श्रीकृष्णांचे गुरू सांदिपनी यांचा आश्रम पालघर जिल्ह्यातील चांदिप गावात होता असे म्हटले जाते. सांदिपनी ऋषींचे गुरुकुल मध्यप्रदेशात आहे. महाराष्ट्रातील चांदिप हे ठिकाण मात्र ‘नाही चिरा नाही पणती’ अशा दुर्लक्षित अवस्थेत आहे…
सांदिपनी ऋषींचे समाधिस्थळ ही पाटी वाचून मी तीन ताड उडाले ! श्रीकृष्णांचे गुरू सांदिपनी यांचा आश्रम त्या गावात होता म्हणे ! पुराण व इतिहास यांची गल्लत लोकमानसात किती असावी ! श्रीकृष्ण हे सुदामा व बलराम यांसह त्या अरण्यात लाकडे तोडण्यासाठी येत. सांदिपनी ऋषींच्या नावावरून त्या गावाचे नाव सांदिप किंवा त्याचा कालांतराने अपभ्रंश होऊन चांदिप असे झाले. सांदिपनी ऋषींचे गुरुकुल मध्यप्रदेशात आहे. ते नर्मदा परिक्रमेत पाहण्यास मिळते. महाराष्ट्रातील चांदिप हे ठिकाण मात्र ‘नाही चिरा नाही पणती’ अशा दुर्लक्षित अवस्थेत आहे. तो परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वनखाते यांच्या अखत्यारीत मोडतो. त्यामुळे तेथील वृक्षसंपदा बऱ्यापैकी टिकून आहे. परिसरात आंब्याची झाडे विपुल प्रमाणात आहेत. त्यामुळे तेथे पक्षी आणि फुलपाखरे यांची रेलचेल दिसते. ते ठिकाण पावसाळ्यात धबधबा वाहत असल्यामुळे सहलीसाठी रमणीय मानले जाते. तेथे स्वयंपाकाला भांडी देतात. पाहुण्यांनी शिधा नेल्यास त्यांना चुलीवर जेवण बनवता येते.
काळेकभिन्न पाषाण, मोठमोठ्या शिळा आणि घनगर्द हिरवे वृक्ष यांचे नैसर्गिक सौंदर्य तेथे दिसते. तेथील नदीसम भासणारे पात्र उन्हाळ्यात मात्र अगदी कोरडे ठणठणीत असते. तरी पाण्याच्या आवेगापुढे शरणागती पत्करून गोल झालेले गोटे, मध्येच उगवलेली झुडपे आणि काठावरील उंचच उंच वृक्ष व ऊनसावलीची नक्षी यांमुळे नदीपात्र कोरडेठाक तरी रूपवान दिसते. मी तेथे गेले तेव्हा झाडांच्या हिरव्या पानांवर उन्हाची तिरीप आल्याने पानांना सोनेरी पोपटी छटा आली होती. पाडगावकर यांच्या ‘पाचूच्या हिरव्या माहेरी उन हळदीचे आले’ या ओळी समूर्त झाल्या होत्या ! एका शिळेची नैसर्गिक रीत्या सुरेख खुर्ची झाली होती. पानांच्या जाळीआडून ताम्रपंखी भारद्वाज पक्षी डोकावला. तांबट पक्ष्यांची कुरर्रकुकची जुगलबंदी अथक चालू होती. काळसर पाठीच्या खारींचेही संभाषण रंगात आले होते. पानांच्या आडून अचानक सूर्यपक्ष्याएवढा एक पक्षी प्रकटला. काळी पाठ अन रक्तवर्णी छाती. तो कोण होता हे ओळखू आले नाही तरी, त्याचे अवचित दर्शन विस्मयकारक आनंद देऊन गेले. झाडांच्या थंड सावलीत बसून आवाजावरून पक्ष्यांचा असा मागोवा घेणे हा अनुभव सुखद होता. ‘कॉमन ब्लू’ जातीची फिकट निळसर रंगाची बरीचशी फुलपाखरे तेथे भिरभिरत होती. मंदिराजवळच एका झाडावर मोठे ‘मॉथ’ बसलेले असावेत असे वाटले. पानांमधील हरीत द्रव्य नष्ट करणारा काही तरी रोग असावा. परंतु पानांच्या शिरांजवळ तपकिरी रंग आणि इतर ठिकाणी पांढरा रंग यांनी झाडांवर दुरंगी भरतकाम केल्यासारखी गुलाबांच्या आकारांची नक्षी उमटली होती.
तीन मंदिरे वेगवेगळ्या उंचीवर तेथे आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या मंदिरांच्या मध्ये बारमाही जिवंत पाण्याचा झरा असलेले कुंड आहे. त्या परिसरात प्लेन टायगर जातीची इतकी फुलपाखरे भिरभिरत होती, की फुलपाखरांच्या गावात आल्यासारखे वाटले ! सर्वात तळच्या बाजूस असलेले मंदिर आत्मलिंगेश्वर महादेवाचे होते. मंदिराची बांधणी किंवा त्यातील पिंड नेहमीसारखी होती. परंतु बाहेरच्या भागात भिंतीवर फ्रेम लावली होती, त्यात चक्क सहा फूटी सर्पाची कात होती ! इतक्या जवळून ती बारकाव्यांनिशी बघताना काही वेगळेच वाटत होते. ती कात कोणाला सापडली असावी? मंदिरातील पितळी घंटाही खूप वेळ नाद घुमणारी आहे. मंदिराबाहेर एका वेगळ्या छपराखाली एक धुनी आहे.
मुंबई–अहमदाबाद हायवेवरून जाताना शिरसाड फाट्याला वज्रेश्वरी रस्त्याला हे ठिकाण आहे. रस्त्यावर उजवीकडे ‘शिवणसई’ गावाची पाटी आहे. ‘आत्मलिंगेश्वर महादेव मंदिरा’च्या दिशादर्शक पाट्या ठिकठिकाणी दिसतात. परंतु तेथे निसर्गदेवही प्रकटल्याचे जाणवते. वसई व विरार स्थानकावरून शिवणसईपर्यंत एस.टी.ने पोचता येते, पुढे ट्रेक होऊ शकतो. वाहन थेट मंदिरापर्यंत नेता येते. रस्ता एकेरी आणि कच्चा आहे.
– स्नेहा सांगेकर 9326468385 snehavihang@gmail.com
——————————
लेखन छान आहे . वाचून तिथे जाण्याची उत्सुकता निर्माण होते
सांदिपनी ऋषी यांच्याबद्दल मला अधिक माहिती नाही, परंतु त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला या लेखाने प्रेरणा मिळाली