महात्मा बसवेश्वर हे वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी महान विभूती होते. कर्नाटक ही त्याची कर्मभूमी. त्यांनी धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण इ. क्षेत्रांत केलेले कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. बसवेश्वर हे मध्ययुगातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष होते. समाजसुधारकांच्या यादीतही यांचे पहिले स्थान आहे. म्हणूनच त्यांना आद्य भारतीय समाजसुधारक, क्रांतीयोगी व युगपुरुष मानले जाते.
शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील मणिराज ऊर्फ भादरस हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते. त्यांच्या पत्नी मादुलांबा (मादंबा) परम शिवभक्त होत्या. बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते. बसवेश्वर कर्मठ विधींना विरोध करत. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून मुंज करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.
बसवेश्वरांनी बिज्जल राजाकडे कारकूनाच्या नोकरीपासून सुरूवात केली. पुढे त्यांची राजाचा कोषाधिकारी म्हणून निवड झाली. त्यावेळी मंगळवेढा परगणा बिज्जल राजांच्या अधिपत्याखाली होता. त्या राजवटीत मंगळवेढा ही राजधानी होती. बसवेश्वर हे वेदशास्त्रात, धनुर्विद्येत व इतर कलांत पारंगत असल्याने आणि ते हुशार व चाणाक्ष असल्याने राज्याचे प्रधान झाले. त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली. रेवणसिद्धेश्वराच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून बारा ज्योतिर्लिंगांच्या बारा पिंडी एकाच शिवपिंडीवर स्थापन केल्या. पुढे, बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली व ते धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण इत्यादी कर्नाटकातील प्रदेशांत आले. तेथे त्यांचा लिंगायात धर्म बऱ्यापैकी रुजला. लिंगायत लोक बसवेश्र्वरांना शिववाहन नंदीचा (काही वेळा स्वतः शिवाचाही) अवतार मानतात. बसव (सं. वृषभ = बैल) या नावावरून ते सूचित होते.
बसवेश्र्वरांचा उदय होण्यापूर्वी कर्नाटकात हिंदू, जैन, बैद्ध इ. धर्म व कापालिक, कालामुख, शाक्त इ. पंथ प्रचलित होते. परंतु ही संयुक्त धर्मपरंपरा भ्रष्ट व अवनत अवस्थेतच होती. त्या पार्श्र्वभूमीवर बसवेश्र्वरांनी शिव हा एकमेव ईश्र्वर असल्याची घोषणा करून शिवोपासनेचा पुरस्कार केला. त्यांच्या उत्कट शिवभक्तीमुळे त्यांना भक्तिभांडारी असे नाव प्राप्त झाले. ते कूडलसंगम येथील संगमेश्र्वराचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ‘ॐ नमः शिवाय’ हा षडक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. त्यांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती, शील इत्यादींचा प्रचार केला. एकाच देवाची भक्ती करा, भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती.
बसवेश्र्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली ‘शिवानुभवमंटप’ म्हणजेच ‘अनुभवमंटप’ ही संस्था जागतिक धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण तेथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. बसवेश्र्वरांनी धर्मप्रसारासाठी संन्यास घेतला नाही, भाष्ये लिहिली नाहीत वा प्रवासही केला नाही; परंतु मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. तेथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. बसवेश्र्वरांनी तेथे होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जातिजमातींच्या लोकांमध्ये बंधुभाव आणि विचार-स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली.
बसवेश्र्वरांना पारंपारिक भारतीय समाजातील वर्णजातिमूलक उच्चनीचता व विषमता यांची प्रखर जाणीव झाली होती. म्हणूनच त्यांनी चातुर्वर्ण्याला आव्हान देऊन सर्व मानवांना समान मानले. परिणामतः त्यांच्याभोवती सर्व वर्णातील व जातींतील अनुयायी जमा झाले. त्यांनी आंतरजातीय रोटीव्यवहार व बोटीव्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले. उदाहरणार्थ, त्यांच्या अनुयायांमध्ये मधुवय्या नावाचा ब्राह्मण व हरळय्या नावाचा चांभार यांचा अंतर्भाव होता. त्यांनी मधुवय्याच्या मुलीचे हरळय्याच्या मुलाशी लग्न लावून दिले. त्यांनी शिवनागमय्या व ढोर कक्कय्य या अस्पृश्यांच्या घरी जाऊन भोजन केले होते. त्यांनी बालविवाहाला विरोध केला तसेच विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. सर्व मानव समान आहेत, याचा अर्थ स्त्री व पुरूष हेही समान आहेत, असे त्यांचे मत होते. बसवेश्वरांनी स्त्रियांना लिंग दीक्षेचा पुरुषाप्रमाणेच अधिकार दिला. त्यामुळे स्त्रियांना धार्मीक स्वातंत्र्य बहाल झाले. त्यांच्या अनुभवमंटपातील चर्चेत पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियाही भाग घेत. बाराव्या शतकात बसवेश्र्वरांनी सुरू केलेले हे कार्य निश्र्चित क्रांतिकारक होते.
त्यांनी त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले. तेथे योग्य व्यक्तींची नियुक्ती केली. काश्मीरपासून केरळपर्यंतच्या, राजापासून रंकापर्यंतच्या आणि ब्राह्मणापासून अस्पृश्यापर्यतच्या अनुयायांचे मोहोळच त्यांच्याभोवती जमले होते. यावरून त्यांच्या समर्थ संघटनशक्तीची कल्पना येऊ शकते. शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे, अशी घोषणा करणारा ‘कायकवे कैलास’ हा बसवेश्र्वरांनी मांडलेला महान सिद्धांत आहे. कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हे हीन दर्जाचे नाहीत, असे सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढवली.
महात्मा बसवेश्वरांचा लिंगायत धर्म प्रामुख्याने दलित संवेदनेवर आणि मानव जातीच्या तत्वावर आधारलेला आहे. आजही या धर्मात विविध जातींचा समावेश आहे. समता हे तत्व त्यांच्या धर्म प्रसाराचे प्रमुख सूत्र आहे. बसवेश्वरांनी हा बंधुभाव धर्मात कायम ठेवला. ‘आपण जे कमवतो त्यात ईश्वरांचा वाटा आहे. म्हणून त्यातील दीन दु:खीच्या जीवन कल्याणासाठी दानधर्म केला पाहिजे.’ यावर त्यांनी भर दिला होता. त्यांनी जन्माने ब्राम्हणत्व नाकारुन त्यांनी लिंगायत धर्माला नवसंजिवनी प्रदान केली. त्यांना त्यांचे जीवितकार्य पूर्ण झाले असल्याची भावना निर्माण झाल्यावर, ज्या कुंडलसंगमामुळे आपण ईश्वरी इच्छाशक्तीचे साधन बनलो त्या कुंडलसंगमाकडे गेले पाहिजे, असे त्यांना वाटले. इ.स. 1167 मध्ये वयाच्या 66 व्या वर्षी ते संगमेश्वराशी एकरुप झाले. कर्नाटक सरकारने कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावर बसवेश्वरांचे समाधीस्थळ उभारले आहे.
– राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे
जय बसवसेना
जय बसवसेना
मला बसवेश्वर महाराज यांच्या…
मला बसवेश्वर महाराज यांच्या बदल आणखी माहीती पाहिजे
The great thing
The great thing
जय बसव ,हर हर महादेव आजच्या…
जय बसव ,हर हर महादेव आजच्या ज्या लिंगायत स्वतंत्र धर्म बाबतीत काय माहिती मिळते
अजून माहिती हवी आहे
अजून माहिती हवी आहे
महाराज यांच्या मला बसवेश्वर…
मला बसवेश्वर महाराज यांच्या बदल आणखी माहीती पाहिजे.
आणखी माहिती हवी आहे
आणखी माहिती हवी आहे.
मला बस्वेश्र्वराचे जीवन…
मला बस्वेश्र्वराचे जीवन कार्य आणी त्याच्या जीवनाचे विविध पैलु वर माहिती पाहिजे लेख लाहायचा आहे
महात्मा बसवेश्वर विषयी मौलिक…
महात्मा बसवेश्वर विषयी मौलिक विचार तुम्ही मांडले.खूप छान
✍️
*लिंगायत धर्म संस्थापक…
✍️
*लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवण्णा*
….महात्मा बसवण्णांचा जन्म 25 एप्रिल 1105 – मादिराज व मादलांबिका या उभयतांच्या उदरी झाला. मादिराज व मादलांबिका यांना पूर्वजांच्या सिंधू-कृषी संस्कतीची विरासत माहिती होती म्हणून तर त्यांनी आपल्या मुलांची नावे देवराज, नागाई, बसवण्णा अशी कृषि-नाग संस्कृतीशी निगडीत ठेवली होती.
महात्मा बसवण्णांचा जन्म कम्मेकुळात झाला. कुलव्यवस्था ही सिंधुघाटी-नागसंस्कृतीची होती. म्हणजेच गणव्यवस्था होती. वैदिक आर्य ब्राह्मणांची वर्णव्यवस्था ( ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र ) होती. ब्राम्हणांच्या वर्ण व्यवस्थेत गोत्र आहेत तर मूलनिवासीयांच्या गणव्यवस्थेत कूळ आहेत. कूळ संस्कृती ही कृषी संस्कृती समतेचा प्रचार करते तर ब्राम्हणी संस्कृती विषमतेचा प्रचार करते. तसेच, बुद्धिप्रामाण्यवाद आणि शब्द प्रामाण्यवाद हे दोन विचार प्रवाह आहेत. बुद्धिप्रामाण्यवाद हा मूलनिवासी संघर्षाचा विचार प्रवाह आहे, तर शब्द प्रामाण्यवाद हा विदेशी युरेशियन ब्राम्हणांचा विचारप्रवाह आहे.
महात्मा बसवण्णा आपल्या एका वचनात म्हणतात,
” वेदावर खड्ग चालविन ।
शास्त्रांना बेड्या घालीन ।।
तर्काच्या पाठीवर चाबकाचे फटकारे ओढेन ।
आगमांचे नाक कानून ।। ”
वेद, शास्त्र, पुराण बुद्धिप्रामाण्यवादाच्या विरोधात आहेत.
अल्लमप्रभू वेदाला पढत गप्पा म्हणतात आणी शास्त्रांना बाजाराची उठाठेव म्हणतात तर पुराणांना पुंडाच्या गोष्टी म्हणतात.
महात्मा बसवण्णांचे लिंगायत आंदोलन वचन साहित्य वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था समूळ नष्ट करुन समता प्रस्थापित करण्यासाठी होते. त्यांच्या आंदोलनाचे सामाजिक-सांस्कृतिक
नाते बुद्धाच्या समग्र क्रांती लढ्याशी आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षिलेल्या समग्र व्यवस्था परिवर्तनाशी जुळते.
वर्ण-जातीच्या अभिमानाचा लवलेशही त्यांच्या वचन साहित्यात कुठेच दिसत नाही.
जातीव्यवस्थाच मूलनिवासी बहुजन समाजाच्या सर्व दुःखाचे व विनाशाचे कारण आहे हे जाणून महात्मा बसवण्णांनी जातीव्यवस्थेच्या पूर्ण उच्चाटना साठी लिंगायत आंदोलन उभारले !
जातीच्या विरोधात लिंगायत आंदोलन उभारणार्या महात्मा बसवण्णांची बाराव्या शतकातील लोकसंसद म्हणजे, “अनुभव मंटप ” ! 700 पुरुष आणि 70 स्त्रिया सदस्य असलेल्या अनुभव मंटपचे अल्लमप्रभू अध्यक्ष होते. दबल्या – दडपल्या, मनाचा मुक्त अविष्कार करण्याची संधी मूलनिवासी बहुजन समाजातील स्त्री-पुरुषांना दिली. जात,लिंग,पंथ, वर्ण असा कोणत्याही गोष्टीचा भेदभाव न करता सर्वांना अनुभव मंटपात आपला अनुभव मांडण्याचा अधिकार होता. अनुभव मंटपातून तयार झालेले शरण-शरणी म्हणजे व्यवस्था परिवर्तनासाठी आपले जीवन झोकून देणारे कार्यकर्ते होते. अशा कार्यकर्त्या मध्ये समाज ऋण चुकविण्याची भावना निर्माण केली जात असे. त्याला “दासोह” असे म्हणतात.
स्वतःसाठी जगत जगत थोडे समाजासाठी जगणे म्हणजे दासोह !
महात्मा बसवण्णा जयंती दिनी !
कोटी कोटी प्रणाम !
विनम्र अभिवादन !
शरणू शरणार्थी !!
????
मला आणखी माहीती पाठवा…
मला आणखी माहीती पाठवा महाराजाबद्धल….
महात्मा बसवेश्वर ह्यांचे कला…
महात्मा बसवेश्वर ह्यांचे कला – साहित्य ह्यातील योगदान सविस्तर सांगावे
महात्मा बसवेश्वर ह्यांचे कला…
महात्मा बसवेश्वर ह्यांचे कला – साहित्य ह्यातील योगदान सविस्तर सांगावे
Comments are closed.