नारो आप्पाजी तुळशीबागवाले हे पेशवाईतील नामांकित व कर्तबगार अधिकारी होते. त्यांनी राज्यव्यवस्था सांभाळण्याबरोबर सार्वजनिक व लोकोपयोगी कामे केली. त्यांनी देवालये बांधणे, नदीला बंधारा घालून तिचे पाणी शेतीसाठी उपयोगात आणणे वगैरे गोष्टी केल्या. नारो आप्पाजींनी नदीला घाट व नदीवर धरणही बांधून काढले. पुण्याच्या तुळशीबागेतील राममंदिर हे नारो आप्पाजींच्या तशा कार्यांपैकी अधिक लौकिकप्राप्त काम आहे.
पानिपतचा भीषण संग्राम 1762 च्या जानेवारीमध्ये झाला. नारो आप्पाजींनी राममंदिराचा पाया फेब्रुवारी-मार्च 1762 मध्ये रचला (शके 1683, माघ महिन्यांत). मंदिर त्यावेळी शेतीच्या जागेत, गावाबाहेर होते. त्याला काळे वावर या नावाने संबोधत असत. त्याच्या जवळून आंबील ओढा वाहत होता. ते स्थळ निवांत होते. नारो अप्पा यांनी तुळशीबागेनजीकची घरेही विकत घेतली. देवळाचा उंबरा 1763 च्या नोव्हेंबरमध्ये (शके 1685 मार्गशीर्ष) मुहूर्ताने बसवला गेला. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीतामाई यांच्या मूर्ती 1765 च्या नोव्हेंबरमध्ये (शके 1687, मार्गशीर्ष) घडवून आणल्या. उमाजीबाबा पंढरपूरकर यांनी ते काम केले. त्यांना तीनशेबहात्तर रुपये मूर्ती करण्याबद्दल दिलेले आहेत. हनुमंताची मूर्ती बखतराम पाथरवट गुजराथी यांनी घडवली, त्यास चाळीस रुपये पडले. हनुमंताच्या मूर्तीस झिलई देऊन, देऊळ बांधून प्राणप्रतिष्ठा 1767 मध्ये केली गेली. त्यावेळी पूजाअर्चेस 52.20 रुपये खर्च झाला. नारायण पाथरवट याने गणपती व पार्वती या देवतांच्या मूर्ती 1781 साली (शके 1703, माघ) तयार केल्या. त्यासाठी अनुक्रमे पंचवीस रुपये व पंधरा रुपये अशी मजुरी दिली गेली. प्रभू रामचंद्राला घालण्याकरता मुगुट करवला. त्यास 170.60 रुपये पडले. शिवाय, कंठी एकशेएकोणतीस,कुंडलास माणके जोडी चाळीस रुपये व इतर काही दागिने 1118.10 रुपयांचे खरेदी केले. देवांच्या अंगावरील दागिन्यांची चोरी 1789 मध्ये झाली, म्हणून पुन्हा नवीन दागिने 2014.12 रुपयांचे करून घेतले. श्रीराम, लक्ष्मण व सीता या देवतांसाठी सोन्यामोत्यांचे अलंकार नारो अप्पाजीनंतरच्या तुळशीबागवाले
तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास काही वर्षें लागली. एकूण खर्च एक लाख छत्तीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये झाला. त्यापैकी मंडपास पाच हजार एकशेवीस रुपये, ओवऱ्यास सहा हजार तीनशेएकोणपन्नास रुपये व वृंदावनास एकशेअठ्ठ्याण्णव रुपये असे खर्च झाले. उत्तरेकडील भागास राहण्यासाठी वाडा बांधला गेला. ते काम नारो अप्पाजींचे चिरंजीव नारायण यांच्या वेळी पूर्ण झाले. श्री रामचंद्रास वेळोवेळी इनामे मिळाली. थोरले माधवराव पेशवे यांनी मौजे वढू (तालुका हवेली) हा गाव 27 मार्च 1763 मध्येमोकासाखेरीज इनाम दिला. मंदिरात आलेल्या पाहुण्यांनी त्याच्या नावे गावोगावच्या जमिनी दिल्या आहेत. हल्ली देवस्थानांना देणग्या देतात तसा तो प्रकार आहे.
तुळशीबागेच्या उत्तर दरवाज्यातून देवळात येताना मध्येच संगीन दरवाजा आहे. त्यावर नगारखान्याची दुमजली इमारत आहे. तो नगारखाना श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सुरू केला. पेशव्यांनी खर्ड्याच्या संग्रामात यशप्राप्ती झाली तर तुझ्या दारात चौघडा सुरू करीन, असा रामरायास नवस केला होता असे सांगतात. नगारखान्याच्या खर्चासाठी मौजे आळंदी व मौजे कसूरडी (तालुका सांडस) व मौजे आसवली, मौजे वीर व मौजे हारणी (तालुका नीरथडी) या गावांच्या उत्पन्नातून रकमा मिळत असत. पुढे त्या कमी होऊन दरसाल आठशे रुपये मिळत. पुढे, ब्रिटिश अंमल सुरू झाल्यापासून हवेली तालुका ट्रेझरीतून देवास नक्त नेमणूक म्हणून पाचशेत्रेसष्ट रुपये मिळतात व बाकीची रक्कम पर्वती संस्थानाकडे नगरखान्याच्या खर्चासाठी परस्पर दिली जाते. संगीन दरवाज्यावर असलेली तीन खणांची बंगली 1814 च्या सुमारास सातशेसेहेचाळीस रुपये खर्च झाला. श्रीरामाच्या दारी चौघडा तिन्ही त्रिकाळ म्हणजे पहाटे, सायंकाळी व मध्यरात्री वाजवतात. शिवाय, दर शनिवारी तिसऱ्या प्रहरी म्हणजे दुपारी तीन वाजता वाजवला जातो. याचे कारण असे सांगतात, की पुणे पेशव्यांना शनिवारी तिसऱ्या प्रहरी मिळाले.
तुळशीबागेचे आवार सुमारे एक एकराचे आहे. उत्तर, दक्षिण व पश्चिम अशा तिन्ही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. दक्षिण दरवाज्यासमोर सतीच्या देवालयाच्या पूर्वेस 1806 मध्ये देवाचे पुजारी जोशी यांना राहण्यासाठी वाडा बांधून दिला. सभामंडपाचा काही भाग निसटल्यामुळे दुरुस्त 1832 मध्ये केला. सध्या असलेला सभामंडप हा 1884 मध्ये श्रीमंत नंदरामजी नाईक यांनी बांधला व पूर्वी असलेल्या शिखरावर वरच्या बाजूस नवीन उत्तुंग असे शिखर बांधले. ते शिखर म्हणजे पुण्यनगरीला भूषण झाले. शिखरावर साधुसंतांच्या व पेशवेकालीन पोशाखातील काही व्यक्तींच्या मूर्ती बसवल्या आहेत. मूर्ती बसवलेले कोनाडे बरेच आहेत व त्यावर एकेक कळसही आहे. शिखर सुमारे एकशेचाळीस फूट उंच असून वरचा कळस सुमारे चार फूट उंचीचा आहे. त्यात सोन्याचा पत्रा मढवलेला आहे. तो कळस बसवण्याच्या अगोदर गावातून वाजतगाजत मिरवणुकीने तेथे आणला असे सांगतात. देवाच्या गाभार्याच्या मुख्य दरवाज्याचे चौकटीस पितळी पत्रे 1855 मध्ये बसवले व त्यावर चांदीचा मुलामा दिला. त्यानंतर श्रीमंत पंतसचिव (संस्थान भोर) यांनी त्या दरवाज्यास चांदीची चौकट करून दिली. मंदिराच्या आतील व बाहेरील गाभाऱ्यात संगमरवरी फरशी आहे.
सभामंडप सुमारे तीन पुरुष म्हणजे वीस फूट उंचीचा असून त्यास तीन दालने आहेत. सबंध मंडपाचे छत लाकडी असून त्यावर सुंदर नक्षीकाम आहे. खांब व कमानी रेखीव आणि भव्य आहेत. मंडपाची लांबी व रुंदी साठ आणि चाळीस फूट आहे. मधील मुख्य दालनात फरशी संगमरवरी आहे. सभामंडपात मध्यभागी आणि गाभार्यात जाण्यासाठी असलेल्या पायर्याआ व पैसे टाकण्याच्या पेटीपुढे थोडे, अशा दोन्ही ठिकाणी पूर्वी कारंजी होती. मंदिराच्या उत्तरेस महादेवाच्या देवालयामागे मोठी विहीर होती. ती निर्माल्य टाकण्यासाठी वापरत असत. ती बुजवलेली आहे. तुळशीबागेच्या आवारात पाण्याचे तीन-चार हौद बांधलेले आहेत. त्या हौदांना पाणी कात्रजच्या तळ्यांतून नळाने आणलेले आहे. हौदांना पाण्याचा पुरवठा चालू आहे. देवळाच्या आवारात बरीच झाडे आहेत. ती जास्त व घनदाट होती. त्यात पिंपळ, उंबर, नारळी, सुपारी, बोरी, डाळिंब, तुती, सीताफळ, रामफळ, अशोक, बकुळी, चाफा अशी तरतऱ्हेची झाडे होती. पुण्यातील नागझरीजवळ गंजीचे वावर म्हणून जमीन होती. त्यात तुळशी व इतर फुलझाडे लावून बाग केली होती. त्यातील तुळशी व फुले आणून त्यांचे हार रामासाठी केले जात.
संगीन दरवाज्याजवळ पूर्वेकडील भिंतीवर कमानी असून त्या कमानीत रामायण-महाभारतातील प्रसंगांची चित्रे काढून घेण्याची पद्धत जुनी आहे. तसे चितारकाम (रंगसफेतीसह) फक्त सोळा रुपये देऊन 1826 मध्ये करून घेतल्याचे हिशोब सापडतात. गावातील व इतर मंडळींनाही चित्रे ही एक प्रेक्षणीय गोष्ट होऊन बसली आहे.
खुद्द पेशवे व त्यांच्या कुटुंबातील मंडळी तत्कालीन नामवंत सरदार, जहागीरदार मंडळी नित्य रामदर्शनास येत असत. तसे थोर लोक आले म्हणजे त्यांना तीर्थप्रसादाबरोबर वस्त्रे दिली जात. त्यांना अहेराची न म्हणता ‘प्रसादाची वस्त्रे’ असे म्हणत. वस्त्रे ज्यांच्या त्याच्या मानाने दिली जात. श्रीरामदर्शनासाठी थोरले माधवराव, सवाई माधवराव, बाबासाहेब, आप्पासाहेब वगैरे पेशवे येऊन गेले व त्यांना अशी प्रसादाची वस्त्रे दिल्याचे उल्लेख आहेत. तुकोजी होळकर, आंग्रे घराण्यातील मंडळी येऊन अशा वस्त्रांचा मान घेऊन गेली आहेत. पेशवे एकादशीच्या कीर्तनास येऊन बसत असत व वेळप्रसंगी कीर्तनकारास स्वखुशीने बिदागी भेट देत.
हा ही लेख वाचा-
तुळशीबागेशिवाय पुणे उणे !
श्रीरामनवमीचा उत्सव हा पूर्वीसुद्धा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असे व खर्चही दोन हजार रुपयांवर येई. पुण्यातील प्रतिष्ठित मंडळींना आमंत्रण व ब्राह्मणभोजनही पूर्वीपासून होत आहे. उत्सवाची पद्धत चालू आहे. जन्मोत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध एकादशीपर्यंत असतो. शुद्ध अष्टमीपर्यंत रोज रामायण, सप्ताहवाचन, संहिता, वसंतपूजा, ब्राह्मणभोजन, छबिना मिरवणूक, मंत्रपुष्प, कीर्तन अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. नवमीस म्हणजे जन्मदिवशी सकाळी जन्माख्यानाची कथा असते व श्रींच्या पोशाखांची मिरवणूक रामेश्वराच्या मंदिरापासून निघते. रामेश्वर मंदिरात श्रींच्या पोशाखांची पाहणी मामलेदार (तालुका हवेली) यांच्याकडून होते. पोशाखांच्या मिरवणुकीत ते हजर राहून तुळशीबागेत रामजन्मास येतात. नारो आप्पाजींचा व श्रीमंत खासगीवाले यांचा अतिशय घरोबा व ते काही काळ खाजगीवाले यांच्याकडे कामासही होते; त्यामुळे मिरवणूक रामेश्वरापासून काढण्याची पद्धत असावी. मिरवणूक आल्यानंतर श्रींचा जन्म दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी होतो. जन्म झाल्यावर बाहेर जमलेल्या जनसमुदायासाठी व कथेमध्ये पाळणा म्हणण्यासाठी उत्सवमूर्ती बाहेर मंडपात आणतात. त्या वेळी रामनामाच्या जयजयकाराने वातावरण दुमदुमून उत्साही होत असते. पाळण्यास दोरी तांबड्या पागोट्याची असते व पाळणा मारुती देवळावर बांधलेला असतो. त्याच्या चिंध्या अगदी बारीक बारीक करून वाटल्या जातात. तो प्रसाद म्हणून लोक दरवर्षी घेऊन जातात. ती सुताएवढी चिंधी मिळवणे म्हणजे एक फार मोठे दिव्य असते! त्यासाठी भक्तांना लाथा-बुक्क्याही
– भरत नारायण तुळशीबागवाले 93710666502
bharat.tulshibagwale@gmail.com