फंदी, अनंत कवनाचा सागर! (Fandi, Sea of ​​Infinite Kavana)

2
115
_fandi

अनंत फंदी हे संगमनेरचे. त्यांच्या पूर्वजांचा धंदा सराफीचा, गोंधळीपणाचा; भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला, तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली! शाहीर होनाजीने ‘फंदी, अनंत कवनाचा सागर’ असे अनंत फंदी यांच्या रचनाबहुलतेचे वर्णन केले आहे. तथापि त्या कवनाच्या सागरातील काहीच रचना उपलब्ध आहेत. फंदी यांचे सात पोवाडे, पंचवीस-तीस लावण्या आणि ‘माधवनिधन’ हे काव्य आहे. त्यांनी कटाव व फटके लिहिले आहेत. अनंत फंदी यांची चंद्रावळ ही लावणी प्रसिद्ध आहे. त्या लावणीत ‘कथा कृष्णाची परंतु रूप मात्र सर्वसामान्य माणसाचे आहे’. त्यांच्या विनोदात ग्राम्यता आणि अश्लीलता जाणवते, त्यांच्या लावण्यांतून प्रतिभेची चमक दिसत नाही, परंतु त्यांची सामाजिक जाणीव मात्र जागृत होती. अनंत फंदी रक्ताक्षी संवत्सरावर इसवी सन 1744 मध्ये जन्मले. त्यांना नाथपंथीय भवानीबुवा यांची कृपादृष्टी लाभली. त्यानंतर, फंदी यांची काव्यसृष्टी बहरली.  

अनंत फंदी यांचे बालपण स्वच्छंदीपणात गेले. त्यांचे व्यष्टी आणि समष्टी यांचे निरीक्षण मनसोक्त हुंदडणे, हाणामाऱ्या, नकला करणे यांतून आपोआप घडत गेले. ते निरीक्षण काव्यनिर्मितीत उपयोगी आले. सत्ता, वित्त, शक्ती यांतून येणारा अहंकार, त्या अहंकारापायी सर्वसामान्य माणसांची नित्य होणारी होरपळ यांमुळे फंदी यांचे मन कळवळले. ते त्या विरुद्ध पेटून उठले आणि ते शब्दांतून ‘लंडे गुंडे हिरसे तटू यांची संगत धरू नको’ असे अवतरले. फंदी यांची लेखणी तत्कालीन राज्यकर्त्यांची कानउघाडणी करताना धारदार बनते आणि ‘दो दिवसांची जाईल सत्ता, अपेश माथा घेऊ नको’… अशी व्यक्त होते.

फंदी यांचा मित्रपरिवार सर्व थरांतील होता. रतन, राघू हे साथीदार गुरव तर मलिक हा मुस्लिम होता. होनाजी गवळी होता तर भवानीबुवा हे ब्राह्मण; त्याशिवाय फंदी यांची उठबस धनगर, मराठा, गोसावी अशा सर्व लोकांत होती. त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झाला आणि त्यातूनच त्यांची कवनाची भाषा आकारली. त्यामुळे फंदी यांची भाषा धनगरी आहे हा आक्षेप तयार झाला व निकालातही निघाला. स्पष्टोक्ती हाच त्यांचा स्थायिभाव आहे. उदाहरणार्थ, विंचूरकर यांच्याकडे घडलेला प्रसंग. ते महेश्वराहून संगमनेरी परतत असताना, विंचूरमध्ये थांबले. फंदी यांनी सरदार शिवाजीराव विंचूरकर यांना निरोप जासुदाबरोबर ‘संगमनेरचे कवी’ आले आहेत असा पाठवला. उलट, विंचुरकरांनी त्यांना जासुदाबरोबर ‘विंचुरी रुपया’ पाठवून दिला. त्याचा राग येऊन फंदी यांनी तेथेच एक कवन रचले – ‘विंचूरकरांची रास पाहिली, नाही अमुच्या कामाची’. त्यांना अहिल्याबार्इंच्या दरबारात अतिशय सन्मानाची वागणूक मिळाली होती. परंतु त्यांना त्यांच्या मुलखात त्यांच्याच माणसांकडून अशी वागणूक मिळाल्यामुळे त्यांना ते सहन झाले नाही. ते निघणार, तोच सरदारांना त्यांची चूक उमगली आणि त्यांनी फंदी यांचा सत्कार करून, संगमनेरपर्यंत पोचवण्यासाठी सोबत त्यांची माणसेही दिली. ते कवन म्हणजे तत्कालीन राज्यकर्ते धनिक कलावंतांकडे कसे पाहत याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे.

हे ही लेख वाचा –
अनंत फंदी (Anant Fandi)
अनंत फंदी यांच्‍या नावाविषयी थोडेसे

होनाजीने फंदी यांचे वर्णन करताना ‘सरस्वती ज्याच्या जिव्हाग्री’ असेही म्हटले आहे. फंदी यांना त्यांच्या काव्यगुणामुळे महाराष्ट्र; तसेच, मध्यप्रदेश व गुजरात राज्यांतही लोकप्रियता मिळाली. फंदी यांनी त्यांचा ठसा पूर्वायुष्यात शाहीर म्हणून तर उत्तरायुष्यात कीर्तनकार म्हणून जनमानसावर उमटवला. अहिल्याबाई होळकर यांच्या दरबारात, खर्ड्याच्या लढाईनंतर सवाई माधवराव यांच्या दरबारात, दुसरे बाजीराव; तसेच, पेशवाईनंतर बडोदा येथे सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारात फंदी यांना मोठा मान होता. दुसऱ्या बाजीरावाने त्याच्याजवळील पत्रव्यवहार फंदी यांच्या स्वाधीन करून, त्यांना सवाई माधवरावांवर कवन करण्यास सांगितले होते. तरीही त्यांनी वेळप्रसंगी बाजीरावासही ‘वडिलांचे हातचे चाकर, त्यास मिळेना भाकर!’ (योग्य मान) या शब्दांत फटकारले आहे.

मलक फकीर हा अनंत फंदी यांच्या फडातील साथीदार होता. तो फंदी यांच्या रचना सुरेल आवाजात गाई. तो सुफी होता, फंदी यांना गुरुस्थानी होता, तथापि त्याच्या सुफी तत्त्वज्ञानाचा फारसा प्रभाव फंदी यांच्या रचनेवर दिसत नाही. ‘फंदी’ हे त्यांचे नामकरण तत्कालीन शृंगेरीपीठाचे शंकराचार्य संगमनेरी आले असता घडून आले आहे. अनंत फंदी लौकिक अर्थाने शाळेची पायरी चढले नाहीत, तथापि त्यांचे व्यक्तिमत्त्व कुशाग्र बुद्धी, अफाट निरीक्षण, अभ्यासू वृत्ती यांतून विकसित होत गेले. त्यांना विविध वृत्तांचा अभ्यास, संगीतकलेची जाण, माणसांची पारख होती. त्यांना दागिन्यांचीही पारख होती. त्यांना त्यांच्या पिढीजात सराफी व्यवसायामुळे ते शक्य झाले, हे त्यांच्या ‘चंद्रावळ’ लावणीतील तेहतीस वाळ्यांच्या वर्णनावरून लक्षात येते.  

अनंत फंदी नाव उच्चारले, की त्यांच्या अजरामर उपदेशपर फटक्यातील शब्द ओठावर घोळू लागतात. ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको…’ या फंदी यांच्या शब्दांना सुभाषिताचे मूल्य लाभले आहे. सर्वसामान्य माणसाचा वर्तनक्रम कसा असावा, याचे सुंदर दिग्दर्शन त्या रचनेत आहे. ‘संसारामधि ऐस आपुल्या, उगाच भटकत फिरू नको…’ किंवा ‘कष्टाची बरी भाजीभाकरी, तुपसाखरेची चोरी नको…’ अथवा ‘पदरमोड कर काही, पण जामिन कोणा राहू नको…’ तो फटका सर्वसामान्य माणसासाठी आचारसंहिता होय! त्यात दांभिकपणाचा लवलेश नाही. त्यांनी तत्कालीन समाजाला निर्भीडपणे व व्यावहारिक उपदेश केला. त्यांचे फटके सडेतोड उपदेश आणि प्रसादात्मकता यांमुळे ‘खाताना’ आनंद वाटतो. त्यांनी दुसऱ्या बाजीरावाची कारकीर्द वर्णन करणारी लावणीदेखील लिहिली आहे. 

फंदी यांना पंच्याहत्तर वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभले. त्यांनी अखेरचा श्वास 14 नोव्हेंबर 1819 रोजी संगमनेर (नगर) येथे घेतला. फंदी यांच्या द्विशताब्दी स्मृतिवर्षाची सांगता 14 नोव्हेंबर 2019 रोजी झाली. शाहीर म्हणून आणि कीर्तनकार म्हणून अनंत फंदी यांची कामगिरी संस्मरणीय आणि कालातीत आहे. 

– शिरीष गंधे 9766202141
shirish.gandhe@gmail.com
(‘शब्द रुची’वरून उद्धृत, संपादित व संस्कारित)

About Post Author

2 COMMENTS

  1. खूप छान माहिती दिली आहे.
    खूप छान माहिती दिली आहे.

  2. हा लेख सविस्तर लिहून मराठी…
    हा लेख सविस्तर लिहून मराठी संशोधन पत्रिकेला पटवाल का? त्यांच्या काही रचना , त्याच्या घराचा फोटो, असे काही पाठवता आले तर खूप छान,। माझा नंबर 9867812898 आहे,

Comments are closed.