वाचकांच्या तीन पायर्या असतात- जे उपलब्ध होईल ते वाचणारे भाबडे वाचक, अभिरुचिसंपन्न वाचक आणि उच्च अभिरुचिसंपन्न वाचक. पहिल्या पायरीवरील वाचक प्रगती करत तिसर्या पायरीवर जाऊ शकतो. पैकी उच्च अभिरुचिसंपन्न वाचक हा, बाहेर कितीही करमणुकीच्या साधनात उत्क्रांती- क्रांती वा स्फोट झाले तरी त्याची वाचनसाधना सोडत नाही. ती त्याची गरज बनलेली असते. त्याला प्रपंचासाठीची नोकरी वा व्यवसाय यांतून वाचण्यासाठी वेळ मिळत नसला तरी वेळ नाही असे त्याला वाटत नाही. तो त्यातल्या त्यात फट काढतोच काढतो व तो वेळ वाचण्यास देतो. अभिरुचिसंपन्न वाचक हा एकतर उच्च अभिरुचीसंपन्न वाचक बनतो अथवा त्याच पायरीवर अधूनमधून वाचन करत राहतो. अथवा व्यवहारी तडजोड करून छंदाला व्यवसायाशी जोड देऊन प्रपंचाचे साधन करू पाहतो. मग त्या खटपटीत वाचनाचा छंद तो अन्य छंदात बदलून घेऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या कथेचा चित्रपट तयार करणे, नाटक सादर करणे, दिग्दर्शन करणे, निर्माता होणे, पटकथाकार होणे, संवाद लेखक होणे, जाहिराती तयार करणे, नाटककार होणे, एकांकिका लिहिणे, प्रकाशक होणे, कवितांचा व्यावसायिक प्रयोग करणे, रंगमंचीय कविता सादर करणे, साहित्य संमेलने भरवणे, साहित्यिकांना छोटे छोटे पुरस्कार देणे, व्याख्याने आयोजित करणे, कॅसेट काढणे, सीडी तयार करणे, यु ट्युबचा वापर करणे वगैरे.
पहिल्या पायरीवरील वाचक जो केवळ उपलब्ध होईल ते वाचणारा भाबडा रसिक असतो. त्याने अभिरुचिसंपन्न वाचक होऊन पुढे उच्च अभिरुचिसंपन्न वाचक होणे अशा पायर्या क्रमाक्रमाने गाठायच्या असतात, पण त्यांपैकी बहुतेक वाचक प्रपंचासाठी अन्य व्यवसाय, रोजगार, नोकरी, दुकानदारी, एजंट, कंपनी, कंत्राटदार, शिक्षक आदी नोकर्या- व्यवसायांत अडकतात (लिखाण करून पोट भरता येत नाही म्हणतात). अशा व्यवसायात राहूनही पैशांसाठी अल्पसंतुष्ट असलेला माणूस सर्वसाधारण वाचकाकडून उच्च अभिरुचिसंपन्न वाचकाकडे प्रवास करू शकतो. पण तो प्रपंच-हव्यासात गुरफटला की वाचनातून बाद होतो. प्रापंचिक तत्कालीन सुख त्याला खरे सुख वाटू लागते. मग तो कुटुंबासाठी पैसे कमावल्यानंतर विरंगुळ्यासाठी स्वस्त करमणुकीचा आश्रय घेत राहतो. उदाहरणार्थ टीव्ही, चालू मसालेदार सिनेमा, बुवा, सत्संग, साहित्य वा सांस्कृतिक मंडळातील सत्ता- प्रसिद्धी वगैरे.
सर्वसाधारण वाचक आणि अभिरुचिसंपन्न वाचक या वर्गाकडून ‘वाचण्यास वेळ कोठे आहे?’ असे प्रश्नात्मक शेरे ऐकू येत राहतात. पण त्याच वेळी तो क्षुद्र गोष्टींसाठी वणवण भटकत असतो. तो ज्या दैनंदिन गोष्टींना अपरिहार्य समजतो तितका तो वाचनाच्या छंदाला अपरिहार्य समजत नाही. तो दैनंदिन कष्टाच्या तासांनंतर करमणुकीसाठी वा जगणे सुसह्य करण्यासाठी ज्या धावपळीत अडकतो त्याच त्याच्या गरजा होऊन बसतात. मात्र तो त्याचा वेळ जसा काही क्षुल्लक गोष्टींसाठी काढू शकतो तसा तो वाचनालाही काढू शकतो हे त्याच्या लक्षात येत नाही. उदाहरणार्थ, अनेकांना चहाची चव घेत नुसते बसून राहण्यास वेळ आहे, पण वाचण्यास वेळ नाही. गरज नसताना दुपारी झोपण्यास वेळ आहे, पत्ते कुटण्यास वेळ आहे, निंदा-नालस्ती-चकाट्या यांच्यासाठी वेळ आहे, चालू मसालेदार सिनेमे-सिरियल्स-क्रिकेट यांसाठी वेळ आहे, बाबा-बुवांकडे जाण्यासाठी वेळ आहे, टाइमपास म्हणून मंदिरात जाण्यासही वेळ आहे, सत्संग करण्यास वेळ आहे, दारु पिण्यास वेळ आहे, पार्ट्या-बार यांसाठी वेळ आहे, सहलींना वेळ आहे, लग्नाला-बारशाला-मौतीला जाण्यासाठी वेळ आहे, विविध मंडळांतील सत्तास्पर्धेसाठी वेळ आहे, राजकारण खेळण्यासाठी वेळ आहे, पण वाचण्यासाठी वेळ नाही ! माणूस इतर सगळ्या गोष्टी जर आयुष्यात अपरिहार्य म्हणून करत असतो, वेळ नसतानाही वेळात वेळ काढून वरील सर्व कर्मे रोज निपटत असतो, तर तसाच वेळात वेळ काढून तो थोडेसे का होईना वाचन नक्की करू शकतो.
डिजिटल वाचन जगात सुरू झाले आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांना वेब पोर्टलचे – ईबुक्सचे महत्त्व कळू लागले आहे. मात्र अनेक साहित्यिक (ज्येष्ठ साहित्यिकसुद्धा) ईमेल वापरत असूनही, सोशल मीडियावर वावरताना दिसत असूनही वाचण्यास त्यांना पुस्तकाची हार्ड कॉपीच हवी असते ! काही पुस्तके संगणकावर वाचण्यास हरकत नसते, पण ते वाचत नाहीत. अनेक प्रकाशकांनाही प्रकाशनासाठी लेखकाकडून पुस्तकाची हार्ड कॉपी हवी असते. ते काळानुसार बदलण्यास तयार नाहीत. उलट, त्यांच्या लक्षात येत नाही, की लेखकाकडून (प्रकाशनार्थ) पुस्तकाची सॉफ्ट कॉपी ईमेलने प्राप्त झाली तर पुस्तक पुन्हा टाईप करावे लागत नाही. हवे त्या फॉण्टमध्ये त्याचे लगेच अवस्थांतर करता येते.
साहित्य संमेलन असले की अनेक वाचकमित्र विचारत असतात, साहित्य संमेलनाला जाणार आहात का? संमेलनाला गेले होते का? ‘नाही’ असे सांगितले तर ‘का नाही जाणार?’ ‘का नव्हते गेले?’ असल्या विचारणा होत असतात. साहित्यिक असले म्हणजे साहित्य संमेलनांना हजेरी लावलीच पाहिजे असे अनेकांना वाटते. वाचकांत साहित्य म्हणजेच साहित्य संमेलन असे समजले जाते की काय? साहित्य संमेलनांच्या व्यासपीठांवर वावरणारा वा साहित्य संमेलनांना जाणारा तो साहित्यिक असाही समज दृढ होत चालला आहे. साहित्य संमेलनांकडे एक वारी म्हणून पाहणार्यांसाठी अथवा पर्यटन म्हणून साजरे करणार्यांसाठी अथवा दरवर्षी साहित्य संमेलनातील कोठल्या तरी मंचावर हजेरी लावणार्यांसाठी साहित्य संमेलन ही पर्वणी नक्की असते.
मराठी माणूस उत्सवप्रिय आहे. फोटोप्रिय आहे. प्रसिद्धीप्रिय आहे. फेसबुक- व्हॉटस्अॅप प्रियही आहे. म्हणून काही साहित्यिक संमेलनाच्या दिंडीत नाचतानाचे फोटोही अपलोड करतात. सर्वसामान्य माणूसच नव्हे, तर साहित्यिक असलेले लोकही फेसबुकवर लिखाणापेक्षा फोटो जास्त अपलोड करत राहतात आणि लिखाणापेक्षा फोटोंना लाईक वाढत राहतात. अनेक साहित्यिक संमेलने,सेमिनार-वेबिनार, भाषणे, काव्यवाचन आदी कार्यक्रमांत रमतात, पण तोच वेळ ते चांगले वाचन करण्यासाठी खर्च करत नाहीत.
लेखन, सार्वजनिक वाचन आणि सार्वजनिक ऐकणे हे कवितेच्या बाबतीत मात्र प्रचंड प्रमाणात घडत असते. कविता कशी आस्वादावी यावर विंदा करंदीकर एकदा मुलाखतीत म्हणाले होते, ‘कविता आस्वादायची नसते, भोगायची असते आणि तीही अगदी कपडे काढून’. त्याचा अर्थ कविता ही सार्वजनिक जागेत आनंद घेता येईल अशी कलाकृती नाही. ती सोवळेओवळे पाळून, मखरात बसवून पूजाअर्चना करण्याची आकृती नाही. कविता ही एकांतात समाधी लावून, व्रत घेऊन, म्हणजेच अभ्यास करून मेंदू आणि हृदय यांनी जगण्याची-लिहिण्याची-समजून घेण्याची कला आहे असा त्या उद्गाराचा ध्वन्यार्थ काढता येईल.
करंदीकर यांचे ते म्हणणे कवितेच्या ठिकाणी ‘पुस्तक’ हा शब्द घालून वाचावे. पुस्तक कोणाचे आहे यापेक्षा त्याची काय ताकद आहे ते समजून वाचावे. मग लेखक ओळखीचा असो वा नसो ! सारांश, कोणत्याही कलेचा, साहित्याचा उत्सव व्हायला नको. कला, साहित्य हे कोपर्यात उदयास येऊन कोपर्यातच त्याचा आस्वाद घेण्याचा असतो. त्यानंतर त्याचा सार्वजनिक बोलबाला व्हावा.
पुस्तके प्रचंड प्रमाणात प्रकाशित होत आहेत. अगदी तालुक्याच्या ठिकाणी आणि गावागावातही प्रकाशन संस्था स्थापन होत आहेत, अनेक लेखक (लिहिणारा तो लेखक या अर्थाने) स्वखर्चाने आणि स्वत: पुस्तके प्रकाशित करत आहेत. महाराष्ट्रात रोज कमीत कमी पंचवीस पुस्तके प्रकाशित होत असावीत. त्या हिशोबाने महिन्याला साडेसातशे व वर्षाला नऊ हजार पुस्तके प्रकाशित होत असावीत. इतकी सारी पुस्तके प्रकाशित होत असूनही महाराष्ट्रात सांस्कृतिक दुष्काळ वाढत आहे. मात्र माणसांचा वैचारिक दृष्टिकोन वाढत आहे असे दिसून येत नाही. अशा प्रचंड प्रमाणात साहित्य छापले जात असेल तर मग वाचकाने काय करावे? कोणती पुस्तके वाचावीत आणि कोणती वाचू नयेत हे त्याने कसे ठरवावे? म्हणून मी स्वत:ला एक शिस्त लावून घेतली आहे. मी पुस्तक वाचण्याची एक प्राधान्यसूची तयार केली आहे. ती अशी – एक: वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके, दोन: एकदा वाचण्यास हरकत नाही अशी पुस्तके व तीन: वाचली नाहीत तरी चालेल अशी पुस्तके.
अशा पद्धतीने, मी एक आणि दोन क्रमांकाची पुस्तके वाचत असतो. पुस्तकांची अशी यादी केली की वाचन सोपे होईल हे खरे असले तरी त्यासाठी निकष कोणता लावावा हा यक्षप्रश्न राहतोच आणि कोणती पुस्तके वाचावीत व कोणती वाचू नयेत हे कोणाला विचारावे हे त्यापेक्षा कठीण !
– सुधीर देवरे 9422270837, 7588618857 drsudhirdeore29@gmail.com
डॉ. सुधीर राजाराम देवरे (एम ए, पीएच डी) हे भाषा, कला, लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकवाङ्मय या विषयांचे अभ्यासक आहेत. त्यांची साहित्य, समीक्षण, संशोधन आणि संपादन अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी चालते. देवरे हे अहिराणी भाषेचे संशोधक असून त्यांनी अहिराणी लोकसंचितावर लेखन केले आहे. ते ‘ढोल‘ या अहिराणी नियतकालिकाचे संपादक आहेत. ते ‘महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती‘सोबत सदस्य रुपात कार्यरत आहेत. त्यांचे ‘डंख व्यालेलं अवकाश‘ हा कवितासंग्रह तर, ‘आदिम तालनं संगीत‘ हे अहिराणी कवितासंग्रह आणि इतरही पुस्तके प्रकाशित आहेत.
————————————————————————————————–—————————————————————
आपल्या लेखातील सांस्कृतिक दुष्काळाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा वाटतो… त्यावर विचार मंथन होणे आवश्यक आहे
मिळेल ते वाचणारे कमी दर्जाचे हे कसे ठरवले?
Great post!
सर, आपला पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ हा लेख वाचला .अचूक मांडलंय आपण.अवांतर वाचन ही अनावश्यक गोष्ट वाटायला लागली आहे आता.सोशल मीडिया आणि ott यामुळे हे आणखी कमी होतंय.