दत्ताराम गायकर हे मुळचे कोकणातील. ते त्यांच्या कुटुंबासमवेत मुंबईतील चुनाभट्टी येथील किसन बापू चाळीत दहा बाय बाराच्या खोलीत राहतात. पत्नी, मुलगा, सून, एक नातू असे त्यांचे कुटुंब. गायकरांना छंद आहे तो दुर्मीळ पुस्तके जमवण्याचा, वाचण्याचा आणि ती पुस्तके ज्या कुणाला संदर्भासाठी हवी आहेत त्याला ती पुरवण्याचा. त्यांना लहानपणापासून वाचण्याची आवड आहे.
दत्ताराम गायकर आयआयटी, पवई येथे शिपाई म्हणून काम करत होते. ते सदतीस वर्षांच्या नोकरीनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना दुर्मीळ पुस्तके जमवण्याचा छंद आयआयटीत असतानाच लागला. ते पूर्णवेळ नोकरी करत होते तरी त्यांनी त्यांची पुस्तकांची आवड मनापासून जोपासली आणि वाढवली. गायकरांचे शिक्षण जेमतेम नववी, पण ज्ञान मिळवायचे तर शिक्षण आड येऊ शकत नाही याची प्रचीती गायकर यांच्या वाचनवेडातून येते!
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी गायकर यांची पावले वळतात ती रद्दीच्या दुकानांकडे. तेथे जाऊन पुस्तके चाळायची, त्यांतील आवडतील ती पुस्तके विकत घ्यायची हा त्यांचा शिरस्ताच बनून गेला. गायकर यांचे ते वेड गेली वीस वर्षें चालू आहे. कधी पुस्तके अगदी जीर्ण अवस्थेत त्यांना मिळतात, मग गायकर त्या पुस्तकांची झेरॉक्स प्रत तयार करून त्याला बाईंडिंग करून ते जतन करून ठेवतात. ते घरच्या पुस्तकांना कीड, वाळवी लागू नये म्हणून विशेष काळजी घेतात. पुस्तकामध्ये कडुलिंबाचा पाला ठेवतात.
ग्रंथसंग्रह करून ठेवण्याची आवड कशी लागली याबद्दल गायकर एक आठवण सांगतात – “एकदा दादरला कांदे-बटाटे आणायला गेलो असताना वरच्या बाजूला दुकानाची पाटी दिसली, ‘दहा रुपयांत एकशेवीस रुपयांची पुस्तके’ मला नवल वाटले आणि आनंदही झाला. मी घाईघाईत जिना चढून वर गेलो आणि तेथे असलेल्या व्यक्तीला विचारले, की ही पाटी काय आहे? तेव्हा तेथील माणसाने मला त्यांच्या पुस्तकविक्री योजनेची माहिती दिली. दर महिन्याला दहा रुपये याप्रमाणे वर्षभरात एकशेवीस रुपये जमा करायचे, त्यात प्रकाशन संस्था वीस रुपये मिळवून एकशेचाळीस रुपयांची पुस्तके वाचकाला देणार, अशी ती योजना होती. त्यामध्ये ‘लकी ड्रॉ’ होता. मी योजनेत सहभागी व्हायचे ठरवले. त्या योजनेत भाग घेतल्यानंतर दोन-तीन वेळा माझा मध्येच नंबर लागला आणि मला कमी पैशांत बरीच पुस्तके घेता आली. त्यामुळे मला आणखी हुरूप आला. ती ‘मॅजेस्टिक प्रकाशना’ची योजना होती. ‘मॅजेस्टिक’मध्ये पुस्तके सगळी खुली मांडून ठेवलेली असतात. ती पुस्तके कोणाही वाचकाला हातात घेऊन चाळता येतात – विकत घ्या अथवा घेऊ नका, वाचक पुस्तके पाहू शकतो. त्यामुळे त्या पुस्तकात काय मजकूर आहे त्याचा अंदाज येतो आणि मग पुस्तकखरेदी सोपी होते. अशा प्रकारे माझी पुस्तकांबद्दल गोडी वाढत गेली आणि त्यातूनच कोणते पुस्तक घ्यावे व संग्रही ठेवावे याची जाण येत गेली. दिवसेंदिवस संग्रहात पुस्तकांची भर पडत गेली.
गायकरांचे छोटेसे घर पुस्तकांनी भरून गेले आहे. गायकर म्हणाले, “मला पुस्तकं जमा करण्याशिवाय इतर कोठलेही व्यसन नाही. त्यामुळे घरातील लोक म्हणतात, ‘बाकी कोठले वाईट व्यसन तर नाही ना, मग करू देत पुस्तके जमा!’” ‘महाराष्ट्र टाइम्स’ने 2009 साली त्यांच्या कामाची दखल घेतली तेव्हा घरच्यांना त्यांच्या कामाचे मोल कळले.
मराठी भाषा-संस्कृतीबद्दल अगदी वेगळे लेखन करणारे श्री.बा. जोशी (प्रथम कोलकाता, आता वडोदरा) यांचा ‘मॅजेस्टिक प्रकाशना’तर्फे मुंबईत सत्कार होता. त्या सभेला गायकर हजर होते. जोशी यांनी भाषणात गायकरांच्या तेथील उपस्थितीचा उल्लेख केला व ते म्हणाले, त्यांचे ग्रंथप्रेम, वाचनवेड अगदी वेगळे आहे. त्यांनी ते प्रतिकूल परिस्थितीत जपले आहे. अशा माणसांचे सत्कार व्हायला हवेत. जोशी यांनी उपस्थित सर्व लोकांना गायकरांस अभिवादन करण्यास सुचवले.
त्या प्रसंगातून सूचना घेऊन ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या मनीषा नित्सुरे यांनी गायकरांवर छोटा लेख प्रसिद्ध केला व गायकरांचा सर्वत्र बोलबाला झाला. खुद्द आयआयटीच्या नियतकालिकात इंग्रजीमधून त्यांच्यावर टिपण आले. गायकरांची महती सर्वत्र कळून चुकली. त्यांना अरुणा ढेरे वगैरे नामवंत लेखक-कवींचे फोन निमित्ता निमित्ताने येत असतात.
दत्ताराम गायकर कोकणातील दापोलीजवळच्या करंजाळे या छोट्याशा गावात राहत होते. तेथे त्यांचे घर राहिलेले नाही. त्यांच्या लहानपणी गावात वाचनालयाची सुविधा नव्हती, त्यामुळे त्यांना त्यांची वाचनाची आवड पूर्ण करता आली नाही. ते मुंबईत त्यांना हवी ती पुस्तके वाचू शकतात, पण खेड्यातील मुलांना ग्रंथालयात अनेक चांगली पुस्तके उपलब्ध होत नाहीत. म्हणून तेथील ग्रंथालयाला त्यांनी शेकडो पुस्तके निःशुल्क भेट म्हणून दिली आहेत.
लोकं दुर्मीळ पुस्तके गायकरांकडे आणून देतात. एका गृहस्थांनी सुमारे अडीचशे जुनी पुस्तके त्यांना आणून दिली. त्यात इंग्रजी ज्ञानेश्वरीही आहे. त्यांच्याकडे झाशीच्या राणीच्या जीवनावर, तिच्या पराक्रमावर लिहिलेली पुस्तके होती. ती त्यांनी राणीच्या इंदूरच्या वंशजांना देऊन टाकली. महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांबरोबरच शिवराम महादेव परांजपे यांचे ‘मराठ्यांचा इतिहास’ हे महत्त्वाचे असे दुर्मीळ पुस्तक गायकर यांच्या संग्रही आहे. त्या पुस्तकाची झेरॉक्स प्रत गायकरांनी काढून ठेवलेली आहे. गायकर यांनी कॅप्टन गणेश वासुदेव मोडक यांचे 1927 साली प्रसिद्ध झालेले ‘प्रतापगडचे युद्ध’ हे पुस्तक संदर्भासाठी इतिहासाचे अभ्यासक अरुण निगुडकर यांना मिळवून दिले. त्या पुस्तकात शिवाजीला जिवंत वा मृत विजापूरच्या दरबारात आणतो असा विडा उचलणा-या अफजलखानाचे चित्र आहे. अफजलखान धिप्पाड आणि आडदांड असल्याचे ऐकतो. परंतु त्या पुस्तकात मात्र त्याचे व्यक्तिमत्त्व तरतरीत दिसते. त्याबद्दल अरुण निगुडकर हे इतिहासाचे अभ्यासक लिहितात :
अफझलखान प्रत्यक्षात दिसायला होता तरी कसा? माझ्या संग्रही कॅप्टन गणेश वासुदेव मोडक यांचे ‘प्रतापगडचे युद्ध’ या नावाचे १९२७ साली प्रसिद्ध झालेले पुस्तक आहे. त्याच्या पंधराव्या पानावर अफझलखानाचे अत्यंत दुर्मीळ चित्र छापले आहे. माझे स्नेही दत्ताराम गायकर यांनी मला ते पुस्तक आणून दिले. त्या चित्रावरून अफझलखानाचे व्यक्तिमत्त्व तरतरीत दिसते. इतर कोठे त्याचे चित्र छापलेले माझ्या पाहण्यात नाही.
रामदासांनी शिवाजी महाराजांना सावध करण्याच्या हेतूने लिहिलेले एक काव्यमय पत्रही त्या पुस्तकात पान ६७ वर दिले आहे. तोही दुर्मीळ दस्तावेज आहे. रामदास प्रसंगी महाराजांसाठी हेरगिरी करत, हे यावरून कळते –
विविकें करावें कार्य साधन | जाणार नरतनु हें जाणोन |
पुढील भविष्यार्थीं मन | रहाटोंची नये ||१ ||
चालों नये असन्मार्गीं | सत्यता बाणल्या आंगी |
रघुवीर कृपा ते प्रसंगी | दास महात्म वाढवी || २ ||
रजनीनाथ आणि दिवाकर | नित्यनेमें करिती संचार |
घालीताती येरझार | लाविलें भ्रमण जगदीशें || ३ ||
आदिमाया मूळ भवानी | हेची जगताची स्वामिनी |
एकांतिं विवेकें धरूनी | इष्ट योजना करावी || ४ ||
अशी कितीतरी दुर्मीळ पुस्तके गायकर यांच्याकडे आहेत; जी आऊट ऑफ प्रिंट आहेत ती ते लेखकांना संदर्भासाठी केव्हाही उपलब्ध करून देतात.
गायकर यांनी, त्यांच्या छंदामुळे मुंबईतच नाही तर, महाराष्ट्रभर अनेक मित्र जोडले आहेत. त्यातीलच एक म्हणजे पुण्यातील इतिहासाचे अभ्यासक डॉ. सदाशिव शिवदे. सदाशिव शिवदे यांनी मराठ्यांचे सरदार कान्होजी आंग्रे यांच्यावर लिहिलेल्या ‘दर्याराज कान्होजी आंग्रे’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गायकर यांचा उल्लेख केला आहे. डॉ. द.रा. केतकर हे आयआयटी (पवई) मध्येच काम करत होते. त्यामुळे ते गायकर यांना ब-याच वर्षांपासून ओळखतात. ते म्हणतात, “गायकर आणि मी सुमारे वीस वर्षं एकत्र आहोत. त्यांचा पुस्तकसंग्रह पाहून मला अलिबाबाची गुहा सापडल्याची भावना झाली.” त्यांना त्यांच्या ‘सरखेल कान्होजी आंग्रे… मराठा आरमार’ या ग्रंथाच्या लिखाणासाठी गायकर यांनी प्रवृत्त केल्याचे आणि संदर्भासाठी ग्रंथ उपलब्ध करून दिल्याचे केतकर सांगतात. उदय गंगाधर सप्रे यांचाही अनुभव तसाच आहे. सप्रे यांच्या ‘रत्नपारखी शिवरायः भाग 1 – बाजी पासलकर’ या ग्रंथात ऋणनिर्देश करताना लिहिले आहे – ”माझ्या लेखनाच्या कामी लागणारे संदर्भ ग्रंथ स्वतःची हृदयशस्त्रकिया झालेली असताना, चुनाभट्टी ते ठाणे असा प्रवास करत, दोन खांद्यांवर जड-जड ऐतिहासिक पुस्तके घेऊन येणा-या गायकर काकांबद्दल लिहिण्यास एक प्रकरणही कमी पडावे. माणसाची श्रद्धा कशी थोर असावी हे गायकर काकांएवढे दुसरे कोण सांगू शकेल? स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून येणा-या गायकर काकांनी त्या मदतीचा मोबदला तर घेतला नाहीच, उलटपक्षी त्यांनी मलाच आशीर्वाद म्हणून दोन रुपयांचे जुने नाणे भेट दिले, कारण त्या नाण्याच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती! माझ्या लेखी परमेश्वर यापेक्षा वेगळा नाही.” गायकर यांना इतिहास संशोधनाबद्दल असलेली आस्थाच अशी दिसून येते.
“मी एवढी पुस्तकं जमा करून ठेवली आणि इतरांना त्यांचा उपयोग होत आहे, पुढेही होत राहील, हे पाहून खूप आनंद होतो. समाधान वाटते,” अशी भावना दत्ताराम गायकर व्यक्त करतात.
दत्ताराम गायकर, 88790 84748
किसनबापू चाळ, मुक्तादेवी मंदिर मार्ग, सायन, चुनाभट्टी (पू), मुंबई – 22.
– मंगला घरडे
Hello.worth spreading msg..I
Hello. worth spreading msg. I have forwarded this article to many of my friends .
Infomation is very much
Information is very much interesting & useful also.
Very nice kaka . we proud of
Very nice kaka. we proud of u. Keep it up Gaikar kaka. Khup chaan karya karatay tumhi. te asech chalu theva akhanditpane.
Thanks
Thanks
Mala abhimaan ahe ki he maze
Mala abhimaan ahe ki he maze kaka ahet. Tyanche he kaam khupach prashansaniy ahe. Tyana pudhil kamasathi shubhecchha!
Very Very Nice Work done by
Very Very Nice Work done by Shri Dattaram Gaykarji. Very simple person but very Important work he has done for inspiration of new readers/book lovers. Best Wishes from we all …
Ramesh K. Kamble, Thane.
Kaka khoop chaan ¡
Kaka khoop chaan!
Mama Mala aanand zala,mazya
Mama Mala aanand zala,mazya mama che website var nav aale. Tu Kelelya kastache tula fal milale. Mala abhiman aahe ki Aplya gavache nav website var aale.
Article by Mangala Gharade on
Article by Mangala Gharade on Gaykarkaka is a good piece in journalism. Efforts of a low profile man have come to limelight. I know Mr Gaykar for a few years now. He is always enthusiastic about every happening in the field of Marathi literature. He is a source of spirit to manya a writers and is ever willing to extend his helping hand. Keep it up Gaykarkaka!
KHUP CHHAN KAKA TUMHI MALA
KHUP CHHAN! KAKA, TUMHI MALA SANGITALE AANI MI VACHALE. MALA TUMCHA KHUP ABHIMAN WATLA. THANKS KAKA!
आपल्या कार्याची स्तुती करावी
आपल्या कार्याची स्तुती करावी तेवढी कमीच. अशी फार कमी लोकं आढळतात. आपल्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. मी आपणापुढे नतमस्तक होतो. आपल्या कार्याला आमच्या शुभेच्छा!
गायकर काका तुम्ही जोपासलेला
गायकर काका तुम्ही जोपासलेला छंद या प्रकाशनामुळे खऱ्या अर्थाने सार्थक झाला. आता पर्यंत तुम्ही पुस्तकांच्या शोधात फिरत होतात . पण यापुढे लोक आपणाला शोधात येतील. अभिनंदन !
Kaka amhala tumcyabaddaladar…
Kaka amhala tumcyabaddaladar ani abhiman vatato
very nice kaka. Tumchya…
very nice kaka. Tumchya badalchi yevdi mahiti aamala pan mahit nhavati. He sagal vachun khup chan vatl.
Comments are closed.