर्वसामान्यांपासून सुटलेले पण दर्दींनी अचूक पकडलेले स्थान! मुल्हेर-मोरागड ही जोडगोळी ज्या गावात सुखाने नांदत आहे, त्याच गावात त्या दोघांना खेटून ‘हरगड’ हा त्याचे अस्तित्व राखून उभा आहे. आम्ही हरगड गाठण्यासाठी नाशिकमार्गे कळवण-सटाणा-ताहराबादहून दरमजल करत मुल्हेर गावात पोचलो. गावातून एक वाट त्या तिन्ही गडांकडे जाते. ती वाट जेथे संपते तेथे धनगरवाडा आहे. आम्ही धनगरवाड्यात आलो अन् समोरचे चित्र पाहून भानच हरपून बसलो! कॅनव्हासवर रेखाटल्यासारखे मोरागड डावीकडे, मुल्हेर मधोमध आणि हरगड उजवीकडे असे समोर उभे! दुर्गत्रिकुटाचे चित्र डोळाभर साठवून घेतले आणि उरात दीर्घ श्वास घेऊन हरगडाची वाट धरली.

दोन वाटा धनगरवाड्यापासून हरगडाकडे जातात. त्यांतील एक वाट मुल्हेर गडाच्या दिशेने मुल्हेर माचीवर जाते. त्या माचीपासून उजव्या बाजूने हरगडावर जाता येते. दुसरी वाट धनगरवाड्यापासून उजव्या बाजूने थेट हरगडावर जाते. दोन्ही वाटा एकत्र येतात त्या मुल्हेर आणि हरगड या दोघांना जोडणा-या खिंडीतील उद्ध्वस्त दरवाज्यापाशी! त्या खिंडीतून पलीकडे गेलो की मुल्हेरचे मुखदर्शन दिसेनासे होते आणि तेथूनच, मात्र खिंडीपल्याड आल्यानंतर हरगड पसरत गेलेला दिसू लागतो. खिंडीतून हरगडाच्या दिशेने पसरलेले जंगल पाहून अंगावर काटा येतो. त्‍या खिंडीला डाकिणदरा असे म्‍हणतात. हरगडावरील पहिला दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंना खांब आहेत. मात्र त्‍यावर कमान नाही. आत प्रवेशताना उजवीकडे मारुतीचे शिल्‍प आहे. गडावर एकूण तीन दरवाजांचे अवशेष आहेत. त्‍या तिन्‍ही दरवाजांपासून घळीच्‍या भिंतीपर्यंत दगडी बांधकाम केलेले आहे.

आम्ही अर्धा तास खिंडीची ती जंगलवाट तुडवत हरगडाच्या डोंगराच्या नाळेखाली आलो. नाळेची ती वाट जणू गडाला भिडणारी वाटली. त्या वाटेने तासाभराची चढाई करून, दरवाजे पार करून थेट महादेवाच्या मंदिरासमोर आलो. ‘सोमेश्वराचे मंदिर’ अशी त्यावरील पाटी पाहून गडाच्या सद्यस्थितीचा अंदाज येण्यास वेळ लागत नाही. मंदिरापेक्षा पाटी जास्त सुस्थितीत दिसते. त्यावरून हरगडाच्या अंगावर उभ्या असलेल्या वास्तूंची कल्पना आली. शंकराच्‍या त्या मंदिरासमोर शेंदूर फासलेली मारुतीची मोठी शिळा आहे. त्‍यासमोर चार-पाच दगडी तोफगोळे ठेवलेले आहेत.

आम्ही शंकराच्या मंदिरापासून जसजसे गडाच्या पठारावर चालू लागतो, तसतसे आमच्यासमोर पुरातन राजवाडे, इमारती आदी वास्तूंच्या अवशेषांचे ढीग येऊ लागले. त्यामुळेच गडावर उरल्या आहेत केवळ वास्तूंच्या खाणाखुणा, निद्रिस्त झालेल्या, गपगार पहुडलेल्या. इमारतींचे ते दगड बोलत असते तर किती बरे झाले असते… नाही? त्यांनी ‘हरगडा’ची कथा ऐकवून आम्हाला रोमांचित केले असते.

गडमाथा म्‍हणजे सुमारे दीड किलोमीटर लांबीचे पठार आहे. आम्‍ही ते पाहून गडाच्या मुल्हेरच्या बाजूच्या टोकावर आलो. त्याच टोकावर गडाचे विशेष आकर्षण असलेल्या ४.३ मीटर लांबीच्या तोफेने आमचे लक्ष वेधून घेतले. ‘हजार बागदी’ नावाची ती अजस्र तोफ पाहून डोळे विस्फारले! बांगडी पद्धतीची ती लोखंडी तोफ म्हणजे हरगडाचा दागिनाच! अशा महाकाय तोफा हातावरील बोटे मोजण्याइतक्या संख्येने गडांवर शिल्लक आहेत.

गडावर पाण्याची कोरीव टाकी विपुल प्रमाणात दिसतात.

हरगडावरून बागलाणच्या रांगेचे चित्र अप्रतिम दिसते. त्यातही मुल्हेर-मोरागड अधिकच रेखीव. मुल्हेर हे बागलाण प्रांतातील बागुलवंशी राजघराण्याचे महत्त्वाचे केंद्र होते. हरगडाच्या रचनेमुळे, त्यावरील तोफेमुळे तो मुल्हेरचा संरक्षणकर्ता असेल यात शंका नाही. हरगड त्याच्या भौगोलिक रचनेमुळे संकटाच्या वेळी मुल्हेरसाठी नक्की धावला असेल असे पदोपदी जाणवत राहते.

– ओंकार  वर्तले

Last Updated On – 7 June 2016

About Post Author