प्रकाश कामत यांचा ध्वनिमुद्रिकांचा खजिना

0
48
carasole

छंद हे सहसा ‘स्वांत सुखाय’ असतात. मात्र काही वेळा स्वत:च्या आनंदासाठी जोपासलेल्या छंदाची व्याप्ती एवढी रुंदावते, की त्यातून सांस्कृतिक ठेवा निर्माण होतो. ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक डॉ. प्रकाश कामत यांनी आपल्या छंदातून सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या अनोख्या छंदाची दखल घेऊन 2001 साली ‘लिम्का बुक ऑफ रेकोर्डस् ’ने त्यांचे नाव विक्रमांच्या यादीत समाविष्ट केले आहे.

डॉ. कामत यांना लहानपणापासून संगीताबद्दल ओढ होती. त्यांनी विद्यार्थिदशेत गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या शास्त्रीय गायनाच्या तीन परीक्षा दिल्या. घरातही, वडीलांच्या आवडीमुळे नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिका कानावर पडत. महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाल्यावर शास्त्रीय गायनाचे शिक्षण थांबले, परंतु तोपर्यंत शास्त्रीय आणि नाट्यसंगीतापर्यंत मर्यादित असलेल्या आवडीला, काही मित्रांच्या प्रभावातून वेगळे आयाम मिळाले. डॉ. कामत जुन्या हिंदी चित्रपटगीतांचे चाहते बनले. मात्र ही भूक भागवायला त्यावेळी मुबलक साधनसामुग्री उपलब्ध नव्हती. त्यांच्याकडे असलेले एकमेव साधन म्हणजे शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांनी बक्षीस दिलेला रेडिओ! जुन्या हिंदी गाण्यांचा दुर्मीळ खजिना म्हणजे रेडिओ सिलोन! सिलोनवरून रात्री प्रसारित होणारा ‘हमेशा जवाँ गीत’ हा कार्यक्रम म्हणजे जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांना पर्वणीच असायची! मात्र कामत यांचे तेवढ्यावर समाधान होत नव्हते. ही अवीट गोडीची गाणी आपल्याला हवी तेव्हा, हवी ती आणि हव्या तितक्या वेळा ऐकता यावी यासाठी या कार्यक्रमातली गाणी त्यांनी ध्वनिमुद्रित करून ठेवली. अशा प्रकारे, हळुहळू त्यांच्याकडे जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या २४७५ कॅसेट्स आणि स्पूल्सचा संग्रह जमा झाला. डॉ. कामत 1963-64 सालापासून या ध्‍वनिमुद्रिका जमवत आहेत.

शास्त्रीय संगीताचा शोध घेता घेता त्यांच्या छंदाचा प्रवास रेकॉर्डसकडे वळला. किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँ यांच्या शास्त्रीय गायनाच्या तीन-तीन मिनिटांच्या रेकॉर्डसपासून कामत यांनी ७८ आरपीएम स्पीडच्या तीन हजार रेकॉर्डस्, ईपी तीनशे पंचेचाळीस रेकॉर्डस, एलपी पाचशे रेकॉर्डस, अठ्ठ्याऐंशी स्पूल्स आणि दोन हजार चारशे पंचाहत्‍तर ऑडिओ कॅसेट्स असा समृध्द संग्रह जमा केला.

अनेक संग्राहकांच्या संग्रह जमवतानाच्या ‘दंतकथा’ वाटतील अशा आठवणी असतात. कामत यांनी बहुतांश संग्रह पदरमोड करून जमवला आहे. प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद अशा ठिकाणी दुर्मीळ रेकॉर्डस् उपलब्ध झाल्याचे कामत सांगतात. ज्या काळात रुपयालाही मोठी किंमत होती त्या काळात प्रसंगी एकेका रेकॉर्डला त्यांनी हजारो रुपये मोजून हा संग्रह जमवला आहे. दुर्मीळ रेकॉर्डस् मिळवून, त्यांचे जतन करून त्या शौकीन रसिकांना उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय बहुतेक मुस्लिम बांधवांनी जतन केल्याचे निरीक्षण कामत नोंदवतात.

कामत यांच्या संग्रहात वेगवेगळ्या कंपन्यांच्या आणि लाकूड, भुसा, प्लास्टिक यांपासून बनवलेल्या ध्वनिमुद्रिकांचा समावेश आहे. त्यांचा आकारही एक ते सोळा इंच असा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. त्यांच्या संग्रहात बहुतांश ध्वनिमुद्रिका शास्त्रीय व चित्रपटगीतांच्या असल्या तरीही कोका कोला, गोल्ड स्पॉट अशा शीत पेयांच्या; तसेच ५५५ सिगारेट, कोलगेट असा जुन्या जाहिरातींचे ध्वनिमुद्रणही त्यांच्याकडे आहे. याशिवाय महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, विन्स्टन चर्चिल, जे.एफ. केनेडी आदी जुन्या नेत्या-वक्त्यांच्या भाषणांच्या ध्वनिमुद्रिका या संग्रहाचे मोल कैक पटींनी वाढवतात. आशा भोसले, लता मंगेशकर, मुकेश, तलत आदी आघाडीच्या पार्श्वगायकांच्या पहिल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण या संग्रहात आहे. ‘दिल की रानी’ या चित्रपटासाठी एस.डी. बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनात साक्षात राजकपूर ने गायलेले गाणे, अभिनेत्री मीनाकुमारीने ‘बेहेन’पासून ‘पाकिजा’पर्यंत गायलेली गाणी, तसेच ‘पाकिजा’ चित्रपटातून वगळलेली गाणी, रविंद्रनाथ टागोरांच्‍या आवाजातील जनगणमन असलेली रेकॉर्ड अशा वैशिष्‍ट्यपूर्ण ध्वनिमुद्रिका ही कामत यांच्या संग्रहाची खासीयत. हिंदी, मराठीशिवाय, उर्दू, अवधी, मागधी, पूरबी, आसामी अशा तेहतीस भाषांमधल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकाही त्यांच्या संग्रहात आहेत. याचसोबत 16, 33, 45 आणि 78 आरपीएमच्‍या रेकॉर्डस्, विविध रंगांच्‍या आणि लेबलच्‍या रेकॉर्डही कामत यांच्‍या संग्रहात पाहण्‍यास मिळतात. कामत म्‍हणतात, की मुंबई, पुणे, दिल्‍ली अशा परिसरात माझ्याप्रमाणे अनेक व्‍यक्‍ती ध्‍वनिमुद्रिकांचा संग्रह करतात. मात्र प्रत्‍येकाची आवड वेगळी असते. कुणाला लताच्‍या रेकॉर्ड जमवणे आवडते, तर कुणाला शास्‍त्रीय संगीताच्‍या. या आवडीतून ठेवा निर्माण होत असला तरी अनेकदा यामुळे संग्रहाला मर्यादाही येतात. मी याबाबतीत न्‍यूट्रल राहून सगळ्या प्रकारच्‍या ध्‍वनिमुद्रिकांचा संग्रह करत राहिलो. त्‍यामुळे या संग्रहात विविधता आली. त्‍यामुळे ‘लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डस्’ने या संग्रहाची दखल घेतली.

एवढ्या समृध्द संग्रहाचा आनंद इतरांपर्यंत पोचवून तो द्विगुणित करण्यासाठी कामत ह्यांनी ‘सूरविहार’ या संस्थेची स्थापना 3 डिसेंबर 1992 रोजी केली. सुरुवातीला, विशिष्ट कलाकार किंवा विशिष्ट गीतप्रकार अशी संकल्पना घेऊन कामत यांच्या घरीच कार्यक्रम व्हायचे. मात्र रसिकांचा प्रतिसाद वाढत गेला तशी ही जागा अपुरी पडू लागली. मग ज्ञानेश मंगल कार्यालय, रामचंद्र सभामंडप, फर्ग्‍युसन महाविद्यालयाचे अँम्फी थिएटर अशा विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू झाले. कामतांच्या कार्यक्रमांच्या संकल्पनांनाही धुमारे फुटू लागले. हिंदी चित्रपटगीतांमध्ये ‘या हू’ किंवा ‘ला रा लाप्पा’ अशा शब्दांचा वापर केला गेला आहे की ज्यांना अर्थ नसतो, पण या शब्दांमुळे ती गाणी गाजली गेली. अशा गाण्यांवर आधारित ‘अनोखे बोल’ हा कार्यक्रम कामत हे केवळ संग्राहक नाहीत तर सच्चे रसिक आणि शोधक बुध्दीचे अभ्यासक आहेत याची साक्ष देतो. याबाबत कामत सांगतात, की मी विशिष्‍ट विषय घेऊन कार्यक्रम करीत असे. शामसुंदर, शंकर-जयकिशन, हेमंत कुमार, वसंत देसाई, एन दत्‍ता, मदनमोहन, जोहराबाई, सुरय्या, शमशाद बेगम, काननदेवी अशा वेगवेगळ्या व्‍यक्‍तींवर आधारित हे कार्यक्रम असत. या कार्यक्रमात जी गाणी पडद्यावर पाहण्‍यास मिळत नाहीत, ऐकण्‍यास मिळत नाहीत, अशी गाणी सादर केली जात असत. लता, आशा, रफी इत्‍यादी गायकांची गाणी प्रसिद्ध आहेतच, मात्र सोबत जोहराबाई, सुरय्या, शमशाद बेगम, काननदेवी यांच्‍या गाण्‍यांचा लेहजा, त्‍यांच्‍या उर्दूची ढब इत्‍यादी गोष्‍टींतील गोडी इतरांना समजावी हा यामागचा उद्देश असे.

पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरा होतो. मात्र सवाई गंधर्वाचे गुरू आणि किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँसाहेब यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम केला जात नाही ही बाब कामत यांच्या रसिक मनाला खटकली. खाँसाहेबांच्या साठाव्या पुण्यतिथीनिमित्त कामत यांनी २७ ऑक्टोबर १९९७ रोजी ‘अब्दुल करीम खाँ स्मृती समारोह’ आयोजित करण्याचा घाट घातला. पं. भीमसेन जोशी यांनीही या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला आणि एक ऐतिहासिक महत्त्वाचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात भीमसेन यांच्यासह फिरोज दस्तूर, सरस्वतीबाई राणे, गंगुबाई हनगल असे किराणा घराण्याचे अध्वर्यू उपस्थित राहिले. तेही केवळ श्रोते म्हणून! या सगळ्या दिग्गजांनी आपापल्या घराण्याच्या मूळ पुरुषाच्या गायनाचा निखळ आस्वाद घेतला. या कार्यक्रमानंतर, ‘भीमसेन मला कामत न म्हणता ‘खांसाहेबवाले’ असे संबोधायचे. त्यांनी दिलेली ही पदवी मला ‘भारतरत्न’ पेक्षाही मोलाची आहे’ असे कामत आवर्जून नमूद करतात.

आजकाल माहितीच्या महाजालात एका ‘क्लिक’वर जे हवे ते उपलब्ध असताना, दुर्मीळ असे काही राहिले आहे का; या प्रश्नावर कामत मिश्किलपणे हसले. जे खरोखर दुर्मीळ आहे ते माहितीच्या महाजालात निश्चितपणे उपलब्ध असणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. माहितीच्या महाजालासह अनेक नवी अत्याधुनिक माध्यमे उपलब्ध झाली असली तरीही त्यामुळे रसिकांची दृष्टी अधिक व्यापक होण्याऐवजी उलट संकुचित होत आहे अशी खंत ते व्यक्त करतात. सध्याच्या माध्यमांत जे उपलब्ध आहे त्यापलीकडे काही असूच शकत नाही या भ्रमात समृध्द सांस्कृतिक ठेव्याकडे समाजाचे दुर्लक्ष होत असल्याची सल त्यांच्या मनात आहे. रसिकांचा घटता प्रतिसाद, सभागृहांची वाढती भाडी, माध्यमांतून जाहिरातीसाठी मिळणा-या सवलतीत घट यामुळे पदरमोड करून विनामूल्य कार्यक्रम करण्याचे दिवस गेले, अशी खंत शहात्तर कार्यक्रमांतून आपला अनमोल खजिना रसिकांसमोर मांडणारे कामत व्यक्त करतात.

‘रिमिक्स’ प्रकारावर उलटसुलट वादविवाद सुरू असतात. मात्र जुनी गाणी नवे गायक आणि नव्या वाद्यवृंदासह नव्याने सादर करण्याची पद्धत जुनी आहे असे कामत म्हणाले. अनेक नामवंत गायकांनी जुन्या किंवा समकालीन अन्य प्रसिद्ध गायकांची गाणी गायलेल्या काही दुर्मीळ रेकॉर्डस् कामतांच्या संग्रहात आहेत. अशा ध्वनिमुद्रिकांना ‘व्हर्शन रेकॉर्डस्’ म्हणत. सन १९३८ मधल्या ‘धरतीमाता’ या चित्रपटातल्या गाण्यांपासून ‘व्हर्शन रेकॉर्डस्’ची पद्धत रूढ झाल्याचे कामत सांगतात. ‘भाभी’ या चित्रपटासाठी महंमद रफी यांनी गायलेले ‘चल उड जा रे पंछी’ हे गाजलेले गाणे ‘व्हर्शन’ स्वरूपात तलत मेहमूद यांच्या आवाजात त्यांच्या संग्रहात आहे. तसेच, गुरुदत्त यांची अजरामर कृती ठरलेल्या ‘प्यासा’ मधले ‘जिन्हे नाझ है हिंद पर वो कहां हैं’ हे महंमद रफी यांच्या आवाजातले गाणे मूळ मन्ना डे यांच्या आवाजात आहे. ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक राज खोसला हे गायक होते हे सिद्ध करणारी ‘अंदाज’ या चित्रपटातल्या गाण्यांची व्हर्शन रेकॉर्ड आहे. खोसला यांनी ‘अंदाज’ या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेली गाणी या रेकॉर्डमध्ये तितकीच उत्कृष्ट गायली आहेत. ‘जागते रहो’ या चित्रपटात मुकेश यांनी गायलेले ‘जिंदगी ख्वाब हैं’ हे गाणे ‘व्हर्शन’वर मन्ना डे यांच्या आवाजात असलेली रेकॉर्ड कामत यांनी दस्तुरखुद्द त्यांना दाखवली. त्यावर मन्नादा म्हणाले, की हे मूळ गाणे बंगाली आहे. ते मी सलील चौधरी यांच्या संगीत दिग्दर्शनात गायलेले होते. हिंदीतही हे गाणे मीच गाणार होतो; मात्र अभिनेता मोतीलाल यांच्या आग्रहामुळे ते मुकेश यांना मिळाले.

रेकॉर्डसची निर्मिती करणारी प्रसिद्ध कोलंबिया कंपनी एचएमव्हीमध्ये विलीन झाली. त्यानंतर एचएमव्हीने केवळ ‘व्हर्शन रेकॉर्डस्’ काढणारी ट्विन ही उपकंपनी स्थापन केली. या कंपनीच्या ‘व्हर्शन रेकॉर्डस्’ सहजपणे ओळखू याव्यात, म्हणून त्यांचे लेबलही एचएमव्हीच्या इतर रेकॉर्डसप्रमाणे गुलाबी रंगाचे न ठेवता काळ्या रंगात बनवण्यात आले अशी माहिती कामत देतात. तीन वर्षांपूर्वी मुरुड (जंजिरा) या ठिकाणाहून नामजोशी आणि आणखी काही मंडळी कामत यांच्याकडे आली. त्यांना आबिद हुसेन खाँ या बीनवादक शास्त्रीय गायकाबद्दल माहिती हवी होती. ते लोक खांसाहेबांच्या जयंतीनिमित्त संगीत समारोहाचे आयोजन मुरुडला करतात. त्यांना स्मरणिकेसाठी खाँसाहेबांच्या चित्रपट संगीतातल्या मुशाफिरीची माहिती हवी होती. कामतांनी पुण्यातल्या संगीतातल्या सगळ्या जाणकार मंडळींना विचारले. कुणाला त्यांचे नावही माहीत नव्हते. मुंबईच्या संग्राहकांकडील नोंदींवरून समजले, की खाँसाहेबांनी १९४९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आखरी पैगाम’ तथा ‘लास्ट मेसेज’ (मूळ नाव गांधीजी का आखरी पैगाम) या एकमेव चित्रपटाला संगीत दिले होते. त्यात त्या काळातल्या नामवंत पार्श्वगायकांनी गाणी गायली होती. त्यानंतर हा अवलिया कलाकार कोकणात माणगाव येथे स्थायिक झाला आणि त्यांनी महाड, रोहा, माणगाव, हरिहरेश्वर या भागात शास्त्रीय संगीताचा ज्ञानयज्ञ सुरू ठेवला. अशा विलक्षण कलाकाराची ओळख या छंदामुळे झाल्याबद्दल कामत यांना धन्यता वाटते.

प्रकाश कामत यांनी आपल्‍याकडील काही दुर्मिळ गाणी डिजीटली रूपांतरीत करण्‍याचा प्रयत्‍न केला, मात्र एकूण ठेवा एवढा प्रचंड आहे, की हे काम एकट्याला झेपण्‍यासारखे नाही. कामत जुन्‍या आठवणींना उजाळा देताना सांगतात, की पूर्वी या कार्यक्रमांची लोकांना क्रेझ असे. या जुन्‍या ठेव्‍याचं लोकांना अप्रुप वाटत असे. मात्र आता जमाना बदलला. एमपी-3 चे युग आले. ग्रामोफोनवर गाणी ऐकताना रेकॉर्ड बदलत रहावी लागते. सीडी आणि डिव्‍हीडीमुळे या गोष्‍टी सोप्‍या झाल्‍या. बसल्‍याजागी किंवा काम करताना गाण्‍यांचा आस्‍वाद घेता येऊ लागला. कामत यांनी सुरू कलेल्‍या ‘सूरविहार’ या संस्‍थेकडून केले जाणारे कार्यक्रम शहात्‍तरच्‍या संख्‍येवर थांबले. आता हे कार्यक्रम होत नाहीत. लोकांना ग्रामोफोनमध्‍ये तेवढा इंटरेस्‍ट राहिलेला नाही. त्‍यातच ग्रामोफोन ही ‘अँटिक’ गोष्‍ट झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या किमती पाच ते दहा हजाराच्‍या घरात गेल्‍या आहेत. सोबत रेकॉर्डही तेवढ्याच महाग. त्‍यामुळे एखाद्याला आवड असली, तरी तो ग्रामोफोनकडे वळत नाही. त्‍यातच ग्रामोफोनचे पार्टही मिळत नाहीत आणि रिपेअर करणा-या व्‍यक्‍तींना त्‍याचे ज्ञानही नाही. त्‍यामुळे ग्रामोफोन आणि रेकॉर्डस् इतिहासजमा झाल्‍या आहेत. मात्र, एमपी-3ने गाणी ऐकणे कितीही सुलभ झाले असले, तरी ग्रामोफोनवर रेकॉर्ड फिरताना पाहत जुन्‍या काळाच्‍या सुरावटी ऐकणे हा एक वेगळाच अनुभव असतो, असे कामत सांगतात.

 

डॉ. प्रकाश कामत
9689996999, 9890115919, दूरध्‍वनी – 02025655112

– श्रीकांत टिळक

About Post Author