पाबळ विज्ञान आश्रम – काम करत शिकण्याची गोष्ट

2
47
carasole1

शिक्षण अर्थपूर्ण बनवण्यासाठी, त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकले पाहिजे. प्रत्यक्ष काम करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तीन दशकांपूर्वी पाबळ येथे सुरू झालेले ‘विज्ञान आश्रम’ देशभर पोचले आहे.

ती एका गावाची गोष्ट नाही. तशी त्याची सुरुवात एका गावात तीस-एक वर्षांत झाली; परंतु ती देशातील एकशेबावीस गावांची गोष्ट बनली आहे. गोष्ट केवळ गावापुरती मर्यादित नाही. त्याची व्याप्ती त्याहून अधिक आहे. ती जगण्याशी संबंधित आहे. शिकण्याशी संबंधित आहे. खरे तर जगता-जगता शिकण्याची, शिकता-शिकता जगण्याची आणि ग्रामीण विकासाच्या वेगळ्या प्रारूपाची ती गोष्ट आहे. शिक्षणाद्वारे जीवनावश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांना देऊन त्याद्वारे ग्रामीण विकास घडवून आणण्याच्या संकल्पनेतून तीन दशकांपूर्वी डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाबळ येथे ‘विज्ञान आश्रम’ सुरू केला. त्या संकल्पनेचे मूर्त स्वरूपात रूपांतर झाले असून, अरुणाचल प्रदेशापासून केरळपर्यंत त्याचा लौकीक गेला आहे.

ज्या पाबळमध्ये हा आश्रम आहे, तेथील उत्पादकता वाढल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. एका अर्थाने ‘विज्ञान आश्रमा’चे गृहितक प्रत्यक्षात आले आहे. ‘ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल, तर उत्पादकता वाढवावी लागेल आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे’ असे विज्ञान आश्रम मानतो. मात्र, केवळ तंत्रज्ञान विकसित करून उपयोगाचे नाही, तर ते लोकांपर्यंत जायला हवे आणि अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित सेवा देणारे उद्योजक निर्माण व्हायला हवेत. असे उद्योजक घडवण्याचा प्रयत्न ‘विज्ञान आश्रम’ करत आहे.

तंत्रज्ञान लोकांपर्यंत म्हणजेच समाजापर्यंत पोचवण्यासाठी विज्ञान आश्रमाने ‘शिक्षण’ हे माध्यम निवडले आहे. शिक्षण अर्थपूर्ण बनवण्यासाठी, त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकले पाहिजे. प्रत्यक्ष काम करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. ‘विज्ञान आश्रमा’तील विद्यार्थी तंत्रज्ञानावर आधारलेले विविध प्रकल्प प्रत्यक्ष काम करत शिकतात. सोलर दिवे तयार करणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारखी तंत्रे वापरून शेती उत्पादन घेणे, बांधकामाची नवीन तंत्रे वापरून शिकणे, खाद्य पदार्थांची निर्मिती करणे आदी बाबी ते काम करता करता शिकतात. त्यालाच कार्यकेंद्री शिक्षण म्हटले जाते. ते शिक्षण म्हणजे व्यवसाय शिक्षण आहे असे कोणाला वाटू शकेल. मात्र, एखादे काम करताना विद्यार्थ्यांना त्याच्या अनुषंगाने विविध विषयांतील संकल्पनांची ओळख करून देण्यावर तेथे भर दिला जातो. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिकल उपकरणांची दुरुस्ती करताना भौतिकशास्त्रातील संकल्पना शिकता येतात. शेतीत पीक घेताना जीवशास्त्र, गणित आदी अनेक विषयांतील कल्पना सहजपणे शिकता येतात. काम करता करता संकल्पना स्पष्ट करून शिकवले, की ते विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटत नाही. नेहमीच्या पुस्तककेंद्री शिक्षणात ज्यांना रुची नाही आणि त्यामुळे जे शैक्षणिक प्रगती करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना घेऊन ‘विज्ञान आश्रमा’ने ही संकल्पना सिद्ध केली आहे. तेथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले शेकडोजण स्वतःचे व्यवसाय करत आहेत.

वास्तविक नेहमीच्या शाळांमध्येच प्रत्यक्ष अनुभवातून प्रकल्पातून शिक्षण दिल्यास ते अधिक उपयोगी ठरू शकते. म्हणूनच ‘विज्ञान आश्रमा’ने ‘मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ हा कार्यक्रम तयार केला. चार राज्यांतील शंभरहून जास्त शाळांत तो राबवला जात आहे. आठवी ते दहावी वर्गांतील विद्यार्थी आठवड्यातील एक पूर्ण दिवस विविध उत्पादक कामे करतात. त्यांना त्या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी संबंधित गावातील अनुभवी कारागिरांना ‘मानद शिक्षक’ म्हणून बोलावले जाते. विद्यार्थी शाळेतील व समाजातील विविध कामे सेवा म्हणून देतात. प्रत्येक काम महत्त्वाचे असते आणि त्यासाठीचे कौशल्य उपयुक्त ठरते हे त्या उपक्रमातून विद्यार्थ्यांवर बिंबवले जाते. विद्यार्थ्यांकडून कोणत्या प्रकारची उत्पादक कामे करून घेता येतील, त्यांमधून कोणत्या संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवता येतील, त्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करता येईल आणि ही साधने कशी उपलब्ध होतील आदी अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्नही केला आहे. त्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी विज्ञान आश्रमाने www.learningwhiledoing.in ही वेबसाइटही विकसित केली आहे. उत्पादक कामे आणि त्यांच्याशी संबंधित रिसोर्सेस (व्हिडिओ, पॉवर पॉइंट, मॅन्युअल, कृती इत्यादी), मुक्त शैक्षणिक संसाधने (ओ ई आर) म्हणून उपलब्ध आहेत. त्याचा तपशीलही पुरवला जातो. उत्पादक कामे करतानाही सर्जनशीलता, निरीक्षणे यांवर भर दिला जातो. त्यातूनही काही नवीन प्रयोग जन्माला येतात.

उदाहरणार्थ, भिवंडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी लाकूड, एलपीजी, केरोसिन अशी वेगवेगळी इंधने वापरून खिचडी तयार केली. कोणते ‌इंधन किफायतशीर, चुलीची उत्पादकता, ज्वलनक्षमता यांचा अभ्यास त्या विद्यार्थ्यांनी केला. पारंपरिक कामाचे प्रशिक्षण देतानाच विज्ञान उलगडण्याच्या अशा प्रयत्नांची दखल घेऊन पवई येथील ‘आय आय टी’ने ‘विज्ञान आश्रमा’ला दोनशे ‘आकाश’ टॅब्लेट विकसित केले. पाबळच्या भैरवनाथ विद्यामंदिरातील आठवीच्या विद्यार्थ्यांना हे टॅब्लेट दिले गेले. शाळेमधील ‌कार्यशाळेत प्रत्यक्ष कृती करायची व त्या संदर्भातील संकल्पना टॅब्लेटवरून अभ्यासायच्या असा हा प्रयोग आहे. शिंदवळे येथील नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला आवश्यक असलेले संपूर्ण वायरिंग केले. वायरिंगचे काम करतानाच विजेची संकल्पना, विजेचा इतिहास, एडिसनचे चरित्र, ओहमचा नियम, वायरींचे प्रकार आदी संकल्पना त्यांना शिकवण्यात आल्या. त्यांनी आपण केलेल्या कामाचा जमाखर्च काढला आणि झालेल्या कामाचा अहवाल मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांत लिहिला. त्या प्रयोगात विद्यार्थ्यांनी वायरिंगचे काम केले, त्याच्याशी संबंधित विज्ञानाचे अध्ययन केले, जमाखर्च लिहिण्याचे प्रशिक्षण घेतले आणि विविध भाषांतील अहवाल लेखनही केले. पोखरी शाळेतील विद्यार्थ्यांनी गावाच्या पाण्याचा वर्षाचा हिशोब मांडला. त्यांनी पर्जन्यमापक तयार केले, त्याद्वारे पडणाऱ्या पावसाचे मापन केले, गावातील ओढ्या-नाल्यांतून वाहणारे पाणी मोजले, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जनगणनेची माहिती मिळवली, प्रत्येक प्राण्याला साधारण किती पाणी लागते त्याची माहिती इंटरनेटवरून घेतली आणि त्या सर्व नोंदींद्वारे गावातील पाण्याचा जमाखर्च सादर केला. संगमनेर मधील ‘मालपाणी शाळे’तील विद्यार्थ्यांनी मेथी आणि पालक यांची पिके नुकतीच घेतली. अभ्यासक्रमातील बीज प्रक्रिया, खते, सिंचन पद्धती यांचा अभ्यास त्यांनी पीक घेताना केला. आलेली भाजी विकून त्यांनी ‌पिकाचा जमाखर्च मांडला. कार्यकेंद्री शिक्षण अशा प्रकारे बहुआयामी असते.

निव्वळ हाताने काम केले, की आपोआप बुद्धीला चालना मिळत नाही. त्यासाठी केलेल्या कामावर विचार करायला लागतो. का, कसे, कधी, केव्हा, कुठे असे प्रश्न विचारावे लागतात. प्रश्न पडायला लागले, की उत्तर शोधता येतात. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. ‌त्यामुळे त्याची लाज वाटण्यापेक्षा विज्ञान आश्रमाने ‘हमे पता नहीं, पर ढुँढ लेंगे!’ (एचपीएनपीडीएल) ही संज्ञा तयार केली आहे.

महात्मा गांधींनी ‘नई तालीम’द्वारे अशा कृतिशील शिक्षणाचा विचार मांडला होता. ‘विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित करण्याची जलद पद्धत म्हणजे त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणे’ असे गांधीजी म्हणत. उत्पादक कामातून शिक्षण देण्याच्या त्यांच्या विचारांकडे दुर्दैवाने आपण दुर्लक्ष केले. डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी गांधीजींचा हा शिक्षण विचार पुढे नेत तंत्रज्ञानावर आधारित उत्पादक कामे शाळेत शिकवण्याची संकल्पना प्रत्यक्ष राबवली. एरवी विद्यार्थ्यांना न आवडणारे गणित, विज्ञान आदी विषय प्रत्यक्ष कामाद्वारे शिकताना त्यांना आवडू लागतात हे त्यांनी स्पष्ट करून दाखवले.

उत्पादक कामातून शिकणे, प्रकल्पातून शिकवणे यासाठी शिक्षकाकडे विशेष कौशल्ये लागतात हा समज होता. वास्तविक ‘ओ ई आर’च्या मदतीने कुठल्याही शिक्षकाला असे शिक्षण देणे शक्य आहे. ‘ज्या कल्पनेची वेळ आली आहे तिला कोणीही थोपवू शकत नाही’ असे म्हणतात. नवीन शैक्षणिक संशोधनामुळे ज्ञानरचनावाद, प्रकल्पातून शिक्षण, कृतियुक्त शिक्षण या कल्पना स्वीकारल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे त्या सर्व कल्पनांच्या पुढे जाऊन शोषणमुक्त, अहिंसात्मक समाजासाठीची ‘नई तालीम’ची वेळ आली आहे असे वाटते.

विज्ञान आश्रम,
मु. पो. पाबळ, ता. शिरूर,
जिल्हा – पुणे, पिन कोड – 412413
दूरध्वनी – 0238 292326

संपर्क – रजनिश शानबाग – 9579734720.
ranajeetpallavi@gmail.com

(डॉ. योगेश कुलकर्णी, महाराष्ट्र टाइम्स, शनिवार, 22 फेब्रुवारी 2014 वरून उद्धृत)

About Post Author

2 COMMENTS

  1. अनुभव शिक्षण व्यक्तीला…
    व्यक्तीला अनुभव शिक्षण सर्जनशील बनवते, समृद्ध करते. त्यातून व्यक्तीबरोबर समाजाचीही प्रगती शक्य आहे. खूप छान काम आहे विज्ञान आश्रमचे.

Comments are closed.