‘पेन इंटरनॅशनल’ ही जगभरातील कवी, कथा-कादंबरीकार व अन्य लेखक यांची संघटना. पेन म्हणजे लेखणी. संस्था 1921 साली स्थापन झाली. तिला ‘पेन क्लब’ असे आरंभी म्हटले गेले. ‘पेन’ हे ‘पी’, ‘ई’, ‘एन’ ह्या तीन अक्षरांतून, जगभरच्या पोऐटस् (कवी), एसेइस्टस् (गद्य, निबंध, ललित लेखक) आणि नॉव्हेलिस्टस् (कथा-कादंबरीकार) ह्यांच्या सामूहिक उपस्थितीच्या अर्थाने वापरलेले एक सोयिस्कर नाव आहे. पुढे, त्याचे ‘पेन इंटरनॅशनल’ असे नामकरण झाले, त्याची व्याप्ती वाढवून ती पोऐटस्, प्ले राइट्स, एडिटर्स, एसेइस्टस् आणि नॉव्हेलिस्टस् अशी करण्यात आली. संस्थेचे मुख्यालय लंडन येथे आहे. संस्थेच्या शाखा एकशेवीस देशांत आहेत. संस्थेत भारतातील रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, मुल्कराज आनंद, निसीम एझिकेल, प्रेमचंद, सोफीया वाडीया असे अनेक ख्यातनाम लेखक सदस्य म्हणून वेळोवेळी सामील झाले आहेत. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेले कितीतरी मान्यवर साहित्यिकही या संस्थेचे सभासद म्हणून सामील झालेले दिसतात. एकेकाळी जॉर्ज बर्नाड शॉ सदस्य होते आणि आजही जे. के रोलिंगसारखी लेखिका संस्थेची सदस्य आहे. अमेरिकन-मेक्सिकन लेखिका जेनिफर क्लेमन्ट या संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत. चार अत्यंत महत्त्वाच्या कांदबऱ्या क्लेमन्ट यांच्या नावावर आहेत.
संस्थेचे कार्य अन्य साहित्यिक संस्थांप्रमाणे परिषदा घेणे, संमेलने घडवणे अशा प्रकारचे नसते. जगातील कोणत्याही भाषेत साहित्यावर किंवा लेखकांवर हल्ले झाले, त्यांना कैदेत टाकले, हद्दपार केले अथवा त्यांची हत्या करण्यात आली, तर ‘पेन’ ही संस्था त्वरित सरसावून पुढे येते, त्या लेखकाची बाजू घेऊन त्या-त्या देशातील सरकारांना जाब विचारते, जरूर पडल्यास कायदेशीर खटले लढवते आणि अनेक वेळेस साहित्यिकांच्या कुटुंबीयांना साहाय्य पुरवते.
– (गणेश देवी यांनी दिलेल्या माहितीआधारे)