पाचवे साहित्य संमेलन – 1907

0
45
_pchave_Sanmelan

रावबहादूर विष्णु मोरेश्वर महाजनी हे पाचव्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष होते. पाचवे संमेलनही पुणे येथे 1907 साली भरले होते. विष्णु मोरेश्वर महाजनी यांचे सारे आयुष्य शिक्षण खात्यातच गेले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात महनीय कामगिरी केली. त्यांचा इंग्रजी वाङ्मयाचा व्यासंग वाखाणण्याजोगा होता. त्यांनी शेक्सपीयरच्या काही नाटकांची भाषांतरे केली. त्यांनी ‘ज्ञानसंग्रह’ नावाचे मासिक वयाच्या एकविसाव्या वर्षी, 1872 साली सुरू केले. त्यांनी ‘वऱ्हाड शाला-पत्रक’ हे मासिकही संपादित करून पाच-सहा वर्षें चालवले. 

त्यांनी ‘मनोरंजन’, ‘विविधज्ञान विस्तार’ यांसारख्या नियतकालिकांतून ज्ञानात्मक लेख लिहिले. ते निवृत्तीनंतर अकोल्यात स्थायिक झाले. त्यांचे सर्व आयुष्य वऱ्हाडात गेले. ते मराठीतील समीक्षक, कवी व नाटककार होते. त्यांनी काव्ये, नाटके, कादंबऱ्या, चरित्रे, प्रवासवर्णने इत्यादी वाङ्‌मयप्रकारांबरोबर अर्थशास्त्र, इतिहास, राजकारण, शिक्षणशास्त्र अशा विषयांवर ही मार्मिक समीक्षणे लिहिली आहेत.

त्यांना सामाजिक कामाची आवड होती. ते धारवाड येथे भरलेल्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. ती सामाजिक परिषद 1904 साली भरली होती. महाजनी यांचा जन्म पुणे येथे 10 नोव्हेंबर 1851 रोजी झाला. महाजनी यांचे शालेय शिक्षण धुळ्यात व उच्च शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. त्यांनी एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले होते. महाजनी हुशार विद्यार्थी होते. ते पदवीधर 1869 साली झाले.त्यांची बी ए झाल्यावर फेलो म्हणून नेमणूक झाली होती. त्यांनी व-हाडातील अकोला येथे शिक्षकाची नोकरी सुरू केली. ते नोकरी करत करत एम ए 1873 साली झाले. त्यांना त्यांच्या व्यासंगामुळे आणि शिकवण्याच्या पद्धतीमुळे शिक्षणक्षेत्रात मोठे नाव मिळाले. ते शिक्षण खात्यात एज्युकेशनल इन्स्पेक्टर पदापर्यंत प्रथम चढत गेले; नंतर ते त्या खात्याचे डायरेक्टर 1901 साली झाले. महाजनी यांनी शेक्सपीयरच्या तीन नाटकांची मराठीत भाषांतरे केली आहेत. त्यांनी शेक्सपीयरच्या नाटकांतील पात्रांवर मराठी परिवेष चढवला. त्यांची ‘तारा’, ‘मोहविलसित’, ‘वल्लभानुनय ही’; तसेच, ‘बंगल्यातील जमीनदारी वहिवाट’ आणि ‘स्वतःचा प्रयत्न’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली. ‘कुसुमांजली’ हा त्यांचा काव्यसंग्रह. त्यांचे काही इंग्रजी कवितांचे भाषांतर उपलब्ध आहे. त्यांनी टीका लिहिली. ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले होते, की “एक गोष्ट मराठी ग्रंथकारांनी चांगली लक्षात ठेवली पाहिजे. ती ही, की आपले वाङ्मय मराठी आहे, राष्ट्रीय आहे. म्हणजे महाराष्ट्रांतर्गत सर्व लोकांचे आहे. केवळ ब्राह्मणांचे नव्हे किंवा त्रैवर्णिकांचे नव्हे. ते महाराष्ट्रातील साऱ्या जातींच्या, साऱ्या धर्मपंथीयांच्या, लोकांचे आहे. म्हणून लेखकाचे सर्व लेखन राष्ट्रीय बुद्धिपोषक पाहिजे.” विष्णु मोरेश्वर महाजनी जेव्हा 1868 साली डेक्कन कॉलेजात शिकत होते तेव्हा विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांचे सहाध्यायी होते. महाजनी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा वर्ड्स्वर्थ, ऑक्झनहॅम, कीलहॉर्न, केरूनाना छत्रे, चिंतामणशास्त्री थत्ते या प्राध्यापकांचा आणि अनंतशास्त्री पेंढारकर यांसारख्या विद्वानांचा, होता. कर्नल कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कविसंमेलन जळगाव येथे 1907 साली भरले होते. महाजनी यांनी ‘कवी आणि काव्य’ या विषयावर त्या संमेलनात दिलेले व्याख्यान गाजले होते.  त्यांचा मृत्यू 16 फेब्रुवारी 1923 साली झाला.

-वामन देशपांडे
(रेखाचित्र – सुरेश लोटलीकर)

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here