राजन खान प्रणीत ‘अक्षर मानव’ या संस्थेने तेजगड येथे योजलेली सहल विचारांनी श्रीमंत करणारी व बौद्धिक आनंद देणारी, अशी अविस्मरणीय होती. सहल जून 2018 मध्ये तीन दिवस आयोजित केली गेली होती. त्यात महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमधून चारशे जणांनी भाग घेतला होता. तेजगड हे ठिकाण गुजरात राज्यात बडोदा ते छोटा उदेपूर हमरस्त्यावर आहे. ठिकाण गुजरातमध्ये असले तरी तेथून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांच्या सीमेवरील गावे काही तासांच्या अंतरावर आहेत. ती बरीचशी आदिवासी गावे आहेत.
‘आदिवासी अकादमी’ ही संस्था गणेश देवी यांच्या प्रयत्नांतून तेजगड येथे उभी आहे. ती वीस एकर जागेवर असून आदिवासींसाठी विविध स्तरांवर काम करते. भारतातील लोप पावत चाललेल्या सर्व बोली भाषा तेथे ऑडिओ व पुस्तक रूपात जतन करून ठेवल्या गेल्या आहेत. आदिवासी भाषांसंदर्भात जास्तीत जास्त लेखनसाहित्य उपलब्ध करून देणारे सुसज्ज ग्रंथालय तेथे आहे. ‘आदिवासी अकादमी’ व ‘भाषा केंद्र’ या संस्था संलग्न आहेत. संग्रहालय ग्रंथालयाच्या जवळच आहे. आदिवासींची कलापूर्ण व सांस्कृतिक जीवनरहाटी उलगडून दाखवणारी साधने, चित्रे संग्रहालयात पाहण्यास मिळतात. त्यांतील अनेक वस्तू आदिवासींच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. आदिवासींचे जगणेच त्यातून जिवंत झालेले आहे.
‘आदिवासी अकादमी’च्या पिछाडीला शेकडो एकर पसरलेल्या सपाट भूमीवर एक डोंगर उभा आहे. त्या डोंगरात चौदा गुहा आहेत. त्यांतील भिंतींवर चितारलेली चित्रे बारा हजार वर्षांपूर्वीची आहेत! चित्रे अणकुचीदार शस्त्राने काढली गेली आहेत. ती कुत्रा, हाताचा पंजा, हातात धनुष्यबाण धरून घोड्यावरून जाणारा शिकारी अशी साधी व अत्यंत ढोबळ आहेत. पांढरा व तांबडा हे दोनच रंग चित्रांमध्ये वापरले गेले आहेत.
गणेश देवी, त्यांची बायको- सुरेखा यांच्यासह पूर्ण तीन दिवस आमच्यासोबत होते. त्यांच्याशी सतत संवाद होत होता. गणेश देवी आम्हाला अकादमीच्या आवारात वेगवेगळ्या ठिकाणी संबोधित करत होते. आमच्यापैकी काही जणांनी त्यांच्या ‘वानप्रस्थ’ या पुस्तकातील काही उतारे जाहीर रीत्या वाचूनही दाखवले. ते त्या अनुषंगाने पुस्तकात न आलेल्या घटना व मुद्दे स्पष्ट करत होते. ते अनेक जणांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होते. वैचारिक मैफल तीन दिवस उत्तरोत्तर रंगत गेली.
गणेश देवी यांनी त्यांच्याबरोबर काम करत असलेल्या तरुणांचा गट खास बोलावला होता. ती तरुण मुले गांधीनगर येथील एका गुन्हेगार वस्तीतील होती. ती मुले विमुक्त भटक्या जमातींपैकी साँसी जमातीतील छारा या पोटजमातीमधील होती. त्यांनी ‘बुधन कलामंच’ स्थापन केला आहे. ते भटक्या विमुक्त जनजातींवर होणाऱ्या अन्यायाला, अत्याचारांना वाट मोकळी करून देणारी पथनाट्ये, नाटके देशभर सादर करून जनजागृतीचे काम करत असतात. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्ये करणारे एक पथनाट्य तेथे सादर केले गेले. त्याशिवाय, ‘हर सपनेको जीनेका अधिकार है।’ हे एक तासाचे, पथनाट्याचा बाज असलेले नाटक सादर केले गेले. दक्षिण बजरंगी छारा या तरुण लेखकाने त्याचे लेखन केले आहे. भटक्या विमुक्त जनजातींमधील विविध समाजघटकांना पोलिसांकडून, समाजाकडून, सरकारी यंत्रणेकडून माणुसकीशून्य वागणूक कशी मिळते त्याचे विदारक चित्रण नाटकामध्ये केले गेले आहे. प्रत्येक माणसाचे जीवन हे जणू एक स्वप्न असते. प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार असतो. ते नाटक आदिवासी, भटक्या, विमुक्त जमातींमधील माणसांना प्रत्यक्षात जगण्याचे साधे स्वप्नही पाहू दिले जात नाही हे वास्तव प्रखरतेने मांडते. गणेश देवी म्हणाले, की ते नाटक म्हणजे मनोरंजन नाही तर जीवनदर्शन आहे.
गणेश देवी यांनी त्यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या चार चळवळींची माहिती सांगितली :
1. त्यांना दोन जनगणनांचा अहवाल अभ्यासताना सुमारे एक हजार भाषा गायब झालेल्या दिसल्या. त्यांचा शोध घेऊन, त्या जतन करून त्यांना हवे आहे त्याप्रमाणे त्यांचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सबलीकरण करण्याच्या प्रयत्नांतून तेजगड येथील आदिवासी अकादमी उभी राहिली आहे. तेजगडसभोवतालच्या शेकडो आदिवासी गावांत मुलांना त्यांच्या भाषेत प्राथमिक शिक्षण देणे, उपासमार होऊ नये म्हणून ‘अनाज बँक’ चालू करणे, प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, शेतीसाठी सामूहिक विहिरींद्वारे पाण्याचे वितरण-व्यवस्थापन करणे, लहान प्रमाणातील कर्जे उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे अशा विविध पातळ्यांवर ती चळवळच उभी राहिली आहे – ती भाषांच्या अभ्यासातून.
2. ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्यपूर्व काळात गुन्हेगार जमाती म्हणून अनेक जमातींना स्वतंत्र ‘सेटलमेंट’मध्ये, म्हणजे एक प्रकारे तुरुंगवासात ठेवले होते. त्यांना नोटिफाईड जमाती म्हटले जात असे. स्वातंत्र्यानंतर, त्या जमातींना सेटलमेंटमधून मुक्त करण्यात आले. भारत सरकारने त्या जमातींना १९५२ साली डी-नोटिफाईड केले. त्या विमुक्त भटक्या जमाती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या, पण त्यांच्यावरील ‘गुन्हेगारी जमात’ हा शिक्का अजूनही तसाच राहून गेला आहे. तो पुसला जाण्यासाठी संपूर्ण भारतभर चळवळ उभी केली गेली. गणेश देवी यांनी पश्चिम बंगालच्या महाश्वेता देवी यांच्याबरोबर त्यासाठी भारतभर भ्रमण केले. त्यातून ‘बुधन कलामंच’ यांच्यासारखे काही कलामंच उभे राहिले.
3. भारत सरकारने भारतातील सर्व भाषांचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले. पण ते काम सरकारी लाल फीत, कामाबाबतची उदासीनता व दिरंगाई करणारी नोकरशाही या गोष्टींमध्ये हरवून गेले. गणेश देवी यांनी भाषाकेंद्राच्या माध्यमातून, लोकसहभागातून ते काम करण्याचे ठरवले. भारतीय भाषांचे ते लोक सर्वेक्षण असंख्य लोकांच्या मदतीने पार पडले. पस्तीस हजार छापील पानांचा तो अहवाल ब्याण्णव खंडांत प्रकाशित होत आहे. त्याचे बावन्न खंड प्रकाशित झाले आहेत. पैकी महाराष्ट्र खंड अरुण जाखडे यांनी संपादित केला आहे.
4. गणेश देवी गुजरातमधील वास्तव्यात समाजात फॅसिझम उफाळून येण्याची प्रक्रिया फार जवळून बघत होते. त्यांना समानतेला, स्वातंत्र्याला आणि सामाजिक सहिष्णुतेला दडपून, त्याची पायमल्ली करून एका व्यक्तीचे माजवले जाणारे अवास्तव स्तोम दुःखी करत होते. त्यांनी दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील विचारवंतांच्या होत राहिलेल्या हत्यांना थोपवण्यासाठी, त्यामागील फॅसिस्ट मनोभूमिकेला अटकाव घालण्यासाठी ‘दक्षिणायन’ ही प्रक्रिया सुरू केली. त्यांनी त्यांचे वास्तव्य ‘दक्षिणायन’च्या निमित्ताने बडोद्यातून धारवाड येथे हलवले आहे. ‘दक्षिणायन’ची परिणती म्हणून ठिकठिकाणी ‘नागरिक सभा’ स्थापन कराव्यात यासाठी देवी देशभर फिरत आहेत. राज्यात व केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, त्याला विविध सामाजिक समस्यांची दखल घेण्यास लावणारा दबावगट निर्माण करण्याची ती प्रक्रिया आहे.
त्यांनी ‘भाषा केंद्र’, ‘आदिवासी अकादमी’, ‘भटक्या विमुक्त जमातीची चळवळ’ हे सारे निर्लेपपणे दुसऱ्या लोकांच्या हाती सोपवले आहे. त्यांच्या कामाची शैली महात्मा गांधींच्या कामाशी साधर्म्य दाखवते. त्यामुळे गांधी कशा प्रकारे काम करत असावेत याची किंचित झलक मिळते. त्यांनी शैक्षणिक दृष्टया प्रगल्भ असलेल्या लोकांना अकादमीशी जोडून घेतले आहे. अकादमीचे माजी अध्यक्ष अशोक चौधरी, अकादमीचा कार्यभार नव्याने स्वीकारलेले अध्यक्ष मदन मीना, तेथील निवासी डायरेक्टर या सगळ्या व्यक्ती पाहिल्यानंतर गणेश देवी यांचा अचूक लोकसंग्रह ध्यानात येतो.
स्वप्न पाहिल्याशिवाय काम उभे करता येत नाही, हे खरेच! पण काम उभे करताना त्यामागे सखोल अभ्यास हवा हे सूत्र धरूनच गणेश देवी काम करत राहिले. म्हणूनच त्यांनी अकादमीतील महाश्वेता देवी यांच्या स्मृतिस्थानावर कोरून ठेवले आहे. ‘हर एक सपनेको जीनेका अधिकार है!’
– विद्यालंकार घारपुरे
vidyalankargharpure@gmail.com
(चालना, जुलै 2018वरून उद्धृत)
Last Updated On 26th Sep 2018
या संदर्भातील देवींचे कार्य…
या संदर्भातील देवींचे कार्य अजोड आहे
Comments are closed.