जखिणवाडी या गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. गाव खुद्द शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. तसेच, छत्रपती शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले तेव्हा त्यांचा महाराणी ताराबाई यांच्याशी संघर्ष झाला होता. त्यावेळी तह जखिणवाडी गावी झाला होता. त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या. एक सातारची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. तो ‘वारणेचा तह’ म्हणून प्रसिद्ध आहे. तह 13 एप्रिल 1731 रोजी झाला. त्यांपैकी काही अटींचे पालन झाले तर काहींचे नाही. तहाची आठवण म्हणून शाहुराजांनी गावाला दोन तलवारी भेट दिल्या होत्या. त्या गावच्या मळाईदेवी मंदिरात आहेत.
जखिणवाडी गाव हे सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. ते साताऱ्यापासून बासष्ट किलोमीटरवर आहे. गावातील कुटुंबांची संख्या सातशेसत्तर असून लोकसंख्या तीन हजार सातशे आहे. गावात जखणाईदेवीचे मंदिर आहे. देवीच्या त्या नावावरून गावाला जखिणवाडी हे नाव पडले.
गावात सर्व लोक सुशिक्षित आहेत. गावातील लोक शेती व शेतीपूरक व्यवसाय करतात. गावातील लोक जवळपासच्या शहरांत नोकरीकरता जातात. गावात पारंपरिक मर्दानी खेळ दांडपट्टा खेळला जातो.
गावात मळाईदेवीची यात्रा रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. सर्व घरांची साफसफाई वर्षातून दोनदा यात्रेच्या आधी; तसेच, दसऱ्याला करण्यात येते. घरातील सर्व वस्तू बिछान्यासहित धुतल्या जातात. ती गावाची परंपरा आहे. गावात मोठा उत्सव दसऱ्याला असतो. रंगपंचमी गावाच्या वेशीवर आणि गावात विविध ठिकाणी रंगांचे मोठे ड्रम (पिंप) ठेवलेले असतात. जी कोणी व्यक्ती तेथून जाते. तिला सरळ उचलून ड्रमात बुडवले जाते. त्यानंतर गावातून बैलांच्या गाड्या शर्यतीसाठी पळवल्या जातात. गाडीमध्ये आंबील असते. काही ट्रॅक्टरही त्यात सहभागी होतात. त्यावेळी लोक बैलांवर व गाडीवानांवर रंग टाकतात. काही लोक ट्रॅक्टरमधून गावात फिरत असताना, लोकांवर रंग टाकतात. तो कार्यक्रम सायंकाळी सहा-सात वाजेपर्यंत संपतो. त्यानंतर सर्वांची पालखीसाठीची तयारी सुरू होते. मळाईदेवी मंदिरात लगबग चालू होते.
धनगरांच्या ओव्या रात्री दहा वाजल्यापासून मंदिरासमोर गात असतात. त्यातून प्रबोधनपर संदेश दिले जातात. भैरोबा, बिरोबा आणि मळाईदेवी पालखीत असतात. पालखी रात्री बारा वाजता मंदिरातून निघते. लोक दिवट्या व सासनकाठ्या पालखीच्या पुढे घेऊन चालत असतात. सासनकाठ्या नाचवण्यास सुरुवात होते. अब्दागिरीही पालखीसोबत असतात. पालखीच्या मागे पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. लोक नाचतात, त्यापाठी अनेक वेगवेगळी साउंडपथके असतात. सर्व पथकांत गाणी म्हटली जातात. प्रत्येक पथकामागे ज्याला जी गाणी आवडतात त्यानुसार लोक आकृष्ट होऊन नाचतात. पालखी ठरावीक ठिकाणी थांबते. तेथे वेगवेगळे संघ दांडपट्ट्याचे चित्तथरारक प्रकार करतात. त्यात सर्व वयोगटांतील- अगदी पाच-सहा वर्षांपासूनची मुले–मुली, तरूण-तरूणी सहभागी होतात. तो कार्यक्रम दोन तास चालतो. त्यानंतर पालखी पुढे जाते. त्या पालखीचा प्रवास रात्रभर चालतो.
सर्वांची पावले पहाटेपासून मंदिर परिसराकडे चालू लागतात. पालखी सकाळी सात-आठ वाजेपर्यंत गावाला वेढा घालून मंदिरात येते. त्यावेळी सर्व ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळी गुलाल-खोबरे पालखीवर टाकण्यासाठी जमतात आणि मंदिरात पाया पडून त्यांच्या त्यांच्या कामाला लागतात. गावाची प्रथा आहे, की जोपर्यंत पालखी म्हणजे छबिना मंदिरात जात नाही तोपर्यंत गावात मटण आणत नाहीत. शहरांत राहणारे सर्व गावकरी लोक त्या यात्रेकरता उपस्थित असतात; आजूबाजूच्या गावांतील तसेच सातारा-सांगलीहूनही भाविक यात्रेसाठी येतात. त्याखेरीज गावात विठ्ठलरूक्मिणीचे, बिरोबाचे व लक्ष्मीचे अशी मंदिरे आहेत. दसरा आणि दिवाळीत मेंढरे पळवण्याची प्रथा आहे. मेंढरे मंदिरापासून संपूर्ण गावाला वेढा घालतात. त्यांच्यावर गुलाल उधळला जातो. गावात अशी प्रथा आहे की लग्न ठरवताना पहिली साडी देवीसाठी काढली जाते. लग्नानंतर गुरविण्या ठेवल्या जातात. त्यावेळी सर्व गुरवांना पुरणपोळीचे जेवण केले जाते. गावातील गुरव देवाचे पुजारी आहेत. नवरात्रात गावातील बहुसंख्य लोक कडक उपवास धरतात आणि देवीची आराधना करतात. त्या काळात ते केवळ रात्री फलाहार करतात.
गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. ती दहावीपर्यंतच आहे. विद्यार्थ्यांना पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी कराडला जावे लागते. कराड हे शहर जखिणवाडीला जवळचे आहे. गावात शाळेच्या वेळी एसटी येते. कराडहून जखिणवाडी हायवेपर्यंत एसटी व ‘डुगडूगी’ येते. गावाला जवळचे रेल्वे स्टेशन कराड हे आहे.
गावापासून जवळच असलेल्या डोंगरावर प्राचीन लेणी आहेत. तेथे जाण्यासाठी गावातून रस्ता आहे. डोंगराच्या मध्यावर भैरोबाचे मंदिर आहे. तेथे प्रवेश करताना बारमाही थंड असलेल्या स्वच्छ पाण्याच्या टाक्या (वोहुरे) आहेत. त्या डोंगराचा आकार ओमसारखा आहे. डोंगरावर अनेक प्रकारची झाडे आहेत. डोंगरावर श्रावण महिन्यात यात्रा असते. पर्यटक तेथे येत असतात. गावापासून जवळच दोन किलोमीटर अंतरावर तालुक्यातील सर्वात मोठे कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज व संशोधन केंद्र आहे.
अहिल्यानगर, कोयनावसाहत, मलकापूर, नांदलापूर ही जखिणवाडीच्या दोन-तीन किलोमीटर परिसरातील गावे आहेत.
माहिती स्रोत – शालन यादव, छायाचित्रे – विनायक यादव
– नितेश शिंदे
शिंदे साहेब आपण जे कार्य करत…
शिंदे साहेब आपण जे कार्य करत आहात ते खूप छान आहार तुमचे आभार मानावे तितके कमी आहे,,तुमची मांडणी खूप पद्धतशीर आहे,,,
धन्यवाद
मळाई -भैरवनाथाच्या नावान…
मळाई -भैरवनाथाच्या नावान चांगभल
माझ्या आजोळची फारच छान…
माझ्या आजोळची फारच छान माहिती दिलीत. धन्यवाद.
Very true and important…
Very true and important information about Jakhinwadi Village.
मळाई -भैरवनाथाच्या नावान…
मळाई -भैरवनाथाच्या नावान चांगभल
मळाई -भैरवनाथाच्या नावान…
मळाई -भैरवनाथाच्या नावान चांगभल