Home वैभव इतिहास बहुढंगी मुंबई

बहुढंगी मुंबई

carasole

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. ब्रिटिशांनी सात बेटे परस्परांना अठराव्या शतकाच्या मध्यकाळात जोडली आणि मुंबई हे शहर तयार झाले. शहराची आर्थिक व शैक्षणिक प्रगती एकोणिसाव्या शतकात झाली. मुंबई शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. शहराच्या पश्चिम, दक्षिण, पूर्व भागांकडे अरबी समुद्राचा किनारा आहे तर उत्तरेस मुंबईची उपनगरे येतात. मुंबई शहरात पश्चिमेकडे मलबार हिल, खंबाला हिल, वरळीच्या‍ टेकड्या, पूर्वेकडे भंडार वाडा टेकडी, गोलनजी हिल, अँटॉप हिल आहेत.

स्वातंत्र्य चळवळीला पाया लाभला तो मुंबईत, विसाव्या शतकामध्ये. महाराष्ट्र राज्याची स्थापना संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर १९६० साली झाली. त्या नवीन राज्याची राजधानी बनली मुंबई. त्यानंतर मुंबईचा विस्तार झपाट्याने झाला व शहराचा प्रदेश सात बेटांच्या पलीकडे वाढला. त्यामधून मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे दोन स्वतंत्र जिल्हे म्हणून १९९० साली अस्तित्वात आले. शहराचे नाव ‘बॉम्बे’पासून ‘मुंबई’ असे अधिकृतपणे शिवसेनेची सत्ता असताना, १९९५ मध्ये करण्यात आले.

मुंबई या नावाच्या उपपत्तीतविषयी वेगवेगळी मते आहेत. मच्छिमारांनी (कोळी लोकांनी) मुंबादेवीचे मंदिर बांधले. त्या  देवीला मुंबा-आई-मुम्बा ई म्हटले जात असे. त्यांपासून शहराला मुंबई नाव मिळाले असावे असे प्रमुख मत मांडले जाते.

मुंबई बेटे पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना सोळाव्या शतकात आंदण देईपर्यंत त्या प्रदेशाला इतिहास नव्हता असे म्हटले तरी चालेल. कोकणासह मुंबई भागावर अभीर राजाची सत्ता होती. नंतर त्रिकटक राजवटीची सत्ता निर्माण झाली. मग तो प्रदेश मौर्य, चालुक्य, शिलाहार, यादव, मुस्लिम या राजवटींखाली राहिला. मुंबई, वसई येथे पोर्तुगीजांचे वर्चस्व 1534 नंतर स्थापन झाले. पोर्तुगीजांनी इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला मुंबई बेट भेट म्हणून दिले. चार्ल्स दुसरा याने ईस्ट इंडिया कंपनीस मुंबई बेटे भाड्याने दिली. त्यानंतर मराठ्यांनी त्यांचे नियंत्रण त्या क्षेत्रावर निर्माण करण्यास यश मिळवले. मराठ्यांच्या राजवटीचा अंत 1818 मध्ये झाला व त्याबरोबर मुंबई ब्रिटिशांची झाली!

मुंबई हे भारतातील सर्वांत श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाते. ते जगातील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे. भारताची सागरी मार्गाने होणारी पन्नास टक्के मालवाहतूक त्या बंदरातून होते. भारतातील पहिली कापड गिरणी 1851 साली मुंबईत सुरू झाली. मुंबई ते ठाणे ही भारतातील पहिली रेल्वे 1853 साली सुरू झाली. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 साली झाली. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था त्या शहरात आहेत. अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये मुंबईत आहेत. तेथे व्यवसाय व नोकरी यांसाठी अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागांतून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात, त्यामुळे मुंबईची लोकसंख्या  झपाट्याने वाढत आहे.

मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे तेथे दोन ऋतू प्रमुख प्रकारे अनुभवास येतात – पावसाळा (आर्द्र) व उन्हाळा (शुष्क). शहर समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे हवामान वर्षभर उष्ण व दमट असते. ते कधी पंधरा सेल्सियसच्या खाली जात नाही. पंधरा ते वीस सेल्सियस या पट्ट्यात जेमतेम (डिसेंबर ते फेब्रुवारी) महिनाभर असते. पावसाचे प्रमाण भरपूर आहे; पावसाळ्यात पाऊस जास्त पडल्यास मुंबईकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याामध्ये मुख्यतः लोकल ट्रेनचे प्रश्न असतात. तसेच ट्रॅफिक, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साठणे व त्यामुळे खोळंबा हे महत्त्वाचे. मुंबईमध्ये माती असलेली जमीन पाहण्याससुद्धा मिळत नाही. परिणामी, पावसाचे पाणी साठून राहते. त्याचा भीषण परिणाम २००५ साली आलेल्या महापुराच्या रूपात मुंबईकरांना अनुभवण्याला मिळाला. त्यावेळी दोनशेहून अधिक लोक पाण्यात बुडून मरण पावले. पंधरा लाखांहून अधिक लोक संध्याकाळी घरी पोचू शकले नाहीत. त्यांनी रात्र बसमध्ये, लोकल ट्रेनमध्ये, फूटपाथवर, कोणाच्या घरी आश्रयाला राहून अशा अवस्थेत काढली. दहशतवाद्यांचा २६/११ चा मुंबईवरील भीषण हल्ला ही दुसरी भीषण घटना. सहा दहशतवाद्यांनी मुंबई तीन दिवस ओलीस ठेवली होती. अखेर संरक्षक दलांनी त्यांचा पाडाव केला. तेव्हा त्यांना कसाब हा एकटा दहशतवादी जिवंत हाती लागला.

मुंबई उपनगरातील महत्त्वाची ठिकाणे – गेटवे ऑफ इंडिया, माऊंट मेरी चर्च, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, एस्सेल वर्ल्ड, छोटा काश्मिर, विहार व पवई तलाव, जुहू चौपाटी, कान्हेरी लेणी, जोगेश्वरी लेणी, घारापुरी लेणी, छत्रपती शिवाजीमहाराज संग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू विज्ञान केंद्र, महालक्ष्मी मंदिर, हाजीअलीचा दर्गा, वाळकेश्वर येथील हँगिंग गार्डन, बाबुलनाथाचे मंदिर, मुंबादेवीचे मंदिर, क्रॉफर्ड मार्केट, क्विन्स नेकलेस मरिनलाइन्स, तारापोरवाला मत्स्यालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस, फिरोझशहा मेहता गार्डन, हुतात्मा चौक, आझाद मैदान, मणिभवन-गांधी स्मारक, एशियाटिक लायब्ररी, राजाभाई टॉवर, मुंबई विद्यापीठ, विधान भवन इत्यादी. ती स्थळे पर्यटकांसाठी आकर्षण ठरली आहेत.

मुंबईत इंग्रजांच्या काळातील बांधकाम असलेल्या अनेक वास्तू पाहण्यास मिळतात. पर्यटन स्थळांसोबत अनेक इमारती त्या काळी उभारण्या‍त आलेल्या आहेत. इंग्रजांनी मुंबईमध्ये बसवलेले मैलाचे काही दगड (माईलस्टोयन) आजही पाहता येतात. मुंबईतील चायना टेम्पल, काळा किल्ला, बोरिवली येथील विरगळ, भाऊचा धक्का अशी जुनी व अपरिचित, मात्र पाहण्याजोगी ठिकाणे आहेत. त्यापैकी चोरबाजार हे नाव सर्वांना ओळखीचे असते, पण त्या‍ची माहिती नसते. तो बाजार मुंबईचे वैशिष्ट्य आहे.

मुंबई शहर उद्योगधंद्यांचे केंद्र आहे. तेथे विविध प्रकारच्या  वस्तूंचे उत्पादन केले जाते. दादर, नायगाव ते महालक्ष्मी व भायखळा येथे तर कारखान्यांची गर्दीच आहे. त्या भागात कापड गिरण्या, रेशीम गिरण्या मोठ्या प्रमाणात होत्या. कापड गिरण्या परळ, लालबाग, वरळी या भागांत असल्यामुळे त्यास गिरणगाव म्हणत. वैद्यकीय औषधे, टुथपेस्ट, रेडिओ, विजेचे पंखे, बल्ब ह्या वस्तूंचे कारखाने वरळी क्षेत्रात आहेत. शिवडी आणि वडाळा भागात पीठ गिरण्या, कापुस गिरण्या आहेत. कुलाबा, वरळी, वसई भागात मत्स्योद्योग व शीतकेंद्रे आहेत.

मुंबई शहर उत्तर-दक्षिण चिंचोळ्या पट्ट्यात पसरलेले असल्याने मुंबईमध्ये वाहतुकीची व्यवस्था वेगळ्या प्रकारची आहे. प्रवास करण्यासाठी व स्थानिक प्रवासासाठी लोकल आणि मुंबईबाहेरच्या गावांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर जाणारे ‘थ्रु’ लोहमार्ग आहेत. मध्य रेल्वे , पश्चिम रेल्वे, हार्बर लाईन हे तीन लोकल लोहमार्ग आणि मुंबईबाहेर जाणारे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन लोहमार्ग आहेत. तसेच, मुंबईतील लोक बस आणि रिक्षा यांचा वापर करतात. मुंबईमध्ये वर्सोवा ते घाटकोपर ही मेट्रो सेवा २०१४ मध्ये सुरू करण्यात आली आहे. चेंबूर ते वडाळा ही मोनो रेल त्याच सुमारास सुरू झाली. तिचा विस्तार पूर्ण झाला, की ती सात रस्ता (महालक्ष्मी) येथपर्यंत पोचेल.

मुंबई हे जलमार्गासाठीसुद्धा महत्त्वाचे केंद्र असून स्थानिक व आंतरराष्ट्रीय जलवाहतूक जलमार्गाद्वारे केली जाते. जलवाहतुकीचा पर्यटनाच्या दृष्टीने वापर केला जातो. मुंबईत मालाडच्या मार्वे बिचपासून मनोरीच्या किना-यापर्यंत पोचण्यासाठी बोटीची व्यवस्था आहे. मनोरीचा किनारा नावाप्रमाणे नयनरम्य आहे. तेथे नितळ समुद्रकिनारा, किना-याजवळ असलेली हॉटेल्स आणि टुमदार बंगले नजरेस पडतात. ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून अलिबागला जाण्यासाठी बोट उपलब्धं असतात. तेथून पाऊण तासात मांडव्यापर्यंत पोचता येते. तो समुद्रकिनारा अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ चित्रपटामुळे लोकांना परिचित आहे. दुस-या बोटीने तेवढ्याच वेळात एलिफन्टा केव्हज (घारापुरी लेणी) येथे जाता येते. तेथे जाताना बचलर बेट पाहता येते. सागरी मार्गाने येणारे सर्व ऑईल कंटेनर तेथे रिकामे होतात. ते तेल मुंबईत आणले जाते. भाऊच्याा धक्यावरून निघणारी फेरीबोट अलिबागपासून दहा किलोमीटर अंतरावरील रेवस येथे किंवा मोरा या उरणजवळच्या समुद्रकिना-याला जाते. रेवसला जाताना अलिबागच्या किल्ल्यासोबत खांदेरी, उंदेरी ही बेटे आणि कोर्लाई किल्ला पाहता येतो.

सांताक्रूझ व सहारा येथे दोन विमानतळ आहेत, पैकी सांताक्रूझ येथील देशांतर्गत इतर भागात जाणाऱ्या विमानांसाठी व सहारा येथील परदेशी जाणाऱ्या विमानांसाठी आहे. दोन्ही विमानतळ छत्रपती शिवाजीराजे यांच्या नावाने आहेत.

मुंबईमध्ये मच्छिमारीचा व्यवसाय प्रमाणात चालतो. समुद्रातून मासे पकडून विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये पाठवले जातात.

मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा – महाराष्ट्र राज्याची राजभाषा – मराठी असून हिंदी, इंग्रजी, गुजराथी व कोकणी या भाषादेखील तेथे बोलल्या जातात. हे कॉस्मॉापॉलिटीन शहर असल्याने येथे सर्व भाषिकांचे आणि धर्मियांचे सण साजरे केले जातात. त्यामुळे गणपती उत्सवासोबत दिवाळी, नवरात्र, ईद मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

वडापाव या खाद्यपदार्थाचे तेथे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेळपुरी, दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज हे पदार्थदेखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत.

मुंबईला युनेस्कोकडून तीन हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.

मुंबई हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. त्यास बॉलिवूड म्हणतात. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ तेथे १९१३ साली रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच, नाट्यरसिकांसाठी पाच-सात नाट्यगृहे, चित्रशिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी पंधरा-वीस कलादालने मुंबईत आहेत. जहांगीर कलादालन, एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छ्त्रपती शिवाजी संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.

क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. मुंबईमध्ये गल्लीत, मोकळ्या मैदानात; सर्वत्र, मुले क्रिकेट खेळताना दिसतात. मुंबईच्या अनेक क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. मुंबईने अनेक क्रिकेटपटू भारतास दिले आहेत. सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर हे भारताचे सर्वश्रेष्ठ मानले जाणारे  क्रिकेटपटू मुंबईचेच. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय तेथे आहे. ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्ज्याची मैदाने मुंबईत आहेत. पैकी ब्रेबॉर्न वापरात नाही. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्ज्याची कामगिरी केली आहे. सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे.

मुंबईतील दुसरा लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल हा आहे. विशेषत: पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. हॉकी, टेनिस, स्क्वॅश, बिलियर्डस, बॅडमिंटन, टेबल टेनिस हे खेळसुद्धा कमीअधिक प्रमाणात खेळले जातात. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहेत. महालक्ष्मीचा रेसकोर्स येथे जगप्रसिद्ध डर्बी, रग्बी या घोड्यांच्या शर्यती खेळल्या जातात. तेथे पावसाळा (मे ते ऑक्टोबर) वगळून घोड्यांच्या शर्यती होतात. तेव्हा त्या पुण्याला जातात.

– रोहिणी क्षीरसागर

Last Updated On – 14th July 2017

About Post Author

2 COMMENTS

  1. फारच छान लेख. मस्त माहिती!
    फारच छान लेख. मस्त माहिती!

  2. खुप छान माहिती आहे. सर्व अगदी
    खुप छान माहिती आहे. सर्व अगदी सुटसुटीत मांडले आहे. वाचकांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद

Comments are closed.

Exit mobile version