प्रांजलाच्या शिक्षणाची सुरुवात

_Pranjalachya_ShikshanachiSuruvat_1.jpg

प्रांजलाची आई परिस्थितीने त्रस्त अवस्थेत माझ्याकडे आली. प्रांजला ही इयत्ता दुसरीमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतील विद्यार्थिनी. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर. त्या चालू वर्षाच्या अभ्यासाचा मोठा बोजा अंगावर होता. परीक्षेच्या तयारीसाठी दिवस कमी होते. परिस्थिती भरकटलेल्या जहाजासारखी होती. प्रांजलाचे जहाज किनाऱ्यावर सुखरूप आणणे हे आव्हानच होते. प्रांजलाकडे पाहून, तिला आधाराची गरज आहे हे जाणून मी ती जबाबदारी स्वीकारली.

प्रांजलाबरोबरचा पहिला दिवस मला चक्रावून सोडणारा होता. मी तिचे निरागस हसणे, अतिशय उत्साही चेहरा, सतत बोलण्याची, सुंदर पद्धतीने गोष्टी सांगण्याची आवड; तसेच, निरनिराळ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याचे कुतूहल पाहून थक्क झालो. तशा मुलीला Not up to the mark हा टॅग लागणे ही फार खेदाची बाब होती. त्याचे कारण शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे होते.

प्रांजलाची उजळणी पाहता भाषेतील व गणितातील काही प्राथमिक बाबींकडे तिचे दुर्लक्ष झालेले जाणवले. सेमिस्टर पद्धतीचा अभ्यासक्रम असल्यामुळे जे शिकवून झाले होते ते व ज्याची परीक्षा होऊन गेली होती ते पुढील परीक्षेसाठी महत्त्वाचे नव्हते. प्रांजलाच्या बाबतीत मात्र त्याचा अभ्यास करणे गरजेचे होते. परंतु त्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. पुढील पाठ व मागे सपाट या अवस्थेमध्ये न पडण्यासाठी काय करावे हा प्रश्न मोठा होता. वेळ आणि काम यांची सांगड घालणे अवघड होते. परीक्षा तोंडावर आली होती.

त्यात मजेदार गोष्ट म्हणजे प्रांजलाला परीक्षा ही कशासाठी असते आणि तिची आई व मी तिच्या इतके मागे का लागतो हे कळतच नव्हते. त्याचा परिणाम म्हणजे प्रांजला ट्युशन गांभीर्याने घेत नव्हती. ती टाळाटाळ करत होती. अशा वेळी पालक व शिक्षक यांचे मानसिक संतुलन बिघडून पाल्याला शिक्षा केली जाण्याची शक्यता असते व त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या अभ्यासावर होऊ शकतो.

मी माझे मत तिच्या आईला सांगितले, की प्रांजलाच्या बाबतीत टोकाची भूमिका घेण्याची गरज लागणार नाही. तिने ते मान्यही केले.

प्रांजलाबरोबरचा पहिला दिवस तिला तिचा तोपर्यंत झालेला अभ्यास किती समजला आहे हे जाणून घेण्यात गेला. त्यात तिची पुस्तके, अभ्यासक्रम, वह्या व त्यांत केलेले लिखाण; तसेच, तिचे इंग्रजी शब्दांचे ज्ञान व लिहिण्याची क्षमता अशा गोष्टींचे आकलन करता आले. काळजीची गोष्ट म्हणजे तिचे अगदी प्राथमिक स्वरूपाचे इंग्रजी शब्द व त्यांचा नीट वापर करणे याकडे खूपच दुर्लक्ष झाल्याचे जाणवले. कारण होते नियमित अभ्यासाचा अभाव, शंकांचे निराकरण न करणे, त्यात व्याकरणशुद्ध इंग्रजी वाक्यरचना करता न येणे; तसेच, गणिताबद्दल दुराभाव – या महत्त्वाच्या त्रुटी वाटत होत्या. सर्वांच्या मुळाशी होता वैयक्तिक शिस्तीचा अभाव. पालकांचे वैयक्तिक समस्यांमुळे मुलांकडे दुर्लक्ष होत असते. नोकरी करणाऱ्या महिलांना त्याचा त्रास अधिक होत असतो. अशा वेळी मुलांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते व मुलांना चांगल्या सवयी मोडून इतर काही सवयी लागू शकतात. त्याचा थेट परिणाम त्यांच्या शिस्तीवर व अभ्यासावर होत असतो. प्रांजलाच्या बाबतीत तसेच झाले होते. तरीदेखील तिची आई तिच्यावर सतत लक्ष ठेवून होती.

प्रांजलाच्या झोपण्याच्या, उठण्याच्या वेळा बदलल्या होत्या व तिला अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जास्त समरस होण्याची सवय लागली होती. त्यात टेलिव्हिजन व मोबाईल हे मुख्य कारण होते. प्रांजलाच्या आईला ते कळत होते. ती प्रांजलाला अभ्यासात एकाग्रता लाभावी यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती. ती त्यात यशस्वीदेखील होत होती. प्रांजलाच्या अभ्यासक्रमातील मुख्य विषय चार- गणित, इंग्रजी, हिंदी व ईव्हीएस. मला चार विषयांपैकी काळजी वाटत होती ती हिंदी या विषयाची. इंग्रजी माध्यमामध्ये शिकत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मराठी व हिंदी या विषयांबद्दल तितकी आपुलकी वाटत नसते. त्याचे कारण त्यांचा कल त्या विषयांकडे बघण्याचा – ते दुय्यम दर्ज्याचे विषय असा असतो. त्याबद्दल पालक मात्र जास्त गंभीर नसतात. मातृभाषेत उत्तम बोलणारे पालकदेखील माझा मुलगा मराठी वा हिंदी या विषयांमध्ये जेमतेम आहे असे कौतुकाने सांगत असतात! पालक जेव्हा मुलांचे वाचन घेत असतात तेव्हा मुले मुळाक्षरे बघून अनेकदा वाचन करत नाहीत व अंदाजे वाचत असतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे वाचन जरी ठीक वाटले तरी मुलांना लिहिताना अडचणी येत असतात. त्याचा परिणाम त्यांच्या परीक्षांच्या गुणांवर होत असतो. त्यांचा आत्मविश्वास व आवड कमी होऊ लागते. प्रांजलाच्या बाबतीत तेच होत होते.

त्यामुळे मी प्रांजलाच्या अभ्यासाची सुरुवात तिला देवनागरी लिपी, त्यातील मुळाक्षरे, बाराखडी यांवर अधिक लक्ष देऊन केली. त्यामुळे तिच्यात बदल झाल्याचे दिसू लागले. तिला शब्दांचे जणू भांडारच मिळाले होते! ती उत्साहात हिंदीचे वाचन मनापासून करू लागली. लिहिणे हे व्याकरणशुद्ध असले पाहिजे. त्यासाठी हिंदीमध्ये काळ, वचन व लिंग याप्रमाणे वाक्यात कसे बदल होतात हे तिला सांगितल्यावर तिचे लिहिणेदेखील सुधारू लागले.

नेमकी तीच स्थिती इंग्रजीच्या वाचण्याची व लिहिण्याची होती. तिला स्पेलिंग्ज लक्षात ठेवणे खूप जड जात होते. शब्दांचे उच्चार व स्पेलिंग्ज यांचा मेळ नव्हता. देवनागरी लिपीचा अभ्यास केल्यामुळे शब्दांचा उच्चार व त्यानुसार इंग्रजी मुळाक्षरे जुळवताना सोपे झाले व अभ्यासाला गती व हुरूप येऊ लागला. अशा रीतीने, इंग्रजी व हिंदी या दोन्ही विषयांचा अभ्यास एकत्र होऊ लागला.

प्रांजला इंग्रजीत संभाषण करू शकत होती. तिची लकब, तिचा आवाज व शब्दोच्चार वाखाणण्याजोगे होते. परंतु काळाचे प्रकार तिला नीट समजले नसल्यामुळे वाक्यावाक्यात चुका होत होत्या. त्या सुधारल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे व निबंध इत्यादी लिहिणे कठीण होते. त्यामुळे प्रांजला लिहिण्याचा कंटाळा करत होती. मी तिच्या व्याकरणावर जास्त वेळ घालवला. कारण भाषेचा पाया व्याकरण हाच आहे. प्रांजला अनेक पाने एका वेळी वाचन करू शकते. ती अनोळखी शब्दांचा उच्चार मुळाक्षरांवरून करते, त्याचा उपयोग तिला स्वतः अभ्यास करताना होतो. अशा रीतीने, तिच्या बाबतीत इंग्रजी व हिंदी भाषांचा प्रश्न सुटत होता.

गणित या विषयात पाढे पाठ करून घेणे हे विशेष परिश्रमाचे होते. नियमित अभ्यास न केल्यामुळे पाढयांचा बोजा मुलांना वाटू लागतो; कमी वेळात पाठांतर करणे हे थोडे अवघड जाते. एक पाढा दोन भागांत विभागून दिल्यावर पाठांतर लवकर होऊ लागले. त्यामुळे स्मरणशक्तीवर ताण कमी पडून उत्साह कायम राहिला असा अनुभव मला प्रांजलाच्या पाढे पाठ करण्यासंबंधी आला. हे फार महत्त्वाचे आहे. कारण पुढील सर्व अभ्यास – गुणाकार व भागाकार यांवरील गणिते- पाढयांवरच अवलंबून होता. बेरीज व वजाबाकी शिकवण्यासाठी थोडा जास्त वेळ द्यावा लागला. तिला बेरीज बोटांचा आधार घेतल्याशिवाय जमत नव्हती. ती समस्याही खूप सराव दिल्यानंतर काही अंशी दूर झाली. त्यामुळे प्रांजलाला गुणाकार व भागाकार करणे जमू लागले.

ईव्हीएस या विषयाचा अभ्यास हा इंग्रजी शब्दांच्या सरावावर जास्त अवलंबून आहे. प्रांजलाला इतर विषयांची विशेष आवड असल्यामुळे तिला ईव्हीएसमध्ये जास्त अडचणी आल्या नाहीत. प्रांजलाच्या शाळेत इंग्रजी बोलण्याचा कटाक्ष असल्यामुळे प्रांजलाचे इंग्रजी शब्दोच्चार खूप चांगले आहेत. तसेच, तिला संभाषणात खूप आत्मविश्वास आहे. त्याचे श्रेय तिच्या शाळेला द्यायला हवे. पोषक वातावरण तयार करणे हे शाळेचे काम आहे. त्याबाबतीत प्रांजलाची शाळा खूप प्रयत्न करते. निरनिराळे उपक्रम प्रांजलाच्या शाळेत राबवले जातात. त्यात इंग्रजी नाटके, ऑपेरा, कोरसगाणी व इतर स्टेज शोज शाळेत होत असतात व त्यामध्ये सर्व मुले सहभागी होतात हे पाहिले जाते. इतर विषयांपैकी संगणक, हस्तकला, चित्रकला आणि शरीरसौष्ठव यांत प्रांजलाला विशेष गती आहे.

पोषक वातावरण लाभणे हे मुलांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अर्थात, मुले प्रतिकूल परिस्थितीचा सामनादेखील करू शकतील एवढी क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करणे हे अधिक गरजेचे आहे. प्रांजलाच्या शिक्षणाची ही सुरुवात आहे. तिच्या या प्रवासात, पुढे, यशाची अनेक शिखरे येणार आहेत. तिच्या प्रयत्नांना शिक्षक म्हणून थोडा हातभार लावण्याची संधी मिळत आहे!

– प्रकाश देशपांडे

About Post Author

2 COMMENTS

  1. Sundar lekh. ….pranjala…
    Sundar lekh. ….pranjala keep it up. We all also with you.

Comments are closed.