प्रतिभावंत लेखक, शाहीर आणि समाजसुधारक अवलिया म्हणजे अण्णाभाऊ साठे होत. अण्णाभाऊ यांचे स्वलिखित ‘फकिरा’ कादंबरीवर चित्रपटनिर्मिती करावी हे स्वप्न होते. अण्णाभाऊ यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील चार-पाच शेतकरी एकत्र आले आणि स्वत:च्या जमिनी तारण ठेवून त्यांनी ‘फकिरा’ या चित्रपटाची निर्मिती केली. पण त्याचा शेवट मात्र शोकाकुल झाला…
ही 1960 च्या दशकातील गोष्ट. शेवगाव तालुक्यातील सामनगाव या लहानशा खेड्यातील प्रगत विचारांचे चार-पाच शेतकरी एकत्र आले – शेतकरी व जिल्ह्याच्या कम्युनिस्ट चळवळीचा आर्थिक भार एकहाती पेलणारे कॉम्रेड श्रीपतराव गेनुजी सातपुते (मामा), एरंडगावचे एकनाथराव भागवत, पैठण येथील कॉ.देवढे, नगरचे अप्पासाहेब शिंदे. त्यातील श्रीपतमामा सातपुते आणि अप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या त्यांच्या साऱ्या शेतजमिनी तारण म्हणून ठेवल्या आणि मातंग समाजातील गरीब, पण प्रतिभावंत लेखक, शाहीर आणि समाजसुधारक असलेल्या अवलियाचे स्वप्न साकारण्यासाठी चित्रपट निर्मिती केली! तो अवलिया म्हणजे अण्णाभाऊ साठे हे होत! ती घटनाच एखाद्या चित्रपटाचे कथानक म्हणून शोभेल अशी! कथानकात लेखकाची प्रतिभा, समाजातील भीषण सामाजिक विषमतेचे वास्तव दर्शन, त्या विषमतेविरुद्ध लढणाऱ्या एकाकी नायकाचा संघर्ष, साथीदाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारी मैत्री असे विविध घटक आहेत, पण त्या कथानकाचा वास्तवातील शेवट मात्र शोककारक ठरला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीवर आधारित ‘फकिरा’ या चित्रपटाच्या निर्मितीची ही कहाणी! कादंबरी भारतासह जगातील सोळा भाषांत भाषांतरीत झाली. कादंबरीतील ती कहाणी विलक्षण करुण आणि हादरून टाकणारी, उद्ध्वस्त करणारी आहे.
‘फकिरा’ कादंबरीवर चित्रपट निघावा हे अण्णाभाऊंचे स्वप्न होते. अण्णाभाऊ सामनगाव येथे सातपुतेमामांच्या वाड्यावर त्यांची बहीण शांताबाई साठे व कला पथक यांच्यासह मुक्कामी येत असत. एका भेटीत अण्णाभाऊ व त्यांचे सहकारी डी.एन. गवाणकर यांनी, ‘फकिरा’ या कादंबरीवर चित्रपट निघाल्यास त्यांच्या कम्युनिस्ट या पक्षाचे विचार राज्यभर पोचतील असे सांगितले, पण आर्थिक अडचण! श्रीपतमामांना ती कल्पना खूप आवडली. त्यांनी कॉ. एकनाथ भागवत यांच्याशी चर्चा करून त्यांची सारी शेतजमीन गहाण ठेवली आणि अण्णांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा विडा उचलला. श्रीपतराव सातपुते, सुशीला जनार्दन देवढे (पैठण), वत्सलाबाई एकनाथ भागवत (अहमदनगर), सुमन आप्पासाहेब शिंदे (अहमदनगर), अप्पासाहेब शिंदे (अहमदनगर), शालिनी रघुनाथ खानोलकर (पुणे), दतात्रय नारायण गवाणकर (मुंबई) व स्वत: अण्णाभाऊ साठे (चिराग नगर, घाटकोपर, मुंबई) अशा आठ संचालकांनी मिळून ‘चित्रनिकेतन’ नावाच्या निर्मिती संस्थेची नोंदणी 1962 मध्ये केली. त्या संस्थेचे बहुतेक संचालक शेतकरी असल्याने निर्माते म्हणून अधिकृत नाव गवाणकर यांचे व कर्जफेडीची सर्व जबाबदारी श्रीपतमामा सातपुते व अप्पासाहेब शिंदे यांची असा करार झाला.
केंद्र शासनाची फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन ही संस्था चित्रपटनिर्मितीसाठी अडीच लाख रुपयेपर्यंत कर्ज देत असे. श्रीपतमामा सातपुते व अप्पासाहेब शिंदे हे ते कर्ज मिळवण्यासाठी जामीनदार राहिले. श्रीपतमामांनी त्यांची सारी स्थावर मालमत्ता तारण ठेवून कर्जफेडीची सारी जबाबदारी उचलली. फकिरा या चित्रपटाला शासनाने दीड लाख रुपये कर्ज मंजूर केले (20 सप्टेंबर 1962). प्रत्येक संचालकाने किरकोळ खर्चासाठी तरतूद म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये जमा केले. त्या चित्रपटाचे चित्रीकरण नगरजवळच्या अकोलनेर परिसरात 1964 मध्ये पूर्ण झाले. अण्णाभाऊ यांनी स्वत:च चित्रपटात ‘फकिरा’ची भूमिका केली. चंद्रकांत मांढरे, डेव्हिड, जयराज, सुलोचना, वंदना अशी त्या काळातील तगडी स्टारकास्ट, ग.दि. माडगूळकर यांची सुरेख गीते, आशा भोसले यांचा स्वरसाज असा सर्व थाट ‘एक नंबर’चा होता.
पण संचालक मंडळ व स्वत: अण्णाभाऊ यांना चित्रपट वितरणातील काहीच माहिती नव्हती. तो चित्रपट तोट्यात गेला. मुदतीत कर्जफेड न झाल्याने श्रीपतमामा व अप्पासाहेब शिंदे यांना तारण स्थावर मालमत्ता जप्तीच्या नोटिसा आल्या. त्यांनी सत्तावन्न हजार रुपये फिल्म फायनान्स कंपनीला परत केले. दरम्यान, अण्णाभाऊ साठे व गवाणकर यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या अडचणींत भर पडली. जप्तीच्या नोटिशीच्या धक्क्याने मामांच्या पत्नी हौसाबाई यांचा हृदयविकाराने अकाली मृत्यू झाला. तेव्हा यशवंतराव चव्हाण केंद्रीय अर्थमंत्री होते. निर्मात्यांनी ‘आम्ही एका महान लेखकाच्या स्वप्नपूर्तीसाठी हे धाडस केले आहे. आम्ही शेतकरी असून सर्वस्व पणाला लावले आहे. आम्हाला या कर्जातून सूट मिळावी’ अशा अर्जविनंती चव्हाण यांच्यापासून अनेकांना केल्या, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पुढे, आणीबाणीमध्ये ‘फकिरा’वर बंदी घातली गेली आणि एका महान लोकशाहिराचे स्वप्न कायमचे पडद्याआड गेले ! त्याच्या मित्रांची धूळधाण झाली. त्यांच्या त्या असीम त्यागाची जाणीव सद्यस्थितीत समाजातील कोणालाही नाही ही मोठ्या खेदाची गोष्ट आहे.
अहमदनगर येथील कॉ. एकनाथराव भागवत यांच्या कन्या निर्मलाताई काटे, सामनगाव येथील दिलीप सातपुते, नगरजवळील सोनेवाडीचे निवृत्त शिक्षक हरिभाऊ गोबरे हे ‘फकिरा’च्या चित्रीकरणाचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. ते अण्णाभाऊंच्या आठवणी सांगतात. मामांचे नातू संदीप सातपुते हे मामांच्या सामाजिक समतेच्या विचारसरणीला अनुसरून राजकीय व सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहेत. ते नगर जिल्ह्याला भूषण ठरणाऱ्या ‘फकिरा’ या चित्रपटाच्या प्रिंट कोठे उपलब्ध होतील याचा शोध घेत आहेत. तो मोठा ऐतिहासिक ठेवा आहे.
कुसुमताई सुधाकर सातपुते या सामनगावच्या माजी सरपंच. त्या म्हणाल्या, “अण्णाभाऊ साठे आमच्या वाड्यात अनेकदा मुक्कामी असत. क्रांतिसिंह नाना पाटील, गोदुताई परुळेकर, शाहीर अमर शेख हे दिग्गज नेते भूमिगत असताना, माझे सासरे श्रीपतमामा वाड्यातून सरकारविरोधी चळवळ चालवत. तेव्हा मामा हे स्वत: जिल्ह्याची कम्युनिस्ट चळवळ एकहाती चालवत. मामा अखेरच्या श्वासापर्यंत तत्त्वांशी एकनिष्ठ व प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यांनी त्यांच्या जावयालादेखील अन्य पक्षाची उमेदवारी केली म्हणून मत दिले नाही. इतके ते कडवट कम्युनिस्ट होते.”
– उमेश घेवरीकर 9822969723 umesh.ghevarikar@gmail.com
फोटो साभार- कॉ. श्रीपतराव गेनुजी सातपुते (मामा)
—————————————————————————————————————————-