घराणी सिनेमाक्षेत्रात अनेक होऊन गेली; अजूनही आहेत. सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय ही क्षेत्रे कमीजास्त ग्लॅमरची; लोकांच्या मनी आकर्षण असलेली. परंतु त्या कलावंतांची तशी प्रसिद्धी करणारे जे चित्र कलाकार पडद्यामागे काम करतात ते मात्र दुर्लक्षित राहतात, उपेक्षित असतात.
दादासाहेब फाळके यांच्यापासून (1913) भारतात चित्रपटनिर्मिती सुरू झाली. चित्रपट खेळांची (शोज) जाहिरात आरंभीची काही वर्षे साधे फळे लावून, भिंती रंगवून, चौकाचौकात दवंडी देऊन करत असत. पुढे चित्रपटांची प्रसिद्धी होर्डिंग्ज व पोस्टर या माध्यमातून होऊ लागली. पोस्टर व बॅनर हे चित्रपट प्रसिद्धीचे सर्वात प्रभावी साधन मानले जाई आणि तसे ते जवळ जवळ सहा दशके राहिले. इलेक्ट्रॉनिक माध्यमे आल्यावर होर्डिंग्ज व पोस्टर यांचा जमाना संपला. होर्डिंग्ज चौकटींच्या पक्क्या आधारावर खुल्या अवकाशात प्रदर्शित केलेली असत आणि पोस्टर शहरा-गावांमध्ये भिंतींवर आणि खांबांवर लावली जात. बॅनर व पोस्टर हे दोन्ही प्रकार चित्रकारांना पूर्णत: हातांनी वेगवेगळ्या नंबरांच्या कुंचल्यांच्या सहाय्याने तयार करावे लागत. पण ते फलक आणि ती पोस्टर हवी त्या आकारात बनवण्यासाठी प्रथम चितारली तर पाहिजेत. ती चित्रे काढणारे, त्यासोबत जरूर ते अक्षरांकन करणारे चित्रकार असत. त्यांच्यासाठी खास ‘कॉपी’ (शब्दांकन) लिहिली जाई. तशा चित्रकारांचा मोठा व्यवसाय सिनेमाक्षेत्रात होता.
मात्र ते कलाकार उपजत असत व अनुकरणाने तयार होत. प्रशिक्षण वगैरे गोष्टी नव्हत्या. पोस्टर वा हाताने चित्रांकन करून त्या चित्रकृतीचा जाहिरातीकरता उपयोग करण्यासाठी वापरताना कलाकाराच्या अंगी महत्त्वाचे तीन गुण हवे असत- 1. हुबेहूबता – लाईकनेस, 2. रंगसंगती – कलरस्किम आणि 3. आकर्षकता – ॲट्रॅक्टिव्हनेस. नटनट्यांची व्यक्तिचित्रे हुबेहूबपणामुळे अस्सल वाटत व त्यांचे ग्लॅमर बनण्यास मदत होई. रंगसंगती व आकर्षकता हे दोन्ही गुण हातात हात घालून येत व तसे प्रकट होत.
पोस्टरचे आकार – 20// × 30// हाफशीट, 30// × 40// फूल किंवा सिंगल शीट, 30// × 80// किंवा 60// × 40// डबल शीटस्, 90// × 40// दोन शीटस्, 60// × 120// सिक्स शीटस् असे असत. ते आकार नक्की होण्याचे कारण छपाईसाठी पोत आणि टिकाऊपणा या दृष्टीने योग्य असा कागद 30// × 40// या आकारातच उपलब्ध होई. त्यातून चित्रकलेसाठी हे गणिती आकार बनवले गेले. जगातील प्रमाण व परिमाण कसे ठरते याचा तो उत्तम नमुना होय.
सिनेमांची प्रसिद्धी करण्यासाठी पोस्टर्सची संख्या किमान तीन ते पाच हजार एवढी छापणे आवश्यक असे. तेथेही शहरविस्तार लक्षात घेत, उपनगरे, तसेच जिल्हा-तालुका व गावांची लोकसंख्या यानुसार आणि चित्रपटाची अपेक्षित लोकप्रियता लक्षात घेऊन पोस्टर्सचा आकार व त्यांची संख्या वाढवत न्यावी लागे. चित्रकारांचे ‘मानधन’ हे चित्रकाराच्या कामाच्या दर्ज्यानुसार स्वतंत्रपणे ठरवले जाई. चित्रकार रक्कम प्रत्येक आकारमानाच्या पोस्टरच्या नगाप्रमाणे मागत असे. निर्माता तशी रक्कम त्याला देत असे. प्रत्येक निर्मात्याचा चित्रकार (डिझायनर) ठरलेला असे. तो सहसा बदलत नसे. तसे संबंध-व्यवहार चित्रपट उद्योगात वर्षानुवर्षे व पिढ्यानुपिढ्या चालत आलेले आहेत.
चित्रपटनिर्मितीचे श्रेय दादासाहेब फाळके यांचे. पण चित्रपटाला वास्तववादी चौकट दिली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी. विषयांचे वैविध्य आणले भालजी पेंढारकर आणि ‘प्रभात फिल्म कंपनी’ यांनी. महाराष्ट्रातील चित्रपटनिर्मितीची प्रमुख केंद्रे होती मुंबई, पुणे व कोल्हापूर. देशातील चित्रपट निर्मिती महाराष्ट्रासोबत मद्रास (चेन्नई) व कोलकाता याही ठिकाणी सुरू झाली. पोस्टर व बॅनर चित्रकलेतील 1924 ते 1989 ही पासष्ट वर्षे म्हणजे रंगरेषांचा ‘महायज्ञ’च होता. तो 1990 नंतर निवांत झाला, असे वर्णन चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी सुबोध गुरुजी यांनी संकलित केलेल्या ‘पाऊलखुणा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केले आहे. सुबोध गुरुजी यांनी स्वत: त्यास ‘मानवी स्पर्श संपला’ असे समर्पक रीत्या म्हटले आहे.
चित्रपट प्रसिद्धीचे तंत्र 1990 नंतर बदलले, होर्डिंग्ज बाद झाली. इलेक्ट्रॉनिक साधने हाती आली. मागणी कमी होत गेली. पोस्टर आणि बॅनर कलाकारांपैकी कोणी निवृत्त झाले, तर कोणी निर्वतले. त्यानंतर काळ बदलला. सुबोध गुरुजी यांनी म्हटले आहे, “हाताने रंगकाम करून येणाऱ्या परिणामाची – रंगांच्या श्रीमंतीची किंमत, तिचे मोल ह्या सर्वांची कदर संपली ! या पासष्टाव्या कलेची गरज उरली नाही.” इतिहासक्रमात त्या कलावंतांचा फक्त पासष्ट वर्षांचा कालखंड ! त्या कलावंतांचे ना रक्ताचे वारस त्या क्षेत्रात आले, ना कलेचा वारसा घेऊन कोणी कलावंत पुढे आले.
पोस्टर कलाकारीत सुबोध यांचे वडील हरिभाऊ लक्ष्मण गुरुजी हे फार कुशल मानले जात. मात्र ते त्या व्यवसायात योगायोगानेच आले. त्यांचे मूळ घराणे जोशी-राजोपाध्ये. ती मंडळी बडोद्याच्या दरबारात पौरोहित्य करत. त्यामुळे तेथे त्यांना ‘गुरुजी’ असे संबोधत. हरिभाऊ गुरुजी त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी मुंबईत आले. तेथेही ते पौरोहित्य करत. परंतु त्यांचे हस्ताक्षर सुंदर होते. त्यामुळे त्यांना ‘मुक्तागिरी पेंटर्स’ यांनी फलक लिहिण्याचे काम दिले. त्यानी ‘ड्युक्स’ कंपनीचे फलक इतके छान लिहिले, की त्यांना कंपनीने नोकरीतच ठेवले. तथापी गुरुजी तेथे एकाच ठिकाणी रमू शकले नाहीत. त्यांनी नोकरी सोडून तोच व्यवसाय सुरू केला. प्रसिद्धी, जाहिरात आणि तत्संबंधीचे सर्व काही करणारे, मातब्बर असे घराणे ठरले पुढे गुरुजी यांचे. हरिभाऊ जसा सिनेमा तशी त्याची अक्षरे निर्माण करत. अक्षरलेखन ही त्यांची हातोटी. त्यातून आशयाला व्यक्तिमत्त्व प्राप्त होई ! तसे कौशल्य होते त्यांचे- त्यांनी निर्माण केलेल्या समर्थ आर्ट्सकडे ! त्यांचे वर्णन चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी ‘गुरुजी घराण्यातील तमाम ‘गुरुजी’ कलेत पार रंगलेले आहेत. त्यांच्या बोटांना, हातांनाच नाही तर त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला रंग लगडले आहेत.’ असे केले आहे. वास्तवात असे गुरुजी चारच जण होते – स्वत: हरिभाऊ आणि त्यांचे तीन मुलगे – सुबोध, प्रमोद व विनोद.
हरिभाऊ दगडीवाडीत राहत. पण लवकरच ते दादरला प्लाझा सिनेमाच्या पुढे राहण्यास आले. तेथेच त्यांनी चित्रकलेचा उद्योग समर्थ आर्ट सर्विसेस या नावाने सुरू केला! त्यांनी पौरोहित्य चालू ठेवले होते. हरिभाऊ आणि त्यांचे तीन मुलगे यांच्यामुळे ‘समर्थ आर्ट्स’ ही कलासंस्था नावारूपाला आली. सुबोध पुण्यामध्ये राहून स्वतंत्र व्यवसाय करतात, प्रमोद चित्रपट प्रसिद्धीच्या व्यापक उद्योगात गुंतले गेले होते. ते 1996 साली अकाली निधन पावले. त्यांच्या पुढील पिढ्या मात्र चित्रकलेशी संबंधित व्यवसायात नाहीत. एकूण सिनेमा व्यवसायात पोस्टर प्रसिद्धी कला सहा दशके झळाळून उठली त्यांतील चार दशके तरी गुरुजी मंडळींनी त्या व्यवसायावर वर्चस्व गाजवले. पण त्या काळात पामार्ट, दिवाकर करकरे यांची कलासंस्था असे आणखी काही पोस्टर-बॅनर व्यवसाय गाजवून गेले.
चित्रपट उद्योगात चित्रफलक रंगवणाऱ्या या कलाकारांना प्रतिष्ठा मात्र मुळीच नव्हती. त्यांच्या कामाचे स्वरूप मजुरीचे असल्यासारखे गणले जाई. त्यांना पहिल्या उत्सवी खेळाचे आमंत्रणदेखील मिळत नसे. महोत्सवात सहभाग, शंभरावा दिवस/पंचवीस आठवडे यांच्या भेटवस्तू, स्मृतिचिन्ह अशांपासून तर ते कोसो ‘दूर’ राहत. त्यांची गणती कोणी कधी केली नाही, त्यांच्या कामाची ऐतिहासिक महत्त्वाची नोंद सुबोध गुरुजी यांनी पुस्तकात करून ठेवली आहे, तेवढीच. त्यात या क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराचे चित्रचरित्र थोडक्यात निर्देशित केले आहे. सुबोध गुरुजी यांनी त्या सोबत त्यांनी चितारलेल्या पोस्टरांचे नमुनेही प्रसिद्ध केले आहेत. बोलपट 1930 नंतर आले. ‘आलम-आरा’ (1931) व ‘अयोध्येचा राजा’ (1932) हे पहिले अनुक्रमे हिंदी आणि मराठी बोलपट होत. त्यानंतर त्या पहिल्या दशकातील (1941- 42 पर्यंतच्या) काही प्रमुख चित्रपटांची पोस्टर्स व त्यांचे कलाकार यांची नोंद पुस्तकात आहे.
सुबोध गुरुजी हे स्वत: चित्रपट प्रसिद्धीचे उत्तम साहित्य निर्माण करत. त्यांनी चित्रपटांची पोस्टर जमा करण्याचा छंद बाळगला. त्यातून हे पुस्तक सिद्ध झाले. त्यांना उपलब्ध झालेले पहिले पोस्टर हे 1924 सालचा मूकपट, ‘कल्याण खजिना’चे आहे. त्यावर चित्रकाराचा खरे वा खिरे असा नामोल्लेख आहे. दुसरे ‘सती सावित्री’ या 1927 सालातील चित्रपटाचे आहे. त्यांची छपाई एस.बी. लिथो, ओगलेवाडी येथे झाली असा उल्लेख त्या पोस्टरांवर आहे. अशी बरीच मनोरंजक माहिती ‘पाऊलखुणा’ या पुस्तकात आहे. सुबोध हरिभाऊ गुरुजी यांचे शिक्षण जी डी आर्ट (उपयोजित) झाले आहे. त्यांनी कला दिग्दर्शन, स्थिरचित्रण, प्रसिद्धीकला म्हणून मराठी, हिंदी, गुजराती या भाषांतील पंचेचाळीसहून अधिक चित्रपटांचे काम केले आहे. त्यांनी मुंबई व दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात चित्ररथ संकल्पना व उभारणी करून अकरा वेळा सहभाग नोंदवला आहे. त्यामध्ये नऊ वेळा प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे. त्यांनी साहित्य संमेलने, नाट्य संमेलने, जागतिक मराठी परिषद, बाबुराव पेंटर, अबालाल रहेमान आणि बालगंधर्व यांच्या जन्मशताब्दी या सर्व कार्यक्रमांनिमित्त रंगमंच व परिसर सजावट केली आहे. त्यांची विविध मानचिन्हांसाठी- आयफा, जागतिक मराठी परिषद वगैरे संकल्पना व चित्रांकने आहेत. त्यांची चित्रप्रदर्शने अनेक कलादालनांत झाली आहेत.
सुबोध गुरुजी 9850966207
– टीम थिंक महाराष्ट्र