पाचीपांडव डोंगराचे रहस्य

0
113
for frame

मळवंडी-ढोरे गावचा माळ आणि पलिकडे दिसणारी पाचीपांडव डोंगराची रांगडोंगर म्हटले की दर्‍याखोर्‍या, जंगल, संभ्रमात टाकणार्‍या पायवाटा आणि पशुपक्ष्यांची निवासस्थाने. पुण्यापासून सर्वसाधारणपणे साठ-सत्तर किलोमीटर पश्चिमेस मावळ तालुक्यामध्ये मळवंडी-ढोरे हे छोटे गाव आहे. गावाच्या दक्षिणेस पूर्व-पश्चिम दिशेस पसरलेला डोंगर बराच लांब आहे. तो इतर डोंगरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. गावाच्या सीमेनुसार ठरलेल्या त्या डोंगरात वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आढळतात. त्या स्थळांना तशीच नावेही आहेत. एकंदर माहितीवरून ती स्थळे प्राचीन आहेत. अनेक वयस्कर लोकांच्या मुलाखतींतून व चर्चेमधून बरेच काही समजले आणि त्यांपैकी महत्त्वाचे ठिकाण म्हणजे ‘पाचीपांडव’ डोंगराच्या माथ्यावर एक काळा खडक आहे, त्यामध्ये दोन हात खोल कपरेचा भाग आहे. आतमध्ये डोकावल्यास काळाकुट्ट अंधार दिसतो. कोणी आतमध्ये जाण्याचे धाडस करत नाही. तेथे पायर्‍यांची रचना आहे. तेथे रोजच्या वापरातील दगडी साहित्य आढळते. त्यामध्ये मोठे असे ‘दळणाचे जाते’ आढळते. पाच पांडव वनवासात असताना त्यांनी ठिकठिकाणी राहण्यास उपयुक्त स्थाने निर्माण केली. रोजच्या जीवनातील अत्यावश्यक गरजेच्या वस्तू निर्माण केल्या. त्यांपैकी काही त्या ठिकाणी आढळतात. म्हणून वाडवडिलांनी त्या स्थळाला ‘पाचीपांडव’ नाव ठेवले असावे!

पाचीपांडव डोंगराचा एक भागलहानपणी, असाच एक दिवस मोठ्या बहिणींबरोबर गुरांकडे (जनावरे सांभाळण्यासाठी) गेलो असताना त्या स्थळाशी जाऊन ठेपलो. त्या ठिकाणी वारा जोराचा वाहतो. अनेक ठिकाणी, अशा खोलवर स्थळांमध्ये प्रकाशाची विशेष व्यवस्था असते. परंतु अनेक वर्षांच्या घडामोडीनंतर ‘पाचीपांडव’ येथे प्रकाशाची व्यवस्था बुजली असावी. अंधारामुळे एकादृष्टीने स्थळाचा जास्त प्रमाणात फायदा झाला; तसाच तोटाही घडून आला. रस्त्याच्या कडेला किंवा लोकवस्तीजवळ आढळणार्‍या बर्‍याच स्थळांचा दुरुपयोग होतो; त्यामुळे त्या स्थळाची दुर्दशा होते. तसेच डोंगरात असल्यामुळे व छोट्या रचनेमुळे ‘पाचीपांडव’ स्थळ अनेक आक्रमणांपासून वाचले असावे. स्थळाची काहींना कल्पनाच नाही. भुताखेतांसारख्या अंधश्रद्धा व चोरांच्या भीतीमुळे क्वचितच त्या ठिकाणी माणसांची चाहूल लागते. तसेच त्यांमधील अंधारामुळे आत जाण्याचे कोणी धाडस करत नाही. अशा प्रकारे अंधाराचा फायदा आढळतो. तर अंधारामुळे स्थळ उपद्रवापासून बचावले. बर्‍याच प्रमाणात बाहेरील स्थितीवरून ते सुरक्षित दिसते. मात्र अंधारामुळे स्थळाचा अभ्यास झाला नाही. त्याची वैशिष्ट्ये, रचना, कालावधी, कलाकुसर; तसेच, त्याचे सौंदर्य, जडणघडण इत्यादींसाठी हे स्थळ वंचित राहिले आहे हा आणखी एक तोटा.

पाचीपांडव डोंगरावरून दिसणारे दृश्य . स्थळाच्या बरोबर खालच्या भागात छोटेसे मैदान आढळते. मैदानावर जागोजागी खडक आहेत. त्यांपैकी मध्यावरच्या खडकात मडक्याच्या आकाराचा वीतभर खोल खळगा आहे. त्याला खालून छोटासा झरा आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्याने सतत भरलेला असतो. तो कधीही ओसंडून वाहत नाही. भर उन्हात दातांना कळ लागावी एवढे थंड पाणी त्यात असते! खळगा रिता केला तरी तो काही वेळात पुन्हा भरतो. तहानलेले, मोळी घेऊन येणारे लोक, त्या ठिकाणी विसावा घेतात. त्या खळग्यामुळेच त्या मैदानाला ‘तळ्याचं पटांगण’ असे नाव पडले आहे.

माणूस उडून जाईल एवढ्या जोराचा वारा डोंगरमाथ्यावर वाहतो. त्या भागाला ‘सुळकी’ असे नाव आहे. टेकडीवर वीज पडून जो सूक्ष्मपणे मोजता येणे शक्य नाही एवढ्या खोल आकाराचा खळगा पडला. एवढ्या उंचावर असूनही त्यात सतत पाणी असते. त्या ठिकाणाला ‘कोटमा’ म्हणतात. या ठिकाणी लाकडासाठी गेलेली माणसे व गुराखी मुले पाणी, छानपैकी झाडांची सावली यांमध्ये जेवण उरकून आराम करतात.

पाची पांडव पावसाळ्यात डोंगरावरून असे झरे वाहतात. स्थळापासून खाली उताराचा भाग लागतो. त्यामुळे उतरणारा काही वेळातच दमतो. त्याची तहान भागण्यासाठी जणू काही निसर्गाने पाण्याची व्यवस्था केलेली आढळते. तो भाग साधारणपणे मध्यावर आहे. त्यामुळे जिवंत पाण्यावरूनच त्या स्थळाला ‘जिळ्हेपाणी’ हे नाव पडले असावे. त्या स्थळाचाही वापर आढळतो. तहानलेला वाटसरू पाण्यावर तृप्त होऊन परमेश्वराचे आभार मानतो. अशा प्रकारे उंचावरदेखील पाण्याची व्यवस्था असल्यामुळे स्थळाला महत्त्व मिळते.

डोंगरात उंच माथ्याच्या बाजूला दगडाची गाडी, माणसाची चित्रे, नवरा-नवरी असा संपूर्ण लग्नाचा थाट दगडांमध्ये कोरलेला आढळतो. खडक काही प्रमाणात एकसंध तर काहीसा अलगविलग आहे. यावरून तेथे लग्नाचे वर्‍हाड लुप्त झाले असावे असे सांगतात, त्याविषयी जास्त माहिती मिळत नाही. त्यामुळे हे का? कधी? व कसे? घडले असावे असा प्रश्न निर्माण होतो. असा हा वैशिष्ट्यपूर्ण डोंगर आमच्या गावाच्या हद्दीत येत असल्याने मला त्याविषयी अभिमान आहे!

महादेव कांबळे– भ्रमणध्‍वनी :- ९८९०३७६२४१
अमृतानगर सोसायटी, बिल्डिंग क्र. १२, प्लॅट – ९ ब,
माणिक बाग, सिंहगड रोड पुणे – ४११०५१

happymanmahadev@gmail.com

About Post Author