‘दिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी,
गायी-म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या‘ … ||
या ओळी आठवतात आणि दिवाळीच्या आठवणी मनाला प्रसन्न करून जातात. सगळ्या सणांमध्ये आतुरतेने वाट पाहण्यास लावणारा, उत्साह वाढवणारा दिव्यांचा हा सण. मराठवाड्यात दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे. ‘दिवाळी दिवाळी आन्घुलीची जल्दी करा, आजमारील नरकासूरा, किसनदेव||’ ‘गायी-म्हशीने भरले वाडे, दह्यादुधाने भरले डेरे, बळीचे राज्य येवो||’ अशा प्रकारच्या ओव्यांतून वा गाण्यांतून मराठवाड्यातील लातूरला दिवाळीचे प्रतिबिंब दिसते. मराठवाड्यातील काही भागांत लहान मुले मातीचा किल्ला तयार करतात तर मुली भांडीकुंडी (खेळणी) मांडतात. लातूर या ठिकाणी प्रत्येक देवाच्या मंदिरात ‘अन्नकूट‘ हा प्रसाद मोठ्या प्रमाणात केला जातो. त्या प्रसादात सर्व पालेभाज्या, फळभाज्या, सुका मेवा, फळे यांचे एकत्र मिश्रण असते. म्हणूनच त्याला अन्नकूट असे म्हणतात.
‘दसऱ्यापासूनदिवाळी इस रोज वाट पाहते बंधुराया नित रोज |’ या लोकगीतामध्ये दिवाळीचे वर्णन ऐकताना त्या सणाची आतुरता एकाद्या सासुरवाशिणीला कशी असे त्याचा प्रत्यय येतो. कारण त्या सणात, एकूणच सहा दिवसांच्या उत्सवात माहेरवाशिणीला प्रेम, माया मिळते. सोबतच, नातेसंबंधातील जिव्हाळा जतन होतो. एवढेच नव्हे तर घरातील पाळीव प्राण्यांविषयी ममत्व भावदेखील त्यात दिसून येतो.
वसुबारस– भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. त्या दिवशी गायीची पाडसासह पूजा करतात. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालून हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहतात व गायीच्या कपाळाला दही लावतात. बाजरीची भाकरी, शेंगदाण्याची गोड पोळी, राळ्याचा भात, वरण, मेथीची भाजी असा नैवेद्य गायीला खाऊ घालतात. तसेच, त्या दिवसापासून दिवाळीचे पाच दिवस सकाळी घरासमोरील अंगणात शेणाने सारवून शेणाच्या गौळणी करतात. त्यांच्यासमोर रांगोळी काढून त्याची पूजा करतात. त्या दिवसापासून सायंकाळी पणत्या लावल्या जातात.
धनत्रयोदशीलास्त्रिया पहाटे लवकर उठून, सुवसिक उटणे लावून, अभ्यंगस्नान सूर्योदयापूर्वी करतात. त्याच दिवशी सायंकाळी रस्त्यावर (चौकात) पणती लावून तिच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात व दिव्याला नमस्कार करतात.
नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे, सूर्योदयापूर्वी घरातील पुरुषांना सुवासिक उटणे लावतात. त्यांच्या कानात गरम तेल टाकतात आणि अभ्यंगस्नान घालतात. विवाहित पुरुषास आंघोळ झालेल्या ठिकाणी (स्नानगृहात) कणकेचा दिवा व मुटका यांनी ओवाळतात. ओवाळताना ‘इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो‘ असे म्हणतात. आंघोळ झाल्यानंतर पुरुषांना शेवयाचा भात व दसरा या सणाला केलेली ‘कडाकणी‘ (पापडाच्या आकाराचा गोड पदार्थ) खाण्यास देतात. त्याच दिवशी शौचालयात एक दिवा लावतात.
बलिप्रतिपदाहा सण दिवाळीचा पाडवा म्हणूनही ओळखतात. पुरुषांचे अभ्यंगस्नान त्या दिवशीदेखील असते. शेतकरी त्यांच्या शेतात एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन जातात व ते मडके शेतात पुरतात. व्यापारी लोक पाडव्याच्या दिवशी दुकानात वह्यांची पूजा करतात. नवीन वह्यांना हळद-कुंकू, गंध, फुले, अक्षता वाहतात व मुरमुरे, बत्ताशे प्रसाद म्हणून वाटतात.
भाऊबीजेच्यादिवशी बहीण भावाला ओवाळते. ओवाळणीचा दिवा कणकेचा केलेला असतो. तसेच, बहीण भावाला पानसुपारी व करगोटा (काळा दोरा – कंबरेभावती बांधण्याचा) देते. त्या दिवशी घरासमोरील अंगणात शेणाचे पाच पांडव केले जातात. त्यांची पूजा केली जाते. तसेच, त्या दिवशी सायंकाळी पांडवांसमोर दूध गरम करतात व ते दूध कोणत्या दिशेस ऊतू जाते त्या दिशेस त्या वर्षी पीक सर्वात जास्त येते असे मानतात. त्याच अग्नीत हरभरे व खोबरे भाजून घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात.
दिवाळीचे असे हे सहा दिवस वर्षभर वाट पाहण्यास लावतात आणि आल्यानंतर भर्र्कन निघून जातात. लोक आनंदात न्हाऊन तृप्त होतात. ती तृप्तता वर्षभर पुढे त्यांना सकारात्मक ठेवत असते. म्हणून असे म्हटले जाते, की ‘दिवाळीसण मोठा नाही आनंदास तोटा!’
– स्नेहा वाघमारे 9511744800
waghmaresneha567@gmail.com
स्नेहा वाघमारे यांना भाषेची आवड असल्याने त्यांनी भूगोल आणि मराठी या विषयांत एम ए केले आहे. तसेच, त्यांचे बी एड चेही शिक्षण झाले आहे. त्यांना कादंबरी वाचनाची आवड आहे. त्या लातूर शहरात राहतात.
—————————————————————-——————————