महाराष्ट्रात निरनिराळ्या मुख्य जातींना जवळच्या अशा पोटजाती आहेत. त्या मुख्य जातींनी त्यांच्या पोटजातींच्या एकीकरणाच्या चळवळी चालवल्या पाहिजेत. जातिभेदनाशाची पहिली व्यवहार्य व परिणामकारक पायरी म्हणून व पोटजातींच्या सामाजिक गरजा भागवण्यासाठी म्हणून पोटजातींच्या एकीकरणाची आवश्यकता आहे ! त्यासाठी पद्धतशीर चळवळ केली पाहिजे. ते कार्य ‘आता हे सर्व होणारच आहे’ अशी आरोळी ठोकून पळून जाण्याने होणार नाही किंवा ‘ते कार्य अशक्य आहे. उगाच आपली शक्ती खर्च केली जाते’ हे म्हणणेही योग्य ठरणार नाही. पोटजातींच्या एकीकरणाची चळवळ अभ्यासपूर्वक व समाजाच्या कलाने चालवली पाहिजे. ती वरच्या वर्गातून खालच्या वर्गापर्यंत पायरी पायरीने उतरत आली पाहिजे. ती स्त्रिया, प्रौढ, मुले यांत पसरली पाहिजे. त्यासाठी सभा, संमेलने, पुढाऱ्यांचे दौरे, सहली, खेळ, पत्रके, वर्तमानपत्रे ही साधने आहेत. त्या साधनांचा योग्य उपयोग करून चळवळ चिकाटीने चालवली पाहिजे. झटपट गुण येण्याची आशा धरू नये. एकीकरण झालेल्या जातींत एक मध्यवर्ती संस्था असावी. तिने प्रत्येक गावात तिची शाखा स्थापन करावी. त्या संस्थेने आरंभी एकीकरण दृढतेचे व नंतर समाजोन्नतीचे काम हाती घ्यावे. ती संस्था नव्याने एकत्र झालेल्या समाजाचे संबंध अधिक जवळ आणील.
ज्या संस्था उदारमताच्या व कृतीने पुरोगामी वळणाच्या आहेत, त्यांना पोटजातींच्या एकीकरण चळवळीला फार साहाय्य करता येईल. एकीकरणकारांनी अशा संस्थांचे साहाय्य अवश्य घ्यावे. मध्यवर्ती संस्था त्या पोटजातींची एकमेव असेल तर फारच मोठे कार्य करू शकेल. तशा संस्थांनी एकीकरणाचा ठराव पास केला, की ती पोटजात संपूर्णपणे एकीकरणात सामील झाली असे म्हणता येईल. त्या संस्थेतील कार्यकर्त्यांना एकीकरणाच्या विशाल क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. संस्थांच्या अधिवेशनांना एकीकरणाने जवळ आलेल्या जातींना बोलावता येईल. त्यामुळे दळणवळण वाढेल, स्नेह वाढेल, नवनवी माणसे आल्यामुळे समाजात उत्साह वाढेल व एकंदरीत त्या संस्थेचीही भरभराट होईल. एककीकरण झालेल्या पोटजातींच्या संस्थांनी त्यांचे अस्तित्व राखून इतके करण्यास काहीच हरकत नाही. असे साहाय्य ज्या एकीकरण चळवळीला मिळेल ती लवकर यशस्वी होईल !
वास्तविक एकीकरण झाल्यानंतर परकेपणाची भावना साफ निघून गेली पाहिजे. तू आणि मी एक; आता, आपण निराळे नाही. तर तुझी व माझी संस्था निराळी कशी असेल? जातीच्याच संस्था ना ह्या ! मग एक झालेल्या त्यांच्या समाजातील कोणाही व्यक्तीला मी ‘माझ्या समजल्या जाणाऱ्या’ संस्थेत येऊ देईन. माझ्याइतकाच त्याला भाग घेऊ देईन. का ते फंडात भागीदार होतील अशी शंका मनात येईल? होईनात ! त्यांचेच ना ते !सर्वांचा काला… एकत्र करून गवळ्यांच्या मुलांप्रमाणे थोडा थोडा खाऊ. कृष्णाचे वंशज ना आम्ही ? सर्वांना जवळ करण्याएवढे मोठे मन केल्यानंतर ही क्षुद्र वृत्ती का? माणसापेक्षा पैसा का श्रेष्ठ आहे? माणसे एकत्र आली, संघटित झाली तर असलेल्या पैशांच्या शतपटीने पैसा निर्माण करतील. संघशक्ती काय करू शकत नाही !असे विचार एकीकरणाने भारलेल्या मंडळींच्या मनात आले पाहिजेत. त्या मंडळींचे वजन त्यांच्या सामाजिक संस्थेत असले तर त्यांनी ती संस्था एकीकरण झालेल्या सर्व जातींत खुली करावी. एकीकरण चळवळीला साहाय्य करण्याची पोटजातींच्या संस्थेची ही परमोच्च पायरी होय. मात्र एकीकरणाची चळवळ चालवणाऱ्यांनी तितकी अपेक्षा लगेच करू नये. सहसा इतकी तयारी एकदम होऊ शकत नाही. त्यांच्या कार्यास त्या संस्थांनी नुसता पाठिंबा दिला तरी पुष्कळ झाले.
प्रत्येक समाजात एक फार मोठा उदासीन गट असतो. समाजातील कोणत्याही चळवळीचा त्याच्यावर सहसा परिणाम होत नाही. तो समाज खेड्यात असला व तो ज्या पोटजातीशी एकीकरण करायचे त्या जातीपासून दूर बसत असला तर त्याच्यावर त्या चळवळीचा काहीही परिणाम बरेच दिवस होणार नाही. तेव्हा अशा लोकांना एकीकरण मान्य होणार नाही. त्यांना हा विचार सबगोलंकार आहे असे वाटेल वगैरे विरोधकांचे जे म्हणणे आहे ते अयोग्य आहे.
चळवळीचे यश एकीकरणाची चळवळ बोलावणाऱ्या पुढाऱ्यांच्या व पुरस्कर्त्यांच्या गुणांवर अवलंबून बरेच आहे. त्या मंडळांची उक्ती व कृती यांत मेळ पाहिजे, पुष्कळ लोक व्यासपीठावर तोंड भरून एकीकरण चळवळीची स्तुती करतात- पाठिंबा देतात, परंतु खाजगी बोलण्याचालण्यात एकीकरणाला प्रतिकूल असे बोलतात. भोवतालचे लोक हे ओळखतात व त्यांस हे एकीकरण म्हणजे ढोंग आहे असे वाटते. त्यामुळे एकीकरण चळवळीसाठी लावलेली शक्ती फुकट जाते. एकवेळ उघड विरोधक पत्करले, परंतु असे बिनभरवशाचे लोक मात्र चळवळीचे नरडे आतून दाबत असतात. एकीकरणाचा पुरस्कर्ता कोण खराखुरा आहे व कोण केवळ मानासाठी त्या चळवळीच्या कार्यकर्त्यांत प्रत्यक्ष वा कागदी वावरत आहे हे चाणाक्ष जनतेच्या लक्षात येते. जनता या गोष्टी बोलून दाखवत नाही;पण ती त्या चळवळीवर विश्वासही ठेवत नाही. एकीकरणाचे काही खरे खरे पुरस्कर्ते असतात, परंतु त्यांच्या वागणुकीत प्रथम त्यांची जात व मग इतर जात असे दिसते. ते तसा उल्लेख बोलतानाही करतील.
एकीकरण चळवळीला निदान पाच तरी किंवा जितक्या पोटजातींचे एकीकरण असेल त्या प्रत्येक पोटजातीत निदान एक तरी असा पुढारी असला पाहिजे, की तो बोलतो तसा वागतो. त्याला एक झालेला सर्व समाज त्याचा आहे अस वाटले पाहिजे. त्यातील प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याला सहानुभूती आहे, कोणास मदत करायची झाली किंवा कोणाचे कौतुक करायचे झाले तर तो त्याच्या मूळ जातीचा व हा नवीन आलेल्या गटाचा असा भेद करणार नाही. तो बोलताना चुकूनही ‘माझ्या जातीचा’असे बोलणार नाही, असे म्हणणार नाही. असे म्हणणारा व कितीही कोणी कान फुंकले अगर इतर अडचणी आल्या तरी जो एकत्वाच्या भावनेने भारलेला राहील असा पुढारी त्या चळवळीस मिळाला पाहिजे. असा एक जरी पुढारी मिळाला तरी तो चळवळ यशस्वी करील. गांधीजींचे उदाहरण या बाबतीत आदर्श आहे. त्यांनी हिंदू-मुसलमान हे भाऊ भाऊ आहेत ही वृत्ती शेवटपर्यंत ठेवली. असे कित्येक प्रसंग आले, की त्यावेळी त्यांची मुसलमानांवरील प्रेमाची वृत्ती ढळली असती; परंतु त्यांनी त्यांची सद्वृत्ती शेवटी आत्माहुती देऊनही अढळ ठेवली. त्यांचे महात्म्य त्यातच आहे. तशा खंबीर वृत्तीच्या पुढाऱ्यांची एकीकरणाच्या चळवळीलाही जरुरी आहे.
एकीकरण करण्याच्या पोटजाती जेथे एकत्र राहतात, जेथे त्यांच्यात सांस्कृतिक सौम्य आहे. त्या ठिकाणी एकीकरण चळवळीचा प्रचार आधी करावा. त्या त्या जातीतील पुढाऱ्यांच्या मदतीने त्यांचे संबंध वाढतील व ते एक आहेत अशी भावना त्यात रुजेल असे करावे. ज्या ठिकाणी जाणूनबुजून विरोध आहे, त्या ठिकाणी प्रचाराचे व्यर्थ श्रम घेण्याचे कारण नाही. कालांतराने, तो भाग आपोआप सामील होईल.
– कै. अरविंद हरी राऊत
संपादक, ‘चालना’
(‘माळी समाज विकास पत्रिका’ मासिकावरून उद्धृत)
संपर्क – किरण अरविंद राऊत 9969039871, 9867452332 editor_chalana@yahoo.co.in
———————————————————————————————————————————————————————