पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक!

1
249
_Paisacha_Khamb_1.jpg

संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे म्हणतात.

‘पैसचा खांब’ अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. ते स्थळ नेवासे गावाच्या पश्चिमेला आहे. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात. ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन ‘त्रिभूवनैक पवित्र | अनादी पंचक्रोश क्षेत्र | जेथे जगाचे जीवनसूत्र | श्री महालया असे ||’ असे केले आहे.

ज्ञानदेवादी भावंडे पैठणहून शुद्धिपत्र घेऊन पुन्हा आळंदीकडे प्रस्थान करताना नेवासा येथे आली. तेथील परिसर गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला निसर्गरम्य, शांत व अद्भुत आहे. ती भावंडे जवळजवळ दोन वर्षें त्या ठिकाणी राहिली, कारण त्या गावी करविरेश्वराचे (महादेवाचे) मंदिर होते. त्याच मंदिरातील या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव इत्यादी ग्रंथांची निर्मिती केली. महादेवाचे मंदिर कालौघात नष्ट झाले, परंतु मंदिरातील तो खांब मात्र त्याचे अस्तित्व टिकवून, त्याचे अलौकिक तेज सांभाळून उभा आहे. वारकरी पंथातील भाविक त्या खांबामध्ये ज्ञानदेवांचेच अस्तित्व पाहतात. ‘ज्ञानेश्वरी’सारख्या अभिजात ग्रंथनिर्मितीची साक्षात खूण आणि ज्ञानदेवांच्या अलौकिक अस्तित्वाचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्यामुळे गावाला महात्म्य लाभले आहे.

त्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने वारकरी पंथाची व पर्यायाने महाराष्ट्र धर्माची, मराठी भाषेच्या गौरवाची गुढी उभारली गेली आहे. हरिपाठाचे अभंग यांचीही निर्मिती तेथेच झाली. अशा तऱ्हेने वारकरी पंथाचे तत्त्वज्ञान, सुलभ भक्तिमार्गाची शिकवण तेथे घडून आली. म्हणून त्या परमपवित्र स्थळाला वारकरी पंथाचे आद्य विचारपीठ मानले गेले आहे. तेथेच ज्ञानदेवांनी संपूर्ण जगताला ‘हे विश्वची माझे घर’ असे म्हणून विश्वात्मकतेचा, अखिल मानवतेच्या कल्याणाचा पसायदानरूपी महामंत्र दिला. अखिल मानवतेच्या सुखासाठी गायलेल्या त्या विश्वगीताचे ध्वनी त्या खांबाच्या साक्षीने त्या मंदिरात निनादले आणि त्या सुमधुर सुरांचा ‘पैस’ विश्वव्यापक बनला. त्यामुळे वारकऱ्यांसाठी तो केवळ खांब नाही तर त्यांच्या लेखी त्याचे स्वरूप ‘पाषाण झाला चिंतामणी’ असे आहे. तशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे.

ज्ञानदेवांनी शके १२१२ (इसवी सन १२९०) मध्ये त्या खांबाला टेकून समोरच्या श्रोतृवृंदाला गीतेवर प्राकृत भाषेत निरुपण केले, ते श्री सच्चिदानंद बाबाने लिहून घेतले (‘शके बाराशे बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरे | सच्चिदानंद बाबा आदरे | लेखकू जाहला |’) असा ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या लेखनाचा इतिहास आहे. तेथे भव्य मंदिर उभे आहे. त्या खांबावर चंद्र, सूर्य यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. शिवाय, त्यावर सुंदर असा शिलालेख कोरलेला आहे. तो असा – ‘ओन्नम (कर) विरेश्वराय | पिता महेन यत पूर्व (दत्त) षटकं जगद्गुरो | अखंडवर्ती तैलार्य, प्रतिमास सदा हि तत (रूपका) नां षटक संख्या देया अचंद्र सू एकं (यस्वी) करोति दुष्ट: तस्य ( स : ) पूर्वे वर्ज्यत्यथ | मंगलमं महाश्री |’ ज्या दानशूर भाविकांनी मंदिराच्या अखंड दीपज्योतीसाठी (नंदादीप) दान दिले त्यांचा उल्लेख त्या मंदिरात सापडला. त्या खांबास तेराव्या शतकातील भाषिक अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. पुराण वास्तू संशोधन विभागाच्या वतीने जे उत्खनन त्या परिसरात 1953-54 साली झाले त्यात जे अवशेष सापडले ते अश्मयुगीन, ताम्र-पाषाण युगातील व सातवाहन काळातील आहेत. त्यातून मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा अभ्यास या दृष्टीनेही त्या स्थळाचे महात्म्य अधोरेखित झाले आहे. त्याच खांबाच्या भोवती मंदिर बांधले गेले आहे. ते खांबासाठी मंदिर असणारे जगातील एकमेव ठिकाण होय.

‘पैस’ हा खांब कातीव काळा पाषाणरूपी आहे. त्या खांबाची सध्याची उंची चार फूट पाच इंच व रुंदी सोळा इंच आहे. साधारणपणे, कोणाही माणसाचे डोके त्याच्या वर जाईल इतकीच! तो संदर्भ दुर्गा भागवत यांच्या ‘पैस’ या ललित लेखात लिहिलेला आहे. तो साधा पाषाणी खांब आहे. तो कोरलेला, कलापूर्ण स्तंभ नाही, निव्वळ टेकू आहे. त्या टेकूचे टेकूपण अद्याप अभंग आहे. तो खांब, ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे ओथंबा अगर ओळंबा आहे. त्याच्यावर त्यांनी पाठ टेकली आणि सामान्यजन तर त्यांची डळमळीत श्रद्धा त्याच्या आधारानेच उभारू बघतात! ख्रिस्ताचा क्रूस हा बलिदानाचे प्रतीक आहे. हा स्थानुतुल्य खांब जीवनाच्या अमर अस्तित्वाचे प्रतीक आहे. तेथे आले, की माणूस स्वतःच्या आशानिराशा विसरतो. मनात उभा राहतो त्याला टेकून बसून, शांत स्वराने ज्ञानेश्वरी वदणारा नवतरुण योगी. त्याची प्रतिमा तशीच तोलून धरणे आणि ती कल्पक व भाविक मनांना दाखवणे हे तर त्या खांबाचे कार्य! ज्ञानेश्वरीत त्या संदर्भात ‘महाशून्य, पैस हे शब्द वापरले आहेत. पैस म्हणजे अवकाश.

_Paisacha_Khamb_2.jpgते स्थळ भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दुर्लक्षित होते. त्या स्थळाला उर्जितावस्था आणली ती कै. बन्सी महाराज तांबे यांनी. कै. बन्सी महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिकून 1939 साली चैत्र वद्य एकादशीला नेवासा येथे आले. ते तेथेच झोपडी बांधून राहू लागले; पैस खांबासमोर कीर्तन करू लागले. त्यांच्या कीर्तनाला आरंभी चार-पाच श्रोते उपस्थित असत. परंतु बन्सी महाराजांनी मात्र त्या क्षेत्राला त्यांची कर्मभूमी मानून ‘पैस मंदिर’ उभारणीचा ध्यास घेतला. त्यांनी त्यानुसार लोकांची मानसिकता तयार केली. मात्र त्यासाठी त्यांना 1939 ते 1947 पर्यंतचा मोठा काळ व्यतीत करावा लागला. वेळोवेळी मदत, सल्ला, मार्गदर्शन मागावे लागले. तरीही महाराजांनी ते काम चिकाटीने, नेटाने सुरू ठेवले. तशातच त्यांची भेट मामासाहेब दांडेकर यांच्याशी झाली. महाराजांनी त्यांना ‘पैस मंदिर’ उभारणीचा मनोदय सांगून मंदिर उभारणीसाठी त्यांची वडिलोपार्जित संपत्ती विकून पहिली पंचवीसशे रुपयांची देणगी मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यासाठी दिली त्यांच्या संकल्पास दांडेकर यांची संमती आणि कृतिशील आशीर्वाद मिळाले. त्यामुळे कार्याला गती लाभली. ‘मंदिर जीर्णोद्धार मंडळ’ 16 जून 1947 रोजी स्थापन करण्यात आले. मंडळात बन्सी महाराज तांबे, डॉ. बा.शं. देवचक्के, शं.य. फाटके, हिरालाल गांधी, अ.रा. पवार, आ.ग. पाटील, न.वा. शहापूरकर इत्यादींचा समावेश होता. मंदिर उभारणीसाठी लागणारी वर्गणी जमा करण्याकरता गावोगाव दौरे सुरू झाले. हळुहळू निधी संचय होऊ लागला. स्थानाचे महत्त्व लोकांना पटू लागले. जवळपास चारशे वर्षें अलक्षित राहिलेले ते स्थळ पुन्हा प्रकाशात आणायचे होते. मंदिराचा आराखडा तयार झाला आणि 25 मार्च 1949 रोजी मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते मंदिराची कोनशीला बसवण्यात आली. त्यावेळी अनेक अतिथी – मुंबईचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, सहजानंद भारती – तेथे येऊन गेले. लोकाश्रय आणि राजाश्रय मिळू लागला. दातृत्वाचे हात पुढे सरसावले. ‘पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना’ यांच्याकडून वीस हजार रुपयांची देणगी मिळाली. मंदिराचे काम जोमाने सुरू झाले आणि बघता बघता, एका दृढ निश्चयाची फलश्रुती मंदिराच्या रूपाने समोर उभी राहिली. ज्येष्ठ कीर्तनकार धुंडा महाराज देगलूरकर यांच्या हस्ते आणि श्री रावसाहेब पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात 22 मार्च 1963 रोजी मंदिराचे उद्घाटन झाले. ते स्थळ पुन्हा एकवार महाराष्ट्राचे अस्मिता केंद्र, श्रद्धाकेंद्र बनले.

त्या स्थळाच्या विकासासाठी शासनाकडून काही योजना राबवल्या गेल्या, परंतु इतर श्रीमंत देवस्थानांच्या तुलनेत तेथील सुविधा तुटपुंज्या आहेत. ते भारतीयांच्या सांस्कृतिक अनास्थेचे द्योतक म्हटले पाहिजे. अलिकडे मंदिर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून काही विकासकामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ‘पैस मंदिरा’च्या पाठीमागे एक उद्यान आणि तेथे ज्ञानेश्वरी रचना शिल्पे साकारत आहेत.

– अशोक लिंबेकर, संगमनेर ९३२६८९१५६७, ashlimbekar99@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. धन्यवाद माहिती बद्दल.मी सह…
    धन्यवाद माहिती बद्दल.मी सह कुटुंब या पैस खांब मंदिरात बरेचदा गेलो आहे. सच्चिदानंद बाबा ची समाधि कुठे आहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here