Home कला प्रशांत मानकर – तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना!

प्रशांत मानकर – तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना!

0
_PrashantMankar_TevtyaRahoSadaRandharatuni_1.jpg

आमच्याकडे चांगले शिक्षक नाहीत, मुलांना धड शिकवले जात नाही, गुणवत्ता तितकी चांगली नाही. शिक्षक मुलांना संस्कार देत नाहीत असे ब-याचदा ऐकायला मिळते. तेव्हा वाटते, हे म्हणणे पूर्ण खरे नव्हे! अशाच अनुभवाची एक गोष्ट वाचकांसमोर मांडावी असे वाटत आहे. आहे तशी साधी सोपी गोष्ट. पण त्यात दडलेला अर्थ मोठा आहे – मुक्ताईने म्हटलेच आहे ना, ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सुर्याशी’! या गोष्टीतून दिसून येते, की इच्छा असली तर काहीही अशक्य नाही आणि कोठल्याही गोष्टीसाठी रडत न बसता त्यावर काही उपाय शोधून काढला तर ते जास्त उपयुक्त ठरत नाही का?

विजया वाड यांच्या ‘बालकोश’ या कथासंग्रहाकरता ठाण्यात ‘भाग्यश्री फाउंडेशन’तर्फे चित्रकला स्पर्धा 2015 साली ठेवली होती. ठाण्यातील अनेक शाळा त्यांत सहभागी झाल्या होत्या. सर्व बालगोपाळांनी छान छान चित्रे ‘बालकोशा’साठी काढली. प्रशांत मानकर हे विजया वाड यांचे विद्यार्थी व ‘लोकसत्ता’ वर्तमानपत्राचे सिनियर डिझायनर आहेत. ते त्या स्पर्धेचे परीक्षक होते. ठाण्यातील महानगरपालिका शाळा क्रमांक – 1च्या प्रिन्सिपल श्रीमती मनीषा लोहोकरे यांनी त्यांची शाळा स्पर्धेत भाग घेईल असे उत्साहात आम्हाला सांगितले होते. आम्ही त्यांच्या शाळेत त्यापूर्वी काही शिबिरे घेतली होती. त्यामुळे लोहोकरे मॅडम यांचा परिचय होता. त्या मनापासून सहकार्य करतील याची खात्री होती, पण प्रश्न निराळाच होता. त्यांच्या शाळेत चित्रकलेचे शिक्षक नव्हते. त्यामुळे तेथील मुलांनी हौस म्हणून चित्र काढणे हे ठीक आहे. पण चित्रकला स्पर्धेत भाग घ्यायचा, तोसुद्धा एवढया मोठमोठ्या शाळांबरोबर – जेथे उत्कृष्ट चित्रकला शिकवली जाते! पण प्रशांत मानकर यांनी उत्साह दाखवला आणि ठरवले, की महानगरपालिकेच्या शाळेला सहभागी करून घ्यायचे. आम्ही त्या मुलांना रंग दिले. प्रशांत मानकर यांच्याबरोबर माझे सहकारी होते अजित लोटलीकर. ते उत्तम चित्रकार आहेत. ते चित्रकलेची, कॅलिग्राफीची शिबिरे घेतात. त्या दोघांनी महानगरपालिकेच्या मुलांसाठी चित्रकलेची शिबिरे घेतली. त्यांना मार्गदर्शन केले, पण तरीही चित्रे शाळेकडून ठरलेल्या वेळेत आली नाहीत. मुलांना दोन-तीन शिबिरांतून शिकून गोष्टीवर आधारित चित्रे काढता येत नव्हती.

चित्रकलास्पर्धेची गडबड होती. अजून काही करण्यास तेव्हा वेळ नव्हता. मी मानकरसरांना म्हणाले, की आता ती शाळा राहू दे. तिचा समावेश स्पर्धेत नको करूया. आपल्याकडे वेळ कमी आहे. स्पर्धेनंतर आपण मुलांना चित्रकला शिकवू.

मानकर तेव्हा ‘हो’ म्हणाले. स्पर्धेची गडबड सुरू होती. इतर कामे होती. मी ती गोष्ट विसरून गेले आणि आठ-दहा दिवसांनंतर, प्रशांत मानकर काही चित्रे घेऊन माझ्याकडे आले. ‘बाई, ही पाहा चित्रे, कशी आहेत? चित्रे छान होती. ‘कोणी काढली आहेत’, मी विचारले.

ती चित्रे महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांची होती. मी नको सांगितल्यानंतरही, मानकरसर लोहोकरे मॅडमची परवानगी घेऊन शाळेत जाऊन काही वेळ मुलांना चित्रकला शिकवत. त्या मुलांपैकी सुजाता क्षीरसागर हिने सर्व शाळांमधून स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला! ज्या शाळेत चित्रकलेचे शिक्षक नाहीत, मुलांकडे रंग नाहीत अशा शाळेतील मुलींसाठी ते मोठे यश होय. ‘बालकोश’च्या प्रकाशनसमयी तिला दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आली. त्या मुलीचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर तिचे वडील शाळेत आले. ते प्रिन्सिपल लोहेकरे मॅडमना म्हणाले, ‘हे पैसे माझ्याकडे देऊ नका. तिच्या नावे बँकेत ठेवा. तिला खूप शिकू दे.’ मानकरसरांनी केवढे मोठ काम केले! माझ्या हृदयात ती गोष्ट कोरली गेली आहे.

तसे बघायला गेले तर गोष्ट साधीशी आहे, पण फार मोठा अर्थ त्यात दडला आहे. ‘जाणवाया दुर्बलाचे दु:ख आणि वेदना तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना.’

माझ्या प्रिय शिक्षक मित्रांनो, तुम्ही उद्याच्या पिढीला घडवणारे शिल्पकार आहात! अशा प्रकारच्या जाणिवेची समाजात फार गरज आहे. तुमच्याकडे ज्ञान आहे, अनुभव आहे. तुमच्या हातांमध्ये पुढच्या पिढीचे भवितव्य आहे. मला खात्री आहे, तुम्ही ते उत्तम रीतीने साकाराल.

तुमच्या स्वत:च्या अशा तर्हेेच्या अनुभवांची वाट हे ‘व्यासपीठ’ पाहत आहे. तुमचे अनुभव त्यांच्याशी संबधित विद्यार्थ्यांची नावे, फोटो यांच्यासह लिहून पाठवावे.

– शिल्पा खेर

About Post Author

Exit mobile version