प्रश्न जीवन मरणाचा की भांडण्याचा? (Domestic Violence)

2
27

कोरोनाच्या बरोबरीने जगभर फैलावलेली आपत्ती म्हणजे घरगुती हिंसाचार (डोमेस्टिक व्हॉयलन्स). तो विषय देशोदेशी चिंतेचा बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील त्याबाबत सावधान असण्याची गरज व्यक्त केली आहे. पुण्यामध्ये बायकोला छळणाऱ्या नवऱ्यालाच क्वारंटाईन करण्याची सजा फर्मावली गेली आहे. अनेक मानसोपचार तज्ज्ञ टीव्ही-रेडिओवरून तत्संबंधी भाषणे देत आहेत. एकूणच, मानसिक आजारांचे, विसंवादाचे प्रमाण गेल्या दोन-तीन दशकांत वाढले आहे. त्यामुळे समुपदेशन हा मोठा व्यवसाय बनला आहे. कोणत्याही दोन व्यक्ती एकत्र आल्या, की त्यांचे जसे जमते तसे बिनसते. त्यात बापलेक, मायलेक, पती-पत्नी अशा जोड्या कुटुंबात असतात. पैकी पतिपत्नीची वा सासुसुनेची भांडणे विकोपाला गेली, की घरगुती हिंसाचाराची ज्वाला भडकू शकते. तो हिंसाचार मानसिक छळणूक, शारीरिक छळणूक -अगदी काठीने बडवण्यापर्यंत असा असू शकतो. स्त्रीकडून पुरुषाचा छळ झाल्याचे उदाहरणही कानावर येते. घरगुती हिंसाचार कोरोना काळात वाढण्याचे कारण काय असावे? जी भांडणारी जोडपी आहेत ती थोडी जास्त तीव्रतेने आणि जास्त वेळा याकाळात भांडतील, इतपत माझा अंदाज होता. पण तरीही सर्वत्र चर्चा घरगुती हिंसाचाराची आहे असे ऐकल्यावर मी काळजीत पडलो. मी माझ्या स्नेही प्रतिभा देशपांडे यांना तो प्रश्न अधिक खुलाशासाठी विचारला. प्रतिभा या मानसशास्त्र एमए झाल्यानंतर, त्यांनी परदेशी विद्यापीठांचे मानसोपचाराचे दोन अभ्यासक्रम ऑनलाइन पूर्ण केले व गेली अनेक वर्षे त्या पुण्यात समुपदेशनाचा व्यवसाय करतात. त्यांच्या बोलण्यात वेगवेगळ्या वयोगटांतील पती-पत्नी संबंध हा विषय अनेक वेळा येई. त्यांची त्या विषयाशी संबंधित बारा पुस्तके आहेत आणि जयंत नारळीकर, अच्युत गोडबोले, राजेंद्र बर्वे अशा मान्यवरांनी त्यांच्या पुस्तकांची प्रशंसा केली आहे.

 

          मानसोपचार शास्त्र ज्या तऱ्हेने गेल्या दोनशे वर्षात विकसित झाले आहे त्याबद्दलच माझ्या मनात विचारणा आहेत. या शास्त्रात बिघाड दुरुस्त करण्याची किमया सुचवली गेली आहे पण मन घडवण्याची सूत्रे नाहीत, बहुधा. निदान मी त्याबाबत कोणाकडून फारसे ऐकलेले-वाचलेले नाही. मी परदेशातील व महाराष्ट्रातील पाच-सात ज्येष्ठ अनुभवी तज्ज्ञांशी चर्चा केली, परंतु फार उपयुक्त काही कानी आले नाही. मनोविकार वाढण्याचे प्रमुख कारण कुटुंबसंस्था ढासळण्यात व त्याच वेळी पर्यायी व्यवस्था न होण्यात आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रापुरते बोलायचे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सानेगुरुजी कथामाला, राष्ट्र सेवा दल, बाबा आमटे यांची श्रमसंस्कार छावणी असे राज्यपातळीवरील उपक्रम आणि त्यासारखे राज्यभरातील स्थानिक उपक्रम संपल्याने ‘आम्हीबी घडलो तुम्हीबी घडाना’ हे थांबून गेले. अशा परिस्थितीत पालक-बालक संबंधांकरता काही ऑनलाईन उपक्रम करता येईल का असा आमचा विचार जो चाललेला असतो, त्यातील प्रतिभा देशपांडे ह्या प्रमुख भागीदार आहेत. त्यामुळे मी काहीशा हक्काने कोरोना उद्भवल्यानंतर त्यांच्याशी घरगुती हिंसाचार या विषयावर बोलू लागलो.  
     

 

          त्यांच्या मते, हा विसंवाद वाढला आहे व याहून अधिक वाढण्याची शक्यता आहे, कारण कोरोनामुळे जनमानसात तयार झालेली अस्थिरता, अस्वस्थता व त्यामुळे आलेली हतबलता. माणसे कधीही नव्हती एवढी असहाय व पराधीन आहेत. त्यामुळे माणसांतील निराशा, दुःख, संताप, नकारात्मकता या भावना बळावल्या आहेत, तर सहनशक्ती कमी झाली आहे. कोरोनाचा आघात अनपेक्षित रीत्या एकाएकी आला आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील वेगवेगळ्या योजना, संकल्प, स्वप्ने… सारे काही ढासळून पडले आहे. नोकरीची शाश्वती नाही, कोठे पगार अर्ध्यावर आले आहेत. तशात लॉकडाऊनचा उपाय मनाला अधिकच खच्ची करणारा ठरत आहे, कारण घरातील दोन-तीन-चार-सहा माणसे एका छपराखाली चोवीस तास राहणार -त्यात फेरबदल, स्थित्यंतर काहीच संभवत नाही. अशा वेळी मनाचे कंगोरे अधिक टोकदार होतात व घर्षण तीव्र होऊ लागते. उदाहरणार्थ घरकाम. ते स्त्रीने करायचे हे इतके गृहीत धरलेले असते, की पुरुष तेथे ‘मदत करतो तो स्वतः घरकाम करत नाही’ हे कोणाच्या लक्षात येत नाही आणि त्यावरून अकारण वाद किंवा कुचेष्टा सुरू होतात.
          देशपांडे यांच्या बोलण्यात पटापट उदाहरणे येत होती. मी त्यांना म्हटले, की हे सर्व मध्यमवर्गीय तरुण दिसतात. तळच्या वर्गात व अन्य वयोगटांत काय परिस्थिती आहे? देशपांडे म्हणाल्या, की तळच्या वर्गातील प्रत्यक्ष अनुभव मजजवळ नाही, परंतु बोलण्याबोलण्यातून कळले त्याप्रमाणे त्या वर्गात भांडणे व हिंसाचार नेहमी घडत असतो आणि त्या प्रश्नाच्या सुटकेसाठी काही स्वयंसेवी संस्था सातत्याने प्रयत्न करत असतात. मध्य वयातील आणि ज्येष्ठ वयातील जोडपी कोरोनाच्या आघाताने अधिक स्वावलंबी झाल्याचे जाणवते. त्यांना जाणीव झाली आहे, की त्यांच्या मदतीला आपत्तीत दुसरे कोणी येऊ शकणार नाही. त्यांची त्यांनाच त्यावर मात करायची आहे. त्यामुळे त्यांचे प्रयत्न स्वयंपूर्णतेकडे आहेत. आपण बरे आपले घर बरे. देशपांडे म्हणाल्या, की त्याच जाणिवेने ज्येष्ठ वयातील पती-पत्नी एकमेकांच्या अधिकच निकट आलेल्या व परस्परांची काळजी घेत असलेल्या दिसतात.
          देशपांडे म्हणाल्या, की सद्यकाळात तरुण अधिक बिथरलेले असणे स्वाभाविक आहे, कारण त्यांचा जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. रोगामुळे मृत्यूची धास्ती आहे. त्यापेक्षा अधिक भीती उद्या ‘जगण्याचे जे संकट’ ओढवणार आहे त्यातून निर्माण झाली आहे. त्या संकटाचे स्वरूप आर्थिक अस्थैर्याचे आहे. देशपांडे यांचे त्यांना सांगणे आहे, की त्यांनी स्वतःला जपावे आणि त्यांच्या घराला जपावे. उद्याच्या संभाव्य अनिश्चिततेने आजचे जगणे भांडणांनी कशासाठी काळवंडायचे? पती-पत्नींनी आमनेसामने बसून अडचणी मांडाव्या. आपल्यातील मतभेद सोडवण्याच्या दृष्टीने त्याबाबत विचार करावा. उत्तम म्हणजे मतभेद काही वेळापुरते Pause वर ठेवावेत. सध्याच्या काळात लढाई आहे ती जगायचे की मरायचे याचा विचार करण्याची. त्याबरोबरच स्वतःकडे काय आहे आणि स्वतःला अजून काय मिळवायचे आहे याचाही विचार करण्याची. ही वेळ आहे नियोजनाची. Sharpen your tools यात स्वतःची शक्ती घालवावी. माणसाला स्वकर्तृत्वाने सर्व अडचणींवर मात करता येते.
प्रतिभा देशपांडे 9890169559 pratibhadilip@yahoo.com
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
———————————————————————————————————————–                                       प्रतिभा देशपांडे यांची पुस्तके 

 

 

————————————————————————————————————–

About Post Author

Previous articleजयंत खेर – वृद्धत्वी आनंद (Jayant Kher – Economist turned Painter)
Next articleशेखरचा शेतजीवनाचा आनंद ( Engineer Seeks Happiness in Farming)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here