प्रत्येक विद्यार्थी हे स्वतंत्र पुस्तक!

0
46
_Pratyek_Vidyarthi_1.jpg

भावनिक विकास हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया होय. तो विकास शाळेतील नियोजनबद्ध उपक्रमांच्या माध्यमातून होत असतो. त्या प्रकियेतील शिक्षकाच्या भूमिकेला अनन्साधारण महत्त्व असते. विद्यार्थ्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शिक्षकांना पुढीलप्रमाणे प्रयत्न करता येतील.

१. विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी निरीक्षण, अनुकरण पद्धतीने शिकण्याची सवय असते. तेव्हा शिक्षकांनी स्वत: त्यांच्यापुढील रोल मॉडेल बनावे. सर्व तऱ्हेची मूल्ये म्हणजे संयम, वडिलधाऱ्यांबद्दल आदर, वरिष्ठांचा शब्द मानणे, धडाडी, आत्मविश्वास, चारित्र्यसंपन्नता, नियमांचे पालन, नीटनेटकेपणा, समानता वगैरे पाळावीत.

२. सर्व विद्यार्थी शिक्षकांपेक्षा लहान असतात. तरीही शिक्षकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा योग्य आदर केला पाहिजे. गरीब-श्रीमंत, हुशार-कमी हुशार, सुंदर-कुरूप, सुदृढ-अशक्त, उत्साही-निरुत्साही यांसारख्या गुणवैशिष्ट्यांनुसार विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये. सर्वांना समानतेची वागणूक द्यावी.

३. प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकासाठी ‘एक स्वतंत्र पुस्तक’ असते. ते शिक्षकांना व्यवस्थित वाचता व समजून घेता आले पाहिजे. क्षमता, मर्यादा, आवडीनिवडी व बुद्धीची कुवत यांसारख्या गोष्टीतील फरक जाणून त्यानुसार त्यांना वागवावे.

४. शिक्षकांच्या आचार-विचारात समन्वय हवा. स्वतः उशिरा येणाऱ्या शिक्षकाने ‘लेट कमर’ विद्यार्थ्यास शिक्षा केल्यास ती त्याला त्रासदायक वाटू शकते.

५. शिक्षकांनी शक्यतो विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संबंध, भावनिक नाते निर्माण करावे. विद्यार्थ्याचे पहिले नाव लक्षात ठेवून त्या नावाने संबोधावे.

६. विद्यार्थ्यांवर छोट्यामोठ्या जबाबदाऱ्या सोपवाव्यात. कामाचे स्वातंत्र्य द्यावे. आवश्यक तेथे मार्गदर्शन व प्रेरणा द्यावी.

७. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भावनिक आविष्कारास संधी द्यावी. भूमिका पालन, पथनाट्य, नाट्यीकरण, मूकाभिनय, मिमिक्री इत्यादी माध्यमातून इतरांचे विचार, भावना समजून घेण्याची प्रेरणा देणे सहज शक्य असते.

८. गटकार्य करून घेऊन प्रतिसादाची शिकवण द्यावी.

९. क्रियाशील श्रवणाची सवय लावावी. दुसऱ्याचे शांतपणे ऐकून घेण्याचे वळण हवे.

१०. सांस्कृतिक कार्यक्रमांप्रमाणेच कार्यानुभव व छंदाची जोपासना यांतून भावनिक विकास व भावनिक आविष्कारास सुयोग्य संधी उपलब्ध करून देता येते.

११. ‘माणूस नेहमी चुकीस पात्र असतो’ असे म्हणतात. चुका झाल्या तरी हरकत नाही, पण चूक कबूल करण्यासाठी लागणारा मनाचा मोठेपणा शिक्षकांनीही दाखवावा. झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी.

१२. कोणत्याही गोष्टीचे नियोजन करत असताना घ्यावे लागणारे निर्णय, त्याचबरोबर निर्णयाची जबाबदारी स्वीकारणे, पार पाडणे, आवश्यक असते. तेव्हा तो अनुभव विद्यार्थ्यांना द्यावा. चांगल्या व वाईट परिणामांचे अंदाज करण्याची सवय लावावी.

१३. छोट्यामोठ्या उपक्रमांतून प्रभावी नेतृत्त्व व डोळस अनुयायित्वासाठी आवश्यक गुणांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

१४. परीक्षा, क्रीडा व इतर शालेय स्पर्धेच्या माध्यमातून निकोप स्पर्धेची बीजे रूजवावीत व त्याचबरोबर स्वयंस्पर्धा ही सर्वोत्कृष्ट स्पर्धा आहे याची जाणीव निर्माण करावी.

१५. मानसिक आणि भावनिक संतुलन साधण्यासाठी योगासने, मौन, प्राणायाम, व्यायाम, खेळ इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून प्रेरणा व मार्गदर्शन करावे. ‘जगाला जिंकणे एकवेळ सोपे आहे, पण स्वतःला जिंकणे फार फार अवघड आहे’ असे म्हणतात.

अशा प्रकारे अध्ययन-अध्यापन आणि विविध शालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासाला हातभार लावावा. शिक्षकच विद्यार्थांचा भावनिक विकास करण्यासाठीच्या दृढ निश्चयाची बांधिलकी मानणारे, विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञापूर्वक कर्तव्याने जबाबदाऱ्या पाळणारे असावेत.

– लीला पाटील

(शिक्षण संक्रमण, ऑक्टोबर २०१८, ‘विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासातील शिक्षकांची भूमिका’ या लेखातील हा अंश आहे.)

About Post Author