पुण्याची ग्रामदेवता – तांबडी जोगेश्वरी

1
152
for frame

ऐतिहासिक असल्यामुळे पुण्यात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत, भिकारदास मारुती, पत्र्या मारुती, जिलब्या गणपती, चिमण्या गणपती अशा चित्रविचित्र नावांसाठीही ती प्रसिद्ध आहेत. पण पुण्याचे ग्रामदैवत कोणते म्हणाल तर एक आहे कसबा गणपती आणि दुसरी तांबडी जोगेश्वरी! ही पुण्याची, ग्रामसंरक्षक देवता.

ग्रामदेवता ही साधारणपणे गावाबाहेर वेशीपाशी असते, कारण तिने शत्रू आला तर त्याला वेशीबाहेर अडवून त्याचा संहार करायला पाहिजे, पण तांबड्या जोगेश्वरीचे देऊळ हे पुण्याच्या शहर भागात गजबजलेल्या वस्तीत येऊन ठेपले आहे. ज्या काळात मूर्ती बसवली गेली तेव्हा ती वेशीबाहेर, म्हणजे त्या काळच्या पुण्याबाहेर होती. तेव्हा मंदिरही नव्हते. नुसती पाषाणाची मूर्ती.

तीनशे वर्षांपूर्वी, आजच्या पुणे शहराच्या अगदी मध्यावरून, अत्यंत गजबजलेल्या गर्दीच्या भागातून आंबील ओढा वाहत होता. हा ओढा सदाशिव, शुक्रवार, बुधवार व शनिवार या पेठांच्या भागामधून वाहात जाऊन मग मुठा नदीला मिळत होता. जोगेश्वरी तेव्हा ओढ्याच्या काठी होती.

जोगेश्वरीचे उल्लेख पुराणातही सापडतात असे मत कै.राजवाडे, डॉ.केतकर यांनी नोंदवलेले आहे. ‘तां नमामी जगदधात्री योगिनी परयोगिनी’ असे योगेश्वरीचे म्हणजेच जोगेश्वरीचे वर्णन भविष्यपुराणात आहे. योगिनी हे योगेश्वरीचे दुसरे नाव. योगेश्वरीचे प्राकृत रूप म्हणजे जोगेश्वरी. योगेश्वरी संज्ञेचा उलगडा मूर्तिरहस्य व्याख्येत ‘जीवेश्वरैकस्य ईश्वरी सा योगेश्वरी’ असा केला आहे. म्हणजे, जीव आणि ईश्वर यांची एकरूपता दाखवणारी ही आदिशक्ती आहे.

पुण्याची योगेश्वरी म्हणजेच जोगेश्वरी ताम्रवर्णी म्हणजेच तांबडी आहे. म्हणून तिला तांबडी जोगेश्वरी असे नाव प्राप्त झाले. ‘देवी भागवत’, ‘मार्कंडेय पुराण’, ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथांत ताम्रवर्णी जोगेश्वरीची कथा आहे. त्यानुसार आर्यांनी भरतखंडात वसाहती केल्या तेव्हा रेवाखंड, दंडकारण्य, अंगवंगादी प्रांतांत त्यांचे अनेक संघर्ष झाले. त्यात तिने महिष्मती नगरीतील मुख्य महिषासुराचा पराभव केला! म्हणून ती महिषासूरमर्दिनी नावानेही ओळखली जाते. महिषासूराचे अंधक, उध्दत, बाष्कल, ताम्र वगैरे बारा सेनापती होते. त्या सेनापतींपैकी ताम्रासुराचा वध करणारी ती ताम्र योगेश्वरी, म्हणजेच पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी.  म्हणजे शेंदूर चर्चिला जातो म्हणून तिचे नाव तांबडी जोगेश्वरी असे पडले नसून ताम्रासुराचा वध करणारी पराक्रमी देवता म्हणून तिचे नाव तसे पडले आहे.

तांबड्या जोगेश्वरीची मूर्ती स्वयंभू आहे असे म्हटले जाते. ती चतुर्भुज आणि उभी आहे. ती मातेश्वरी, सावित्री आणि चामुंडा अशी देवत्रयात्मक आहे. तिच्या वरच्या उजव्या व डाव्या हातांत डमरू व त्रिशुळ आहे. खालच्या हातात मुंडके व पानपात्र आहे. ती मूर्ती कुठल्याही वाहनावर नाही; उभी आहे. सव्वा हात उंचीची मूर्ती सुटी नसून तिच्या पाठीमागे पाषाण आहे.

इतिहासात जोगेश्वरीचा उल्लेख शिवकाळात छत्रपती शाहू सुटून येण्याच्या काळात आढळतो. मोगली अंमलदार हुसेनखान याच्या शके 1627 (इसवी सन 1705) मधल्या पत्रात जोगेश्वरी आणि पुजारी बेंद्रे यांचा उल्लेख सापडतो. त्याच बेंद्रे घराण्याकडे जोगेश्वरीची पूजा आहे.

आंबील ओढ्याच्या काठी, तीनशे वर्षांपूर्वी जोगेश्वरीच्या चारही बाजू रानमाळांनी भरलेल्या होत्या. दक्षिणेस स्मशान होते. अर्थतच लोकवस्ती नव्हती, पण पुढे पेशवाईत जेव्हा पुणे गावठाणाचा विस्तार करण्याची गरज भासू लागली. तेव्हा स्मशान उठवले गेले. ती सर्व बाजू गाव पंढरी झाली. आंबील ओढ्याचा प्रवाह वरच वळवून त्याचे तोंड फिरवण्यात आले. पेशवे दप्तर रुमाल नं. 165 मधल्या कागदात त्या विषयीचा उल्लेख सापडतो- ‘पहिले जोगेश्वरीचे ठाई पाटलाचे शेत होते. त्यात देवी होती. पेठांची वस्ती होती होऊ लागली! तेव्हा जिवाजी अण्णा खासगीवाले यांनी देवळासाठी जागा घेऊन देवळ बांधोन पूजेची व्यवस्था केली.’

श्रीमंत माधवराव पेशव्‍यांनी हैदरवरील तिसर्‍या स्वारीवर (सन 1766 ऑक्टोबर 9 सन 1767 जून) जाताना आणि परत येताना जोगेश्वरीचे दर्शन घेतले असल्याचे उल्लेख सापडतात. जोगेश्वरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले, त्याची वेगळीच कथा आहे. मूळ श्रीवर्धनचे असलेले श्रीवर्धनकर देशमुख भट पेशवे यांचे कुलदैवत म्हणजे श्रीवर्धनची योगेश्वरी. पण पेशवे पुण्याला आले आणि श्रीवर्धनच्या योगेश्वरीचे दर्शन त्यांना दुर्मीळ झाले. तेव्हा पेशव्यांनी पुण्याच्या जोगेश्वरीलाच आपली योगेश्वरी मानले. पेशव्यांच्या स्त्रिया-सगुणाबाई, पार्वतीबाई, रमाबाई, राधाबाई, आनंदीबाई-जोगेश्वरीच्या दर्शनाला येत आणि नारोशंकरी चोळखण, हिरवी चिरडी, नारळ, तांदूळ घालून जोगेश्वरीची ओटी भरत. दुसर्‍या बाजीरावाचा विवाह, विनायकराव अमृत याचा व्रतबंध अशा पेशव्यांच्या लग्नमुंजीच्या अक्षदा मोठ्या थाटामाटाने जोगेश्वरीला येऊन दिल्या जात. इचलकरंजीकर, देवासकर, होळकर, भोरकर, सचीव इत्यादी सरदारही जोगेश्वरीच्या दर्शनास येत असत. यज्ञेश्वर अवधानी यांनी जोगेश्वरी मंदिरात क्रम पारायण केले, म्हणून त्या वेदमूर्तींना पेशव्यांनी 135 रुपये संभावना दिली होती. केशवभट साठे वाईकर यांनाही पारायणसमयी दुधाला आख रुपये 108 मिळाली.

तुळजापूरच्या भवानीमातेची पालखी नवरात्राच्या यात्रेस पुण्याहून जाण्याचा परिपाठ होता आणि त्यावेळी जोगेश्वरी देवस्थानकडून पेशव्यांकरवी तुळजाभवानीला भेट जात असे. त्याचप्रमाणे चिंचवडच्या देवीची पालखी पुण्यास जोगेश्वरीच्या भेटीला येत असे. देवदेवींच्या अशा भेटी त्या काळात घडून येत असत. चिंचवडदेव संस्थानचे प्रमुख गळ्यातील पिशवीत देव गणपती तांदळा घालून जोगेश्वरीपुढे तो तांदळा अर्धा तास ठेवत आणि मग प्रसादग्रहणानंतर प्रदक्षिणा होऊन, मगच देवी आणि गणपतीची भेट पूर्णत्वास जायची. भेटीची ही प्रथा चालू आहे.

जोगेश्वरीचा मुख्य उत्सव म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत होणारा नवरात्रोत्सव. या उत्सवासाठी पेशव्यांकडून बुधवार पेठेच्या चावडीपासून एक बकरे, निशाणासाठी खादी, गेरू व तेल आणि नवचंडी होमासाठी लागणारे साहित्य मिळत असे. नवरात्रोत्सवात काही लोकांचे मान होत असत. व्यवहारे जोशी, झांबरे पाटील, पेठेतील वाणी, कसब्याचा महार यांना शिरपाव, शिधा व पानसुपारी मिळत असे. विजयादशमीच्या पूजेसाठी पेशवे, देशमुख, शितोळे व इतर सरदार मंडळी येत. जोगेश्वरीची दसर्‍याच्या पालखीची मिरवणूक पेठेतून निघे व दसर्‍याचा समारंभ मोठ्या थाटात होई.

जोगेश्वरीच्या दररोज दोन पूजा होतात. ज्येष्ठात गणपतीचा वाढदिवस, भाद्रपदात हरतालिका पूजा होते. नवरात्रात तर दहाही दिवस देवीच्या दहा अवतारांच्या मूर्ती वाहनांसह बसवतात. नवकुमारिकांचे पूजन होते, होम होतो, लोक होमातील रक्षा भक्ति भावाने नेतात. चैत्रात गौरीचा हळदीकुंकू समारंभ थाटात साजरा होतो. प्रत्येक सणाला देवीची महापूजा बांधण्यात येते. प्रत्येक पौर्णिमेला, मंगळवारी, शुक्रवारी देवीच्या दर्शनाला असंख्य भक्त येतात. लोक लग्न, मुंज इत्यादी मंगलकार्याची प्रथम अक्षद देवीला देतात. मुंजीची भिक्षावळ आणि लग्नाची वरातही इथेच येते. आपल्या नवजात बाळाला घेऊन बाळंतीण बायका देवीच्या दर्शनाला येतात आणि मगच नेहमीचे व्यवहार सुरू करतात. पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवात जेव्हा गणपतीची भव्य विसर्जन मिरवणूक निघते, तेव्हा तिच्या अग्रभागी ऐटीत डुलणार्‍या हत्तींपाठोपाठ असतात ते पुण्याचे ग्रामदेवतांचे म्हणजे कसबा गणपती व जोगेश्वरीचा गणपती.

दिनांक 31 जानेवारी 2007 रोजी पहाटे सहा वाजता श्रीसुभ्याचा अभिषेक होत असताना देवीचे शेंदूराचे कवच निखळून पडले आणि जोगेश्वरीमातेचे मूळ स्वरूपात दर्शन झाले! पुण्यात देवींची एकूण बत्तीस मंदिरे आहेत. परंतु प्राचीन काळापासून पुण्याची ग्रामदेवता म्हणून अग्रपूजेचा मान आहे तो तांबड्या जोगेश्वरीला!
 

श्री तांबडी जोगेश्‍वरी/योगेश्‍वरी ट्रस्‍ट, 33(ए), बुधवार पेठ, पुणे – 411002

admin@shree-jogeshwari.com

– अंजली कुलकर्णी

Last Updated On – 21st September 2016

About Post Author

Previous articleडॉ. दामोदर खडसे
Next articleश्री देवी भगवती, मुक्काम कोटकामते!
अंजली कुलकर्णी या पुण्‍याच्‍या कवयित्री. त्‍यांनी आतापर्यंत काव्‍यसंग्रह, ललित लेखसंग्रह, संपादीत अशी एकूण बारा पुस्‍तके लिहिली आहेत. त्‍यांनी लिहिलेले 'पोलादाला चढले पाणी' हा रशियन कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्‍यांनी अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद केले आहेत. त्‍यांच्‍या लेखनाला आतापर्यंत महाराष्‍ट्र राज्‍य शासन, यशवंतराव प्रतिष्‍ठान यांसारख्‍या संस्‍थांकडून अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी - 9922072158

1 COMMENT

  1. कजॅत तालुका येथे सुद्धा
    कर्जत तालुका येथे सुद्धा जोगेश्वरी मंदिर आहे. जर काही माहिती असेल तर अपलोड करा.

Comments are closed.