बहुढंगी राजाराम बोराडे

2
58

राजाराम दत्तात्रय बोराडे यांच्या बंगल्याच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला वाढलेली तुळशीची उंच रोपटी लक्ष वेधून घेतात. बंगल्यात जावे तर हॉलमध्ये मात्र भिंतीवर लाल रंगाने लिहिलेल्या ज्योतिषविषयक लिखाणावर नजर खिळून राहते. एका कपाटाच्या दारावर भविष्यविषयक जो सल्ला हवा असेल त्याचे दरपत्रकही चिकटवलेले दिसले. दुसऱ्या भिंतीला शेल्फ आहे. त्यात अनेक बरण्या आणि त्यात औषधे. बाजूला कॉम्प्युटरही आहे. शिवाय एक लहानसे रायटिंग टेबल व खुर्ची.

राजाराम दत्तात्रय बोराडे हे बहुढंगी व्यक्तिमत्त्व आहे. भारतीय परंपरेतील अशी परस्पर विरोधी गुणवैशिष्ट्ये त्यांच्यात एकवटली आहेत. ते सोलापूर जिल्‍ह्यातील कुर्डुवाडीचे रहिवासी. आईवडील व सहा भावंडे असा परिवार. त्यांचा परिवार त्यांच्या बालपणी लहानशा जागेत राहत होता. वडिलांचा पगार बेताचा, त्यामुळे हलाखीची परिस्थिती. बोराडे यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असे विचार त्यांच्या मनात घोळत होतेच. त्याच सुमारास गावातील विनायक दीक्षित व मोहनलाल या दोन व्यक्तींनी बोराडे या सातवी पास मुलास पैसा कमावण्‍याची कल्पना सांगितली. सोलापूरच्या मुलतानी बेकरीतून माल आणायचा व तो कुर्डुवाडीला विकायचा! बोराडे यांना ती कल्पना आवडली. कष्ट करण्याची तयारी होतीच. त्यांनी केवळ पंचेचाळीस रुपये भांडवलावर तो उद्योग चालू केला. सकाळी लवकर उठून, सोलापूरला जाणे व दुपारपर्यंत माल घेऊन येणे, तो विकणे असा दिनक्रम चालू झाला. खर्चवजा जाता महिन्याकाठी तीस रुपये कमाई होई. कुर्डुवाडी एस.टी. स्टँडजवळ ‘न्यू दत्त बॅकरी’ आहे ती त्यांचीच. बोराडे यांची पत्नी व मुलगी मिळून ती बेकरी चालवतात.

बोराडे यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. आजुबाजूच्या परिसरातील लोक त्‍यांचा सल्ला मागण्यासाठी येतात. बोराडे लग्न, नोकरी यांसारख्या व इतर अनेक समस्यांवर उपाय सांगतात व त्याचे मूल्य आकारतात. बोराडे यांनी वास्तुशास्त्राचाही अभ्यास चालू केला आहे; त्यांचा  स्वत:चा बंगला त्यानुसारच बांधला आहे. ते लोकांना वास्तुशास्त्रविषयक सल्ला मोफत देतात. लोक माढा तालुक्यातून व इतर अनेक ठिकाणांहूनही त्यांच्याकडे सल्ला विचारण्यासाठी येतात.

पुढे बोराडे यांनी वनस्पतिशास्त्राचाही अभ्यास केला. ते आजारांवर घरगुती उपाय सुचवतात, तेही मोफत. अशीच काही औषधे, त्यांच्या घरात दर्शनी भागी शेल्फमध्ये ठेवलेली आहेत. कोणी रात्री-अपरात्री मदत मागण्यास आला तरी ते औषध देतात. त्यांनी काही उपाय आम्हालाही सांगितले. मूतखड्यासाठी मक्याच्या कणसाचे केस पाण्यात उकळवून ते पाणी रोज पिणे. मधुमेहासाठी ‘अपामारी’ या वनस्पतीची पाने खाणे, ‘अमृतवल्ली’ची चार पाने रोज सकाळी अनुषापोटी (सकाळी उठल्‍यानंतर काहीही खाण्‍यापूर्वी) खाणे यांमुळे सर्व आजारांपासून मुक्ती मिळते. वगैरे वगैरे. त्यांनी स्वत:च्या बंगल्याभोवती ती झाडे लावली आहेत.

बाराडे यांच्‍या बंगल्‍याच्‍या आवारात तुळशीची असंख्य झाडे, तजेलदार व माणसाच्या कमरेइतकी उंच वाढलेली पाहिली आणि मी थक्क झाले. त्यानंतर बोराडे यांनी स्वत: तुळशी घातलेला चहा बनवून आम्हाला दिला.

बोराडे यांनी सातवीनंतर शाळा सोडली. त्यांना इंग्रजी येत नव्हते. पण या वयातही ते रोज ABCD लिहितात. ती वही त्यांनी आम्हाला दाखवली. अक्षर सुंदर होते. काळाची गरज म्हणून बोराडे कॉम्प्युटरही शिकले. त्यांचा स्वत:ला अद्यावत ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे.

– पद्मा कऱ्हाडे

About Post Author

2 COMMENTS

  1. बोराडे यांच्या जिद्दीला सलाम
    बोराडे यांच्या जिद्दीला सलाम !

Comments are closed.